Friday, October 31, 2008

मुलीला आपली आई माहित हवी.

रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते.
असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं,
” असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?”
त्यावर ती म्हणाली,
“आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान होती तेव्हा कुणा देवाची प्रार्थना करायची?एखाद्या वाईट दिवशी ती कशी वागायची.?तिला लहानपणी गाणं गायला आवडायचं काय?रस्त्यावरून चालताना ती डाव्या बाजूने चालायची की उजव्या.? वगैरे वगैरे.”
हे ऐकून मी रेवतीला म्हणालो,
“तुझे हे प्रश्न पाहून तू तुझ्या आईला किती मिस करतेस हे मला चांगलंच लक्षात येतं.”
रेवती मला म्हणाली,
“मी पाच वर्षाची असतानाच माझी आई निर्वतली.तिला फिट्स यायच्या.गेली त्यावेळी ती ४२ वर्षाची होती.मला माझ्या आईबद्दल काही माहित नाही.माझे वडील खूपच चांगले आहेत.आणि मला आणखी तीन भावंडं आहेत. मी सर्वात लहान असल्याने माझ्या भावंडाना माझी आई चांगलीच माहित होती.ती सर्व माझ्यापेक्षा नशिबवान आहेत.आमच्या आईचं निर्वतणं हे आम्हा सर्वांना दुःखदायक होतं.माझी काही माझ्या आई बाबत अनुमानं आहेत.खूप दिवसाच्या काळजीपुर्वक ऐकण्यातून ती अनुमानं मी काढली आहेत.माझी आई तशी दोषदर्शी होती तशी ती हजरजबाबी होती.तिच्या चेहर्‍यावर पटकन हसूं दिसायचं. लहान मुलांकडे तिची जिव्हाळ्याची नजर असायची.लिहायला आणि वाचायला तिला खूप आवडायचं.सगळा परिसर तिच्यावर प्रेम करायचा.तिची गैरहजेरी आम्हाला खूपच जाचते.

अलिकडेच मी माझ्या गीताला जन्म दिला.मी तिला म्हणते,
“गीता,मी तुझी आई आहे.तू माझ्यात अडकली आहेस.माझ्या बद्दल तुला काही माहित हवं असेल तर ते माहित होई पर्यंत मी तुला वाटतं तितकी तुझ्या अपेक्षे प्रमाणे नसेनही.पण माझ्या बद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी तुला माहित असणं आवश्यक आहे.
जोपर्यंत मी ह्या जगात आहे तोपर्यंत मला तू काहीही विचारून घ्यावस.मला नेहमी वाटतं मुलीला आपली आई माहित हवी.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: