Monday, October 6, 2008

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.

आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच.
मी त्याना म्हणालो,
“भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेरपण घेऊन जातात. आणि अलीकडे सायन्स म्युझीयम,प्लॅनेटेरीयम,मुलभूत संशोधन करणार्‍या संस्था अशा ठिकाणी नेऊनत्याना माहिती देतात.त्यामुळे विज्ञानाचा प्रसार परिणामकारक होतो.तुम्हाला नाही का वाटत?”
मी एव्हडं बोलायचीच फुरसत,प्रो.देसायानी आपल्या लहानपणातल्या शाळेपासून सुरवात करून मला एक माहिती-वजा सुंदर लेक्चरच दिलं.

मला म्हणाले,
“मी अकरा वर्षाचा असेन,आमच्या शाळेतून एका विज्ञानशास्त्र म्युझियमला आमची ट्रिप जायची होती.ती होऊन गेल्यावर माझ्या मनात आलेल्या एका आशंकेने मी सद्नदीत झालो.असं कधी मला झालं नव्हतं.एकप्रकारचा पोटात गोळा आल्यासारखं झालं.
मला माहित झालं की आपली पृथ्वी हा एक खडकाळ ग्रह असून एका तार्‍याभोवती प्रदक्षिणा करतो आणि हा तारा इतर कोट्यानी तार्‍यांपैकी एक असून ते सर्व एका आकाशगंगेत आहेत आणि अशा कोट्यानी अब्जानी आकाशगंगा ह्या ब्रम्हांडात आहेत. ह्या विज्ञानशास्त्राकडे पाहून मला अगदीच खूजं वाटायला लागलं.

त्यानंतर अनेक वर्षानी विज्ञानशास्त्रा बद्दलचा आणि त्याचा समाजात आणि जगात असलेल्या भुमिकेच्या प्रभावाचा माझा दृष्टीकोन फारच बदलला.
अनेक दशकाचा माझा विज्ञान शास्त्राचा अनुभव मला आता पटवून देतो की हा प्रकार गौरव करण्या लायकीचा आहे.आपण ह्या ब्रम्हांडाच्या एका कोपर्‍यातून कल्पकता वापरून आणि दृढनिश्चय ठेवून अंतरिक्षाच्या बाह्य आणि आंतर क्षेत्राला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात आहो.
आपण पदार्थविज्ञानाचे मुलभूत नियम शोधले.ज्या नियमामुळे तारे कसे चमकतात,प्रकाशाचा प्रवास कसा होतो,वेळेची समाप्ती कशी होते,अंतरिक्ष कसं विस्तारत आहे,ब्रम्हांडाची सुरवात होण्य़ापूर्वीचा किंचीत क्षण कसा होता ह्या सर्व गोष्टीत डोकावून पहाण्याचे नियम शोधले.
ह्यातली कुठलीही उपलब्धता आपण “आहोत ते का आहोत”? किंवा जीवनाचा मतितार्थ काय आहे? ह्याचं उत्तर देऊ शकली नाही. विज्ञानशास्त्र पण ह्या प्रश्नाचं आकलन करू शकणार नाही.परंतु जसं आपल्याला एखाद्दा खेळाचा जास्तीत जास्त अनुभव, त्याचे नियम काय आहेत हे कळल्यावर येतो त्याच प्रमाणे ब्रम्हांडाचे नियम,पदार्थ विज्ञानाचे नियम खोलवर कळू लागतील तसं तसं आपल्या जीवनाच्या अस्तित्वाविषयी आपण प्रशंसा करायला सुरवात करणार.

मला त्याचा पडताळा होतो जेव्हा मी माझ्या विद्दार्थ्यांच्या डोळ्यातली चमक पहातो.मी त्याना ब्लॅकहोल काय आहे बिग-बॅन्ग थेअरी काय आहे हे सांगितल्यावर मी त्यांच्या डोळयातली चमक पहातो. विज्ञानशास्त्रामुळे आपल्याला क्ळतं की ही काहीतरी प्रचंड विश्वव्यापी गोष्ट आहे की ती आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते. म्हणून माझे विद्दार्थी मला भेटल्यावर ते त्यांचं गणीत आणि शास्त्र केवळ नीरस काम म्हणून पहातात त्यावेळी हे त्यांच पहाणं विपत्तिजनक वाटतं.त्यानी तसं करायला नको हे मला पटतं,पण जेव्हा विज्ञान म्हणजे काही वास्तविकतेचे मासले असून त्याचं पाठांतर करण्याची जरूरी नाही,आणि गणीतशास्त्र म्हणजे एक अमूर्त आकडेमोड असून त्यातली शक्ति ब्रम्हांडातलं रहस्य उकलू शकते हे न दाखवता शिकवल्यास ते कंटाळवाणं होईल आणि मुद्देसूत होणार नाही.

त्याहिपेक्षा जेव्हा माझा त्या विद्दार्थ्यांशी संपर्क येऊन कळतं की त्याना असं सांगितलं जातं की गणीत आणि शास्त्र समजण्याची त्याना क्षमताच नाही, असलं काहीतरी ऐकून खूप त्रास होतो.
मला वाटतं की शास्त्रातला आनंदीत करण्याचा भाग विद्दार्थ्याना समजावून सांगणं हे आपण त्यांच देणं लागतो.
मला वाटतं,मनातल्या भ्रमापासून ते मनात आकलन होईपर्यंतची ही प्रक्रिया अमुल्य असते,किंबहूना भावनाप्रधान अनुभव हा आत्मविश्वासाचा मुलभूत पाया असावा.
मला वाटतं विज्ञानाच्या वास्तविकतेचं मुल्यांकन जरी विवेकपूर्ण असलं,आणि त्याकडे काहींची व्यक्तिगत उदासीनता असली तरी विज्ञानशास्त्र धार्मिक आणि राजनैतीक विभाजनाला पूढे नेतं आणि त्यामुळे आपल्याला प्रतिरोधात जखडून ठेवतं.
मला वाटतं,अद्भुत रहस्याचा उलगडा आत्म्याला उभारा देतो जसं एखादं संगीत मन उल्हसित करतं.
मला वाटतं, विस्मयकारिक विज्ञाना बद्दलच्या कल्पना नुसतं मनालाच नाही तर आत्म्याला पण विकसित करतं.”

प्रों.देसायाना नुसती ट्रिगर पुरी असते.एका नावाजलेल्या कॉलेजात फिजीक्स डिपार्टमेंटचे इनचार्ज राहून इतकी वर्ष ज्ञानोपासना केली ती अशी उफाळून येते.माझाही वेळ मजेत गेला.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: