Thursday, March 8, 2012

अंतरातल्या नाना कळा...३




"देते शरीर इशारा अधुन मधुन
घेऊ काळजी शरीराची
त्या इशाऱ्या मधुन"


२५ फेब्रु.२०१२.
आज न्युरोलॉजीस्टने माझ्या पत्नीला चेक-अप केलं.तिच्या पायामधून येणार्‍या रिफलेक्सकडे तो जास्त ध्यान देत होता.नंतर त्याने एम आर आय करायचं ठरवलं.एम आर आय म्हणजेच मॅगनॅटीक रेझोनन्स इमेजींग.
ही टेस्ट, मॅगनॅटीक फिल्ड आणि रेडीओ वेव्ह एनर्जीच्या पल्सीस ह्यांचा उपयोग करून, शरीरामधल्या अवयवांचा आणि शरीरातील आतील संरचनेचा फोटो घेते.
तिच्या कमरेचा,पाठीचा आणि खांद्याचा एम आर आय घेतला.नंतर दुसर्‍या दिवशी मेंदूचा एम आर आय घेतला.


न्युरो डॉकटर निघून गेल्यावर कार्डीयालॉजीस्टने भेट दिली.तिने हृदयाच्या व्हिडीयो इमेजची टेस्ट घेण्याचं ठरवलं.रक्त ह्र्दयातून मेंदुकडे काय रेटने जातं आणि हृदयाच्या आजुबाजूला पाणी साठलं आहे काय? हे तिला पहायचं होतं.
किडनीच्या डॉक्टरने रक्त घेऊन त्यामधून किडनीच्या दृष्टीने काय माहिती मिळते काय ह्याचा शोध घ्यायचं ठेरवलं.
विशेष म्हणजे तिन्ही डॉक्टर्स भारतीय आहेत.दोन स्त्रीया आणि एक पुरूष.


माझी मुलगी थोडावेळ आपल्या आईबरोबर राहून आपल्या कामावर निघून गेली.एम आर आयच्या टेस्टच्या क्रियेमुळे माझी पत्नी इतकी थकली होती की मी तिच्या जवळ बसलो असताना ती झोपत असायची.ग्लानीत असायची.एम आर आयच्या पहिल्या तीन टेस्टमधे जवळ जवळ दीड तास तिला मशीनची धडधड आणि खडखड ऐकून आणि अगदी स्तब्ध राहून थकवा आलेला होता.तसंच,मेंदूच्या एम आर आयच्या अर्ध्या तासानेही तिला थकावट आलेली होती.


हृदयाची व्हिडोयो इमेज घेण्याची क्रिया मात्र एकदम शांत होती.मॉनीटरवर माझ्या पत्नीचं धडधडणारं ह्रुदय मला पहायला मिळालं.पन्नास ते ऐंशी परसेंटच्या रेंजमधे रक्त मेंदूकडे हृदयाने फेकलं पाहिजे.तिचं सत्तावन परसेंटने फेकलं जात होतं.आणि ते नॉरमल आहे असं डॉक्टर म्हणाली.हृदयाच्या आजुबाजूला पाणी मुळीच नव्हतं.


माझी पत्नी शांत झोपली आहे हे पाहून मीही थोडा आराम मिळावा म्हणून खूर्चीवर पाठ टेकून बसलो आणि मलाही डुलकी लागली.आणि भुतकाळातली स्वप्न पहाण्यात मी दंग झालो.


निसर्गातल्या अनेक गोष्टीमधे मला समुद्राने खूपच आकर्षित केलं.अशा ह्या समुद्र्रुपी संसारात मी आणि माझ्या पत्नीने त्रेपन्न वर्षापुर्वी होडी टाकली आणि प्रवासाला निघालो.तो अथांग सागर समोर पाहून मोठ्या विश्वासाने मोठ्या जिद्दीने दोघानी हातात वल्हं घेतली आणि मागे न पहाता होडी वल्हवायला लागलो. प्रवासात बरोबर आईवडिलांच्या आणि थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची,आमच्या  भविष्या बद्दलच्या विश्वासाची, वाटेत येऊ घातलेल्या वादळांच्या शक्यतेची, आनंदी क्षणांच्या आशेची,पडले तरी कष्ट झेलण्याची, आणि समोर दिसणाऱ्या भव्य क्षितीजाकडे झेप घेण्याची मोठी पुरचुंडी घेवून प्रवासाला निघालो. आमच्या बरोबर अनेकांच्या अशाच होड्या होत्या.हसत खेळत,चर्चा करत जो तो क्षितीजाचाच वेध घेवून वल्हवत होता.
कधी समुद्र शांत असायचा,कधी खवळायचा,कधी लाटा यायच्या,कधी वारा बेफाम व्हायचा,कधी छोटी छोटी वादळं यायची,कधी कधी वाऱ्याच्या दिशेने शिडाची दिशा बदलावी लागायची.पण तरी सुद्धा समुद्र खुषीत दिसायचा.त्याला धीर नसायचा.आमच्या होडीला तो ठरू देत नव्हता.तो होडीला धरू  बघायचा.समुद्राचं पाणी हिरवं हिरवं पांचू सारखं दिसायचं.आणि सफेद फेसाची त्याच्यावर खळबळ असायची.मास्यांसारखीच आमच्या काळजांची तळमळ व्हायची.आमची होडी हा समुद्र खाली-वर ओढायचा.

“आला खुषीत समिंदर
 त्याला नाही धीर
होडीला बघतो धरू
ग! सजणी होडीला देई ना ठरू”

ह्या गाण्याची प्रकर्षाने आठवण यायची.


तेव्हड्यात,पत्नीच्या रक्तातली साखर पहायला,तिचं ब्लडप्रेशर पहायला नर्स आली आणि मला जाग आली.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com