Saturday, December 11, 2010

माझ्या आजीची गोधडी.

काल शुक्रवार होता.ऑफिसमधून जरा लवकरच निघालो होतो.अंधेरी स्टेशनवरून येताना धाके कॉलनी बसस्टॉपवर उतरल्यावर,सातबंगल्याच्या चौपाटीवरून येणारा समुद्राचा गार वारा नकोसा झाला होता.लगबगीत आमच्या बिल्डिंगमधे शिरण्याच्या प्रयत्नात असताना,शेजार्‍यांच्या फ्लॅटच्या समोर असलेल्या बागेतल्या एका झाडात एक रंगीबेरंगी चादरवजा कपडा अडकेलेला दिसला.कुणातरी वरच्या शेजार्‍यांचा वाळत घातलेला कपडा असेल म्हणून
तो कपडा झाडावरून काढून घडी करून वर नेत असताना कपड्याच्या मागच्या भागावर लाल धाग्यात कोरलेलं नाव वाचलं.”सुनंदा” असं होतं.वर चढत चढत सुनंदाच्या घरची बेल वाजवली.दरवाजा सुनंदानेच उघडला.
“या,या,काका आत या.”
असं म्हणून, लगेचच म्हणाली,
“अरे वा! माझ्या आजीची गोधडी तुमच्या हातात कशी.?बहुदा,वार्‍याने खाली पडली असावी.आमच्या बाईला, वेंधळीला, मी स्वतः गोधडी धुवून तिला बाहेर बाल्कनीत वाळत घालायला सांगितलं होतं.नवीन आणलेले चाप लाव म्हणूनही सांगितलं होतं.”
मी सुनंदाला म्हणालो,
“मग मला काहीतरी बक्षिस देशील की नाही?”

“या या तुम्ही आत तर या.आज माझ्या आजीचा जन्म दिवस आहे.म्हणूनच मी ती गोधडी धुवायला काढली होती. ती जर हरवली असती.किंवा कुणी घेऊन गेलं असतं तर मला प्रचंड दुःख झालं असतं.माझीच चूक म्हणा.
मला आमच्या अय्यर प्रोफेसरांचं नेहमीचं वाक्य आठवतं.आणि ते मद्रासी हेल काढून म्हणायचे,
“स्मॉल,स्मॉल थिंग्स…व्हेरी इंपॉर्टन्ट थिंग्स….बिग थिंग्स नॉट सो इंपॉर्टन्ट”
ती गोधडी मी स्वतः वाळत घालून चाप लावायला हवे होते.धुण्याचा एव्हडा व्याप केल्यावर वाळत घालायचे कसले एव्हडे श्रम?चुकलंच माझं.”

“एव्हडं का मनाला लावून घेतेस?”
मी सुनंदाला प्रश्न केला.

“तुम्ही जर का मला विचाराल,
“ह्या जगात तुला कशावर विश्वास आहे?”
तर मी लगेचच सांगेन,
“ह्या माझ्या गोधडीवर”
सुनंदा सांगू लागली.पुढे म्हणाली,
“माझी गोधडी तशी जूनी आहे,मळकट दिसते,इकडे तिकडे लक्तरं गेल्या सारखी दिसते शिवाय आता ती माझं पूर्ण अंग लपेटू शकत नाही.पण जगातल्या कुठेच्याही गोधड्यापेक्षा मला माझी ही गोधडी अत्यंत प्रिय आहे.
तुम्ही माझी गोधडी पाहून म्हणाल,
“त्यात काय विशेष आहे?,अशी जूनी गोधडी का आवडावी?”
मला खरंच माहित नाही.मला ह्याच काय उत्तर द्यावं हेच कळत नाही.
मात्र मला एव्हडंच माहित आहे की,माझ्या जवळ ती असल्यापासून त्या पासून दूर जावंस कधीच वाटत नाही.ज्या ज्या वेळी मी ही गोधडी अंगावर घेते त्यावेळी त्यातली उब,त्यातून येणारा सुगंधी वास,आणि तिच्यापासून मिळणारा आनंद मला मिळत असतो.ही गोधडी मला एकप्रकारचं आ़श्वासन देत असते.”

माझं सुनंदाच्या गोधडीबद्दलचं कुतूहल वाढत गेलं.
मी म्हणालो,
“सुनंदा तुझ्या आजीने दिलेल्या या गोधडीबद्दल मला आणखी ऐकायचं आहे.”

“थांबा मी तुमच्यासाठी चहा टाकते.आणि आजीचीच आठवण म्हणून तिने मला शिकवलेला एक पदार्थ चाखायला देते.आज तिचा जन्म दिवस असल्याने तिची आठवण म्हणून मी तो पदार्थ आज केला आहे.”
असं म्हणून माझ्या जवळ खूर्ची घेऊन बसून मला सांगायला लागली.
“ही गोधडी माझ्या अंगावर मी पांघरल्यावर माझ्या जीवाला कसलीच बाधा होणार नाही असा मला एक भरवसा येतो.
माझ्या आजीने मला ही गोधडी दिली होती.माझी आजी तिच्या लहानपणा पासून ही गोधडी वापरायची.
माझी आजी मला सांगायची,
“मला ही गोधडी कुणी दिली ते आठवत नाही.शाळेत मी सर्वांशी चांगली वागायची.पण काही मुली माझा तिटकार करायची.पण कुणाशीही मैत्री करायचं मी सोडत नसायची.माझा तिटकार करण्यार्‍या मुलींमुळे मला कसं वाटायचं ते मी उघड सांगायला कचरायची नाही. माझ्या अंगात काही उणं असेल ते ही सांगायला मला काहिच वाटत नसायचं.”
माझ्या आजीचं हे ऐकून मला तिचा खूप आदर वाटायचा.
मी लहान असताना,रात्रीची झोपल्यावर माझ्या अंगावर माझी आजी ही गोधडी न चुकता पांघरायची.सुरवातीला मी ह्या गोधडीचा उपयोग मला उब मिळण्यासाठी म्हणून करायची.पण नंतर नंतर ह्या मळकट,जून्या गोधडीबद्दल मला खूप आपलेपणा वाटायला लागला.
आता ज्यावेळी ही गोधडी माझ्या सानिध्यात असते,तेव्हा मला लहानपणाच्या आठवणी येतात.आमचं घर खूपच लहान होतं.काहीसं अस्वच्छ असायचं. माझ्या आजुबाजूला माझी भावंडं-सख्खी,चुलत-वावरायची.पडवीत एका मोठ्या जाजमावर उशा टाकून आम्ही जवळ जवळ झोपायचो.कधी कधी लोळायलापण जागा नसायची.लहान असताना मला त्याबद्दल वाईट वाटायचं,आणि रागही यायचा.पण त्या आठवणी आता मला दिलासा देतात.ही
लहानशी गोधडी तर माझ्या आठवणीना उजाळा देते.

ही जूनी,मळकट गोधडी माझ्या जवळ असे पर्यंत माझं जूनं घर,माझं एकत्र कुटूंब, यांच्याबद्दल उजाळा देत रहाणार.
माझी भावंडं आता कामामुळे एकमेकापासून दूर रहायला गेली आहेत.फार क्वचितच आमची भेट होत असेल.आणि त्यांचा दुरावा मला भासत असतो. त्या सर्वांना भेटणं कदाचीत आता शक्य होणार नाही.म्हणूनच मी माझ्या सर्व आशा-आकांक्षा ह्या गोधडीत राखून ठेवते. माझ्या आजोबांचे मोजकेच पण महत्वाचे बोल,माझ्या आईचं व्यक्तिमत्व,माझ्या वडीलांचं वरचस्वी व्यक्तिमत्व,माझ्या धाकट्या बहिणीचे डोळे,माझ्याकडे टवकारून पहाताना, त्यांना दिसणारं,तिचं विश्व आणि अगदी नचुकता माझी जीवश्च-कंटश्च आजी तिच्या सर्व आठवणी ह्यात सामावलेल्या आहेत.

ह्या सर्व कारणांसाठी माझ्या आजीची ही लहानशी मळकट गोधडी रोज रात्री झोपताना जवळ घेतल्याने सर्व आठवणी उजळतातच शिवाय एक संरक्षणाचं मिथ्या कवच माझ्यावर आहे असं समजून मला अगदी गाढ झोप लागते.”

पाणावलेले डोळे पुसत पुसत सुनंदा उठली.आणि आतून दोन कप चहा घेऊन आली.आणि त्याबरोबर शेंगदाण्याचे दोन लाडू एका डीशमधे घेऊन आली.
मला म्हणाली,
“माझी आजी शेंगदाण्याचे लाडू चिकीच्या गुळात वळायची.त्यात सुक्या खोबर्‍याचे तुकडे घालायची.थोडी खमंग वास यायला वेलची टाकायची.तिचे लाडू खायला अप्रतिम वाटायचे.हे मी केले असल्याने कसे झाले आहेत कुणास ठाऊक”
असं म्हणून मला तिने दोन्ही लाडू खायचा आग्रह केला आणि एका डब्यात चार-पाच लाडू घालून,डबा माझ्या जवळ दिला.आणि म्हणाली,
“डब्यातले लाडू काकींसाठी आहेत.आणि तुम्हाला बक्षीस म्हणून आहेत.कसे वाटले तुम्हाला लाडू?”

मी उठता उठता म्हणालो,
“अप्रतिम”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com