Tuesday, December 7, 2010

समुद्राच्या लाटांवरचं आरूढ होणं.

“आतापर्यंत पाहिलेला तिचा चेहरा ह्यावेळी मला निराळाच दिसला.त्यावरचं समाधान,तृप्ति,आणि आनंद विरळाच होता.”

मी पूर्वी मे महिन्यात आठ दिवसांची व्हेकेशन घेऊन वरचेवर गोव्यात जायचो.गोव्याच्या बिचीसमधे मला पोहायला आवडायचं.दरखेपेला निरनीराळ्या बिचवर माझी व्हेकेशन मी घालवीत असे.त्यातल्यात्यात मिरामार बिच,कोळवा बिच किंवा डोना-पावला बिच हे माझे आवडते बिच.

हल्लीच मी बरेच दिवसानी मिरामार बिचवर एका हाटेलात रहायला गेलो होतो.संध्याकाळची वेळ होती.बिचवर मस्त वारा आणि थंड हवा खायला मजा

येत होती.काही वेळ चालल्यावर वाळूत एका जागी बसावं असं वाटलं.म्हणून त्या जागी जावून बसलो.एकाएकी जूनी आठवण येऊन,जसं सिनेमात फ्लॅश-बॅक दाखवतात तसं, माझ्या मनात यायला लागलं.
मला त्याच्या नांवाची आठवण येईना.पण बराच डोक्याला त्रास दिल्यावर माईकल डिसोझा आठवला.

मला हा माईकल नेहमीच बिचवर पोहताना दिसायचा.हळू हळू माझी त्याची ओळख झाली.आणि त्या व्हेकेशनच्या आठ दिवसात,विशेषतः संध्याकाळी, पोहून झाल्यावर माईकलच्या रूम मधे जाऊन फेणीच्या आस्वादाबरोबर गप्पा व्हायच्या.(माईकल फेणी घ्यायचा आणि मी गरम कॉफी.)
नंतर देसायाच्या घरी रात्रीचं जेवण घ्यायचो.
पूर्वी मी कामथांच्या हाटेलात जेवायचो.देसायांकडे घरगुती जेवण मिळतं हे मला माईकलकडून कळलं.मस्त मास्यांचं जेवण असायचं.

माईकल डिसोझा लहान असल्या पासून इकडे लोकांना समुद्रात पोहायला शिकवायचा.ह्या फंदात तू कसा पडलास म्हणून मी माईकलला एकदा विचारलं. माईकल फेणीची चव घेत घेत खूशीत येऊन मला म्हणाला,
“मला आतापर्यंत असा प्रश्न कुणीच केला नाही.
प्रत्येकाला वाटतं की,काहीतरी करण्यात आपण मग्न असावं.काही तरी हरवावं आणि ते गवसण्यासाठी आपण वेळ घालवावा.आपणाला आनंदी रहाण्यासाठी आपल्या जवळ काहीतरी असावं जरी ते “काहीतरी” काहीही नसल्यासारखं असलं तरी.

माझ्यासाठी ते “काहीतरी” समुद्रातून मिळतं.हे समुद्रातलं “काहीतरी” स्वाभाविक दृष्टीने लाटा निर्माण करतं—काहीवेळा ह्या लाटा मोठ्ठ्या असतात आणि काहीवेळा अगदी माझ्या पावलावर आरूढ होतील एव्हड्या लहान असतात.जेव्हा मी समुद्रात पोहायाला जातो तेव्हा ह्या लाटा मला समुद्राच्या प्रचंड क्षमतेत हात घालायला संधी देतात.एकावेळी एकच लाट पूरे होते.”

मला हे माईकलचं ऐकून जरा कुतूहल वाटलं.मी त्याला विचारलं,
“म्हणजे तुझा व्यवसाय पोहायला शिकवायचाच आहे काय?
ह्यातून तुला काय मिळतं?”

