Monday, March 12, 2012

अंतरातल्या नाना कळा...४




"ज्याच्या शरिरावर
होतो जो अत्याचार
त्याचा त्यालाच भोगावा
लागतो त्याचा परिणाम
केल्यामुळे अविचार"

२६ फेब्रु.२०१२
आज रविवार होता.हॉस्पिटलात सर्व सुन्न होतं.गर्दी अगदी कमी होती.आमचे जवळचे नातेवाईक माझ्या पत्नीला भेटायला आले होते.सोमवार ते शुक्रवार मरमरेस्तो काम करणार्‍या इथल्या लोकांना शनिवार रविवार हे दोनच दिवस अशा कामासाठी उपयोगी पडतात.शनिवारचा आठवड्याची साठलेली व्यक्तिगत कामं करण्यात उपयोगी होतो आणि मग रविवारी सोशल कामं, प्राथमिकता पाहून, करायला मिळतात.

माझी मुलं,यात सुन आणि जावई धरून,इतके दिवस आपला जॉब सांभाळून मला मदत करीत होतेच आणि मी फक्त माझ्या पत्नीच्या जवळ, मिळेल तो वेळ तिच्या सानिध्यात घालवायचो.

रिकामटेकड्या मनात जुन्या आठवणी गर्दी करून यायच्या.
काय हे जीवन?आपआपल्या धर्मातल्या,समाजातल्या रुढी नुसार आपण जीवन जगत असतो.अडचणीचे क्षण येतात,आनंदाचे क्षण येतात.गेला तो आपला दिवस.आहे तो दिवस, जगत रहायचं आणि तो दिवस संपल्यानंतर त्याला उद्या आपला दिवस म्हणावा लागणार.मात्र उद्याचा येणारा दिवस कसा तो आपल्याला मुळीच माहित नसतो.आपण योजीत असतो तसाच तो जाईल याची खात्री नसते.दिवस,आठवडे,महिने आणि वर्ष संपत असतात.

"आज" हा "कालचा" "उद्दया" असतो
 आणि
 "आज" हा "उद्दयाचा" "काल" असतो
 मग
 "उद्दया" जेव्हा "आज" होईल
 आणि
 "आज" चा "काल" होईल
 तेव्हा
 त्या "उद्दयाच्या उद्दयाला"
 "आजचा"  "उद्दयाच"  म्हटलं जाईल
 आता
 "आज" जे होत राहिलंय
 त्याचं
 "काल" म्हणून होत जाणार
 जे
 "उद्दया" म्हणून होणार आहे
 त्याला
 "आज" म्हणून म्हटलं जाणार.

 म्हणून त्या वयातही मनात येतं,
"आता कशाला उद्दयाची बात
 बघ उडुनी चालली रात
 भर भरूनी पिऊ
 रस रंग नऊ
 चल
 बुडुनी जाऊ रंगात”


आपल्या जीवनाचा इतिहास जमत असतो.मागे वळून पाहिल्यास आपलं काय चूकलं आपलं काय बरोबर होतं ह्याचं मुल्यनिर्धारण करता येतं.चुकातून सुधारणा करता येते.त्याने पोक्तपणा येतो.पण काहीवेळा म्हणावं लागतं,
"होणारे न चुके जरी तया येई ब्रम्हदेव आडवा."

१२ जून १९५८ साली माझी पत्नी माझ्या घरी आपलं रहातं घर सोडून आली.किती कठीण आहे हे असं करणं.  किती विश्वास होता तिचा. आपल्या आईवडीलाना मागेवळून पहाताना क्षणभर दुःखाने डोळे भरून यावेत आणि मान फिरवून समोर दुसऱ्या क्षणी पहाताना त्याच डोळ्यात भविष्यातल्य़ा सुखाचं तेज भरून यावं.
 काय हा विपर्यास!

आमच्या समुद्ररूपी संसारातल्या,प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची. सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.

ते वसंत ऋतुचे दिवस होते.
“जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे.”
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com