Tuesday, March 10, 2009

“न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते”

आज प्रो.देसायानी मला त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर असतानाच्या जीवनातली एक गंमतीदार पण हृदयस्पर्शी घटना सांगितली.
प्रो.देसाई त्यावेळेला रुईया कॉलेजमधे नुकतेच ज्युनीअर लेक्चरर म्हणून कामाला लागले होते.ते मला म्हणाले,
“न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर मुकी आणि बहिरीही असते.कसं ते ही माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल.
माझ्या फिझीकसच्या वर्गातली मुलं,मुली आणि मी गणपतीपुळ्याला सहलीसाठी गेलो होतो.गांवातल्या एका शाळेत आमचा मुक्काम होता.शाळांना त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी होती.गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा अप्रतिम दिसायचा.त्या दिवसात बर्‍याच लोकाना हा पिकनीक स्पॉट माहित नसल्याने परिसर फारच स्वच्छ होता.समुद्राच्या किनार्‍यावर सोनेरी वाळूत बसून ओहटीच्यावेळी पाणी किना‍र्‍यापासून खूपच दूर गेल्याने परिसरात एक प्रकारची पोकळी येऊन शांत वातावरणात सर्व भकास वाटायचं.पण एखादी थंड वार्‍याची झुळूक आल्यावर मन प्रसन्न व्हायचं.आमच्या बरोबर आलेली बरीच मुलं आणि मुली समुद्रात पोहायला गेल्या होत्या काही मुलं आणि मुली किनार्‍यावर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत गोष्टी करीत करीतचालत फेरफटका मारीत आणि वाटेत दिसल्या तर वाळुतून रंगीबेरंगी शंख,कवड्या कुतूहल म्हणून गोळा करीत फिरत होत्या.

कमला पारसनीस,अतुल शृंगारपूरे आणि संजय साखळकर हे ह्या गर्दीत नव्हते.चौकशी केल्यावर मला कळलं की ते तिघेही गावात गेले आहेत कारण संजय साखळकरची नातेवाईक मंडळी गावात राहतात.त्यांना भेटायला म्हणून आणि कमला,अतुल यांना समुद्राचं इतकं आकर्षण वाटत नव्हतं म्हणून ती दोघंही त्याच्या बरोबर गांव धुंडायला गेली होती.
यायला बराच उशिर झाल्याने ती तिघं संजयच्या ओळखीच्या होटेलमधे राहिली.

गावात राहाणार्‍या प्रभाकर तांब्यांचा मुलगा शरद हा त्या होटेलमधे मॅनेजरची नोकरी करीत होता.उन्हाळ्याच्या सुट्टीत तो मुंबईहून दोन महिन्यांसाठी आला होता.वडलांना तेव्हडाच हातभार लागावा म्हणून त्याने होटेल मालकांच्या ओळखीने जॉब पत्करला होता.खरं तर तो मुंबईत पवईला आय.आय.टी मधे दुसर्‍या वर्षात शिकत होता.
शरद हा खूपच लाघवी स्वभावाचा होताच,आणि कुणाशीही गोड बोलून त्याला आत्मसात करण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती.मला तांब्यांची माहिती असण्यांचं कारण माझी मेहूणी गणपतीपुळ्याला गेली कित्येक वर्षं राहाते.तिची तिकडे शेतीवाडी आहे.तांब्यांचा आणि माझ्या मेहुणीचा घरोबा होता.त्यामुळे मी शरदला लहानपणापासून ओळखतो.

आता मुळ मुद्दाकडे वळताना सांगायचं म्हणजे,शरदने त्या तिघाना तिन बेड असलेली एक खोली एक रात्री साठी दिली.खरं म्हणजे एका खोलीत दोन बेड्स असतात पण शरदने त्याना आणखी एक बेड देऊन त्यांची सोय केली होती.एका खोलीचाच चार्ज त्यांना लावला.
कमलाला एकटं एका खोलीत झोपायला भिती वाटत होती आणि एकट्या पुरुषाबरोबर राहायची तयारी नव्हती म्हणून ही सगळी सोय केली गेली होती. मधूनच वेटर चहापाणी आणि इतर सोयी साठी खेपा मारून गेला होताच,आणि शरद पण एक दोनदा त्यांची चौकशी करून गेला होता.कमलला त्याचा स्वभाव खूपच आवडला होता.जेवणं वगैरे झाल्यावर हातपाय मोकळे करण्यासाठी जरा बाहेर जाउन येऊया असं अतुल शृंगारपूरेने सुचवलं.आणि संजय साखळकर कबूल झाला पण रात्र बरीच झाली होती आणि नवख्या गावात जायला कमलाने नाकमुरडलं आणि दिवसभर दमल्यामुळे मी इथेच रेस्ट घेते म्हणाली.
ते निघून गेल्यावर जराशी पडते म्हणून अंग टेकलेल्या कमलाला गाढ डुलकी लागली.तिला जाग आली तेव्हा तिला कळलं कोण तरी आपल्या बेडकडे उभा राहून एक नजरेने बघत आहे.तो कसा आत आला कुणास ठाउक त्या खोलीतल्या जेमतेमच्याउजेडात तो कोण आहे हे कळण्यापूर्वीच त्याने तिच्याशी अतिप्रसंग केला.आणि नंतर पळून गेला.अतुल आणि संजय खोलीत परत आल्यावर त्या भयभयीत आणि हुमसून हुमसून रडणार्‍या कमलाला पाहून अचंबीत झाले.
झालं,पोलीस आले केस झाली,आणि ओळख परेडमधे तिने शरद तांब्याचा संशय घेतला.वेटर वयस्कर असल्याने तिला त्याचा संशय आला नाही.
ओळख परेडमधे शरद फिट येऊन पडला.तो नाटक करीत असल्याचं कमलासकट इतराना वाटलं.
केसचा निकाल लागून शरद अकरा वर्षं सहा महिन्यांच्या तुरंगात गेला.
मला तर ह्या घटने नंतर गणपतीपुळं म्हटलं की ही सर्व घटना आठवून दुःख वाटायचं.कारण तांब्यांचा शरद एव्हड्या खालच्या पातळीला जाईल असं स्वपनातही वाटत नव्हतं.
पाच वर्षानंतर डीएनए टेस्ट वरून शरद निरपराध आहे हे लक्षात आलं.आणि त्याला शिक्षा पूरी करावी लागली नाही.
तो सुटून आल्यावर मला भेटला.आणि त्यापूर्वी कमलालाही भेटला होता.मी कमलाची आणि त्याची माझ्या घरी एकदा भेट करून दिली.
शरद म्हणाला,
“आम्ही दोघंही त्याच माणसाच्या त्याच अन्यायाचे बळी झालो आहो.त्यामुळे आम्हा दोघांना खंबीरपणे उभं राहायला एकच मंच मिळाला. दोघं मिळून आम्ही एकमेकाला सुधारत आहो.”
कमला म्हणाली,
“माझा क्षमा करण्य़ावर विश्वास आहे.ज्यामुळे क्रोध आणि द्वेष होण्यापासून मुक्त करून माणसाला मनःशांती मिळायला त्या क्षमेमधे क्षमता आहे.”
शरद म्हणाला,
“मलाही तसंच वाटतं.मी एक क्रोध घेऊन तुरंगात गेलो होतो.आणि त्यात माझ्या मला समाधान करून घेत होतो.परंतु,ह्या मनोभावनेने तुरुंगात मी माझ्या मनाला निराळ्याच तुरुंगात जखडून ठेवीत होतो.मी माझ्यातल्या द्वेषभावनेला सुटका देऊन आणि क्षमा मनात ठेवून जीवन जगायच्या प्रयत्नात होतो.
कमला म्हणाली,
“मी शरदला माझ्यावर अतिप्रसंग करणारा म्हणून निवडलं आणि आता पाच वर्षानी माझी चूक माझ्या लक्षात आली.ते मला असहनीय होतं.माझ्या मनात शरद हा एक पशू वाटत होता.पाच वर्षाच्या तिनशे पासष्ट दिवस त्याला मृत्यु यावा म्हणून मनात प्रार्थना करायची. खरं कळल्यावर मला मी प्रचंड अपराधी समजू लागले आणि माझी मला लाज वाटू लागली.एका निरपराध्याला माझ्या चूकीमुळे तुरुंगवास भोगावा लागला.मध्यंतरी खरा अपराधी इतर स्त्रीयावर अत्याचार करीतच राहिला.हे पाहून माझ्या मला मी क्षमा करूच शकले नाही.
शरद म्हणाला,
“मला त्या ओळख परेड मधून मी तिचा अत्याचारी म्हणून निवडून काढल्यावर कमलाला मला क्षमा करायला इतराना वाटेल त्यापेक्षा खूपच कमी वेळ लागला. मला ठाऊक होतं की तिच्यावर अत्याचार झाला होता आणि त्याचं तिला भारी दुःख होत होतं.पण मला पण दुःख दिलं गेलं होतं.मी माझे नातेवाईक गमावून बसलो होतो.माझं स्वातंत्र्य गमावून बसलो होतो.पण मी कोण होतो आणि मी तो पशू नव्हतो हे मला माहित होतं.मला हा कमलावर अतिप्रसंग कुणी केला होता ते माहित होतं. तो मला तुरुंगात ठेवून गेला आणि कदाचीत त्याने स्वतः काय केलं त्या गोष्टीचा कबुली जबाब न देतां नरकातही जाण्याचं पत्करलं असेल. त्याचा द्वेष न करणं मला कठीण जात होतं.परंतु,माझ्या मनात मी मोकळा राहावा की नाही हे केवळ माझ्याच हातात होतं.
कमला म्हणाली,
“मी शरदला म्हणाले तुझ्याकडे मी क्षमेची याचना केली तर ती पूरी करशील का?
ते ऐकून, जगात उरली सुरली असलेली दया कोळून पिऊन त्याने माझा हात आपल्या हातात घेत ढळढळा अश्रूची धार आपल्या डोळ्यातून वाहू दिली.वर मला म्हणाला,
“मी तुला केव्हांच क्षमा केली होती.”
आणि त्या क्षणापासून माझ्यात सुधारणा होऊ लागली.सर्व दुःख कसं हजम करावं ते शरदने मला शिकवलं.त्या रात्री मला त्याने क्षमा केल्याने मी वेदनाहीन झाले, मी माझ्या मनावरच्या भारापासून मोकळी झाले.शरदने मला क्षमा केली नसती तर मी त्या घटनेने मला बंधनात ठेवलं असतं.आणि ते सुद्धा ते बंधन माझ्या आयुष्यभर राहिलं असतं.नंतर माझ्या हे ही लक्षात आलं की ज्याने माझ्यावर अत्याचार केल होता त्यालाही मी क्षमापात्र करू शकते-त्याच्याकडून विचारलं जाईल म्हणून नव्हे,अथवा तो तसं करून घ्यायला लायक आहे म्हणूनही नव्हे- तर मला स्वतःला द्वेषाच्या तुरुंगात जखडून ठेवावयाला इच्छा नव्हती म्हणून.
शेवटी शरद म्हणाला,
“मी आणि कमला आता मित्र झालो आहो.आणि काही लोकाना हे समजत नाही. आम्ही दोघंही त्याच माणसाच्या त्याच अन्यायाचे बळी झालो आहो.त्यामुळे आम्हा दोघांना खंबीरपणे उभं राहायला एकच मंच मिळाला.दोघं मिळून आम्ही एकमेकाला सारख्याच अनुभवाच्या प्रक्रियेतून सुधारत आहो.मला कडवटपणा ठेवता आला असता,मला त्या तुरुंगातल्या शिपायांशी आणि त्या तुरूंग पद्धतीशी द्वेषाने राहता आलं असतं.पण त्या सर्वांना मी क्षमा करायचं ठरवलं.कारण असं केल्याने मी स्वतः मोकळा झालो आणि माझ्या उरलेल्या जीवनात माझ्या मला तुरुंगवासी म्हणून राहायचं नव्हतं.”

