Wednesday, December 29, 2010

वारा फोफावला.

“पण वार्‍याकडून जे बळ मला मिळतं त्याचा मी अख्या जगासाठीही सौदा केला नसता. वारा हा माझा उपचार आहे असं मी नेहमीच समजतो.”

मला वारा खूपच आवडतो.माझ्या सर्व चेहर्‍यावरून वारा चाटून गेला,माझ्या केसातून पिंजारत गेला की त्याचा तो स्पर्श मला आवडतो.उन्हाळ्याच्या दिवसात वारा तर हवा हवा असा वाटतो.उन्हाळ्यात वार्‍याची झुळूक येऊन झाडांची पानं सळसळली की मन कसं प्रसन्न होतं.घराच्या मागच्या परसात,आराम खुर्ची टाकून बसल्यानंतर समुद्राकडून येणारा थंडगार,खारट वारा जेव्हा अंगावरून जातो तेव्हा खूपच आल्हादायक वाटतं.
मला वारा आवडतो कारण तो एव्हडा माझ्या जवळ येतो की जणू माझ्या अंतःकरणाला शिवतो.पण मला माहित आहे की तो मला कसलीच इजा करणार नाही.त्याच्या मनात कसलाच वाईट इरादा नसतो.एव्हडंच कधीतरी जरा जास्त प्रखर वाटतो.

बाकी इतर सर्व गोष्टी असतात तसा वारा काही दोषहीन नसतो.तो नेहमीच असेल असं नाही.पण एक नक्कीच परत कधीतरी तो येतो,आणि मागच्यावेळी जसा माझ्या मनाला प्रसन्नता देऊन गेला तसाच देऊन जातो.जिथे मी जाईन तिथे मी वार्‍यावर आणि आजुबाजूच्या वातावरणावर केंद्रीभूत असतो. मला कुठे न्यायचं ते वार्‍याला नक्कीच माहीत असतं.

वार्‍याने मला अशा अशा ठिकाणी नेलं आहे की त्या जागांचं अस्तित्व मला त्याने तिथे नेई पर्यंत माहीत नसायचं. त्याचं एकच कारण मी वार्‍यावर विश्वास ठेवीत गेलो.मला एखादा दिवस बरा जात नाही असं वाटलं की मग मी आमच्या परसात आराम खूर्ची घेऊन बसतो,डोळे मिटतो आणि वार्‍याचा स्पर्श जाणवून घेतो,जणू मला तो आपल्या जवळ घट्ट धरून ठेवतो असं भासतं.मला वारा चांगल्या ठिकाणी घेऊन जातो.जिथे वारा जातो तिथे मी जर गेलो नसतो तर त्या जागा मला माहीतही झाल्या नसत्या.माझ्या मनातून येणार्‍या आवाजा ऐवजी निसर्गातून येणारा आवाज मला वारा ऐकवतो.
मला वार्‍यानेच शिकवलंय की,माझ्या काहीही समस्या असल्या तरी त्या वार्‍यासारख्याच उधळून जाणार.पण त्या वार्‍यासारख्याच परत येणार.त्या परत आल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या हे मी जाणू शकतो.आणि त्या निभावून नेऊ शकतो.

माझ्या आजोबांनी मला प्रथम दाखवलं की वारा छान असतो.त्यांना कदाचीत माहीतही नसेल पण वार्‍यावर प्रेम कसं करायचं ते त्यांनीच मला शिकवलं.समुद्रावर गेल्यावर बरेच वेळा वारा प्रचंड असतो.अगदी नको कसा होतो.कारण तो सतत आपल्या चेहर्‍यावर आपटत असतो.पण माझ्या आजोबांने दाखवलं की वार्‍याबरोबर समजुतदारपणे राहून त्याचा स्पर्श कसा जाणवून घ्यायचा.

एकदा मी माझ्या आजोबांबरोबर आमच्या घरामागच्या परसात बसलो होतो.माझी धाकटी बहीण व्हायलीनवर एक सुंदर धून वाजवीत होती.ती धून माझ्या आजोबांना खूप आवडायची.धून ऐकत असताना त्यांचं लक्ष आजुबाजूच्या उंच झाडावर गेलं.एक हलकीशी झुळूक त्यांचा विरळ सफेद केसावरून जाऊन त्यांचे केस विसकटले गेले.मी त्यांना पहात होतो.त्यांनी डोळे मिटले होते.आणि वार्‍याच्या झुळकेच्या विरूद्ध दिशेने त्यांनी त्यांची मान हलवली.
मला माहीत झालं की वार्‍याने त्या धूनीतल्या स्वरांकडे त्यांचं ध्यान केंद्रीभूत केलं होतं.

