Thursday, October 15, 2009

पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग पहिला

“आज ओबामाने व्हाईटहाऊसवर दिवे,पणत्या लावून दिवाळी साजरी केली.”

एका वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सांगायचं तर,
“धर्म संस्थापना्र्थाय संभवा मी युगे युगे”
हे म्हणणं खरं करण्यासाठी ह्या “पंढरीच्या विठ्ठलाने ” -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
रि.प पक्षाच्या शंभर कौरवानी गेली आठ वर्ष अमेरिकेत आणि जगात धुमाकूळ घालून मनुष्यधर्म बुडवला.बुशरूपी दुर्योधनाने इराकच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करून लाखो निरपराध लोकांना यमसदनी पाठवलं.सादाम जरी दुष्ट असला तरी ९/११ ला तो कारणीभूत नव्हता.ब्रिटनचा पंतप्रधान टोनी ब्लेअर शकूनीमामा त्याला सामील झाला होता.

“यु गेट वॉट यु डिझर्व्ह”
ह्या म्हणण्याप्रमाणे ह्यावेळी डोकं ठिकाणावर ठेवून अमेरिकन जनतेने आपला प्रेसिडेन्ट निवडला.बरेच वेळेला तीस पसतीस टक्के मतदान करणारी जनता ह्यावेळी पन्नास पंचावन्न टक्क्यावर मतदान करायला आली होती.पंढरीच्या विठोबाकडे जशी भक्तांची गर्दी जमते तशीच ह्या विठोबाच्या सभेला लोक जमत असत,
.”विठ्ठल विठ्ठल गजरी,अवघी दुमदुमली पंढरी “
तसंच ह्याचं भाषण ऐकून लोकांचं व्हायचं.
“यस वीई क्यान”
हे त्याचं पालूपद एव्ह्डं लोकाना आवडायचं की पहिली दहा मिनटं ह्या वाक्याचा गजर व्हायचा.
“जय हरी विठ्ठल जय श्री विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल”
ह्या धरतीवर “ओबामा,ओबामा,ओबामा “
असा लोक आणखी तीन मिनिटं गजर करायची.

प्रायमरी निवडणूकीत आयोवा स्टेट मधून ओबामा जास्तीत जास्त मतानी निवडून आला.गंमत म्हणजे आयोवा स्टेट मधल्या लोकवस्तीत गोर्‍या लोकांचं प्रमाण पंचाणव टक्के आहे.आणि ह्या पंचाणव टक्के गोर्‍या लोकानी विठोबाला निवडून देऊन अख्या देशाला दाखवून दिलं की वारे असे वाहत आहेत.

हा सत्तेचाळीस वर्षाचा तरूण सत्तेवर आणला गेला. राजकारणाच्या वयोमनात सत्तेचाळीस वर्ष म्हणजे ओठ पिळले तर दुध येईल असलं वय.नाही तरी अमेरिकन राज्यकर्ते, वय झालेले, पोटाच्या घड्या पडलेले ढेरपोटे,डबल चीन-हनुवटी-असलेले कुणीतरी शागिर्द हात पकडून ओढत ओढत स्था्नापन्न करण्यासाठी लागणारे,दंतांजीचे ठाणे सुटले,फुटले दोन्ही कान,नन्ना म्हणते मान अश्या काहीशा वयाचे सिनेटर किंवा कॉन्ग्रेसमन औषधाला पण सापडणार नाहीत. आता एखादा म्हातारा अपवाद असलाच तर विरळाच.आणि अपवादाने तो जर असलाच तर मग तो प्रचंड कार्य करीत असलेलाच असल्याने, एव्हडी वर्ष सतत निवडून येत असावा.पण प्रकृतीने मात्र तो शेवग्याच्या शेंगे सारखा असायला हवा.अमेरिकन जनता शक्यतो ढेरपोट्यांना निवडून द्यायला तयार नसते. नव्हेतर असले लोक ही आपल्या “इमेजचा” विचार करून निवडणूकीत उभं राहायला दोनदा विचार करतात.

जसं,
“विठू माझा लेकूरवाळा,संगे गोपाळांचा मेळा”
तसंच ह्या विठूने बाळ गोपाळांना-बर्‍याच तरूण अमेरिकनना- आपल्या भोवती जमवलं होतं.
“मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म साधावा”
ह्या म्हणण्याप्रमाणे ह्या बाळ शिवरायाने मेक्सीकन,एशीयन,लॅटोनोझ असे मावळे जमवले होते.त्या शिवाय त्याची विठ्ठल सेना जवळ जवळ नव्याणव टक्के त्याच्या बाजूची होती.हायटेक प्रणाली वापरून इंटरनेटवरून,
”तुम एक पैसा दोगे तो दस लाख मिलेंगे”
असा मेसेज देऊन त्याने सर्व साधारण मतदाराकडून पाच,पाच,दहा, दहा डॉलर घेऊन दशलक्षानी डॉलर्स जमा केले.त्याचा त्याला निवडणूकीत प्रचारासाठी वापर करून खूप फायदा झाला. एक वेळ अशी आली होती की हिलरी क्लिन्टन हवालदिल झाली.कर्ज काढून काढून थकली.आणि एकदा पत्रकारांसमोर अक्षरशः रडली होती.हा विठोबा आता ऐकत नाही.असं पाहून प्रे.क्लिन्टन पण हताश होऊन एकदा म्हणाला होता,
“हे विठ्ठलपंथी लोक राज्य करू शकणार नाहीत, असं इतिहास सांगतो.”
पण जेव्हा विठोबाची सरशी व्ह्ययला लागली,आणि आपली बायकोची निवडून येण्याच्या शक्यता कमी झाल्याचं पाहून प्रे.क्लिन्ट्न म्ह्णणाल्याचं आ्ठवतं,

“कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।”

ओबामा यापुढे मागे बघायला तयार नव्हता.एका मागून एक तो राज्य जिंकायला लागला.एकदा क्लिन्टनबाई चिडून म्हणाली होती,
“ओबामा,शेम ऑन यु”
पण ओबामा शांतीचा मेरू होता.त्याला पत्रकारानी विचारलं होतं,
“तुला कुणाची चीड कशी येत नाही?”
ओबामाने आपल्या कोटाच्या दोन्ही बाह्या खांद्यावर झटकून दाखवलं,आणि म्हणाला,
“मी कुणी काही म्हटलं तर असं करतो.”
शेवटी पंढरीचा विठू डेमॉक्रटीक पार्टीचा उमेदवार म्हणून निवडला गेला. रिपब्लिकन पार्टीचा बुढ्ढा जॉन मेकेन त्याच्या विरूद्ध उभा होता.
आणखी पुढच्या भागात.
कमशः….





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com