Friday, October 30, 2009

“अमृताहूनी गोड नाम तुझे आंबा”..देवगडचा हापूस आंबा.

मे महिन्याचे दिवस होते.उष्मा मी म्हणत होता.कोकणातून माझ्या मामाने मला देवगड हापूस आंब्याची एक पेटी पाठवली होती.त्या हापूस आंब्याचावास माझ्या घरभर दरावळला होता.आंबे पुर्णपणे पिकले आहेत हे वासाने ते आंबे आपल्याला समज देतात.अंमळ फ्रेश हवा घ्यावी म्हणून मीआमच्या बाल्कनीत आलो. समोरच्या बसस्टॉपवर मला राजेंद्र उभा असलेला दिसला.बहुदा तो बसची वाट पहात असावा.मला हाताने खूणावून येईन कधीतरी तुझ्याकडे असं काहीसं मला सुनावत होता.
एक वयस्कर माणूस वाकून त्याला हात जोडून काहीतरी सांगत असावा असं मी पाहिलं.तेव्हड्यात बस आली.राजेंद्राने घाईघाईत त्या वयस्कर माणासाच्या हातात काही तरी दिल्याचं मी पाहिलं.तेव्हड्यात मला घरातून हांक आली म्हणून मी आत गेलो.

दुसर्‍या दिवशी अचानक माझी आणि राजेंद्राची अपना बाजार मधे गाठ पडली. आताच घरी चल म्हणून मी त्याच्यावर दबाव आणला.
“अरे निदान देवगडचे आंबे खाण्यात आनंद घेऊंया.आणि गप्पा मारूंया.”असं मी त्याला म्हणालो.
मला माहित होतं राजेंद्राला आंबे खूप आवडतात.तो अपनाबाजारातल्या आंब्यांच्या पेटीच्या ढिगार्‍याकडे घुटमळत होता.ते आंबे जरी रत्नागीरीचे म्हणून बाहेर पाटीवर लिहिलं होतं तरी देवगडच्या आंब्यांचा स्वाद निराळाच असतो.किंबहुना देवगडचा आंबा आणि रत्नागीरीचा आंबा ह्यातला फरक फक्त जाणकारच जाणतात.

आकाराने बेताचाच,जर्द केशरी रंगाचा, कापल्यावर आतला बाठा अगदीच लहान, आंबा उत्तम पिकल्यावर सालीला सुरकुत्या दिसतात,”एलिझाबेथ परफ्युम”चा एकवेळ वास दरवळणार नाही पण ह्या आंब्याचा वास लपवणं अगदी कठीण.पूर्ण पिकलेला आंबा कापताना लोणी कापल्यासारखं वाटतं, पण तोच जर कच्चा असेल तर सुरीला खसखस आवाज येतो.तो देवगडचा हापूस आंबा असतो.

मुळात आंब्याला नाक लावून सुगंध पण येत नसेल तर तो कापण्याची घाई करण्यात अर्थच नसतो.कापलाच तर तो नक्कीच आंबट लागणार.
चिंच म्हणणार,
”हाच माझा सख्खा भाऊ!.”एव्हडा तो आंबट असतो.
पण तोच जर पिकलेला कापला आणि जिभेवर आंब्याचा गर ठेवल्यावर,
”अमृताहूनी गोड नाम तुझे आंबा”
असं म्हणायला तिच जीभ तयार होणार.हे वाचून कदाचीत वाटेल की मी आंब्याचा जाणकार आहे.पण ते काही खरं नाही.
मला ही आंब्याची मेख माझ्या मामाने अनुभवाने सांगितली होती.देवगडच्या आंब्याची बरीच कलमं त्याने आपल्या पोरसात लावली आहेत. घरात ठेवून झाल्यावर उरलेले आंबे तो पण मुंबईला विकायला पाठवतो.त्यातलीच एक पेटी मला त्याने आठवणीने पाठवली होती.

देवगडचा हापूस आंबा खायला राजेंद्र नाही कसं म्हणेल.दोघेही आम्ही घरी गेलो.दार उघडताच,
”हाः हाः काय मस्त वास येतो” असं दोघे म्हणत घरात शिरलो.
मी दोन आंबे कापून आणले.एका थाळीत आंब्याच्या शिरा आणि एका थाळीत दोन त्यांचे बाठे ठेवले. आग्रह करण्यापूर्वीच राजेंद्राने आंब्याच्या शिरा फस्त करायला सुरवात केली.त्याचं ते आंब्यावरचं प्रेम पाहून मी ही कौतुकाने त्याच्याकडे बघत होतो.

कालची बस्टॉपवरची घटना मला आठवली आणि मी राजेंद्राला म्हणालो,
“काय रे,तो कोण वयस्कर माणूस होता,आणि तुझा मित्र तुझ्या कानांत काय खूसखूसत होता.?”
“वाः तुझं अवलोकन फारच नामी आहे.”
गालाला लागलेला आंब्याचा रस रुमालाने पुसत राजेंद्र सांगू लागला,
“मी माझ्या घरातून बाहेर पडून नुकता रस्त्यावर आलो होतो,तेव्हड्यात एक वयस्कर माणूस माझ्या जवळ येऊन,
” एखाद्या रूपयाची मदत होईल का?” म्हणून विचारू लागला.
“काहीतरी दुपारच्यावेळी जेवीन”असं तो पुढे मला म्हणाला.
मी माझ्याकडची खिशात असलेली मोड चाचपत असताना माझा मित्र मला कानाकडे येऊन म्हणाला,
“हे पैसे तो दारू पिण्यात खर्च करणार.”

मी त्याला माझ्याजवळ असलेली मोड दिली कदाचीत ती मोड रुपायापेक्षा जास्त ही असावी.पण तो प्रश्न नव्हता.प्रश्न असा होता की,मी किंवा माझा मित्र कधीही जाणू शकणार नाही की त्या माणसाने खरोखरच त्या रुपयाचं काय केलं असावं. एक रुपया मला काहीच नव्हता.पण निदान त्याची दुपारची भूक भागली असावी. माझ्या मित्राचं बोलणं किती न्याय आहे किंवा माझं करणं किती न्याय आहे हे काही मी पहायला जात नाही.
आपणा सर्वांचे ह्या विषयावर निरनीराळे विचार असूं शकतात.”

मी राजेंद्राला म्हणालो,
“ह्या विषयावर बर्‍याच लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला वाटतं आपल्या पैकी काहीना वाटत असतं की हे अशी मदत मागणारे लोक हा समाजाला एक प्रकारचा उपद्रव आहे.आणि हे लोक आपल्या दयनीय वागण्याने इतरांच्या सुसंस्कृत आणि साफसुथर्‍या जीवनाचा विचका करतात.आणि काहीना वाटतं हे लोक आळशी आणि व्यसनाधीन असतात.काही तर त्यांच्या जीवनाचा उपहास करतात.आणि त्यांना असं वाटत असतं की हे लोक अशी जीवनशैली मुद्दाम अंगिकारतात आणि म्हणून आपल्याकडून त्यांना न मिळणार्‍या सहानुभूतीलाच ते पात्र असतात.”

“अगदी माझ्या मनातलं बोलास बघ”असं म्हणून राजेंद्र नंतर म्हणाला,
”मी बरेच वेळा चकित होत असतो की माझे हे हितचिंतक मित्र मी एखाद्या रुपायाचं दान दिलं तर मला ते न देण्याच्या उपदेशचा प्रयत्न करतात आणि उलटपक्षी मी अनावश्यक महागड्या जेवणावर आणि पिण्यावर खर्च केला तर चुकून ब्र पण काढत नाहीत.याचा अर्थ माझे हे स्नेही उदार किंवा दयाळू नाहीत असं मला म्हणायचं नाही.ते खचीत दयाळू आहेत.ते त्यांच्याकडचे पैसे निरनीराळ्या कारणास्तव देऊन बर्‍याच गरजूंचं जीवन सुखकरही करत असतील.
मी एखादा रुपया दान दिला तर तो मला मी उदार मनाचा आहे हे दाखवण्यासाठी मुळीच करीत नाही. किंवा ज्याला दिला त्याची भुक शमवण्यासाठी देतो असंही नाही, शिवाय ह्या रुपयामुळे मी माझ्या जीवनशैलीच्या सुविधा पासून वंचित होतो असा ही प्रकार नाही.मी तो रुपया देतो त्याचं कारण मला अशावेळी नेहमीच मनापासूनचे आणि निष्कपट आशीर्वाद अशा व्यक्तीकडून मिळतात की ज्याला मी माझ्याकडचा आणखी एखादा रुपया देऊन किंवा काही मोड देऊन ते आशीर्वाद घेतो. त्या व्यक्तीची शालीनता माझ्या हृदयाला भिडते आणि मला मी भाग्यवान समजतो.”

मी म्हणालो,
“आजच्या जगात मनापासूनचे आशीर्वाद मिळणं जरा कठीणच आहे बघ.पण रस्त्यावरच्या एखाद्याला एक रुपया देऊन मात्र अनंत आशीर्वादाचं दान मिळतं.मला वाटतं त्या व्यक्तीची शालीनता आणि दुवा तू दिलेल्या रुपयापेक्षा कित्येक पटीने मौल्यवान असावी.तुझ्या जवळ राहीलेला रुपया त्याच्याकडे राहील्याने त्याला जास्त महत्वाचा वाटत असावा.”
राजेंद्र म्हणाला,
“अगदी बरोबर. रस्त्यावर येण्याचं त्याचं काही ही कारण असलं तरी त्याच्या जीवनातला त्याचा दर्जा समाजानेच अप्रतिष्ठित केलेला आहे.
परंतु,माझ्या एक लक्षात आलं आहे की,त्याची दयनीय परिस्थिती असली तरी त्याची शालीनतेने रहाण्याची क्षमता कुणी जरी त्याला दान कमी दिलं असलं तरी मुळीच कमी होणार नाही.आणि ही त्याच्या कडून मिळालेली शिकवणूक माझ्या मनात मी नेहमीच ठेवणार.मला वाटतं ज्याला माझ्याकडून तो रुपया मिळतो तो नकळत मला समजही देत असावा की त्या रुपयाचं मुल्य किती सहजगतीने मी कमी लेखत असलो पाहिजे.

माझ्या लक्षात आलंय की ह्या दान करण्याच्या माझ्या संवयीमुळे माझी उदारता माझ्याकडे अतिरिक्त पैसा रहाण्या इतपत विस्तारली गेली आहे.जीवन आरामात गुजरण्यापासून मी कधीही वंचित झालो नाही.मी असंही म्हणेन दुसर्‍याला जेवायला दिल्याने माझं जेवण मला कधीही चूकलं नाही.माझ्या मनात मला एव्हडीच शरम वाटते की मी माझी जरूरी झाल्यानंतर उरलेलं मी त्याला दिलं.मला असंही वाटायला लागलं आहे की दान दिलेल्या व्यक्तीला माझ्या रुपयाच्या गरजेपेक्षा मलाच त्याच्याकडून मिळणार्‍या आशीर्वादाची जास्त जरूरी भासत आहे”.

“माझ्या मनात काय आलं ते सांगू का?”असा प्रश्न करून, तो “हो!,” म्हणण्यापूर्वीच मी म्हणालो,
“कधी कधी मला असंही वाटायला लागलंय की,कुणा जवळ उदारता असणं किंवा नसणं ह्याची परिक्षा जेव्हा त्याला स्वतःला जर आणि जेव्हा ज्या काही गोष्टीची जरूरी भासेल तेव्हा त्याचा अंश जरी मिळण्यात झाला तरी त्या परिक्षेला तो उतरला अशी त्याची समाधानी होईल.”

“यापुढे मला आशा आहे की मी कोणताही ढिंढोरा न पिटता आणि गाजावाजा न करता असाच त्या आशीर्वाद देणार्‍या रस्त्यावरच्या वयस्कर व्यक्ती सारख्याला रूपया देण्यात उदारता दाखवीन.”

असं म्हणून राजेंद्र हंसायला लागला.आणि वर मला सांगतो कसा,
“पण आता तू आणखी दोन आंबे कापून आण आणि तुझी उदारता मला दाखव.”
आणि मी दुसरे दोन आंबे कापून आणेपर्यंत लागलीच राजेद्र दुसर्‍या थाळीत ठेवलेले आंब्याचे बाठे चोखायला लागला.

मला राजेंद्राचं आंब्यावरचं प्रेम पाहून कौतूक वाटलं, जणू तो मला म्हणत असावा,
“लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा लपेल का?
बाठा चोखून चालेल का?”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com