Thursday, October 23, 2008

आम्ही बाराक ओबामाला मत देऊन पण टाकलं.

“अजून ४ नोव्हेंबर उजाडायचा आहे.तो मतदानाचा दिवस आहे मग त्या अगोदर मत देणं कसं शक्य आहे?”
असं आपण म्हणाल.पण खरं सांगू हीच तर अमेरिकेत गम्मत आहे.इथे स्वातंत्र्याला सिमा नाही.मात्र फक्त ते सर्व कायद्दात असलं पाहिजे.हम करे सो कायदा नाही चालत.आणि तसा काही अन्याय वाटला तर जा कोर्टात आणि मांडा तुमची कैफियत.कोर्टपण तत्पर असतं.लगेचच निर्णय.
जाहिर मतदानाच्या तारखे अगोदर एखादा महिना आपल्याला मत देता येतं.मग एक महिना अगोदर मत देऊन पुढच्या त्या महिन्यात जर का परिस्थिती बदली तर तुमची चूक तुम्ही भोगा.म्हणून तुमचं नक्कीच एखाद्दाला मत द्दायचं ठरलं असेल तर मग शेवटच्या दिवसाची वाट बघण्याची काय जरूरी?.द्दा टाकून मत अगोदर.निदान ४ नोव्हेंबरला मतदाना दिवशी तेव्हडीच गर्दी कमी होईल.हा एक फायदा.आणि दुसरी गम्मत म्हणजे मत तुम्हाला कुठेही देता येतं.मत पेट्या ग्रोसरी स्टोअर मधे पेट्रोल पंपावर आणि अशा गर्दी असणार्‍या स्पॉट वर ठवलेल्या असतात.आम्ही आमचं मत मात्र आम्हाला मत पत्रीका घरी मागवून ती भरून पोस्टाने पाठवली. ५० राज्यातील ३० राज्यात एक महिना अगोदर मत द्दायची सोय आहे.
आता तुम्ही म्हणाल आम्ही पतीपत्नीने ओबामाला का मत दिलं?

त्याचं कारण,तो आम्हाला, दूरदृष्टीचा,गोरगरिबाचा,आपल्या सारखाच,आणि त्याशिवाय तरूण,ताज्या दमाचा,बुशच्या मग्रुरीच्या कारभारात बदल आणणारा,इतिहास बदलणारा,थंड,शांत स्वभावाचा,काळा,सहाफूट उंच, स्मार्ट, तरतरीत, अमेरिकेत सध्या नवीन उद्भवलेल्या एकानॉमीच्या प्रॉबलेम बद्दल जरूर ती माहिती अवगत असलेला,वयोमानामुळे अनुभव नसला तरी त्या त्या प्रांतात अनुभवी लोकांचा संबंध ठेवून असलेला,गुणी,दुसर्‍याचा सन्मान बाळगणारा,हंसत, हंसत न चिडता उत्तर देणारा,कुटुंबवस्तल,आजी आजोबा वर प्रेम करणारा, अगदी साध्या राहाणीमानाचा,गोर्‍यापासून काळ्यापर्यंत आणि अल्पसंख्यांकानाही बराचसा आवडणारा,मध्यंवर्गीय लोकांची बाजू घेणारा,सर्वांना हेल्थकेअरची सुविधा हवी असं म्हणणारा, मोठ्या श्रीमंता कडून निवडणूकीला पैसे न घेता गोर गरिबांकडून आणि मध्यवर्गीयांकडून प्रत्येकी पाच,पन्नास डॉलर घेऊन कोट्यानी डॉलर जमवून निवडणूकीचा प्रचारखर्च करणारा, एका एका सभेत लाखो लोकांची गर्दी जमविणारा फ्लूट पाईपर, अतिशय शिस्थितीत निवडणूकीची ऑरगनायझेशन संभाळणारा, अमेरिकन पेसिडेन्टच्या इतिहासात सर्वात वयाने लहान-४७वर्षाचा- आणि पहिला नी-गोरा म्हणून रेकॉर्ड मोडणारा,अश्या हया ओबामा बद्दल किती लिहू?
ह्याला अगोदरच निवडून आम्ही मत दिलं आणि आमचं हे मत नक्कीच फूकट जाणार नाही याची खात्री आहे.

त्याने त्याच्या व्हाईस- प्रेसिडेन्टसाठी पण अशी व्यक्ती निवडली आहे की त्या व्यक्तिला ३०/३५ वर्षाचा राजकारणात अनुभव असून तसाच मध्यमवर्गीय सज्जन माणूस आहे.बाराक ओबामा आणि ज्यो बायडन ही जोडी उठून दिसणारी आहे.आणिलायक आहे असं आम्हाला मनोमन वाटतं.

