Friday, June 4, 2010

आगावू केलेली परतफेड.

“जेव्हडं म्हणून खोलवर जाऊन दुःख तुमच्या मनात कोरलं जातं, त्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही तुमच्यात सामावून घेऊ शकता.”
असं कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं.हे म्हणणं तुझ्या बाबतीत जास्त लागू पडतं असं मला वाटतं.”
मी मेघनाला सांगत होतो.

“माणासा-माणसातली नाती, सभोवतालचं सौंदर्य,उत्कृष्ट मैत्रीतली मुल्यं,दुनियाने प्रदान केलेला बहुमूल्य ठेवा या सर्वांकडे डोळे,कान आणि मन उघडं ठेवून पहाण्यात मी विश्वास ठेवते.”
असं ज्यावेळी मेघना मला म्हणाली त्यावेळी मला सांगावं लागलं.

मेघना मला पुढे म्हणाली,
“अगदी स्वतःपूरतंच पाहिलं तर मला असं वाटतं की जीवनाकडून मिळणार्‍या समाधानासाठी जीवनच मला आगाऊ फेड करण्याची संधी देतं.परिश्रम जेव्हडे कठीण असतील,भार जेव्हडा वजनदार असेल,दुःख जेव्हडं तीव्र असेल किंवा परिक्षा जेव्हडी कठीण असेल, तेव्हडं हे इनाम उत्कृष्ट असतं.
निष्पत्ती म्हणून,जेव्हा काही अघडीत घडतं,जेव्हा काही अनपेक्षीत असताना वाईट होतं,अशावेळेला मला जाणवतं की काहीतरी चांगलंच होण्याच्या मार्गावर आहे.माझं मन कधीच विचलीत झालेलं नसतं.कारण मला माहित असतं की काहीतरी चांगलं होणार आहे.लहानपणी मला पडणारी स्वपनं आता सत्यात उतरत आहेत.
सुखी संसार,हंसती-खेळती मुलं,मित्रमंडळीना यावसं वाटणारं,त्यांना आमंत्रीत करणारं घर ही कुठच्याही गृहिणी्ची मोठ्यात मोठी पूर्ती असते.”

मेघनाचा नवरा गेली दोन वर्ष अमेरिकेत अधीक शिक्षणासाठी गेला आहे.आता सहा महिन्यात तो परत येणार आहे. तेव्हा हे सहा महिने अमेरिकेत आपल्याबरोबर रहाण्यासाठी त्याने मेघनाला बोलावलं आहे.आणि तिचं तिकीट पण पाठवलं आहे. मला जेव्हा हे कळलं तेव्हा ती अमेरिकेत जाण्यापूर्वी माझ्याकडे चहापाण्याला म्हणून मी तिला बोलावलं होतं.त्यावेळी आमचा हा संवाद चालला होता.

मेघना सांगू लागली,
“फार पूर्वी पासूनची माझ्या मनातली प्रार्थना मला कोड्यात टाकण्यासारख्या निर्णायक क्षणाला आणून सोडीत आहे. त्याच प्रार्थनेने मला सुखी संसाराचा,मातृत्वाचा,आणि मला वाटतो तसा विवेकपूर्ण समतोल ठेवून घरात आणि बाहेर वावरण्याचा मार्ग दाखवला आहे.ही अंधश्रद्धा नव्हे तर माझ्या मनातला अटल दृढविश्वास असल्याने,मी अत्युत्तम भविष्याची अपेक्षा सतत करावी असं मझ्या मनात येत असतं.”

मला जे काही श्रद्धेबद्दल वाटतं ते मेघनाला सांगावं म्हणून मी म्हणालो,
“इतर कुठल्याही स्वाभाविक शक्ती प्रमाणे श्रद्धेवर जास्त भर देत गेलं की श्रद्धा जास्त मजबूत होते.प्रत्येकाने नेहमीच आपली श्रद्धा कार्यान्वित करीत रहावं.जसं कार्य सिद्धीला जातं तशी श्रद्धा गूढ होत जाते.”

माझा विचार मेघनाला पटलेला दिसला.आपल्याला काय वाटतं ते सांगण्यासाठी,थोडा विचार करून मेघना मला म्हणाली,
“मला वाटत असतं की,आपल्या परिस्थितिकडे, आपल्याला येत असलेल्या विचारातून होणार्‍या स्पष्टीकरणाने,आपण पहात असल्याने, मी असकारात्मक वृत्तिपासून दूर रहाण्याच्या प्रयत्नात असते. काही तरी चांगलं होणार हे मनात असल्याने आशापूर्ण दृष्टी मी ठेवीत असते. अशी वृत्ति हा श्रद्धेचा दुवाच असून मी अतिशय कठीण परिस्थितितून जात असताना,वेळोवळी ह्या गोष्टीचा विचार करीत असते.
मी कठीण प्रसंगात असताना,आणि कोणत्याही तणावाखाली असताना,माझी श्रद्धा सतर्क ठेवल्याने ती आपोआप माझ्या कामाला येते.जसं धुक्याने भरून गेलेल्या समुद्रावरच्या वातावरणात समुद्राची भरती दिसल्याशिवाय रहात नाही तसंच काहीसं होतं. भरती दिसली नाही तरी ती येणार आहे हे माहित असतं.हे सर्व “आगाऊ फेडण्याच्या” माझ्या कल्पनेशी सुसंगत आहे.संतुष्टी नक्कीच येणार कारण अगोदरच परिश्रम उपभोगलेले असतात.

मला मेघनाचे विचार आणि तिने दिलेलं उदाहरण फारच आवडलं. मी तिला म्हणालो,
“हे तुझे तत्वविचार तुझ्यासाठी यशस्वी झाले आहेत असं मला दिसतं.तू जे काही करतेस त्यावर होणार्‍या प्रभावाशी तू परिचित झालेली असतेस हे उघडच आहे.”

“एक गोष्ट गंमतीने सांगते.”
मेघना म्हणाली,
“जेव्हा कुठचीही गोष्ट सुलभतेने पार पडते तेव्हा मी मुळीच न-धास्तावता उत्सुकतापूर्वक तिचा स्वीकार करते. अशावेळी, हे अशक्यातलं शक्य झालं, किंवा मला ह्याची भविष्यात केव्हातरी फेड करावी लागेल असं माझ्या मनात येत नाही.मी जर का भूतकाळात वळून पाहिलं तर मला दिसून येतं की ह्याची परतफेड अगोदरच झालेली असते.”

“तुला अमेरिकेत जाण्याचा योग आला हा सुद्धा तुझ्याकडून झालेल्या कसल्यातरी परतफेडीचा परिणाम असावा. दुसर्‍यांदा हनिमून आणि तो सुद्धा अमेरिकेत करायला मिळणार आहे हे काही कमी नाही.हे भविष्य “आगाऊ फेडण्याच्या” तुझ्या कल्पनेशी नक्कीच सुसंगत आहे ह्याबद्दल वाद नाही.”
असं मी मेघनाला गंमतीने म्हणाल्यावर मला लाजून म्हणाली,

“चहा थंड होतोय नाही काय?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोनीया)
shrikrishnas@gmail.com