Monday, June 7, 2010

लोकरीची लडी.

"अतिश्रमाने मनावर येणारा ताण काहीतरी सुखदायी वस्तूत रुपांतरित व्हावा हा माझा उद्देश आहे.लोकरीचं सूत माझ्या जीवनात थोडी उब आणतं."



सुनंदा माझ्या घरी येऊन एक पुडकं देऊन गेली.मी घरी नव्हतो.
"वेळ काढून कधीतरी माझ्या घरी या"
असा निरोप ठेवून लगबगीने गेली.



पुडकं उघडल्यावर मला आतली वस्तू पाहून आश्चर्यच वाटलं.तो एक उबदार स्वेटर होता.सुनंदाने माझ्यासाठी विणला होता. सुनंदा माझ्या धाकट्या भावाची एकूलती एक मुलगी.मी वरचेवर फिरतीवर असतो म्हणू थंडीच्या दिवसात वापरायला आणि आठवण यायला उत्तम भेट म्हणून माझ्यासाठी तिने स्वेटर विणून आणला होता.
मी तिचे मनस्वी आभार मानायला तिच्या घरी गेलो होतो.



"तुला लहानपणापासून लोकर विणण्याचं वेड आहे हे मला माहित आहे.ह्याची कशी काय सुरवात झाली?"
मी तिला भेटल्यावर विचारलं.
मी असा काहीतरी प्रश्न विचारावा,असं तिच्या मनात आलेलं तिच्या चेहर्‍यावरून दिसलं.



"मला त्याचा इतिहास सांगायला आवडेल."
असं म्हणत सुंनदा म्हणाली,
"लोकर पाहिल्यावर माझ्या मनात विशेष येतं.अनेक गंमतीदार गोष्टी पहाताना भावनावश होणार्‍या मला,डाव्या हाताच्या आंगठ्या जवळच्या बोटावर एक फेर गुंडाळलेला लोकरीचा धागा,आणि उजव्या हातातली कोचणारी ती टोकदार प्लास्टिकची सळी परत परत त्या लोकरीच्या लपेटल्या जाण्यार्‍या फांस्यामधे मंत्रमुग्ध करणारी आत-बाहेर होणारी क्रिया,आणि त्यातून तयार होणारी वीण, पहायला खूप मजा यायची.
मला स्वतःला वाटायचं की माझ्या हातून,लोकरीच्या धाग्याने गुंडाळलेल्या लडीतून सुटून येणा्र्‍या एकाच धाग्यातून,तीन दिशांना विस्तारलेली एखादी पांघरण्याजोगी वस्तू तयार होणं अगदीच अशक्यप्राय होतं. तसंच मला ह्या विस्मयपूर्वक वाटणार्‍या विलंब लावणार्‍या अनुभवातून निर्माण होणारा भरवसा त्या वस्तूचा आत्मा होता असं वाटायचं."


"हो,पण तुला ह्याचं वेड कसं लागलं हे सांगीतलं नाहीस"
मी म्हणालो.

"मी दहाएक वर्षांची असेन.माझ्या आजीने मला लोकरीने विणायला शिकवलं.त्यानंतर इतकी वर्ष गेल्यावर, माझे हात,ती सळी,तो लोकरीचा लडी,आणि माझं हृदय यांच्या संयोगाने,बनवले गेलेले हातमोजे,पायमोजे,शाली,गळपट्टा आणि स्वेटर्स मला कमी का मंत्रमुग्ध करीत असावेत?.
जीवनातल्या असंख्य अर्थ हरवलेल्या,वापरून,वापरून गुळगुळीत झालेल्या आणि एकमेकात गुंतलेल्या आठवणीना लक्षात आणून त्यातून निभावून जाणं मला शक्य झालं,पण ह्या लोकरीच्या धाग्याला,तसं विसरता येत नव्हतं."