या उलट जॉन मेकेन आणि सेरा पेलन(तिच्या नावाच्या स्पेलिंगकडे बघून “sarah palin” काही आपल्याकडे तिला सारा पॅलिन म्हणतात ते बरोबर नाही.) ही जोडगोळी अगदीच आमच्या दृष्टीने नष्ट वाटली.मेकेनचे पॉझिटिव्ह पॉईन्ट्स म्हणजे व्हियेटनामच्या युद्धात बंदिस्त झाल्यावर जीव घेण्या छळणूकीची-टॉरचरची-पर्वा नकरता पाच वर्ष त्याने अगणीत छ्ळ भोगले.नाही पेक्षा सव्वीस वर्ष राजकारणात राहून श्रीमंत धारजीण्या रिपब्लीकन पक्षाची री ओढून श्रीमंताना आणखी आणखी करात सवलती देऊन (गरज नसता नाही) देशाची आर्थिक परिस्थिती सुधारते ह्या प्रे.रिगनच्या धोरणाची री ओढून ज्या धोरणाने कर्ज काढा आणि खर्च करा आणि युद्ध करून देशातल्या श्रीमंत लोकांची तुंबडी भरा जे हे धोरण प्रे.बुशने अंगिकारून अमेरिकेला भीक मागण्याच्या स्थितीत सध्या आणून ठेवलं आहे त्याचीच कॉपी कॅट आहे.
आणि ह्या मेकेनची व्हाईस प्रेसिडेन्ट जिला आपल्या मराठीत एखाद्दा व्यक्तिला “अचरट” म्हणू अशा बाईला,देशातल्या समस्त बायकांची आपल्याला मत मिळतील ह्या मुख्य उद्देशाने सनसनाटी म्हणून निवडली आहे.तिचे (दूर)गुण बघून प्रत्यक्ष त्यांच्या पार्टीचेच लोक संतापले आहेत.
आणि तशात हा जॉन मेकेन,सरफिरा,बाष्क्ळबाजी करणारा,भडकू,राग आल्यावर चेहर्‍यावर न लपवू शकणारा,स्वतःला युद्धात निपूण समजणारा,दोन हात आणि एक पाय युद्धात मोडून घेतलेला, सध्या स्किन कॅन्सर होऊन बरा झालेला,चिडखोर वृत्तीचा,सतत बदलणारा,सेरा पेलनला जोडीदार निवडून हंस करून घेतलेला,तिच्यामुळे गर्दी जमते असं फालतु भुषण सांगणारा,नाहितरी रिपब्लिकन पार्टी ह्यावेळेला निवडून न येण्याचे जास्तीतजास्त चान्सीस असल्याने बळीचा बकरा झालेला,अशा ह्या व्यक्तीचे किती दुर्गूण सांगावे.

“बराक ओबामा काळा आहे,तो मुसलमान आहे,तो टेररिस्ट आहे”
वगैर वगैर त्याच्यावर पर्सनल आरोप करून आपण निवडून येऊ अशी जॉन मेकेन समजूत करून घेत आहे.७२ वर्ष वयझालेला हा दोनदा ह्याच प्रेसिडेन्टच्या जागे साठी उभा राहून अपयशी झालेला चेकट वृत्तीचा असून,
“तुझ्या पश्चात तुझी जोडीदारीण प्रेसिडेन्टची जागा संभाळेल काय?”
ह्या सतत विचारलेल्या प्रश्नाला,
”होय” म्हणून निर्भिडपणे उत्तर देतो.
मी मनात म्हणतो उद्दा हा जर का निवडून आला आणि कारकीर्द संपण्यापूर्वी अल्लाला प्यारा झाला-इकडे त्याला वन हार्टबीट अवे-असं म्हणतात तसं झालं तर तिला प्रेसिडेन्ट करून ह्याच्या मागे देशाचं काय होणार आहे ह्याची ह्याला काही फिकीरच नाही.आणि “कंट्री फर्स्ट” असे लिहिलेले त्याच्या सभेत घोषणाचे बोर्ड उंचावून दाखवले जातात.सेरा पेलन ही बया फॉरेन पॉलीसीचं कसलंच ज्ञान नसताना आपल्या घरातून रशिया दिसतो म्हणून आपल्याला,
” तसं अगदीच ज्ञान नाही असं नाही”
असं पत्रकाराला उत्तर देऊन ही आलास्का स्टेटची गव्हर्नर गंभीर चेहरा करून सांगते.
जगातल्या ७० देशात सर्व्हे केल्यावर बाराक ओबामा प्रेसिडेन्ट म्हणून निवडून यावा असं त्या देशातल्या सर्व साधारणजनतेचं मत आहे असं दिसून आलं आहे.
आता सार्वत्रिक निवडणूकीला पंधरा एक दिवस राहिले आहेत.बाराक ओबामा १० पॉईन्टसने पुढे आहे.एक्झीट पोलला इकडे बंदी नाही.एक्झीट पोल वरून मत- परिवर्तन होवून निवडणूकीचा रीझल्ट बदलेल असं कुणालाही इकडे वाटत नाही.अगदी एक पर्सेन्ट लोकांवरही परिणाम होणार नाही.
आता एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक वादाला दोन बाजू असतात.आम्ही आमची बाजू सांगून बाराक ओबामाला आम्ही का निवडला ते सांगण्याचा प्रयत्न केला एव्हडेच.
तेव्हा ४ नोव्हेंबरची वाट पहात आहो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: