Saturday, October 25, 2008

“मेल्यावर जीवाचं काय होतं?”

माझी मेहूणी हेमा माझ्या पत्नी पेक्षा तशी बरीच वयाने लहान.गेले कित्येक वर्ष ती आपल्या नवर्‍याबरोबर इंग्लंडला एडिंबरा इथे राहाते.आता ती आजी झाली आहे तिची नातच पाच वर्षाची झाली आहे.
ह्या गणपतिच्या सणाच्या दिवसात ती तिच्या नातीला घेऊन आमच्याकडे महिनाभर राहायला आली होती.तिच्या नातीला गणपती उत्सव कसा साजरा करतात हे तिला दाखवायचं होतं.
एक दिवशी बोलता बोलता आमचा विषय निघाला की,
“मेल्यावर जीवाचं काय होतं?”
हेमाला गेल्या वर्षाचा एक जुना प्रसंग आठवला.ती म्हणाली,
“मला काय वाटतं आणि त्यावेळी काय घडलं ते तुम्हाला आठवून आठवून सांगते.प्रस्तावना करताना ती म्हणाली,

“मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह्या पृथ्वीवर येऊन धप्पकन पडली आहे आणि दिशाहीन होऊन इकडे तिकडे भटकत आहे.मी ह्याच पृथ्वीचा एक भाग आहे आणि तिला सोडून कुठेही जात नाही.”

माझी नात माया चार वर्षाची होती,आणि अलीकडेच तिने आमच्याकडे असलेल्या मांजरा विषयी पृच्छा केली. आमचं मांजर म्रृत पावलं.मायाला हे माहित पण होतं.ती एव्हड्यासाठी अचंबित झाली होती की ते मांजर कुठे गेलं? आणि तिचं काय झालं?कारण ते आता तिच्या खुर्चीच्या खाली म्यांव,म्यांव करीत नाही आणि मायाच्या चमच्यातून टपकणार्‍या थेंबांसाठी बेचैनही होत नाही.
अशाच क्षणी मला राहून राहून वाटायचं की मी ज्या बाबीवर श्रद्धा ठेवते ते काय आहे हे मला कळावं.
माझे आईवडील सरळ सरळ म्हणायचे,
“मेल्यावर आपलं काय होतं आपल्याला ठाऊक नाही.”
मी लहान असताना कदाचीत एक अखंड वर्ष त्या प्रचंड रहस्याचं चिंतन करण्यात घालवलं.माझ्या गादीवर पडून गुबगुबीत पांघरूणाच्या आत भविष्यातल्या शास्वत अस्तित्वहिनतेचं दृष्य डोळ्या समोर आणून अस्तिपंजर परिस्थितीत येऊन आपलं अस्तित्वात नसणं ह्याची ही दुखद घटना पहात असायची.हा विषय माझ्या डोक्यावर भूत कसा बसायचा.
माझ्या मायाची वृत्ति थोडीशी निकोप वाटली.
तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याची अशी काहीशी कल्पना त्यावेळी माझ्या मनात आली.
थोडासा जड निश्वास टाकून मी मायाला म्हणाले,
”मृगी-आपलं मांजर- शेतात गेलं आहे.जेव्हा असा घरातला पाळलेला प्राणी मरतो तेव्हा त्याला जमिनीत पुरतात,आणि त्यांच मग गवत,फूल किंवा झाड होतं.”
मी मायाच्या सुळसुळीत केसातून हात फिरवीत,तिच्या तुकतुकीत गालाला स्पर्श करून तिची काय प्रतिक्रिया येते ते पहात होते.ती जरा सुद्धा विचलीत झालेली दिसली नाही.उलट एक दिवस आपलं फूलात रुपांतर होतं हे ऐकून ती खूष झाली.
त्या गोष्टीने मी मलाच प्रभावीत करून घेतलं.ह्या आमच्या दोघांच्या समजूती आदान-प्रदान केल्यावर माझ्या चांगलच लक्षात आलं की,ज्यावर माझी श्रद्धा आहे ते जणू माझ्या जीवनातले छोटे छोटे कंगोरे-गांव भटकणं,निसर्गाच्या सृष्टीसौंदर्याचा उपभोग घेणं,सहानुभूतीचं ऋण ठेवणं,उंच,उंच इमारतींचा आणि भयभयीत करणार्‍या समुद्राचा आवाज ऐकून विस्मयीत होणं,प्रेम करणं,विज्ञान काय ते माहिती करून घेणं आणि आई होण्याचं निसर्गाचं गुढ आकलन करून घेणं,हे सर्व जणू एकाएकी माझ्या दृढविश्वासात समाभिरूप झाल्यासारखं वाटलं.जमिनीत एकरूप होऊन वनस्पतिचं खत होण्यात माझं भवितव्य असावं असं माझं म्हणणं नसून माझ्या जीवनात आणखी काहीतरी जीवन आहे असं मला म्हणायचं आहे.
मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह्या पृथ्वीवर येऊन धप्पकन पडली आहे आणि दिशाहीन होऊन इकड तिकडे भटकत आहे.मी ह्याच पृथ्वीचा एक भाग आहे आणि तिला सोडून कुठेही जाऊ शकत नाही-जसा एखादा कोनाड्यातला कोळी,किंवा खिडकीच्या दारावरची धूळ,किंवा त्या पुरलेल्या मांजरा सारखी.

मी मायाला विचारात पडून चूरूचूरू कुरमुरे खाताना पाहून,आजूबाजूला अपरिचित शांती अनुभवली.माझं नातं जुळल्या सारखं वाटलं,,मी नम्र झाले आणि सर्वांत जास्त की मला आनंदी झाले.
जीवन,मरण ही दोन्ही माझ्या सभोवती आहेत,जणू माझ्या श्वासात सामावली आहेत असं वाटू लागलं.
नंतर मी माझ्या नातीचा हात हातात घेतला.आणि शेताच्या मेरी वरून जाताना चिखलातून आम्ही चालत गेलो.आम्ही दोघी झाडावरची नवी हिरवी पालवी सूर्याच्या किरणात चमकताना पाहिली, हिरवा पहाडीभाग हवे बरोबर लहरताना पाहिला, हिरवीगार भाताची रोपटं वार्‍या बरोबर डुलताना पाहिली.आणि ह्याच्याही पलिकडे काही न दिसण्यासारखं असलं तरी चालेल असं वाटलं.आणि त्याचं कारण,जीवन चिरस्थायी असून ते प्रत्येक फूलाच्या बहरात सामाविष्ट असतं असं मनोमनी वाटलं.”

ही सर्व घटना सांगून झाल्यावर हेमा क्षणभर गोरीमोरी होऊन माझ्या प्रतिक्रियेची जणू वाट पहात आहे असं मला वाटलं.मी जरा सुद्धा निराशा न करता तिला म्हणालो,
“हेमा,तू ही घटना सांगून मला स्थंभीत केलंस.हा सगळा मेंदूचा खेळ तर नाही ना? असं मला क्षणभर वाटलं बघ.हे असे विचार मनुष्याच्या कसे डोकयात येतात.का हे निसर्गाची आपलं रूप दाखवण्याची चाल तर नसावी?”
हेमा म्हणाली,
” परत अशीच घटना घडली तरी असेच विचार येतील अशी श्वासवती नाही.”
किती समर्पक आहे हे हेमाच उत्तर?



श्रेकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: