Wednesday, June 23, 2010

घरगुती जेवण.

“आज तरी मालवणी जेवणाची मजा लुटूया”

त्यादिवशी दादरला दुर्गाश्रमात जाऊन मालवणी जेवण जेवायची मला हुक्की आली होती.नंदाच्या-माझ्या भाचीच्या-घरी तिला आणि तिच्या नवर्‍याला, मला कंपनी द्या,म्हणून फोनवर कळवून त्यांना न्यायला घरी येतो म्हणून सांगीतलं.दादरला जाताना वाटेत, बाहेर जेवण्याच्या संवयीवर, विषय निघाला.

मला नंदा म्हणाली,
“अलीकडे आम्ही बाहेर जेवायचं टाळतो.आता तुम्ही आग्रह करून बोलावलंत म्हणून तुमचं मन मोडवेना.पण आम्ही दोघं ठरवून बाहेर जेवायला जायचा अलीकडे विषयच काढीत नाही.”

“का असं काय झालं? घरगुती जेवणाची सर बाहेरच्या जेवणात येत नाही हे मला मान्य आहे.पण कधीकधी बायकानाच घरचं जेवण करून करून कंटाळा येतो.”
मी नंदाला असं सांगून बाहेर जेवायला नजाण्याचा तिचा निर्धार कोणत्या कारणामुळे झाला हे काढून घेण्याच्या उद्देशाने बोललो.

“एक मी मान्य करते की कंटाळा आला म्हणून कधीतरी बाहेर खानावळीत जाऊन जेवण्याचं तुम्ही म्हणता तसं एक कारण आहे.तसंच बाहेरच्या जरा निराळ्या वातावरणात जेवायलाही एक मजा असते.”
असं म्हणून थोडा विचार करीत आणि आणखी सांगू की नको असा काहीसा चेहर्‍यावर अविर्भाव आणीत नंदा म्हणाली,
“का कुणास ठाऊक,उलट अलीकडे मला जेवण्यासाठी बाहेर जाण्याचाच कंटाळा यायला लागला आहे.माझी आजी आजारी झाल्यापासून तिची जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून मी बरेच दिवस घरीच जेवण करते.गेल्या महिन्यात जेव्हा आजी हॉस्पिटलात गेली होती, त्यावेळी हॉस्पिटलातलं जेवण असलं तरी आणि नर्सीस तिला भरवत असले तरी स्वतःच्या हाताने जेवणार्‍या माझ्या आजीला कुणा परक्याकडून भरवलेलं पाहून मला खूपच वाईट वाटलं.आणि आजीला ते जेवणही आवडत नसल्याचं मी पाहिलं.डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांच्या सुचनेप्रमाणे मी घरीच जेवण करून हॉस्पिटलात आणीत होते.
शरीराने क्षीण झाल्याने स्वतःचं जेवण जेवायला कष्ट होत असलेल्या आपल्या आजीला हॉस्पिटलात असताना चमचा,चमचा घरचंच जेवण भरवण्यासारखी दुसरी विनयशीलता नसावी.असं माझ्या मनात आलं.”

घरगुती जेवणाच्या महत्वाची नंदाकडून होणारी प्रशंसा ऐकून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.मी नंदाला म्हणालो,
“लहानपणी मला घरी बनवलेल्या जेवणाबद्दल विशेष वाटायचं.प्रचंड उकाडा होत असताना बाहेरून घरात आल्या आल्या फ्रिझमधे आईने ठेवलेलं जेवण,काढण्यापूर्वी फ्रिझचं दार उघडून जेवण बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना फ्रिझमधून थंड गार हवेचा तेव्हड्या पुरता अंगावर येणार्‍या त्या भपकार्‍यामुळे मन प्रसन्न होत असता असता मागून माझ्या आजीने येऊन,
“जपून काढ रे!”
म्हणून ओरडून सांगीतल्यावर आपल्या मायेच्या माणसाचं छत्र डोक्यावर आहे हे समजल्यावर आणखी बरं वाटायचं.
मनात कसलाही संताप असताना जेव्हा तुम्ही थकून-भागून शेवटी घरी येता तेव्हा आदल्या दिवशी खाऊन उरलेलं झणझणीत मटन फ्रिझमधे तुमची वाट पहात आहे हे लक्षात आल्यावर वाटायचं,जणू माझ्याजवळ वाच्यता नकरता ते मटण मला म्हणतंय,
“मी वाटच पहात होते तुझी!”

नंदाच्या नवर्‍यालाही आपला अनुभव सांगावासं वाटलं असावं.तो म्हणाला,
“घरी बनवलेला एक एक कप गरम गरम चहा आणि डीश भरून गरम गरम चवदार तिखट भजी, बर्‍याच दिवसानी भेटलेल्या मित्र-मैत्रिणीबरोबर गप्पा करताना सप्पा करायला मिळणारं सुख आगळंच म्हटलं पाहिजे.
आईने केलेल्या चकल्या फस्त करून झाल्यावर डब्यात उरलेला चूरा सुद्धा कधी कधी कामाला येतो.तसंच,मामुली आजार आल्याने,घरी अंथरुणावर पडून रहायला जबरदस्ती झाल्याने दिवसातून तिनदा प्यावा लागणारा उकड्या तांदळाचा निवळ,किंवा पेज ढोसल्यावर आजार, **त शेपटी घालून पळून जातोच.”

नवर्‍याचा प्रतिसाद पाहून नंदा जरा खुलून आलेली दिसली.नवर्‍याचं बोलणं संपता संपता म्हणाली,
“आई आणि तिची मुलगी एकत्र येऊन, हंसून-खिदळून,गोपनीय बाबीत सहभागी राहून,वेळ पडल्यास डोळे ओले होऊ देऊन, जीवश्च-कंटश्च असलेल्यांसाठी जेवण करण्यात वेळ घालवण्यासारखं पवित्र कर्म नाही.
ते क्षण बहुमूल्य आणि क्षणिक असल्याने माझ्या अंतरात ते मी अनमोल रत्न समजून राखून ठेवते.मला वाटतं, प्रेमाला मूर्त स्वरूप त्यावेळी येतं ज्यावेळी आपले प्रियजन आपल्या घरी येण्याच्या अपेक्षेत असताना त्यांना आवडणारं जेवण करण्यात आपण मग्न होतो.अशावेळी थोडसं जास्त जेवण करून त्यातलं थोड शेजारच्या एकट्याच असलेल्या काकांना किंवा काकींना देण्यात माणसातलं दयाळूपण दाखवायला मला बरं वाटतं.”

“तुमच्याच जवळच्या कुणीतरी तुमच्या जेवणाची वारेमाप स्तुती केल्याने आणि पुन्हा पुन्हा खाण्याची मनिषा दाखवल्याने तुमच्या मनात वाटणार्‍या समाधानी सारखी दुसरी समाधानी नसावी.आपलं असलेलं विश्व थोडं सुलभ होण्यासाठी,थोडं कनवाळू होण्यासाठी,थोडं जास्त सौम्य होण्यासाठी घरगुती जेवणात निराळीच क्षमता असते.”
असा माझा मुद्दा सांगेपर्यंत दुर्गाश्रम जवळ आल्याचं पाहून मीच नंदाला म्हणालो,
“आज तरी मालवणी जेवणाची मजा लुटूया”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com