Friday, December 17, 2010

दैना आणि गरीबीमधे सामावलेलं सुख आणि आशा.

“सुख हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे.एव्हडं मात्र खरं.”

त्याला बरीच वर्ष होऊन गेली असतील.मला आठवतं,मी नव्या मुंबईहून अंधेरीला येत होतो.ती बस डायरेक्ट अंधेरीला जाणारी नव्हती.वांद्रा स्टेशनच्या पूर्वेला जाऊन संपत होती.नंतर वांद्र्याहून ट्रेनने मी अंधेरीला जाणार होतो.माहिमच्या धारावीच्या खाडीजवळ आल्यावर एकाएकी बसचा टायर पंक्चर झाल्याने आम्हाला बसमधून खाली उतरून, येणार्‍या बसमधे जागा मिळेल तसं ती घेऊन पुढचा मार्ग गाठायचा होता.आमच्या बसचा कंडक्टर प्रत्येकाला ह्या बाबत मदत करीत होता.

संध्याकाळची वेळ असल्याने येणार्‍या बसीस भरून येत होत्या.काही थांबतही नव्हत्या.मी इतरांबरोबर,येणार्‍या बसच्या आत,चढायचा बराच प्रयत्न करून थकलो.
माहिमच्या खाडीवरून अरबीसमुद्रावरून गार वारा येत होता.त्यामुळे मे महिन्याचे दिवस असूनही उष्मा भासत नव्हता.तेव्हडंच एक सुख मिळत होतं. रस्त्यापलीकडच्या झोपडपट्टीकडे माझं लक्ष गेलं.दोन पावलं पुढे चालत गेलो.

जरा हे दृष्य,तुम्हाला जमत असेल तर, डोळ्यासमोर आणावं.
कचरा-कुड्याचे ढिगाचे ढिग अगदी क्षितीजा पर्यंत पोहोचणारे दिसत आहेत.त्याच्या पासून येणार्‍या दुर्गंधीची कल्पना करा.
आणि अशा ह्या वातावरणात लोक रहात आहेत अशी कल्पना करा.

असं दृष्य डोळ्यासमोर आणणं महा कठीण आहे ना? मला तशी कल्पना करायला काही कठीण होत नव्हतं.कारण अशाच ढिगार्‍या समोर मी उभा होतो.तिथल्या लोकांशी बोलत होतो.कल्पनेच्या पलिकडची तिरस्कारपूर्ण गरीबीची, पोटातून पेटके येऊन ओकारी येईल अशी, दुर्गंधी घेत होतो.
धारावी जवळच्या झोपडपट्टीला भेट देऊन इथल्या जगाबद्दलचा माझा दृष्टीकोन थोडा रुंदावण्याच्या प्रयत्नात मी होतो.

त्या दिवसाची धक्कादायक गोष्ट म्हणजे ते दृष्य नव्हतं,जे स्वतःहून घृणास्पद होतं,पण ती दुर्गंधी होती.जमलं असतं तर एखाद्या बाटलीत ती दुर्गंधी कोंडून ठेवून,रोज घरी त्याचा वास घेण्यासाठी,तो वास आनंद देईल म्हणून नव्हे तर, ज्यातून माझ्या मनावर परिणाम व्हावा की,किती अन्यायकारक परिस्थितित जबरदस्तीने आपल्याच भावाबंधाना ह्या पृथ्वीवर रहावं लागत आहे.
त्या ढिगार्‍याची दुर्गंधी कचरा,उष्टनाष्ट,घाम आणि भीति पासून होती.गरीबी काय आहे ते ही दुर्गंधी नाकात घेतल्या शिवाय ते कळण्यासारखं नव्हतं.

