Monday, June 21, 2010

शांततेबद्दल मला विशेष वाटतं.

“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं, तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.”

आज प्रो.देसायांना तळ्यावर भेटल्यावर मी म्हणालो,
“भाऊसाहेब,सध्या जगात गजबजाटच खूप होत आहे.विमानांच्या आवाजापासून,अतिरेक्यांच्या बॉम्ब फुटण्यापर्यंत कानठिळ्या बसेपर्यंतचे आवाज आहेतच त्याशिवाय रस्त्यावरचे मोर्चे,मिरवणूका,विसर्जनं,सणावारी किंवा आनंद किंवा विजय प्रदर्शित करण्यासाठी केलेली फटाक्यांची आतषबाजी आणि त्यातून निघणारे कर्कश आवाज ऐकून शांततेचं महत्व मला प्रकर्षाने जाणवतं.तुमचं काय म्हणणं आहे.?”

प्रो.देसाई चेहर्‍यावर हंसू आणून मला म्हणाले,
“शांततेची अनुभूति मला खूप आवडते.एखाद्या तळ्याच्या परिसरात कुंद आणि धूसर हवेचं वातावरण कसं असतं तसं वाटतं. मला वाटतं अगदी मुळ वास्तविकतेवर प्रचंड शांत वातवरण कुरघोडी करू शकते.समयाला क्षणभर रोखून ठेवण्यात, संवेदनेत बदलाव आणण्यात आणि वस्तुस्थितीत बळ आणण्यात किंवा तिचा नाश करण्यात शांततेच्या अंगी क्षमता असते.
शांततेचं पूर्णत्व बघून मला तिच्या विषयी खास वाटतं.जसा पांढरा प्रकाश हा सर्व रंगाच्या वर्णक्रमामुळे बनला आहे तशीच शांततासुद्धा व्यापक स्वरूपाची असते.तुम्ही म्हणता ती शातंता भंगाची उदाहरणं सोडाच,व्याख्यान किंवा संभाषणाच्यापलीकडे जाऊन भाषेच्या सीमेला शांतता डावलून टाकू शकते.”

मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“पण मला शांततेची दुसरी बाजू आठवते.आठवणीत ठेवण्यासारखी शांततेशी सामना करण्याची माझी पहिली वेळ मला शाळेत शिकताना आली.शाळेत न्यायिक पद्धतिचा भाग म्हणून शांततेची संस्थापना झालेली असते.वर्गातल्या एखाद्या मुला्च्या गैरवागणूकीला -वर्गाच्या शेवटच्या बाकावर दोन हाताची घडी घालून अर्धातास शांत बसवून ठेवण्यात- उत्तर दिलं जातं.मी माझ्या शाळेतल्या जीवनात ह्या मानहानीच्या तख्तावर बसण्यापासून टाळलं. पण ह्या तख्तावर स्थानापन्न होणार्‍या काही कमनशिबी मुलांबद्दल मी नेहमी ऐकत असायचो.मला वाटतं शांततेचा उपयोग त्यावेळी भयभीतिसाठी केला जायचा.”

माझं शांततेविषयीचं मत ऐकून भाऊसाहेबांना संगीतातली शांतता आठवली.प्रो.देसायानी त्यांच्या तरूणपणात संगीताचे धडे घेतले होते ते मला त्यांच्या या स्पष्टीकरणावरून आताच कळलं.
ते म्हणाले,
“शाळेतल्या ह्या शांततेच्या भयभीतिबद्दलच्या तुमच्या उदाहरणावरून मला ही मी तरूण वयात संगीत शिकतानाची आठवण आली. संगीताचे धडे घेताना माझ्या गुरूजींकडून शांततेविषयी बरीच माहिती मिळाली होती.पाव श्रूति,अर्धी श्रूति आणि पूर्ण श्रूतिची शांतता म्हणजे काय ते मी शिकलो होतो.मला शिकवलं गेलं की ह्या ठरवून वापरलेल्या शांततेच्या श्रूत्यांची संगीतात आवश्यक्यता असते.संगीताच्या संरचनेत पूर्वानुमान आणि अत्यावशकता यांची भर असणं जरूरीचं असतं.माझे संगीताचे गुरूजी सांगायचे की, संगीत रचना करणारे दर्दी संगीतकार आपल्या प्रसिद्ध रचनेत तीन लयी मधली शांतता संभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे.खरं म्हणजे कुठचंही संगीत म्हणजेच शांततेत आलेली बाधा म्हणायला हवी. जिथे संगीत संपतं तिथे शांततेला सुरवात होते.परंतु,निसर्गाचे मुळ नियम स्पष्ट केल्याशिवाय संगीत आणि शांतता यामधलं विभाजन दाखवता येत नाही.”

“मी जरका शांततेविषयी तुमच्याशी बोललो नसतो तर दोन गोष्टीना मी मुकलो असतो.”
मी प्रो.देसायांचे आभार मानत म्हणालो.
आणि त्यांना सांगीतलं,
“पहिलं म्हणजे,तुम्ही तुमच्या तरूणपणी संगीत शिकत होता हे मला नव्यानेच कळलं.आणि दुसरं म्हणजे संगीतात पण शांतता असते हा विरोधाभास आजच तुमच्याकडून कळला.”

“असं असेल तर मग तुम्हाला मी माझ्या शाळेतल्या वरच्या वर्गातल्या अनुभवाची आणखी माहिती सांगतो”
असं सांगून प्रो.देसाई म्हणाले,
“मी शाळेच्या वरच्या वर्गात असताना माझी मतं आणि माझ्या धारणा यांचा इतरांशी सहभाग करताना माझ्याकडून व्यवहारिकतेसाठी शांततेची मनोहरता गमवली जायची.तुम्हाला सांगतो शांतता,वादविवादावर जय आणू शकत नाही.मला अजून एखादा भाषा शिकवणारा शिक्षक पहायचा आहे की जो कोरा कागद एक वैध निबंध म्हणून स्वीकार करील. काही बाबतीत शांतता ही त्रुटिशी संबधित असते असं समजलं जातं.कधी कधी शांतता
म्हणजेच आत्मविश्वासाचा किंवा ज्ञानाचा आभाव असणं असं समजलं जातं.अनेक आकर्षक बाबींसारखी शांततासुद्धा वास्तविकतेच्या आवश्यकतेची मागणी झाल्यास थोडी हतबल होते.”

“परंतु,शांततेतला हा विरोधाभास तिचं महत्व मुळीच कमी करीत नाही उलट वृद्धिंगत करतो.”
शांततेचं महत्व मला प्रकर्षाने जाणवतं हे म्हणणारा मी शांततेची बाजू न घेऊन गप्प कसा राहू? हे मनात आणून,मी भाऊसाहेबांना शेवटी म्हणालो,
“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.”

आता तळ्यावर बराच काळोख झाला होता.पुढे कधीतरी ह्याच शांततेच्या विषयावर प्रो.देसायांकडून आणखी माहिती मिळवण्याच्या निर्धाराने मी विषय इथेच संपवता घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com