Saturday, June 12, 2010

माझा गाव,माझं घर.

“एकाएकी त्या क्षणाला ध्यानी मनी नसताना माझ्या लक्षात आलं की मी माझ्या घरी आहे.जन्मभर अशाच जागेचं अस्तित्व असावं ह्या शोधात मी होतो.”

गंगाधर शिर्के सैन्यात होते.माझी त्यांची जूनी ओळख होती.त्यांना दोन मुलं आहेत.मोठा मुलगा माझ्याकडे यायचाजायचा. वडील नेहमीच फिरतीवर असल्याने लहानपणापासून तो देशात निरनीराळ्या गावी राहून असायचा. नंतर मोठा झाल्यावर मुंबईत नोकरी करून रिटायर्ड झाल्यावर खेड्यात एक स्वतःचं घर असावं म्हणून एका गावात घर घेऊन राहायला लागला.

मला खूप आग्रह करून आपल्याच गाडीतून अलीकडे आपल्या घरी घेऊन गेला.
मला त्याचं घर खूप आवडलं.ऐसपैस किचन, बाहेर छोटीशी बाग आणि आजुबाजूला शांत वातावरण पाहून मलाही बरं वाटलं.
“ह्या गावात घर घेण्याचा तुझा विचार कसा ठरला?”
मी त्याला विचारलं.

मला म्हणाला,
“माझं गाव हेच माझं घर अशी कल्पना करण्यात मला विशेष वाटतं.
मी इथला नाहीच आहे.मला माझं असं गांव कधीच नव्हतं.मला लहानपणाचे संवगडी असे नाहीच.अगदी बालवाडी पासून माझा मित्र म्हणजे माझा भाऊ.माझं आयुष्य सैनिकी वातावरणात गेलं. माझ्या बाबांना ऑर्डर्स मिळाल्या की आम्ही निघालोच.माझी आई सर्व पॅकिंग करण्यात तत्पर असायची.आमचं विंचवाच्या पाठीवरचं जणू बिर्‍हाडच असायचं.

कुठच्याही गावाला आम्ही गेलो की आम्हाला माहीत असायचं की इथे काही आम्ही कायम नाही.परत ऑर्डर येईपर्यंत कायम असायचो.
त्यामुळे आम्ही सर्व प्रवास विनाभार करायला शिकलो.तयारी मनाची आणि तयारी जाण्याची.नव्या जागी नवे जॉब आणि अनोळखी परिसर.शिवाय पुढे कधीतरी “निघालो अमुच्या प्रवासा” हे भविष्यात लिहीलेलंच असायचंच. आतापर्यंत चार वर्षे एकेठिकाणी स्थीर राहिलो असं एकदाच घडलं.”

“मग हे घर तू केव्हा घेतलंस?”
मी विचारलं.

मला म्हणाला,
“सहा वर्षापूर्वी मी ह्या गावांत माझं असं हे घर घेतलं.गाव सुंदर आहे.अगदी शांत वातावरण आहे.गावाच्या बाहेर लोकांची शेतीची जागा आहे.दोन गावामधून एक संथ नदी वाहते.नदीवर सुंदर लोखंडी पूल आहे.हाच दोन गावातला दूवा आहे.मी रहातो त्या गावात एक बाजाराची जागा आहे.
आठवड्यातून एकदा बाजार भरतो.गावाचं नाव घेऊन लोकांची आडनावं झाली आहेत.त्यामुळे आडनावाने सगळेच गावकर आहेत.”

“हे गाव तुला कसं वाटलं?लोक कसे आहेत?”
असं मी विचारल्यावर मला म्हणाला,
“ह्या गावात घर घेऊन रहाण्यापूर्वी मी थोडा द्विधा मनस्थितित होतो.
गावातले लोक एकमेकाची दखल घेण्यात थोडे कंजूष आहेत असं मला कळलं होतं.पण मला त्याची संवय होती. बाबांबरोबर गावं फिरताना लोकांत मिसळण्याचा प्रसंग कमीच यायचा.प्रत्येक वेळी आम्ही काही इथे कायम रहाणारे नाही ही आमची वृत्ति झाली होती.त्याकारणामुळे आम्हाला कुणाचंही लक्ष न वेधण्याची संवय झाली होती.
पण ह्या गावात आल्यावर माझा बेत फसला.नव्या घरात सामानसुमानाची लावालाव करण्यापूर्वीच गावातले लोक, शेजारी-पाजारी स्वतःहून येऊन आपली ओळख करून मला देऊं लागले.काहीनी गावात तयार झालेली फळं आणि भाजी आणून मला दिली.रोज रविवारी संध्याकाळी गणपति मंदिरात काहीना काहीतरी कार्यक्रम असतात त्याचं काही आमंत्रण देऊन गेले.मला कसलीच जरूरी भासली तर अनमान करूं नका म्हणून काही सांगून गेले.ज्या साध्यासुध्या पद्धतिने माझा त्यांनी गावात स्विकार केला,माझं स्वागत केलं त्याचं मला खूपच आश्चर्य वाटलं.
माझ्या पूर्वकल्पित विचाराना मला बगल द्यावी लागली.

नंतर नंतर मला घरी चहापाण्यासाठी,जेवणासाठी आमंत्रण यायला लागली.कधीही आमच्या घरावरून गेला तर आमच्या घरी यायचं टाळू नका अशी सुचनापण मिळू लागली.गावातल्या पुस्तकवाचनालयाच्या मुख्याधापकानी माझी इतर सभासदांशी ओळख करून दिली.मी गावात नसताना माझ्या घरावर शेजारी लक्ष ठेऊन रहायचे.माझ्या बाबांचा निरोप आल्यावर गावातले पोलिस अधिकारी मला भेटून जायचे. मला सल्ला देऊन जायचे.”

मी म्हणालो,
“खरंच तू नशिबवान आहेस.गाव लहानसा असल्याने जवळीक रहात असावी.अर्थात लोकपण संस्कारीत असावे लागतात.तू केलेल्या वर्णावरून त्याचा पडताळा येतो.पण तुझ्यावरही नातं ठेवणं अवलंबून आहे.अर्थात तू तुझ्या बाबांबरोबर देशात इतकी गावं फिरला आहेस की त्यामुळे नकळत तुझ्यावरही चांगले संस्कार झाले आहेत.आपलं स्वतःचं एखादं घर असावं हे ही तुला अनुभवाने कळलं असावं.सैन्यात काम करणार्‍या बर्‍याच लोकाना कुठेतरी स्थाईक व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे.”

“चांगलं नातं ठेवणं हे एकमेकावर अवलंबून आहे हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
असं म्हणत मला म्हणाला,
“मी सकाळच्या प्रहरी व्यायामासाठी रस्त्यावरून धावत जात असताना लोक मला हात वर करून सलामी द्यायला लागले.मी पण काही प्रतिष्टाना घरी जेवायला बोलवू लागलो.जणू आपलंच घर आहे असं समजून गावातले ठेकेदार माझ्या घराची डागडूजी करू लागले.आता मी गावातल्या सभेत भाग घेऊन प्रश्नही विचारू लागलो.”
“मी तुम्हाला एक किस्सा सांगतो”
असं म्हणत पुढे सांगू लागला,
“एकदा, मी एका चहाच्या दुकानाच्या समोरून जात असताना एका गावकर्‍याने माझ्या नावानीशी हांक मारून मला सलाम दिला.मी त्याला ओळखतही नव्हतो.मीही हातवर करून त्याला साद देत त्याचं नाव काय असावं ह्याचा विचार करीत होतो.
एकाएकी त्या क्षणाला ध्यानी मनी नसताना माझ्या लक्षात आलं की मी माझ्या घरी आहे.जन्मभर अशाच जागेचं अस्तित्व असावं ह्या शोधात मी होतो..
ती व्यक्ति कोण होती ते अजून मला आठवत नाही. परंतु,पुढल्यावेळेस भेटल्यावर मी त्याचं नाव त्याला नक्कीच विचारीन.आपलं नाव सांगताना तो ते हंसत हंसत सांगण्याची संभावना जास्त आहे.
मला आता माहीत झालंय की मी इथल्या जागेच्या शेल्यात गुंतला गेलेलो आहे आणि मला इकडून जायचं झाल्यास तो शेला नक्कीच फाटून जाईल.मी इथला जरी नसलो तरी मी आता या गावाला माझं घर समजायला लागलो आहे.”

“तू योग्य तोच निर्णय घेतलास.मला तुझं घर आवडलं,गाव आवडला आणि गावातले लोकही आवडले.त्यांचे संस्कार आवडले.
तुझ्याकडे पुन्हा कधीतरी यावसं वाटतं.”
असं मी त्याला शेवटी म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com