माईकल जरा खसखसून हंसला.मला म्हणाला,
“पैसे म्हणाल तर,जे काय मला मिळतं त्यात मी समाधान असतो.
मला आठवतं,माझा सुरवातीचा जॉब,समुद्रात पोहायला शिकवण्याचा होता.मी ह्याच गोव्याच्या समुद्रावर पोहायला शिकलो.ह्या गोव्याच्या बिचवर एका प्रसिद्ध होटेल मधे नव्याने समुद्रात पोहायला येणार्‍या पर्यटकाना शिकवायचं मला काम मिळालं होतं.बरेचसे परदेशातले पर्यटक समुद्रात पोहण्यात तरबेज असतात,पण सगळ्यांना पोहायला येईल असं नाही.बर्‍याच वेळा स्त्रीवर्ग ह्यातला असतो.तसंच स्थानीक पर्यटक विशेषकरून उत्तर भारतातून येणारे
पर्यटक ह्यातले असतात.आणि गोव्याच्या सुंदर बीचवर ,दुधाळलेल्या लाटापाहून कुणाला समुद्रात उडी मारावी असं वाटणार नाही?
ज्या बिचवर प्रथमतः मी लाटांवर आरूढ होण्याची कला शिकलो,त्याच ठिकाणी मी हा जॉब करण्याचं कारण मला, ज्या लोकांना लाटांवर आरूढ होऊन मजा करण्यात आनंद घेण्याची उत्कंठा असेल त्या लोकांना,शिकवण्याची असूया होती.”

मी माईकलला विचारलं,
“तुला हेच काम करून कंटाळा येत नाही काय?”

“ह्या माझ्या समुद्रात पोहण्या्च्या वेडेपणाला वाटलं तर,आवेश म्हणा,चट म्हणा,छंद म्हणा किंवा मनोरंजन म्हणा.
कसंही असलं तरी जेव्हा माझं जीवन तापदायक होतं तेव्हा पोहण्यातून मी ते सूरात लावण्याच्या प्रयत्नात असतो. मला समुद्र ही अशी जागा वाटते की,अगदी आत्ताच झालेल्या घटना, ज्या लागलीच निवळून जातात, त्या प्रतिबिंबीत होतात.पुन्हा अशा घटनाना सामोरं जायला मला ही जागा प्रेरित करते.समुद्रात पोहण्याने मी माझ्या जीवनातल्या कटकटीतून अंतिम सुटका करून घ्यायला प्रवृत्त होतो.”

काहीवेळा मी माझ्या मलाच प्रश्न करतो की,समुद्राच्या लाटांवर एकदाही आरूढ झालो नसतो,बहुदा आठावड्यातून तिनदां होतो,तर माझ्या जीवनात काय अर्थ राहिला असता.
मी प्रेरणा विरहीत राहिलो असतो का?का माझं वजन मी वाढवून घेतलं असतं?जीवन अगदीच कसं निराळं झालं असतं? अशी निरनीराळी दृष्य डोळ्यासमोर आल्यावर, माझ्या नक्कीच एक ध्यानात येतं की,मी लाटांवर आरूढ न होता सुखीच झालो नसतो.
माझ्या जीवनातलं प्रभावाचं अधिरोहण,जो मी आता आहे आणि ज्यावर मी भरवसा ठेवतो ते, समुद्रातल्या लाटांवरचं आरूढ होणं हेच आहे.”

“लाटांवर आरूढ होणं म्हणजे यतार्थतः तुला काय म्हणायचं आहे?.मी पण समुद्रात पोहतो.लाट फुटल्यावर फेसाळलेल्या पाण्यात मला पोहायला मजा येते.”
मी माईकलला म्हणालो.

मला माईकल म्हणाला,
“लाट फुटण्यापूर्वी लाटेवर सर्व शरीर झोकून दिल्यावर,एखाद्या घोड्यावर आरूढ झाल्यावर कसं वाटतं अगदी तसं लाटेवर असताना वाटतं.ह्याला मी लाटेवर आरूढ होणं म्हणतो.घोडा जसा आरूढ झाल्यावर सपाटून पळायला सुरवात करतो अगदी तसं ह्या न फुटलेल्या लाटेवर आरूढ झाल्यावर,ती लाट तुम्हाला आपल्या अंगावर घेऊन जोरात पुढे किनार्‍याजवळ पळत असते.आणि सरतेशेवटी ती लाट फुटते.त्या फेसाळ लाटेत पोहण्यात तुम्हाला मजा
येत असणार.पण न फुटलेल्या लाटेवर आरूढ होऊन तुम्ही एकदा पहा.”

असं म्हणून माईकल विचारात पडल्यासारखा वाटला.आणि लगेचच उठून आणखी एक फेणीची बाटली उघडून रंगात येऊन मला म्हणाला,
“मला एका घटनेची आठवण येते.ती मी तुम्हाला सांगतो.
फेणी घेता घेता तो प्रसंग सांगायला रंगत येणार म्हणून मी ही दुसरी बाटली उघडली.
मला तो प्रसंग आठवतो.
मला एका चवदा वर्षाच्या मंदमतिच्या मुलीला लाटावर आरूढ होण्याचं काम शिकवायची पाळी आली होती.आणि ती घटना मी केव्हाच विसरणार नाही.
तिन आठवडे सतत ती मुलगी सकाळ संध्याकाळ शिकायला यायची.समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन पोहण्यात तिला किती जबरदस्त आनंद होत होता ते ती नित्य सांगायची.

ते उन्हाळ्याचे दिवस होते.लहानश्या लाटेवरसुद्धा तरंगत रहाता रहाता एक दिवशी अशी एक लाट तिला मिळाली की,एव्हड्या दिवसाचा पोहण्याचा अनुभव घेत असताना एका मोठ्या लाटेवर ती स्वतःहून आरूढ होऊन बराच वेळ तरंगत राहिली.तो अनुभव तिला खास वाटला.
आणि एका, त्याहून मोठ्या लाटेवर, मी तिला जवळ जवळ ढकलीच होती.दर खेपेला येणार्‍या लाटेवर आरूढ होतानाचा तिचा चेहरा दिसायचा तसाच ह्यावेळी मला दिसला.पण त्यावर तरंगून झाल्यावर,लाटेबरोबर खाली वाळूत येईपर्यंत ती मुळीच घाबरली नाही.आणि लाटेचा जोर संपल्यावर मागे वळून माझ्याकडे पहात राहिली.आतापर्यंत पाहिलेला तिचा चेहरा ह्यावेळी मला निराळाच दिसला.त्यावरचं समाधान,तृप्ति,आणि आनंद विरळाच होता.

मला इतर काम करून कुठेही जास्त पैसे मिळाले असते.पण मी हे काम करण्याचा स्वेच्छाकर्मी झालो.त्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.मी एकटाच इथे रहात आहे.सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा मला हे काम करावं लागतं.आणि ते फक्त पावसाळा सोडून.असं मी काम करीतच आहे.मला शक्य होईतोपर्यंत हे काम मी करणार आहे. दुसरं कसलंच काम मला एव्हडा आनंद देऊ शकणार नाही.

माझं हे भर उन्हाळ्यातलं पोहायला शिकवणं, माझ्या काही ओळखीच्या लोकांना, यातना देणारं वाटतं.ह्यात माझे जवळचे नातेवाईक आणि मित्रगण सामिल आहेत.पण मला विचारालं तर मी सांगेन की,सुमद्रातल्या उंच,उंच लाटावर आरूढ होऊन पोहणं,मला सांगून जातं,मला शिकवून जातं की,खरा आनंद,हवा असल्यास तो आपल्याजवळ किती संपत्ती आहे ह्याचा हिशोब करून मिळणार नाही.खरा आनंद आपल्या घरात,जिथे वातावरणाला,काबूत
ठेवण्यासाठी,निरनीराळी अवधानं वापरली जातात,सुरक्षता पाहिली जाते,त्याकडे काणाडोळा करून किंवा समाधानी मानून मिळणार नाही.
समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन पोहण्यामुळे,माझ्या आकांक्षाना खरोखरच एकप्रकारचा भडकावा आणून,मला, माणसाने निर्माण केलेल्या,अनैसर्गिक वातावरणापासून दूर राहून निसर्गाची आणि समुद्राची प्राकृतिक स्थिती अजमावून पहाण्याची संधी मिळते.”

जास्त बोलत राहिलो आणि प्रश्न विचारत राहिलो तर माईकल आणखी एक बाटली उघडल्या शिवाय रहाणार नाही. आणि नंतर देसायांकडे मस्त मास्यांचं जेवण घ्यायला जायला मी जरी चांगल्या स्थितीत असलो तरी माईकल नक्कीच असणार नाही ह्याचा विचार येऊन मीच प्रश्न करण्याचं आवरतं घेतलं आणि त्याला म्हणालो,
“पोटात कावळे कांव कांव करायला लागले.चल आपण देसायांकडे जेवायला जाऊया.ह्या विषयावर पुढल्या खेपेला बोलूया.”
असं म्हणून आम्ही दोघे उठलो.

माझा फ्लॅश-बॅक एरव्ही संपला नसता.
“साब माल मस्त है! आताय क्या?”
हे शब्द माझ्या कानावर पडल्यावर मी जागा झालो.एव्हडा काळोख झाला हे ध्यानातही आलं नाही.
पूर्वीचे गोव्याचे बिच आता राहिले नाहीत हे चटकन माझ्या मनात आलं.

“हांव गोयचोच आसां”
असं त्याला म्हणत मी चालू पडलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com