Sunday, March 22, 2009

“अरे संस्कार संस्कार अमेरिकेत आल्यावर”

“अमेरिकेत प्रथमच येणार्‍यांनी आपले जुने संस्कार न विसरता रहावं.तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपल्यात सुधारणा करून घ्यावी.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच आपण पंचाईत करून घेत असतो. नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही.अहो गाईचं मांस,डुकराचं मांस मिळालं म्हणून आपण खायचं काय?ते न खाता इकडे जगतां येत नाही काय?दुसरं इकडे ऋण काढून सण करण्याची प्रथा आहे.अहो अंथरूण बघून पाय पसरायला नको काय?अलिकडे एकॉनॉमीचा बट्याबोळ झाल्यावर इकडच्या लोकांना आता जरा जरा कळायला लागलंय. निगेटिव्ह सेव्हिंग असणार्‍या लोकांनी आता पांच परसेन्ट पर्यंत सेव्हिंग केलं आहे म्हणे. अहो,ह्यां लोकात पैशाचा हावरटपणा वाढल्याने हे असं झालंय ते त्यांना कळलंय आता.क्रेडिट कार्डावर हवे तसे पैसे मिळतात म्हणून आवाक्या बाहेर कर्ज काढून आता नोकर्‍या गेल्यावर कर्जबाजारी होऊन दिवाळी काढीत राहले आहेत.ह्यात आपल्या लोकांचं प्रमाण त्या मानाने कमी जरी असलं तरी आहे.आणि वाटेल तसं फास्ट फूड खावून-स्वस्तात मिळतं म्हणून - मध्यम वर्गीय आणि गरिब लोक लठ्ठ होत राहिले आहेत.अहो, ह्या मासांत प्रोटिन्स अफलातून असतात.ते हजम करायला एक्झरसाईझ घेतला पाहिजे पण आहे कुणाला वेळ.? अनावश्यक लठ्ठपणा कसा होत आहे हे पण आता एकडच्या आरोग्य संभाळणार्‍या लोकाना कळलं आहे.”
असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले.मी त्याना म्हणालो,
” हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र्य आहे.मूभा आहे.संस्काराबद्दल म्हणालात तर,
“कायदा न मोडता तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा”
हेच इकडचे संस्कार आहेत.
कसले संस्कार घेऊन बसलात भाऊसाहेब?”
असं मी त्याना म्हणालो.
थोडेसे नाराज होऊन मला म्हणाले,
”सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का?
” अरे संसार संसार ” तेच शब्द् “अरे संस्कार संस्कार” अशा अर्थाने माझ्या मनांत घोळत आहेत.
बहिणाबाईने कसा तिच्या कवितेत उपदेश केला आहे?तसंच काही तरी संस्कारावर लिहा.”
पुढल्या खेपेला भेटलो तेव्हा त्यांना मी ही कविता वाचून दाखवली.

अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!

अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!

अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता इथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!

अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये !!४!!

अरे संस्कार संस्कार
घेता कर्ज क्रेडीट कार्डावर
त्याच महिन्या अखेर
टाका फेडून सर्व उदार !!५!!

अरे संस्कार संस्कार
आहे मोठा जादूगार
असे जीवनाचा मंतर
ठेवा त्यावर मदार !!६!!



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishanas@gmail.com

No comments: