Monday, March 19, 2012

अंतरातल्या नाना कळा...६




सोडुया मोह आता
वेळेच्या वसुलीचा
आणि
विश्रांती विना श्रमाचा
अथवा पस्तावू
आनंद सुखाने जगण्याचा


मंगळवारपासून रोज सकाळी माझी मुलगी मला सुधार सेंटरवर सोडायला लागली.आणि मुलगा मला सेंटरवरून मुलीच्या घरी येऊन सोडायचा.आम्ही आमच्या मुलीकडे रहात असल्याने मुलगी मला सकाळी ह्या सेंटरवर सोडून,आपल्या आईचं दर्शन घेऊन तिला प्रेमाचं आणि आस्थेचं अलिंगन देऊन आपल्या कामावर जायला लागली.सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत मी माझ्या पत्नीच्या सानिध्यात रहायला लागलो.


ह्या सुधार सेंटरमधे दोन विंग्स आहेत.एका विंगमधे माझ्या पत्नी सारखे दोन तीन आठवड्यासाठी आलेले पेशंट रहातात.आणि दुसर्‍या विंगमधे बरेच उशीरा सुधार होणारे पेशंट रहातात.सत्याहत्तर पेशंटची सोय असलेल्या ह्या सेंटरवर नर्सिंगहोममधे ज्या सोयी पेशंटसाठी असतात त्या सर्व सोयी पुरवल्या जातात.


ह्या सेंटरवर फिजिओथेरपीसाठी लागणारी जीम असून स्न्यायुंच्या सुधारासाठी लागणार्‍या डायथर्मी देता येण्यासारख्या मशीन्स आहेत.स्नायुंनां शिथीलता आणण्यासाठी "इलेक्ट्रीकली इन्ड्युस्ड" उब देण्याची सोय ह्या डायथर्मी मशीनचा उपयोग करून केला जातो.
२८ फेबु.रोजी निर्धारण करणारा फि.थे.(फिजिओथेरपीस्ट) पत्नीच्या रूममधे येऊन तपासणी करून गेला.दुसर्‍या दिवसापासून तिला व्यायाम दिला जाणार असं त्याने सांगीतलं.आम्हाला हे सर्व नवीन होतं.इथली प्रत्येक गोष्ट माझ्या ज्ञानात भर घालणारी होती.


अपघाताने शरीराचा चेंदामेंदा झालेले पेशंट,परॅलेटीक पेशंट वाचा गेलेले पेशंट असे नाना व्याधीने पांगळे झालेल्या पेशंटना जीवन जगण्याच्या पातळीवर आणून त्यांचा पुनर्सुधार केला जातो.


दुसर्‍या विंग मधल्या बरेच उशीरा सुधार होणार्‍या पेशंटची देखभाल कशी करतात ह्याचं कुतूहल मनात आल्याने ते पहाण्यासाठी आणि त्याचबरोबर माझे पाय मोकळे करण्यासाठी म्हणून त्या विंगमधे सहजच फेरफटका मारण्यासाठी मी गेलो होतो.


ह्या विंगमधल्या पेशंटच्या शारीरीक अवस्था पाहून माझं मन खूपच गहिवरलं.जीवनाच्या संध्याकाळी माणसाची काय अवस्था होते आणि अशा लोकांची नीट देखभाल न केल्यास काय अवस्था झाली असती कुणास ठाऊक.
नकळत माझं मन, माझ्या आजी आजोबांच्या उतार वयातल्या माझ्या आठवणी, जागृत करायचा प्रयत्न करू लागलं.


त्या काळात शारीरीक बळाला कमतरता येऊ लागल्याने त्यांच्या हालचालीतही कमतरता दिसायला लागायची.शेवटी चालणंच बंद झाल्याने घरीच बिछान्यात निपचीत पडावं लागायचं.कसलीच हालचाल करायला न आल्याने शरीराचं सर्वच कार्य हळूहळू उताराला लागायचं.अन्न कमी जात गेल्याने शरीर क्षीण होऊन शेवटी अंत व्हायचा.


ह्या सुधार सेंटरमधे असं होऊ द्यायला मज्जाव आणण्याचा प्रयत्न होतो.त्यामुळे दिवसभर व्हिलचेअरवर बसून सेंटरच्या आवारात होणारे निरनीराळे कार्यक्रम पाहून,जेवणांच्या वेळी वाटल्यास डायनींग हॉलमधे बसून जेवावं अथवा तुमच्या रूममधे तुम्हाला जेवण आणून दिलं जातं ते जेवावं.मध्यंतरी पेशंटचा व्यायाम घेतला जातो.थोडक्यात तुम्हाला सक्रिय ठेवलं जातं.


मन उद्विग्न झालेल्या मनस्थितीत मी पुन्हा पत्नीच्या जवळ येऊन बसलो.तिचं रात्रीचं जेवण आटोपून ती आपल्या बिछान्यावर पहूडली होती.बिचारी उद्यापासून व्यायाम घेतला जाणार आहे त्याच्या काळजीत असावी.मी तिची होईल तेव्हडी समजूत घालीत होतो.असं रोज तिला सोडून मला मुलाबरोबर मुलीच्या घरी झोपायला जावं लागणार होतं ह्याही विवंचनेत ती असावी.माझ्या प्रकृतीची हेळसांड होऊ नये म्हणूनही ती चिंतेत असावी. तिचं मुकेपण मला जास्त बोलकं वाटत होतं.तेव्हड्यात माझा मुलगा योजल्या प्रमाणे मला न्यायला आला.मला घेऊन निघण्यापूर्वी आपल्या आईला त्याने अलिंगन दिलं.भरवशाच्या दोन गोष्टी तिला त्याने सांगीतल्या.


घरी आल्यावर मुलीने केलेल्या जेवणातले दोन घास मी कसेबसे खाल्ले.सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत बसायची अशा तर्‍हेची सवय नसल्याने मला खूप थकवा आला होता.
बिछान्यावर पडल्यावर झोप केव्हा आली ते मला कळलंच नाही.
जावई,सून आणि दोन्ही मुलं आमच्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून माझी चिंता दूर झाली होती.पहाटेला जाग आल्यावर भूतकाळाची जाणीव व्हायला लागली.


आमच्या समुद्ररूपी संसाराच्या प्रवासात आम्ही कसे दिवस काढले त्याच्या आठवणी येऊ लागल्या.
ह्या प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.


ते वसंत ऋतुचे दिवस होते.
“जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे.”
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com