Thursday, March 1, 2012

अंतरीच्या नाना कळा....१



"दोन ध्रुवावर दोघे आपण
तू तिकडे अन मी इकडे"

माझ्या आयपॉडवर शेकडो मराठी गाणी स्टोअर करून रोज झोपण्यापूर्वी बिछान्यावरच ऐकण्याची सवय अलीकडे मी मला लावून घेतली.काही गाणी ऐकून झाल्यावर हळू हळू झोप यायला लागते.तसं वाटल्याबरोबर आयपॉड ऑफकरून कानातले स्पिकर बड्स काढून झोपेला जायला मला बरं वाटतं.

काल रात्रीचं पहिलंच गाणं होतं,
"दोन ध्रुवावर दोघे आपण
तू तिकडे अन मी इकडे."

हे गजानन वाटव्यांच, माझं आवडतं गाणं, ऐकायला मला फार आवडायचं.पण आजच्या परिस्थितीत ते थोडसं उदास करण्यासारखं वाटत होतं
त्याचं असं झालं,
हा योगायोग होता की आणखी काय होतं मला माहित नाही.पण आज सकाळीच मी माझ्या पत्नीला हॉस्पिटलमधे ऍडमीट करून रात्री नऊ वाजेपर्यंत तिच्या जवळ राहून घरी झोपायला आलो होतो.गेल्या त्रेपन्न वर्षाच्या लग्नाच्या जीवनात असं फारच थोडेवेळा झालंय की,माझ्या शेजारी माझी पत्नी रात्री झोपलेली नसावी.नाही म्हटल्यास बत्तीस वर्षापूर्वी मी अमेरिकेत, मेन फ्रेम कंप्युटरच्या ट्रेनींगसाठी सहा सात महिन्यासाठी, आलो होतो तेव्हा आमचं तसं झालं होतं.

माझ्या पत्नीचा पंचाहत्तरावा जन्म दिवस फेब्रुवारीच्या बारा तारखेला साजरा केला होता.बरोबर त्याच्या दुसर्‍या आठवड्यात हा प्रसंग माझ्यावर आला होता.अलीकडे तिला चालायला त्रास होत होता.म्हणून तिने चालायचं कमी केलं होतं.नंतर बाहेर व्हिलचेअर वरूनच जायला लागली.परिणाम,पायाचे स्नायू कमजोर होऊ लागले आणि पायात पाणी साचूं लागलं.पाय एव्हडे जड झाले की एक एक मणाचं ओझं बांधून चालायला सांगावं असं तिला वाटायला लागलं.

एमर्जन्सी भागात जाऊन तिला ऍडमीट करून घेतलं.
९११ ला बोलवावं की काय असं वाटत होतं.९११ ही इथली सेवा अत्यंत उपयुक्त सेवा आहे.फोन केल्यानंतर अवघ्या तीन मिनीटात ९११ ची गाडी तुमच्या घरासमोर येऊन ठेपते.पॅरॅमेडीक्स आणि त्यांचे तगडे साथीदार स्ट्रेचर घेऊन तुमच्या घरात येतात.पेशंटची त्याचवेळी प्रकृति तपासून जुजबी उपाय देऊन वाटल्यास हॉस्पिटलमधे नेऊन ऍडमीट करतात.९११ ला आम्ही बोलावलं नाही.आमच्या प्राईमकेअर डॉक्टरला फोन करून त्याला सर्व परिस्थिती सांगीतल्यावर त्याने हॉस्पिटलला ऍडमीट करायचा सल्ला दिला.

एमर्जन्सी वार्डात गेल्याबरोबार लागलीच मोबाईल स्टेचरवर तिला झोपवून इलाज करण्याच्या रूममधे घेऊन गेले.ब्लडशुगर,ब्ल्डप्रेशर,घेतलंच त्याशिवाय त्यांचा हॉस्पिटलचा गाऊन तिला नेसवून बाकी टेस्टससाठी तिला पेशंट वार्डाच्या रूममधे घेऊन गेले.हे सर्व करीत असताना मला एकट्याला शेवटपर्यंत तिच्या सोबत रहायला परवानगी दिली होती.
हार्टचा डॉक्टर,किडनीचा डॉक्टर,न्युरोलॉजीस्ट जमा झाले आणि त्यानी आपआपल्या पद्धतीने तिला तपासलं.रात्री तिला हॉस्पिटलमधे ठेवून घ्यायचं ठरलं.सर्व उपकरणांनी सज्ज असलेल्या बेड्वर तिला झोपवण्यात आलं.नर्सीस,त्यांच्या मदतनीस, नेमल्या गेल्या.

तोपर्यंत,आमच्या मुलीने,जांवयाने,मुलाने आणि सुनेने आप आपल्या परीने मदतीच्या कामाची विभागणी करून योजना ठरवली.आणि त्या रा्त्री मी माझ्या पत्नीचा निरोप घेऊन घरी आलो.

आमची चारही नातवंड मुग गिळून गप्प होती.आपल्या आजीबद्दल वाटणारी काळजी त्यांच्या मुक्या भाषेतून मला कळत होती.

वाटव्यांचं दुसरं कडवं ऐकताना माझं मन खूपच उदास झालं.

दिवस मनाला वैरी भासतो
तारा मोजीत रात्र गुजरितो
युगसम वाटे घडी घडीही
कालगती का बंद पडे?

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com