कोकणात गेल्यावर मला माझे आजोबा नेहमीच वेंगुर्ल्याच्या समुद्रावर न्यायचे.आमच्या घरापासून समुद्र दोनएक मैलावर आहे.मला आजोबा चालत न्यायचे.आजोबांची सारवट गाडी होती.दोन बैलांना जुंपून मागे तीन,चार माणसाना बसायला सोय असलेली अशी सुशोभित बंदिस्त पेटी असायची.मला त्या सारवट मधून जायला आवडायचं. पण निसर्ग सौन्दर्य पाहायचं असेल तर पायी चालण्यासारखी मजा नाही असं मला माझे आजोबा सांगायचे.
मांडवी पर्यंत चालत गेल्यानंतर,खाडीवरून येणारा वारा आणि पुढे थोडी चढ चढून गेल्यावर अरबी समुद्राचा वारा ह्यातला फरक मला ते समजाऊन सांगायचे.खाडीवरून येणारा वारा खारट नसायचा.शिवाय खाडीच्या पात्रात जमलेल्या गाळामुळे म्हणा किंवा खाडीतल्या गोड-खारट मास्यांमुळे म्हणा वार्‍याला एक प्रकारचा वास यायचा. मासा कुजल्यानंतर त्याला जो वास येतो त्याला कुबट वास म्हणतात.तसाच काहीसा हा वास असायचा.माझे
आजोबा हे मला समजाऊन सांगायचे.

वेंगुर्ल्याच्या बंदरावर जाई तो पर्यंत आजुबाजूचं निसर्ग सौन्दर्य पाहून मन उल्हासीत व्हायचं.एका बाजूला फेसाळ पाण्याचा,उफाळलेला,वार्‍याने फोफावलेला,अरबी समुद्र आणि रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला उंचच उंच झाडांनी भरलेला हिरवा गर्द डोंगर पाहिल्यावर एखाद्या चित्रकाराने कॅन्व्हासवर सुंदर चित्र चितारलं असतं. माझे आजोबा जेव्हा मला प्रत्यक्ष बंदरावर घेऊन जायचे त्यावेळेला बंदराच्या धक्याला पाण्याबरोबर आपटून येणारा वारा प्रचंड
थंड लागायचा.अंगात कुडकुडी भरायची.मी चला,चला,म्हणून त्यांच्या मागे लागल्यावर,
“ती होडी एव्हडी जवळ येई पर्यंत थांबू या” किंवा
“ते पक्षी तिथून परत फिरल्यावर निघू या”
अशा शर्ती देऊन मला थांबायला सांगायचे.खरं तर त्या वार्‍याचा आनंद ते लुटायचे.

त्यानंतर आणखी वार्‍याचा निराळा अनुभव घ्यायला मला आजोबा बंदराजवळच्या टेकडीवर न्यायचे.ही टेकडी नक्कीच पाच-सातशे फूट उंच असावी.टेकडीवर चढायला पायर्‍या आहेत.ब्रिटिशांपासून त्या केलेल्या आहेत. टेकडीच्या वरती एक गेस्ट-हाऊस होतं.त्या गेस्ट हाऊस मधून गोव्याच्या दिशेने समुद्रात बांधलेल्या लाईट-हाउसीस दिसायच्या.समुद्रात धूकं असलं तर जवळचीच एखादी बत्ती दिसायची.पण कडक उन्हात दूरवर चार पाच बत्त्या
दिसायच्या.पण ह्या बत्त्यांची मजा पहाण्यासाठी माझे आजोबा येत नसावेत. त्यांना त्या टेकडीवरून येणा्र्‍या वार्‍याची झुळकीत स्वारस्य होतं.मोठ-मोठाले पाच दहा सर्क्युलेटींग पंखे लावल्यावर कसा वारा येईल तसा तो वारा गेस्ट-हाऊसच्या दिशेने यायचा.
ह्या गेस्ट-हाऊसमधे येऊन पुलं. लेख लिहायचे,असं त्यांनीच कुठेतरी या संबंधाने लिहिलेलं मी वाचलं आहे.

आता बाहेर गावी ड्रायव्हिंग करीत असताना,मी बरेच वळा एक हात बाहेर काढून वार्‍याचा स्पर्श जाणवीत असतो. वारा माझ्या हाताच्या बोटातून जाऊन माझ्या तळहातावर जाणवतो.माझ्या केसावर फुंकर मारल्यासारखी जाणवते.वेडपटासारखा माझा हात मी वार्‍यात हलवीत असतो कदाचीत थोडासा वारा पकडून खिशात भरता यावा असं वाटतं.
मला आठवतं,असाच एकदा मी कलकत्याला गेलो असताना हावडा-ब्रिजच्या खालून जाणार्‍या हुगळी नदीच्या काठावर उभा होतो.वारा इतका वहात होता की तो मलाच आपल्या हाताने कवटाळून जवळ घेत होता असं वाटत होतं.मला सांगत होता सर्व काही ठीक होणार.मला सांगत होता की कशाचीच काळजी करू नयेस.मनावर कसलाच ताण आणू नयेस.इतका अविश्वसनीय दिलासा वाटत होता की मी फक्त दीर्घ श्वास घेण्यापलीकडे काहीच करीत
नव्हतो.

वारा माझ्या जीवनात नसता तर मी काही वेगळाच झालो असतो असं मला सांगता येणार नाही.पण वार्‍याकडून जे बळ मला मिळतं त्याचा मी अख्या जगासाठीही सौदा केला नसता.
वारा हा माझा उपचार आहे असं मी नेहमीच समजतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com