Wednesday, November 30, 2011

साक्षात्कार दिलीपचा.


“मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

दिलीप गव्हाणकर दिल्लीलाच जन्मला.त्याचे वडील वसंत गव्हाणकर सुप्रिमकोर्टात वकिली करायचे.दिलीपही त्यांच्या मागोमाग वकिली करायला लागला.दिल्लीची प्रतिष्टीत मंडळी रहायची त्या वसंत विहारमधे गव्हाणकरांचा बंगला होता.

मी ऑफिसच्या कामाला दिल्लीला गेलो की गव्हाणकरांच्या घरी भेट देऊन यायचो.मुंबईला येण्यासाठी रात्री दहाची फ्लाईट असायची तेव्हा संध्याकाळचाच गव्हाणकरांकडे येऊन गप्पा मारीत बसायचो.

दिलीप अतीशय देवभोळा,इश्वरभक्त होता.घरात सर्व सणवार आणि धार्मिक कार्यक्रम केले जायचे. एव्हडं की दिलीप आपलं जानवं दरवर्षी बदलायचा.
भटजीना आणून धार्मिक सोपास्कार करून आपलं जानवं बदलायचा.मी त्याला एकदा म्हणालो होतो,
“माझं जानवं कुठच्या खुंटीला मी गुंडाळून ठेवलंय ते आठवत पण नाही”
हसला आणि मला म्हणाला होता,
“माझ्या लहानपणी माझ्या आजोबांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत.दर शनिवारी मी शनिमाहात्म्यसुद्धा वाचतो.त्यांना दिलेलं वचन आहे.मला त्यामुळे मनःशांती मिळते.”

मला आठवतं त्यानंतर एकदा माझी आणि दिलीपची ह्याच विषयावर थोडी चर्चा झाली होती. आपला अनुभव तो मला समजावून सांगत होता.

मला म्हणाला होता,
“मी नेहमी मानतो की निसर्गच आपला दुवा विधात्याशी सांधत असावा.प्रत्येकाला त्या अचाट शक्तीशी दुवा सांधायला मोका मिळत असतो असंही मला वाटत असतं.

आम्ही पहिल्यापासून दिल्लीलाच रहायचो.मला माझी एक जूनी गोष्ट आठवते.मी सोळाएक वर्षांचा असेन.प्रथमच माझ्या वडीलानी मला आजीआजोबांकडे गोव्याला जाण्यासाठी विमानात बसवून दिलं होतं.त्यापूर्वी मी बरेच वेळा माझ्या आईबाबांबरोबर आजीआजोबांकडे गोव्याला गेलो
होतो.ह्यावेळी दोन आठवडे मी आजीआजोबांबरोबर राहिलो.प्रत्येक दिवस मजेत गेला.रोज आम्ही समुद्र चौपाटीवर जायचो.

ह्यावेळेला समुद्र पाहून मी अचंबीत झालो.समुद्र मी कधीच पाहिला नव्हता असं नाही. क्षीतिजापलीकडे पाणी पसरलं होतं.मोठमोठ्या लाटावरून सूर्याचं प्रतिबिंब परावर्तीत होत होतं. अवतिभवती सर्वच प्रसन्न वातावरण होतं.समुद्राला ओहटी आली असल्याने,दूरवर उंचच उंच खडकं दिसत होती.

एकेठिकाणी ती खडकांची रांग जणू आकाशाला भिडते की काय असं वाटत होतं.पायाखालची वाळू बरीच गरम झाली होती.फुटलेल्या लाटेच्या थंड फेसाळ पाण्यात अशावेळी पाय बुडवून पहायला मजा यायची.थंड वार्‍याच्या झुळकीबरोबर सर्व अंगात शिरशीरी यायची.

त्याच मुक्कामात एक दिवस मी माझ्या आजोबांबरोबर चौपाटीवर आलो होतो.मला आठवतं,त्या संध्याकाळी मी एव्हडा उत्तेजीत झालो नव्हतो.किंवा त्या संध्याकाळी मला एव्हडं रोमांचक वाटत नव्हतं.पण काही कारणास्तव मला विशेष शक्ती आल्यासारखं,अगदी मोकळं मोकळं वाटत होतं.

विधात्याशी दुवा सांधल्यासारखं वाटत होतं.अंगात नम्रपणा आला होता आणि त्याचबरोबर तिथे असल्याचं महत्वही वाटत होतं.काहीतरी विस्मयकारक वाटण्यासाठी आणि निसर्गाच्या शक्तीनेच हे विश्व निर्माण झाल्याची प्रचिती मिळत होती.

मी कुठच्या धर्माचा आहे किंवा मी कुठच्या देवाला मानतो हे विचारण्यासाठी ती वेळ नव्हती. मलाच स्वतःला त्याबद्दलची खात्री नव्हती.ती खात्री नसण्यात मला आनंद होत होता.त्या निसर्ग रम्य वातावरणात माझ्या अंगात एव्हडी शक्ती कशी आली,एव्हडा निश्चिंत मी कसा झालो होतो, खर्‍या जगापासून मी एव्हडा अलिप्त कसा झालो होतो हे अनुभवूनच तो विस्मय प्रेरणापद वाटत होता.

मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

ही दिलीपची माझ्याशी झालेली चर्चा आणि त्या चर्चेची आठवण मला आज आली कारण मला कुणीतरी सांगीतलं की दिलीप गेला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com