Monday, October 3, 2011

एकमेकातला दुवा जाणण्याची असमर्थता.

“आपण माणसं एकमेकाशी दुव्याने सांधलेले आहो.हा एकमेकामधला दुवा माणूसकीची खरी व्याख्या करतो.”

आता उन्हाळा संपला.फॉल चालू झाला.मागल्या परसातल्या झाडावरची उन्हामुळे रंगीत झालेली सफरचंद, पीच,प्लम्स खाली पडायला लागली आहेत.
हळू हळू ह्या झाडांची पानं झडायला सुरवात होणार.शेवटी पडझडीने उघडी बोडकी झालेली ही झाडं,फॉल आणि कडक थंडीला सामोरी जाणार आहेत.

“पण आणखी पंधराएक दिवस तळ्यावर फिरायला यायला हरकत नाही.”
असं फोन करून मला प्रो.देसाय़ांनी,
“आज तुमची तळ्यावर वाट बघतो”
असं सांगून इशाराही दिला.
आज काहीतरी खास मला सांगायचं आहे हे त्या इशार्‍यातून मी ताडलं.
संध्याकाळी मी तळ्यावर जायला निघालो.माझ्या अगोदर भाऊसाहेब तळ्यावर नेहमीच्या बाकावर येऊन बसले आहेत हे मी लांबूनच पाहिलं.मात्र कसलंतरी पत्र हातात घेऊन उलट सुलट करून वाचत होत हे मी त्यांच्या जवळ आल्यावर पाहिलं.

मला आपल्याजवळ बसायला सांगून प्रो.देसाई मला म्हणाले,
“त्या दिवशी मला पोस्टमनने एक पत्र आणून दिलं.ह्या दिवसात जिथे इमेल,सेल फोन ह्या सारख्या साधनातून खबर मिळू शकते,संवाद साधता येतो तिथे,अशा तर्‍हेचं चक्क पोस्टातून येणारं पत्र म्हणजे,एक अमुल्य खजिनाच समजलं पाहिजे,की जो नीट जपून ठेवून पुन्हा पुन्हा वाचायला मिळावा.

मी तर आता निवृत्त शिक्षक आहे.आणि हे पत्र मला माझ्याच एका विद्यार्थ्याने पाठवलं होतं.तोच आता जवळ जवळ पन्नासएक वर्षाचा झाला असावा.तो आता कुठे तरी मद्रास जवळच्या खेड्यात रहातो.

तो माझा विद्यार्थी असताना माझ्या एका मित्राच्या दुकानात मी त्याला पार्ट टाईम म्हणून नोकरी द्यायला शिफारस केली होती.आणि तो तिथे काम करायचा.काही दिवसानी त्या दुकानातून चोरी केल्याचा त्याच्यावर आळ आला. त्यामुळे त्याची नोकरीही गेली होती.

त्या घटनेचा पश्चाताप झाल्याचं ते पत्र होतं.आपण चोरी केल्याबद्द्ल आपल्याला पश्चात होत असून इतकी वर्षं बाळगलेल्या त्या पापाचं ओझं हलकं करण्यासाठी आपण लिहित आहे अश्या अर्थाचा त्यात मजकूर आहे.

मला आठवतं,त्यावेळी त्याने केलेल्या प्रकाराबद्दल मी तेव्हाच खूप त्याच्यावर नाराज होतो.त्याने केलेल्या अविवेकपूर्ण कामाचं मी पूर्वानुमान करू शकलो नसतो. ह्याचंही मला त्यावेळी शर्मिंद झाल्यासारखं वाटलं होतं. कदाचीत त्यावेळी मी अशी समजूत करून घेतली असावी की तो बच्चा होता, म्हणून त्याने तो मुर्खपणा केला होता.मी त्यालाही आणि त्या घटनेलाही केव्हाच विसरून गेलो होतो.

परंतु,तो कधी विसरलेला दिसत नाही.
जगात तेच तेच करणारे लोक क्वचित असतात.पण त्यातून सुधारणा करणारे अनेक असतात.शिवाय,बरेच वेळा तेच तेच करण्यासारख्या घटना ज्या कराव्यासारख्या वाटतात,त्याच घटना सरतेशेवटी आपल्याला सुधारत असतात.

एक सतरा वर्षाचा मुलगा,आपल्या शिक्षकाच्या मित्राच्या दुकानातून चोरी करतो,तो आता पन्नास वर्षाचा वयस्कर झाल्यावर,एक यशस्वी इंजिनीयर झाल्यावर,निष्टावान नवरा आणि दोन मुलींचा बाप झाल्यावर,हीत आणि अनहीत समजायला लागल्यावर, हा माणूस पत्ता हुडकून आपल्या शिक्षकाला पत्र लिहितो.

क्षमा मागण्याची त्याला जरूरी भासते म्हणून तो त्याने केलेली चूक ही त्याच्या जीवनाचा मानदंड आहे असं समजून तो तसा वागल्याने,जीवनात कठीण कठीण समस्या सोडवताना योग्य मार्ग निवडण्याकडे आपलं लक्ष केंद्रीभूत करतो.
“त्या घटनेची आठवण मनात आणून”
तो लिहितो,
“मी जेव्हा माझी स्वतःची सत्यनिष्ठ विकली आणि ती सुध्दा एका फाल्तु गोष्टीसाठी,हे आठवून मी स्वतःला उच्चतम पातळीवर न्यायच्या प्रयत्नात असतो.”

त्याचं हे पत्र,त्याच्यावर झालेल्या प्रभावाची, आठवणीची, चारित्र्याची आणि संपर्क ठेवण्यास लागणार्‍या क्षमतेची जबानीच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

ह्यावरून माझ्या डोक्यात एक विचार आला की,ते अदृश्य दुवे,जे आपल्याला आठवणीच्या सहाय्याने एकमेकाशी बांधून ठेवतात,त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीवही नसते.मला आणि माझ्या त्या विद्यार्थ्याला तो दुवा अजून संपर्कात ठेवत आहे.गेली एकत्तीस वर्षं,हा दुव्याचा गुंता,यश अपयश, सुख दुःख, लोक आणि जागा,ह्यांचा एकमेकांच्या वेगवेगळ्या जीवनातल्या येणार्‍या अनुभवासहीत एक संपर्क सांधून ठेवू शकतो ह्याचं मी भाकीतही करू शकलो नसतो.

तो माझा विद्यार्थी आता कोणत्या पातळीवर जीवन जगत आहे हे मला समजलं जावं ह्याचं त्याला महत्व वाटत असणार.त्याला ह्या गोष्टीची प्रचिती असणं ही माझ्यासाठी पण गर्वाची बाब आहे.त्याचं ते पत्र हे मला त्याने दिले्लं खरोखरीचं बक्षीस आहे.

आपण माणसं एकमेकाशी दुव्याने सांधलेले आहो.हा एकमेकामधला दुवा माणूसकीची खरी व्याख्या करतो.
एकमेकांच्या वयक्तिक कथेचे वाटेकरी असण्याची जरूरी,एकमेकावर करावं लागणार्‍या आणि करून घेतलेल्या प्रेमाची जरूरी,एकमेकातला मतलब आणि एकमेक एकमेकाला आठवले जावे याची जरूरी आणि शेवटी एकमेकाला माफ करणं आणि माफ करून घेणं याची जरूरी हीच खरी माणूसकीची व्याख्या होऊ शकेल.”

भाऊसाहेबांनी मला ते पत्र वाचूं दिलं.त्यांनी अगोदरच केलेल्या त्या पत्राच्या खुलाशाने पत्र वाचता वाचता माझे डोळे भरून आले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com