Tuesday, December 14, 2010

अन्न पदार्थाच्या जादूची किमया.

“मला त्यात नवल काहीच वाटत नाही”
चहाचा कप पुढे करीत सुधाकर म्हणाला.

गेल्या आठवड्यात माझ्या मित्राला, सुधाकर करमरकरला, भेटायला मी पुण्याला गेलो होतो.गाडी जरा उशिरा पोहचली.मला पाहून सुधाकर म्हणाला,
“चल असेच आपण बाहेर पडूं.माझ्या एका नातेवाईकाचं लग्न आहे.तिकडेच आपण जेवायला जाऊं.”
“अरे मी तिकडे आगांतूक दिसणार.मला काही आमंत्रण नाही. तुच जा बाबा! मी इकडे आराम करतो.”
असं मी त्याला लागलीच म्हणालो.पण सुधाकर ऐकेना.मला घेऊन गेला त्या लग्नाला.

गणपतराव खडसे,,माझे एक जुने सहकारी,मला त्या लग्नात भेटायचे होते.हा योगायोग असावा.कारण मीही त्यांना बर्‍याच वर्षानी भेटत होतो.ते ह्या लग्नाला सातार्‍याहून आले होते.
लग्न झालं.जेवणं वगैरे झाली.गणपतराव दुसर्‍या दिवशीच्या गाडीने सातार्‍याला परत जाणार होते.कुठे तरी होटेलमधे रहाण्या ऐवजी सुधाकरनेच त्यांना आपल्या घरी झोपायला बोलवलं.बरेच दिवसानी आम्ही तिघे भेटलो होतो.जरा गप्पागोष्टी होतील हा उद्देशही होता.

गप्पांचा विषय निघाला जेवाणावरूनच.खडसे पहिल्यापासून भोजन-भक्त आहेत हे मला माहित होतं.आत्ताच जेवलेल्या लग्नाच्या जेवणावरून विषय निघाला.त्या जेवणात केलेली बासुंदी छान झालेली होती.खडस्यांनाही बासुंदी आवडली होती.

“खूप दिवसानी अशी बासुंदी खाल्ल्ली.मजा आली.”
मी म्हणालो.

मला बासुंदी खाऊन आनंद झालेला पाहून खडसे मला म्हणाले,
“जर समजा बालपणाचा विचार केला किंवा जीवनातला सर्वात आनंदाच्या क्षणाचा विचार केला तर तुमच्या काय लक्षात येतं?
कुटूंबिय,मित्र-मंडळी, हास्य-कल्लोळ,प्रेम,आणि कदाचीत,जर का तूम्ही माझ्यासारखे असाल तर एखादा अन्न-पदार्थ लक्षात येईल.जसा तो तुम्हाला आता लक्षात आला आणि तुम्ही आनंदी झाला”

सुधाकरकडे मी माझा डोळा मिचकवला.खडसे रंगात आले आहेत हा संकेत त्याला द्यायचा होता.

खडसे पुढे सांगू लागले,
“माझ्या डोक्यातली असतील नसतील ती स्मरणं,पुरण पोळी,श्रीखंड,बासुंदी,उकडलेल्या बट्याट्याची भाजी,काही उत्तम मास्यांचे पदार्थ,ह्यांच्याशी तर्क-संगती करतील.किंवा ही स्मरणं,अनेक खाद्यपदार्थ, पिढ्यान-पिढ्या प्रचलित होऊन,लोकांमधल्या वयांच्या अंतरांचे पूल सांधून,मग त्यामधे काहीही साम्य नसलं तरी,फक्त एखाद्या करंजीवरचं प्रेम दाखवायला आणि तिचा आस्वाद घ्यायला मदत करतील.”

मी म्हणालो,
मला खात्रीपूर्वक वाटतं की,अन्नाची, माणसाच्या अस्तित्वासाठी,जरूरी आहेच,नव्हेतर जीवनाला त्याची जरूरी एव्हडी आहे की,ते जीवन जोशपूर्ण ढंगाने उपभोगून,आपल्या मनात असलेला स्वाद त्यात टाकून,इतरांबरोबर त्याचा आनंद घेता यायला पाहिजे.”

आणि नंतर सुधाकरला उद्देशून खडसे म्हणाले,
“तुम्हाला माझं म्हणणं कसं वाटतं?तुम्ही कशावर विश्वास ठेवता?”
सुधाकर जरा डोकं खाजवून विचार करायला लागला.आणि मग हंसत खडस्यांना म्हणाला,
“तुम्ही प्रथमच मला असं विचारल्यावर माझ्या मनात प्रश्न आला की मी कशावर विश्वास ठेवीत असेन बरं? विचार करणं जरा कठीण व्हायला लागलं.माझ्या मनातल्या खरोखरच्या दृढविश्वासाच्या गुढार्थाचं प्रकटन करणं जरा कठीणच झालं.मी राजकारण्या सारखा,काहीसा नकारात्मक, होऊ लागलो आणि नंतर मला वाटायला लागलं की,ज्या गोष्टीमुळे मला आनंद मिळतो,ज्यामुळे मी जोशपूर्ण रहात आहे असं वाटतं त्या अनेक गोष्टीच्या यादीमधे अन्नाचा क्रमांक पहिला लागतो.हे तुमच्या प्रश्नावर माझं उत्तर आहे.”

सुधाकरलाही भोजनाचे प्रकार आवडतात हे ऐकून खडसे जरा खूश झालेले दिसले.आम्हाला दोघांना उद्देशून म्हणाले,
“कल्पना करा की एखाद्या वाटीतलं एक चमचा भरून श्रीखंड तुम्ही तुमच्या जिभेवर उतरवलंत.त्यात एखादा चारोळीचा दाणा,एखादा निमपिवळा बेदाणा,केशराचं न विरघळलेलं एखादं तूस आणि थंडगार झालेलं, साखरेच्या गोडीने माखलेलं ते चमचाभर श्रीखंड तुमच्या जिभेवर वितळायला लागलं की तुमचे डोळे क्षणभर मिटून स्वर्गीय सुख देत असतील नाही काय?.मला अन्नपदार्थबद्द्ल जे वाटतं त्यात तुम्ही भागीदार व्हावं म्हणून मी असं म्हणत आहे.”

मी खडस्यांना म्हणालो,
“तुमच्या सहवासात आल्यापासून मी पाहिलं आहे की,तुम्ही कुठचाही अन्न पदार्थ मस्त एन्जॉय करता.ही आवड तुम्हाला अगदी लहानपणापासून आहे का?”

“मी अगदी माझ्या जन्मापासून अन्नाला आसक्त होतो. अन्नाच्या पोषकतेच्या दृष्टीने नव्हे तर,त्याबद्दलच्या सर्व गोष्टीनी मला अन्नाचा लोभ वाढला.कदाचीत माझ्या आईच्या पाककृतीच्या प्रेमामुळे त्याचा संबंध येत असेल.किंवा कदाचीत इतक्या लोकांना अन्नाचं प्रलोभन असतं हे पाहून मला श्वासाचा सुटकारा टाकायला जमलं असेल.”
खडस्यांनी सांगून टाकलं.पुढे सांगू लागले,

“माझी मुंज झाली तेव्हा भोजनाचा थाट होता,मी पदवीधर झाल्यावर माझ्या मित्रांसह आम्ही पार्टी केली त्यात भोजन होतं,माझ्या लग्नप्रसंगी भोजन होतं,ह्याचं कारण काय असावं?ह्या सर्व घटना होत असताना, भोजन केल्याने, समारंभात रंग येतो,एक प्रकारचा कंप येतो. गप्पा-गोष्टी चालल्या असताना,हास्य-कल्लोळ होत असताना खाण्याच्या सानिध्यात मजा निराळीच असते.अगदी दूरवर विचार केला तर एखाद्याच्या तेराव्याला पण भोजन
समारंभ ह्यासाठीच केला जातो.”

मला हे खडस्यांचं म्हणणं एकदम पटलं.
मी म्हणालो,
“अन्न पदार्थांचा चारही बाजूनी विचार करायला मला आवडतं. एखाद्या पदार्थाचा तो आश्वस्त करणारा परिमल, त्याची ती चव,स्वाद आणि मिलावट एकत्रीत ठेवण्याची विशिष्ठ क्षमता,अन्नात ज्या पद्धतिने अनेक लोकांना एकत्रीत करण्याची ताकद असते ती ताकद,हे सर्व प्रकार पाहून, आनंद घेऊ देण्याचं अन्नाचं सामर्थ्य पाहून मीही चकित होत असतो.
अन्न आनंदाने फस्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. उत्तरेकडच्या लोकांना “सर्सूका साग आणि मकैकी रोटी” आवडते.दक्षिणेकडचे “इडली डोसा आणि वडा सांभारावर” ताव मारतात.पूर्वेकडचे “मास्यांवर”तुटून पडतात.आणि पश्चिमेकडचा “मराठी माणूस” श्रीखंड-पूरी,आणि झुणका-भाकर तल्लिन होऊन चापतात.
निवडून खाणारे लोक,चवदार पदार्थ कोणता ते बरोबर मेनूकार्डातून शोधून खातात.”