धारावीच्या ह्या दुर्गंधाच्या जागी,घोंघणार्‍या माशा हडकुळ्या गाई,बैलाच्या अंगावर बसून राज्य करीत होत्या.काळे आणि गोरे डुक्कर आणि डुक्करीणी आपली पसाभर पोरं घेऊन उकीरडे हुंगत जात होती.अर्धवट जीवंत असलेले अंगाला लूत आलेले कुत्रे आणि कुत्र्याची पिल्लं, मेल्यासारखी चिखलात, कचर्‍यात,आणि माणसांच्या विष्टेत पडून होती.बायका,मुलं आणि रांगणार्‍या वयातली मुलं,मोडक्या तुडक्या टीनच्या पत्र्याच्या,आणि कार्डबोर्डच्या तुकड्याचा आडोसा घेऊन,येणार्‍या सावलीत घर समजून आसरा घेत होती.जरा मोठ्या वयाची मुलं,मुली घाण पाण्याच्या वहाणार्‍या ओढ्याच्या एका बाजूपासून दुसर्‍या बाजूला पाणी तुडवीत चालत जात होती.

खरं म्हणजे हे त्या मुलांचं शिक्षणाचं वय असावं.पण बसस्टॉप जवळ किंवा रस्त्यावर येणार्‍याकडे हात पसरून भीक मागत होती.कुणी एखादा पोलीस हवालदार पकडून नेईल म्हणून भित्र्य़ा नजरेने इकडे तिकडे नजर लावून होती.ही भीति, त्यांची वास्तविकता झाल्याने, उरलेल्या आयुष्यात त्यांच्या मानगुटीवर बसलेली असणार.

मला वाटतं,ही मंडळी बाहेरून कितीही अस्वच्छ,घाणेरडी दिसली तरी,पांढरपेशा माणसा सारखी ती तितकीच महत्वाची आणि प्रेम करण्यालायक होती. जरी पांढरपेशी माणसं स्वच्छ,शिकली-सवरलेली आणि निगा राखलेली असली तरी सर्वांना शेवटी देवाचीच लेकरं समजली जातात.माझ्या नजरेत तरी ही निष्पाप भुकेलेली मुलं,तेव्हडीच महत्वाची वाटतात जेव्हडा एखादा राजकारणी माणूस किंवा एखादा प्रसिद्धिला भुकेलेला प्रतिष्टीत माणूस दिसावा तशीच दिसतात.

ह्या लोकांकडून बरच काही शिकण्यासारखं आहे.त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य,आणि आनंद पाहून,तुम्ही कुठून आलात आणि तुमच्याकडे काय आहे,ह्यापेक्षा जीवन हे आणखी काहीतरी आहे हे नक्कीच लक्षात येतं.पांढरपेशांची मुलं पाळणा घरात जेव्हडी सुखी असतील त्यापेक्षा ही मुलं असावीत.कारण ही मुलं अगदी लहानपणापासून शिकत असतात की,जीवनात हानीकारक,दुःखदायी गोष्टी होत असतात,पण तुम्हाला मार्ग काढून जीवन जगलं पाहिजे. फेकून दिलेल्या फुलासारखं साध्या खुशी मधून आनंद मिळवायला हवा.जे जीवन देत आहे ते घेऊन त्यातून आनंद कसा मिळेल ह्याचं कारण शोधत राहिलं पाहिजे.सुख हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे.एव्हडं मात्र खरं.
घरी गेल्यावर मला एक कविता सुचली.लगेचच मी ती लिहून काढली.

झोपडी

होती ती एकच झोपडी
नजर कुणाची त्यावर पडली
होते त्यावर एक मोडके छ्प्पर
त्यामधून दिसे आतले लक्तर

निकामी एका आगगाडीच्या फाट्यात
कुणीतरी बांधली ही झोपडी थाटात
नजरेला त्याच्या वाटे तो महाल
झोपडी जरी समजून तुम्ही पहाल

जर असता तो महालाचा राजा
त्यजीला असता न करता गाजावाजा
ओतले त्याने त्याचे त्यात सर्वस्व
कसा सहन करील कुणाचे वर्चस्व

होती पहात वाट आत त्याची राणी
सोसूनी दैना टिपे डोळ्यातले पाणी
गरीबी,दुःख, हानी असे त्यांच्या जीवनी
निःशब्द राहूनी सांगे झोपडी कहाणी.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com