Sunday, May 17, 2009

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो.आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक,ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात.लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात. पण शिरोडं येण्यापूर्वी वेंगुर्ल्या मार्गे आजगांवला जायचं झाल्यास वाटेत मोचेमाडची नदी लागते.ती नदी पार करून जावं लागतं.

ह्यावेळी मी मोचेमाडला जरा उसंत घ्यायचा विचार केला.गरम गरम कांद्याच्या भजांचा वास आल्याने मी त्या ” हाटलात” शिरलो.एक प्लेट भजी आणि कपभर चहाची ऑर्डर दिली.जवळच पडलेलं लोकल वर्तमानपत्रात वाचत असताना,
“भावड्या मोचेमाडकराची खानावळ” अशी जाहिरात वाचली.मनात आलं “आपल्या” मुंबईला रहाणारा बाबल्या मोचेमाडकरची तर ही खानावळ नसेल ना?
“हाटलात” गल्ल्यावर बसलेल्या मॅनेजरकडे चौकशी केल्यावर कळलं की हो ती त्यांचीच खानावळ आहे.भावड्या हे बाबल्याच्या वडलांचं नाव.चाचपत चाचपत त्या पत्यावर गेलो.आणि खानावळीत डोकावून पाहिलं.
उघडा बंब खाली स्वच्छ पांढरा पंचा नेसून मला जवळ जवळ मिठी द्यायला तयार असलेला बाबल्या,
“अरे,तू हंय खंय?”
असा टिपकल मालवणीतून प्रश्न विचारीत माझ्या समोर येऊन ठपकला.
मी म्हणालो,
“बाबल्या,ह्याला म्हणतात, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी”
अरे मी विचार करीत होतो दुपारचं जेवण कुठे घ्यायचं?मी पेपर काय वाचतो आणि तुझी खानावळ काय जाहिरातीत दिसते?”
” मग चल जेवायला बस.मोचेमाडच्या नदीच्या खाडीतले गुंजूले आहेत,वेंगुर्ल्याहून मस्त पैकी सुरमई आणली आहे,गुंजूल्याचं तिखलं आणि सुरमईची तळलेली कापं खाऊन नंतर मस्त गप्पा मारूया.
अरे हो पण तू “घुटूं ” घेत नाहीस ना?पण हरकत नाही आज सोवळ्या ब्राम्हणाबरोबर पंगत आहे समजेन.”
हे बाबल्याचं आग्रहाचं भाषण ऐकून ते मालवणी जेवण मी कसं अव्हेर करणार?.
मी म्हणालो,
“असे योग पुन्हा पुन्हा येत नसतात.सर्व मंजूर आणि तू हवं तर तुला घूटू घेऊं शकतोस”
मालक आणि गिर्‍हाईक एकाच टेबलावर बसून मास्यांवर ताव मारायला लागलो. जेवणावर ताव मी मारत होतो आणि बाबल्या घूटूं चवीने पीत होता. तीरफळं घालून नारळ्याच्या जाड रसातलं तिख्खट तिखलं आणि उकड्या तांदळाचा गरम गरम भात मला एका तंद्रीत नेत होता तर बाबल्याची तंद्री जुन्या आठवणीच्या विश्वात त्याला घेऊन जात होती.
दुपारची वेळ असल्याने जेवायला दुसरी गिर्‍हाईकं येऊन जेवून जात होती.
“तू मुंबई सोडून लहान वयात इकडे आलास आणि आम्हाला विसरलास”
असं मी जरा लागट बोलल्यावर बाबल्या शेवटचा घुटूचा घोट संपवून मला म्हणाला,
“एव्हडं रातांब्याच्या सोलाचं सार आणि भात जेऊन घेतो आणि आपण वर माडीवर जाऊन गप्पा मारुया.”
माडीवर गेल्यावर बाबल्या बोलू लागला,
“त्यावेळी आम्ही मोचेमाडच्या नदीच्या खोर्‍यात ह्या गावात खानावळ काढली होती. मी त्यावेळी टीनएजर वयात होतो.मुंबईच्या शहरी वातावरणात वाढलेला मी ह्या खेड्यातल्या वातावारणात येऊन जरा बुजलो होतो.तसं मला शहरातून ह्या खेडवळ वातावरणात यायला आवडलं नव्हतं असं नाही.उलट मला नदी,नदीतल्या होड्या-खपाटे,मासे मारण्याच्या आणि जाळी टाकून मासे पकडून गावात विकायला आणण्याच्या कामात मजा यायची.”
हे ऐकून मी बाबल्याला म्हणालो,
“आजुबाजूचा डोंगराळ प्रदेश आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी हिरवी गार भाताची शेतं,डोंगर्‍याच्या माथ्यापासून खालपर्यंत त्या झाडांच्या गर्दीत काजूच्या झाडांची झूडपं, करवंदाची काटेरी झूडपं,झाडयाआब्यांची उंचच उंच झाडं,गावातल्या गुराख्यांनी चरण्यासाठी आणलेली गाई-गुरं आणि शेळ्या-बकर्‍या हे वातावरण पाहून कुणाही शहरातल्या सिमेंटकॉंक्रीटच्या जंगलात वाढलेल्या तुझ्या-माझ्या सारख्याला भारावून न गेल्यास नवलच म्ह्टलं पाहिजे.”
माझं हे आजूबाजूच्या प्रदेशातलं सृष्टीसौंदर्याचं वर्णन ऐकून मला बाबल्या म्हणतो कसा,
“तू पण माझ्या बरोबर त्यावेळी यायला पाहिजे होतं.मग तुझं कवी मन आणि माझं वाचनाचं वेड यातून काहीतरी घडलं असतं.”
मी म्हणालो,
“बाबल्या अजून तू ह्या खानावळीचा व्याप सांभाळून वाचनाचं वेड चालूंच ठेवलं आहेस कां?”
“अरे मी ह्या गल्यावर बसून चिं.त्र्यं.खानोलकर,मंगेश पाडगांवकर,वि.स. खांडेकर ह्यांची जवळ जवळ सर्व पुस्तकं वाचून फस्त केली आहेत.आरती प्रभू या नावाने चिं.त्र्यं.नी लिहिलेली कवितेची पुस्तकं त्यावेळी तू आणि मी आवडीने वाचायचो.आठवतं तुला?
“ये रे घना ये रे घना” ही कविता आणि लता का अशाने ते गायलेलं आणि श्रीनिवास खळ्यांचं संगीत ऐकायला काय मजा यायची.अजून ते गाणं कधीकधी रेडोयोवर लागतं.”
असं मी म्हणाल्यावर,बाबल्या आपल्या आयुष्यातल्या गंमती सांगू लागला,
“परंतु,मी आमच्या नवीन थाटलेल्या आमच्या फॅमेलीबिझीनेसला तसा तयार नव्हतो. त्या आव-जाव टाईपच्या लोकांच्या खानावळीत जेवायला येण्याच्या रोजच्या संवयीला मी मनापासून तयार नव्हतो. मुंबईतल्या त्या शहरातल्या विस्मयजनक आश्रीत असलेल्या जीवनशैलीशी आणि ह्या गावातल्या वातावरणाशी तुलना होऊच शकत नाही.
त्या वयात ह्या लोकांकडून काही चमत्कारीक घटना,गडबड असावी अशी वागुणूक आणि विस्मयजनक संकेत पहात असायचो.
एखाददिवशी मी अक्षरशः डोळ्यात पाणी आणायचो.एकदा मी माझ्या आईला विचारलं पण,
“आई हे लोक कुठून कुठून येतात गं!”
एक उदाहरण म्हणून सांगतो,
“तुम्ही मुलाला नदीत पोहायला पाठवू नका.कोणतरी म्हणत होतं की, मोचेमाडच्या नदीत मोरी-मुशी सारखे मांसे आहेत.”
असले बिनबुडाचे सल्ले माझ्या आईला द्यायचे.
मला माहित होतं की ह्या मोरी माशाला इंग्रजीत shark म्हणतात.हा मासा बहुदा खार्‍या पाण्यात असतो.आणि त्याला गोड्या पाण्यातले मासे खायला आवडत नाही. मोचेमाडच्या नदीचं पाणी अर्थात गोडं होतं,मोरी मासा समुद्रात पोहणार्‍या माणसांच्या शरिराचे लचके तोडतो.एव्हडीच भिती घालून मला नदीतल्या मजेदार जीवनापासून माझी फारकत करायला ही मंडळी पहात होती.मला खूप राग यायचा.
ही लक्षात आलेली एकच घटना मी तुला सांगितली. अश्या अनेक गोष्टी हे लोक जेवायला आले की करायचे. अश्या तर्‍हेच्या गोष्टी त्या वयात ऐकून आणि मिळालेला अनुभव घेऊन कुणालाही मनुष्याच्या शक्की स्वभावकडे बघून माझ्या सारख्याला त्यावेळी ह्या लोकांचं कौतूक वाटायचं आणि राग ही यायचा.
मला वाटायचं की हे लोक अज्ञानी आहेतच त्याशिवाय बुद्दु असून जागे असताना झोपेत चालल्यासारखं स्वतःच्या दिनक्रमात करीत असतात. मी मात्र ह्या लोकांपेक्षा नक्कीच तल्लख होतो.

पण जसं वय वाढत चाललं होतं तसा मी जास्त नम्र होत होतो.एक कारण की मी जसा जगात वावरायला लागलो तसा मी एखाद्या मठ्ठ व्यक्तिसारखा विस्मयजनक चूका करायला लागलो.मुख्यतः मी चलाख लोकांच्या सहवासात राहून चलाख व्हायला लागलो पण तसं पाहिलं तर आम्ही सर्व अजून मठ्ठच होतो.हळू हळू माझ्या लक्षात यायला लागलं की आपण बरेच जण असेच बर्‍याच गोष्टीबद्दल आणि बरेच वेळा संभ्रमात असतो.”
हे बाबल्याचं चिंतन ऐकून मी समजलो की बाबल्याचं घुटूं नक्कीच उतरलं होतं. आणि तो अगदी खुशीत येऊन बोलत होता.
“तसं पाहिलंत तर मानवाचा इतिहास ही एक अज्ञानता आणि पागलपणाची नामावली म्हणावी लागेल.आणि रोजचीच त्यात नवीन प्रकारच्या भयाची भर होत असते.पण हा इतिहास इतका सदोष असला तरी सगळेच भुकेने मरत नाहीत, बरेचसे तरूण भयंकर रोगाने मरत नाहीत,जीवन चालूच असतं.जरी ते जीवन उत्कृष्ट नसलं तरी बरचसं यथोचित असतं.”
मी बाबल्याला म्हणालो,
“आपल्याला शेती करता येते,दवादारू,संगीत,आणि कलेचं सानिध्य आहे. आता तर इंटरनेट आहे,टीव्ही आहे रेडियो आहे. जरी आपल्या अतृप्तीची आणि अपेक्षांची मोजमापं केली तरी ती समाधानकारक वाटतील.”
मला बाबल्या म्हणाला,
“तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती अशी की ही सर्व फलश्रुती “त्यांची” आणि “ते” लोक जे अज्ञानी आणि बुद्दु असे मला वाटले आणि ज्यानी माझ्या किशोरावस्थेत माझं जीवन हराम केलं त्यांची आहे.
मी मात्र चकित करणार्‍या ह्या मानवी आचारशिष्टतेची ही बलवत्ता मानतो. ही आचारशिष्टता जरी लडखडणारी, विपत्तीच्या सीमारेषेवर असणारी,दोन पाउलं पुढे आणि एक पाऊल मागे असलेल्या घोळात असलेली जरी भासली तरी असं असून सुद्धा आपण सर्व सांभाळून घेत आहोत.खरंच हे आश्चर्य करण्यालायक आहे.”
मी म्हणालो,
“अरे तुझी खरंच कमाल करावी लागेल.ह्या खानावळीच्या धंद्यात राहून सुद्धा तू तुझी साहित्यीक विचारसणी जास्त राखून ठेवली आहेस,हे अचंबा करण्यासारखे आहे.”
माझं हे ऐकून मला बाबल्या जरा मान उंचावून कॉलर ताठ केल्याचा बहाणा करून-कारण तो अजून वरून उघडाच होता-म्हणाला,
“हे तुझ्याकडून ऐकून मला बरं वाटतं.खरं सांगायचं तर चिं.त्र्यां.ची पण अशीच खानावळ कोकणातच होती.पण त्यांच धंद्यात लक्ष लागेना म्हणून ते सर्व गाशा गुंडाळून मुंबईला गेले.आणि मग ते साहित्यात किती नावजले हे तुला माहित आहेच?”
बोलण्यात वेळ कधीच निघून गेला होता.मला संध्याकाळची मोचेमाड ते शिरोडा ही एसटी गाठायची होती.आणि तिकडून तीन मैलांची पायी रपेट आजगांव पर्यंत करायची होती.
लगबगीने उठत मी बाबल्याला म्हणालो,
“परत येताना वेळ साधून तुझ्या खानावळीत जेवायला येतो.आजचं जेवण मस्तच होतं”
“येण्यापूर्वी फोन कर.म्हणजे खाडीतली ताजी सफेद सुंगटं घेऊन ठेवतो आणि मस्त सुंगटाची आमटी करतो आणि पेडव्याचं सूकं करून ठेवतो.मग परत चिं.त्र्यं.खानोलकरांवर आणि आरती प्रभूवर गप्पा मारूया?”
असं म्हणून झाल्यावर मला सोडायला बाबल्या एसटी स्टॅन्डवर आला.मात्र वरती खादीचा सदरा आणि गांधी टोपी घालायला आणि नेसता पंचा सोडून पांढरं स्वच्छ धोतर नेसायला विसरला नाही.
एसटी सुटता सुटता मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
“बाकी एखाद्या मंत्र्याक लाजवशीत असो दिसतंस हां!”
हे ऐकून हाताने बाय बाय करणार्‍या बाबल्या मोचेमाडकराचा हंसरा निष्पाप चेहरा बघून मी मनात पुटपुटलो,
“बिचारा बाबल्या”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com