मला मधेच अडवीत गणपतराव खडसे म्हणाले,
“माझ्या बाबतीत बोलाल तर अन्नपदार्थाना माझा जीव कसा पकडीत ठेवायचा हे माहित झालेलं आहे म्हणूनच माझ्या मलाच काय आवडतं,आणि कशामुळे आवडतं हे माहित झालेलं आहे.

ही भोजनं एव्हड्यासाठीच के्ली जातात की,जेव्हा शब्द अपूरे पडतात, तेव्हा भोजन हे दिलासा देण्याचा संकेत म्हणून वापरला जातो.आनंद असो वा दुःख, सर्व काही साईड डिशने सामावून जातं.लग्न जुळो किंवा मोडो एखाद्या आईस्क्रिम डिशने भागून जातं असं मला वाटतं.

जरी बर्‍याच जणांचं,कदाचीत म्हणणं असेल,की भोजनातून सर्व काही साध्य होत असतं, तरी पण मला वाटतं,त्या भोजनाची तयारी,पाककृती आणि परंपरा ह्यातून खरा प्रबल एकत्रीकरणाचा प्रभाव होत असतो.

आणि ह्या सर्व गोष्टी आईवडीलांकडून,मित्रमंडळीकडून किंवा वयस्करांकडून शिकवल्या जातात,पण त्या एखाद्या पाककला कृतिच्या पुस्तकातून शिकल्या जात नाहीत.सल्ला, पदार्थ करण्याची ढब आणि पाककृति एका पिढी कडून दुसर्‍या पिढीकडे सोपवली जाते.तांदळाच्या खिरीपासून ते सत्यनारायणाच्या नैवेद्या पर्यंतची पाककला, माझी स्मरण शक्ति जागृत करते.”

सुधाकरला ही जेवणाच्या विषयावरची चर्चा आवडल्या सारखी दिसली.म्हणाला,
“रोजचा रात्रीचा प्रश्न!.आज रात्रीच्या जेवणांत काय आहे? हा रोजचाच प्रश्न माझं डोकं रोज खातो.माझ्या आईने केलेलं रात्रीचं जेवण सहजपणे मी नवरंगी वासावरून हेरू शकतो. माझ्या आईने केलेलं माझं सर्वात मनपसंत जेवण म्हणजे, डाळीची आमटी,भात आणि बटाट्याच्या कचर्‍या. कोणत्याही वेळेला कुटूंबातल्या कुणालाही राजमान्य वाटणारं हे जेवण.मी गावाबाहेर कुठेही असलो तरी असलं जेवण मला इतर कसल्याही आठवणी पेक्षा माझ्या
घराची याद देतं.

अंड्याचं आमलेट निरनीराळ्या प्रकारे बनवता येतं.पण ते बरेच वेळा “योग्य” प्रकारे बनवलं जात नाही.अंड्याचा रस घोटून घोटून फेसाळला गेला पाहिजे.आणि ते फेसाळणं माझ्या पोटाच्या लहरीवर अवलंबून असतं.टोस्ट,अरे वा! टोस्ट.तूपाने माखलेला,स्वादाने मखमखलेला आणि ब्रेकफास्ट साठी सॅन्डविच म्हणून वापरात आणता येणारा असा असावा.सॅन्ड्विचसाठीच म्हणूनच असावा.वैकल्पिक नसावा.
अन्नपदार्थ कसा चैनी खातर असावा हे लक्षात आणून मी माझी अन्न पदार्थाची व्याख्या तयार करायला सिद्ध होतो.”

मला, मालवणी जेवणातल्या मास्यांच्या पदार्थाची आणि खास कोकणी पदार्थांची आठवण आली.मी म्हणालो,
“माझ्या मते दरएक दिवशी जेवणातला एखादा पदार्थ विशिष्ठतेचा असावा.उदा.काही लोक जेवायला बसतात.पोट फूटेपर्यंत खाण्याचा त्यांचा मानस नसतो.किंवा जास्त खाऊन श्वास कोंडून घ्यायचा त्यांचा उद्देश नसतो.शेवग्याच्या शेंगा घालून केलेला झुणका खाताना,एक एक शिजलेली शेंग सोलून त्याच्या आतला गर, स्वादिष्ट समजून,समोरचे खालचे दांत आणि वरचे दात ह्यांच्या पकडीत धरून सरसरून बाहेर ओढून झाल्यावर,ताटाच्या शेजारी शेंगांच्या सालींचा ढिग करून ठेवण्याचा लज्जतदार प्रकार खाण्याच्या कलेचा भाग म्हणून त्यात सामाविष्ट केला जातो.किंवा करली नांवाचा मासा-अतीशय कांटेरी- तळल्यावर त्याच्या प्रत्येक तुकड्यातले कांटे विलग करून गोड लागणारा गर तेव्हडा तोंडात उतरवून अणकुचीदार कांटे तेव्हडेच निराळे करण्याची कला वेगळीच असते.तसंच काटोकाट भरलेलं ताकाचं ग्लास,सगळं जेवण संपल्यानंतर,डाव्या हाताने,उष्ट्या उजव्या हाताच्या उफरट्या भागावर, डाव्या हातातल्या ग्लासाला टेकू देऊन गट,गट आवाज काढून ताक पिऊन झाल्यावर,शेवटचा ग्लासात उरलेला ताकाचा अंश न विरघळलेल्या मिठाची चव घेता घेता मोठा ढेकर देताना दिलेली,स्वादिष्ट जेवण केल्याच्या कृतज्ञतेच्या पावतीतून, पत्नीला खूष करण्याची कला जगावेगळी नसते.

पोटभरून खाल्याबद्दल नव्हे,तर प्रत्येक खाण्याच्या कलेचा अंतरभाव त्या जेवणाच्या थाळीशी निगडीत असतो.
मला वाटतं अन्न हे आनंद घेण्यासाठी खायचं असतं,प्रेमाने खाण्यासाठी असतं,कुणाशी तरी नातं जुळवण्यासाठी असतं. मग ते स्वयंपाक घरात असो,ताट-पाट ठेवल्यावर ताटात वाढलेलं असो,ते नेहमीच कुणाचे तरी आभार मानण्यासाठी, कुणी तरी त्या क्षणाचा आदरास पात्र आहे असं दाखवण्यासाठी असतं.
प्रत्येक अन्न पदार्थ,त्यात असलेली मधुर आणि रसाळ चव,दिलासा देणारा विश्वास आणि असाधारण विशेषता प्रस्तुत करीत असतो.मात्र हडकुळा स्वयंपाकी, मुळीच विश्वास ठेवण्या लायक नसतो हे लक्षात असुद्या,अन्नात एव्हडी जादूची किमया आहे की,ते अन्न, प्रेरणा देणं,सान्तवन करणं आणि उत्तेजित करण्याचं काम करतं. शिवाय शारिरीक आणि आत्मिक दृष्ट्या समाधानी देतं.
हे अन्न,स्वादाची उत्सुकता वाढवून, जिभेचे चोचले संभाळून अनेकाना एकत्रीत करतं.”

रात्र बरीच झाली होती.डोळ्यावर झोपेची झापड यायला लागली होती.खडस्यांना सकाळीच उठून सातारची गाडी पकडायची होती.त्यांनीच चर्चा आवरती घेण्याच्या उद्देशाने सांगून टाकलं,
“मला मनोमनी वाटतं की,राजकारणातले विरोधी पक्ष, एकमेकाशी भांडणारे शेजारी देशातले लोक,विरोधी धर्माचे लोक जर का,गरमगरम किंवा थंडगार, आत्मा संतुष्ट करणारे,जिभेला चटक लावून देणारे,पदार्थ ताटात घेऊन हाताने भुरका मारून,त्यावर ताव मारतील,ढेकर देतील,असं हे क्षणभर का करीनात,तर लगेचच त्यांच्या लक्षात येईल की,सर्व माणसांमधे काहीच नाही तर निदान भोजनावर ताव मारताना भुरके मारून ढेकर देण्यात साम्य
जरूर आहे.”

सकाळी खडसे निघून गेल्यावर मी सुधाकरला म्हणालो,
“खडसे पक्के भोजन-प्रेमी आहेत.आमच्या ऑफिसात पार्ट्या तेच आयोजीत करायचे.”

“मला त्यात नवल काहीच वाटत नाही”
चहाचा कप पुढे करीत सुधाकर म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com