सुनंदा हळू हळू सांगू लागली.
"एकदा मी शहरातून एका खेड्यात माझ्या आजी आणि आईबरोबर बसने जात होते.आमच्या कॉलनीतल्या बर्‍याच मंडळीने गणेशपूरीतल्या त्या भक्तिधामाला भेट द्यायचं ठरवलं होतं.मला माझ्या आईकडून जेव्हा कळलं की हा बसप्रवास बराच लांबचा आणि कंटळावाणी असतो तेव्हाच मी पिशवीत लोकरीच्या लड्यांचा साठा घेऊन ठेवला होता.काहीतरी विणायचा माझा विचार होता.आता मी ते काय विणलं ते विसरले पण तो कंटाळवाणी प्रवास विणण्यात वेळ घालवल्यामुळे सुखकर झाला ते माझ्या नक्की आठवणीत आहे.
त्या प्रवासात माझ्या लक्षात आलं नाही,पण माझ्या आईने आणि आजीने बर्‍याच वर्षांनी त्या ट्रिपचा विषय निघाल्यावर मला सांगीतल्याचं आठवतं की,मी बसमधे लोकर विणत असताना बसमधल्या बर्‍याच बायका माझ्याकडे कुतूहल म्हणून पाहून एकमेकात कुजबूजत होत्या.एव्हड्या लहान वयात माझं विणण्यातलं प्रेम बघून त्या कौतूक करीत होत्या."


मला सुनंदाचं कौतूक करावंस वाटलं.
मी म्हणालो,
लोकरीच्या शालीत गुरफटून घेण्यात,गळ्याला लोकरीचा गळपट्टा गुंडाळून घेण्यात,गुलाबी थंडी पडल्यावर पहाटे,पहाटे स्वेटर चढवून उब घेण्यात,एकप्रकारे अत्यंत सुखदायी वाटतं.आणि असं वाटत असताना कुण्याच्यातरी प्रेमळ बोटांनी ते विणलं गेलंय हे लक्षात आल्यावर आणखी विशेष वाटतं.
तुझ्या घरात अशी ही सुखदायी आवरणं,भरपूर् आहेत.तुझे,तुझ्या आईचे आणि आजीचे ते उपक्रम असावेत."


"अगदी बरोबर"
असं म्हणत सुनंदा सांगू लागली,
"आता माझ्या पलंगाच्या खाली पाहिलंत तर निरनीराळ्या रंगाच्या लोकरीच्या लड्या असलेल्या पिशव्या सापडतील.अंगावर पांघरण्यासाठी रंगी-बेरंगी,लांब रूंद शाल तयार करण्याचा सध्या माझा उपक्रम चालू आहे.व्यस्त कामामधे मधून मधून विरंगूळा मिळाल्यावर त्याचा ही शाल विणण्यात विनीयोग करण्याचा हा प्रयत्न आहे.अतिश्रमाने मनावर येणारा ताण काहीतरी सुखदायी वस्तूत रुपांतरित व्हावा हा माझा उद्देश आहे.
लोकरीचं सूत माझ्या जीवनात थोडी उब आणतं.माझ्या रोजच्या कटकटीना मी विण देण्यात,किंवा दुसर्‍यांच्या कटकटी माझ्यावर लपेटून घेण्यात हा माझा उपक्रम साधला तर काही फरक पडत नाही. मी माझ्या घरात माझ्या लोकरीत जेव्हडी संतुष्ट असते,खूश असते तेव्हडी कुठेच नसते.एक लांबच लांब लोकरीचा धागा स्वतःशीच गुंडाळत असताना निर्माण झालेला प्रकार कुणालाही त्यात लपटण्यात उपयोगी होतो.म्हणूनच मला लोकरीच्या धाग्याबद्दल विशेष वाटतं."


"तू दिलेला स्वेटर वापरताना आणि लोकरीची उब घेत असताना, मला त्या मागच्या तू घेतलेल्या मेहनतीपेक्षा तुझं प्रेम,तुझ्या भावना जास्त उब देतील यात शंका नाही.खूप खूप आभार."
असं मी सांगीतल्यावर सुनंदा सद्गदीत झाली.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com