Friday, March 23, 2012

अंतरातल्या नाना कळा...७





"नजरेला दावी पाप
त्याला नेत्र म्हणू नये
विसरला आईबाप
त्याला पूत्र म्हणू नये."

ह्या ओळी माझ्या मुलांना लागू होत नाहीत. ह्याबद्दल मला धन्य वाटतं.गेले अठराएक दिवस ही मुलं कामावर त्यांचं शरीर घेऊन गेली तरी मनानी ती माझ्याबरोबर आणि आपल्या आईबरोबर रहातात.सुधार सेंटरवर त्यांचे दोन दोन तासानी फोन येऊन असलेल्या स्थितिची चौकशी करीत असतात. जमेल तेव्हा जातीने भेटून जातात.त्यामुळे आम्हाला केव्हडा धीर येतो.



पुनर्सुधार सेंटरवर येऊन आता बारा दिवस झाले होते.परंतु,प्रत्यक्ष थेरपी त्या आठवड्यातल्या बुधवारपासून झाल्याने आज थेरपीला सुरवात होऊन दहाच दिवस झाले होते.
आपलं शरीर आपल्याला दिसायला एकदमच चालू वाटतं.पण ते किती क्लिष्ट आहे हे नुसत्या फिझीकल थेरपी,ऑक्युपेशनल थेरपी.आणि स्पिच थेरपी ह्या घेतल्या जाणार्‍या उपायांकडे पाहून मनात येतं, ज्या निसर्गाने हे शरीर बनवलं आहे त्या निसर्गाची काय महती गावावी.?
माझ्या पत्निला फक्त फिझीकल आणि ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे.
ऑक्युपेशनल थेरपीबद्द्ल अगदी साध्या भाषेत सांगायचं झाल्यास,ज्या पेशंटना त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना हव्या असलेल्या आणि त्यांना लागणार्‍या जरूरीच्या गोष्टी उपचारात्मक उपायानी सुलभतेने प्राप्त होण्यास केलेली मदत.वयस्कर पेशंटना शारीरीक आणि संज्ञानात्मक बदल
होण्यास मदतीच्या रुपाने केलेला उपचार.
सर्व उपाय चालू आहेत आणि प्रगती मुंगीच्या पावलांनी पुढे पुढे चालली आहे.जागृत होणार्‍या स्नायुंची रोजरोजची सुधारणा आकडेवारीत,ग्राफवर आणि प्रत्यक्ष हालचालीवरून नजरआड होत नाही.


"डोन्ट युझ देन यु लूझ"
असं हे ह्या थेरपीचं ब्रिदवाक्य आहे.शरीराचा बाहेरचा अवयव नकळत वापरला जातो.त्यामुळे एरव्ही काही वाटत नाही.पण जर का एखादा अवयव वापरला गेला नाही की तो कधीतरी दुखू लागतो.आणि ह्याची परिणीती तो अवयव न वापरण्यात होतो.
"वापरात नाही म्हणून दुखतो आणि दुखतो म्हणून वापरात नसतो"
ह्या चक्रगतीत तो अवयव निकामी होतो.माझ्या पत्नीच्या पायांची तिच काहीशी परिस्थिती झाली.स्नायु कमजोर झाले.आणि आता त्यांना जोर आणायला व्यायामाशिवाय गत्यंतरच नव्हतं.


मला घेऊन माझ्या मुलीच्या घरी सोडायला माझ्या मुलाला आज जरा उशीर होणार होता.तसं मला त्याने सांगीतलं होतं.माझी पत्नी तिचं रात्रीचं जेवण झाल्यावर तिच्या बिछान्यावर पहुडली होती.तिला झोप कधी आली ते मला कळलंच नाही.
व्यायामाची तिला सवय नसल्याने सर्व अंग आंबलं असल्याने बिछान्यावर टेकल्यावर तिला झोप आली असावी.


तिच्या बिछान्यासमोरच खूर्चीवर बसून मी मुलाची वाट बघत बसलो होतो.दिवसभर त्या सुधार सेंटरच्या वातावरणात राहून माझं मनही थकलं होतं.मलाही डुलकी लागली.आणि परत मी माझ्या समुद्ररूपी जीवनात गेलो.


सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी"

बिचारी गेली एकवीस वर्ष तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
"मी कुणाचं वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?"
असं ती मला म्हणते.
"पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने "आशा" नावाची एक माणसाला क्षमता दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया"
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.



माझा मुलगा माझ्या जवळ निमुट बसला होता हे मला कळलंच नाही.,
मला जाग आल्यावर माझा मुलगा मला म्हणाला,
"तुम्हा दोघांनाही मला उठवायचं नव्हतं."

माझ्या मनात चटकन येऊन गेलं,
"आदर्शाला जोपासितो
त्याला नाव ठेवू नये"


दहाएक मिनीटं तो तसा बसला होता.आम्ही दोघं पत्नीला जाग यायची वाट पहात होतो.जाग आल्यावर मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून आणि मुलांने तिला जवळ घेऊन आम्ही तिला बाय बाय केला आणि घरी आलो.


क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com