अगदी पीन-ड्रॉप-सायलेन्ट राहून मी भाऊसाहेबांच सगळं ऐकून घेऊन झाल्यावर कुतूहलाने विचारलं,
“पण भाऊसाहेब,शेवटी खरा गुन्हेगार कोण तो सांपडला का?”
त्यावर प्रो.देसाई म्हणाले,
“शरदने मला मोठ्या मुष्किलीने सांगतलं की तो अपराधी त्या होटेल मालकाचा एकोणीस वर्षाचा मुलगा होता.ह्या होटेलात संधी मिळताच तो असाच बायकांवर जबरद्स्ती करायचा.एका गुन्ह्यात एका बाईने त्याचे अतिप्रसंग करताना डोक्यावरचे केस ओढले.आणि साक्षीपुरावा म्हणून त्या केसाचा उपयोग डीएनए टेस्टसाठी वापरायला उपयोगात आणले.कारण ती बाई एक फोरेन्सीक एक्सपर्ट होती.शरदची अपराधी म्हणून अटक झाल्यावरही त्या होटेलमधे असेच गुन्हे होऊं लागले.पाच वर्षानंतर सबंध होटेलशी संबंधात येणार्‍या सर्वांची डीएनए टेस्ट घेतल्यावर त्या बाईने ओरबडलेल्या केसांच्या आधारावर मालकाच्या मुलाला पकडलं गेलं.आणि तशीच शरदची डीएनए टेस्ट घेतल्यावर सुटका झाली.खरं म्हणजे कमलावर झालेल्या अतिप्रसंगात शरदला ह्या मालकाच्या मुलाचा संशय होता.पण पोलिसाना सांगूनही त्यानी पैसे खाऊन त्या मुलाला ओळख परेडमधे आणलं नाही.”
हे ऐकून मी प्रो.देसायाना म्हणालो,
“आता मला कळलं खर्‍या पुराव्या आभावी न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर ती बहिरी आणि मुकी पण असते. असं तुम्ही का म्हणालात ते.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: