Sunday, December 26, 2010

फणस

“फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….”

कसलाही विचार न करता मी फळाकडे आकर्षित होत असतो.एखाद्या अननसाच्या तुकड्याला चाऊन खाताना कदाचीत त्यातून निघणार्‍या गोड स्वादिष्ठ रसाची चिकट धार माझ्या हनुवटीवरून ओघळत असताना वाटणारा आनंद त्याचं कारण असावं.एखाद्या पूर्ण पिकलेल्या लालसर-पिवळसर देवगडच्या हापूस आंब्याल्या पाहून, त्याला नाकाकडे घेऊन,त्याच्या वासाचा दीर्घ श्वास घेऊन,अधीर झाल्याने,त्या आंब्याच्या कापून शिरा न काढता तो तसाच
चोखून खाताना,घळघळून निघालेला अमृततुल्य रस माझ्या मनगटावर घरंगळत गेला तरी पूर्ण गर खाऊन झाल्यावरही उरलेली बाठी चोखून चोखून खाण्याचा मोह मला आवरत नसतो हेही कारण असावं.ताजी,ताजी काळीभोर करवंदं तोंडात टाकल्यावर ज्या पद्धतिने फुटतात,जणू छोटे बारूदच फुटावेत तसे,नंतर त्या करवंदाचा आंबट गोड रस तोंड भरून गिळायला मिळत असल्याने ते कारण असावं.फळ म्हटल्याने त्याच्या उच्चारातून मला
एखादा अतिसुंदर बुडबुडा फोडण्यासारखा आहे असंच काहीसं वाटतं.

माझ्या जीवनात फळाला अग्रता आहे.फळ माझा उच्चतम मित्र आहे असं मी समजतो:क्षमाशील,विश्वसनीय आणि मस्त,मस्त.
कोकणात अनेक तर्‍हेची फळं मिळतात.आणि त्यात निरनीराळे प्रकारही असतात.
फळांचा राजा आंबा-हापूस,पायरी,फणस,अननस,बोंडू-काजूचंफळ-आवळे, फाल्गं, करवंदं, जांभळं, चिकू, जांम, जाफ्रं,पेरू,गाभोळी चिंचा,कलिंगडं,रामफळं,सिताफळं,बोरं,पपई,केळी-हिरव्या सालीची,वेलची केळी,सोन केळी…आणखी कितीतरी फळं असावीत.

फणस फोडून त्यातून गरे काढणं म्हणजे एक दिव्य असतं.प्रथम हाताला खोबर्‍याचं तेल फासावं लागतं.त्याने फणसाच्या फळातून येणारा चिकट चीक हाताला लागू नये हा उद्देश असतो.फोडलेल्या फणासाच्या भेशी बाजूला करून त्यातून गरे बाजूला करून चारखण टाकून द्यावं लागतं.काटेरी चारखणात गर्‍याभोवती बेचव पाती गर्‍याला घट्ट धरून असतात.त्या पाती वेगळ्या कराव्या लागतात.त्याचवेळी फणसाचा चीक हाताला चिकटण्याचा संभव असतो
म्हणून खोबर्‍याच्या तेलाने हात माखून ठेवावे लागतात.त्यामुळे हाताला चीक चिकटत नाही.
रसाळ फणसाचं आणि काप्या फणसाचं अशी वेगळी झाडं असतात.मला रसाळ फणसाचे गरे आवडतात.मात्र काप्या फणासाचे गरे रसाळ गर्‍यासारखे गीळगीळीत नसतात.काप्या गर्‍याबरोबर खोबर्‍याची कातळी खाण्यासारखी मजा नाही.निराळीच चव येते.

काप्या गर्‍यामधल्या बिया-घोट्या-वेगळ्या करता येतात.पण रसाळ गर्‍यातली घोटी वेगळी करायची झाल्यास,गरा घोटीसकट तोंडात टाकून तोंडातच गर वेगळा करून घोटी ओठातून बूळकरून बाहेर काढावी लागते.दोन्ही प्रकारच्या गर्‍यांच्या घोट्या उकडून,भाजून किवा डाळीच्या आमटीतून शिजवून किंवा घोट्यांची भाजी करून खाता येते.

मला आठवतं मी सातएक वर्षाचा असेन.उन्हाळ्याचे ते दिवस होते.माझ्या आईने रसाळ आणि काप्या फणसाचे गरे एका मोठ्या परातीत पसरून ठेवले होते आणि ती परात जेवणाच्या टेबलावर ठेवली होती.येता जाता आम्ही गरे खावेत असं तिला वाटत असावं.मी एकदा एक रसाळ गरा खाताना, गर तोंडात ठेऊन घोटी तोंडातून बूळकरून बाहेर काढताना, माझा एक सातवर्षेय दांत,मुळापासून सुटला असावा.कारण,तोंडात काहीतरी घट्ट घट्ट लागत आहे असा मला भास व्ह्ययला लागला.आणि खरंच माझा एक दांत सुटलेला मला दिसला.माझा बालपणातला पहिलाच दांत मी गमावून बसलो होतो.

बालपणाचा दांत पडणं म्हणजेच आपण किशोर वयात पदार्पण करीत आहो हे माझ्या लक्षात आलं.ती बाहेर आलेली घोटी आणि माझा दांत मी माझ्या हातात नीट सांभाळून ठेवला.एका कुंडीत माती घेऊन त्यात मी घोटी दांतासकट पुरली.माझ्या गुरूजींनी शिकवलेल्या माहिती प्रमाणे ती घोटी, कुंडीत फणसाचं रोप होऊन, उगवून आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार नव्हती.पाण्याचा पुरवठाही, सुरवातीला रोप येण्यासाठी,कमी लागत असावा.माझ्या निजायच्या खोलीतल्या खिडकीवर मी ती कुंडी ठेऊन रोज पाणी घालून रुजवीत असताना एक दिवशी आमच्या घरातल्या मनीमाऊने बाहेरून खिडकीत आणि खिडकीतून घरात प्रवेश करण्याच्या धडपडीत त्या कुंडीला धक्का देऊन खाली पाडली.त्या बरोबर माझ्या आईचा स्वतःचा हातात धरायचा आरसा,जो तिला तिच्या आईने दिला होता तो,पण तडकवून टाकला.माझी आई रोज त्या आरशात बघून आपल्या कपाळाला कुंकू लावायची.आईला खूप वाईट वाटलं.माझी आई समजुतदार होती.
“होऊन गेलं त्यावर आता रडण्यात काय हाशील?”असं ती मला म्हणाली.
तरी तिला झालेलं दुःख तिच्या चेहर्‍यावरून लपत नव्हतं.स्वतःचं फणसाचं झाड रुजवून आणण्याच्या माझ्या स्वपनालाही तडा गेली.

माझे ओले झालेले डोळे शर्टाच्या बाहीला पुसून मी ते सर्व झाडून काढलं आणि असं करीत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली.मी ठरवलं की फणसाचं रोप होऊन येणार्‍या माझ्या झाडाला आमच्या मागच्या परसात, विहीरी जवळ जागा करावी.आरसा फुटल्याने झालेल्या नुकसानीबद्दल माझ्या आईचं दुःख मी सहन करून विहीरी जवळीची खड्ड्यासाठी खणून ठेवलेली जागा पाहून आईची बोलणीपण खाऊन घेतली.हे सगळं मी माझ्या मित्राला-फळाला- सहाय्य देण्यासाठी करीत होतो.नाहीतरी मित्र एकमेकासाठी त्याग करतातच म्हणा.

काही महिन्यानंतर त्या जागी एक हिरवं अणकुचीदार रोप त्या जमीनीतून रुजलं आणि बाहेर दिसायला लागलं.मी आणि माझ्या आईने त्या रोपाला वाढवायला खूप मेहनत घेतली.शेळी-बकरीने खाऊ नये म्हणून त्या रोपा सभोवती नारळाच्या झाडाच्या झापाचं कूंपण घालून त्याला आडोसा दिला.
नियमीतपणे खत-पाणी घालीत राहिलो.हळू,हळू आमच्या परसातल्या विहीरी जवळ एक मोठं फणसाचं झाड उभारून आलं.

फणस हे असं एक फळ आहे की ती निसर्गाची उपयुक्त निर्मिती आहे असं मला वाटतं.तसं पाहिलंत तर हे फळ खाऊन कुणाचं वजन वाढत नाही.
आदळ-आपट होऊनसुद्धा हे फळ आपला स्वाद कमी करीत नाही.कोणत्याही परिस्थितीत ते सहकार्य देतं.मग त्याची फणस-पोळी तयार करा किंवा आणखी काही गोष्टीसाठी त्याचा वापर करा.त्याचं सहकार्य असतंच.अनैसर्गीक फळ-शर्करा किंवा अनैसर्गीक चरबी खाण्यापेक्षा कुठच्याही फळाकडून हे दाखवलं जातं की शुद्धता आणि निर्मळता जमिनीतून उगवूं शकते.

आज हे फणसाचं झाड आम्हाला एवहडे फणस देतं की आम्ही त्याचा साठा घरात करून झाल्यावर उरलेले फणस बाजारात विकतो.फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com