Friday, October 23, 2009

प्रेम काय आहे ते आता मला कळलं.

.”प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो” इती मकरंद

धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो, ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या समोर आजगांवकरांचा बंगला आहे.

मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी सकाळी चौपाटीवर कुत्रं पण दिसत नसायचं.म्हणजेच मला सांगायचं आहे की कुणी माणूस दिसत नसायचा.पण खरं म्हणजे जवळच्या बंगल्यातल्या श्रीमंतांची कुत्री वाळूत खेळताना नक्कीच दिसायची. एखादं कुत्रं चावेल म्हणून हातात एक छोटी काठी ठेवावी लागायची. चौपाटीवर पार्ल्याच्या दिशेने जाऊन नंतर वरसोवाच्या दिशेने परत येताना थोडा उजेड व्हायचा.
दोन पांढर्‍या छोट्याश्या कुत्र्यांबरोबर खेळताना दोन सारखीच दिसणारी सारख्याच वयाची मुलं आणि त्यांचे आईवडील नेहमीच मला भेटायचे.हेच ते आजगांवकर आणि त्यांची दोन जुळी मुलं.आनंद आणि मकरंद.चौपाटीच्या ह्या ओळखीवरून नंतर त्यांची आणि माझी स्नेहात गट्टी जमली.बरेच वेळा ते मला बंगल्यावर सकाळच्या चहाला आग्रहाने घेऊन जायचे. बरीच वर्षं त्यांचा आणि माझा संबंध राहिला होता.नंतर मधे ब‍र्‍याच वर्षाचा खंड आला. तरी वीसच्या वर वर्षं झाली असतील.मधे मी एकदा त्यांचेकडे गेलो होतो तेव्हा त्यांचं घर बंदच होतं.तसं ते घर पूर्वी शाळांच्या सुट्टीत नेहमीच बंद असायचं हे मला परिचयाचं होतं.त्यावेळी आजगांवकर कुटूंब दर सुट्टीत मुलाना घेऊन कुठे ना कुठे निरनीराळ्या जागी फिरायला जायचे.

बंगल्यातल्या म्हातार्‍या माळ्याकडे चौकशी केल्यावर मला कळलं, आणि तो मला म्हणाला,
“मुलांची कॉलेजची शिक्षणं होई तो सर्व इकडेच रहायचे.नंतर सर्वजण बंगलोरला निघून गेले.आणि हा त्यांचा बंगला त्यानी कुणाला भाड्याने दिला होता.लवकरच त्यांचा एक मुलगा मकरंद इथे थोडे दिवस राहायला येणार आहे असं त्याने कालच फोनने कळवल्यामुळे आजच मी बंगला साफ करायला आलो आहे.मी आपल्याला त्यांचा फोन देतो.आपण त्यांना फोन करून मग या.”

असं म्हणून त्याने मला त्या बंगल्याचा फोन दिला.दुसर्‍याच रवीवारी मी फोन केल्यावर तो मकरंदनेच घेतला.सहाजीकच माझ्याशी फोनवर बोलून त्याला आनंद झाला.त्याच रवीवारी संध्याकाळी मी त्याला भेटायला गेलो होतो.
इतर गप्पा झाल्यावर मी त्याला ते सर्व सुट्टीत नेहमीच बाहेर जायचे ह्याची आठवण करून दिली.
“त्याचं काय गुपित आहे रे?”
असं मी मकरंदला विचारलं.
मला म्हाणाला,
“तो किस्सा मजेदार आहे.फार लहानपणातली गोष्ट आहे.
एकदा मी आणि माझा धाकटा भाऊ आमच्या आईवडीलांबरोबर रात्री जेवायला बसलो असतांना आम्हाला आमच्या बाबानी आंध्रप्रदेश राज्याची राजधानीचं नाव विचारलं.तसा अगदी सोपा प्रश्न होता.आमच्या बाबांना आम्ही सर्व जेवत असताना भुगोलाचे प्रश्न विचारायला आवडायचं.त्यादिवशी आईने मास्यांचं जेवण केलं होतं.आम्हा दोघानाही मासे खायला खूप आवडायचे. तिसर्‍याचं सुकं आणि सुंगटांची आमटी केली होती.मला हे पक्कं आठवतं,बरोबर उकड्या तांदळाचा भात होता.मासे आणि भात ह्यांचं संयोजन छानच असतं.ताटात आईने गरम गरम भात वाढल्यावर भाताच्या वाफेतून येणार्‍या वासाने जीवघेण्या भुकेला आंवर घालता येत नव्हता.आम्ही समुद्रावर खूप खेळून घरी यायचो त्यामुळे भूक खूप लागायची.

बाबांच्या प्रश्नाकडे लक्ष कसं असणार? आम्हां दोघांनाही अचूक उत्तर सांगता आलं नाही.आम्ही अभ्यासापेक्षा खेळातच जास्त वेळ घालवतो असा त्यांचा समज झाला. माझ्या आईला आणि बाबांना आमची जरा काळजी वाटू लागली.मला वाटतं त्यावेळी आम्ही दुसर्‍या तिसर्‍या इयत्तेत होतो असावे. दुसर्‍याच दिवशी माझे बाबा दादर बूक डेपोमधे गेले आणि भारताचा रंगीत नकाशा घेऊन आले.ते नकाशावरून आम्हाला भुगोलाची माहिती द्यायचे. अशी बरीच जेवणं होऊन गेली. आणि बरेच भुगोलाचे प्रश्न विचारले गेले. त्यांना दिसून आलं की ह्या नकाशाने काही आमच्यामधे बदल होतनाही. आमची उत्तरं चुकायची.”

“मला आठवतं तुम्ही गोव्याला गेला होता आणि मला येण्याचा खूप आग्रह करीत होता.माझं गाव गोव्याला आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं म्हणून तुम्ही मला बोलवत होता.पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही.तुम्ही दोघं खूप नाराज झाला होता.”
अशी मी त्याला आठवण करून दिली.

“तेच सांगतो.आम्हालाही त्यावेळी नवल वाटलं होतं.पण गोव्याला जायला मिळणार म्हणून आम्हाला आनंदही झाला होता.”
असं म्हणत मकरंद पुढे म्हणाला,
“आम्हा दोघांच्या नकळत आमच्या आईबाबानी आमच्या येणार्‍या शाळेच्या सुट्टीत नवीन नवीन गावांना सहली करायचं ठरवलं.आम्ही त्याला गंमतीत “देशाची जेवणावळ” म्हणायचो.त्यानंतर पहिल्याचवेळी आमची सहल गोव्याला गेली.रात्री पोहोचल्यावर आणि दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर आम्ही चौघं सकाळीच मडगांवच्या चौपाटीवर फिरायला गेलो.माझ्या बाबानी पोर्तुगीझ पेहराव केला होता.वरती हॅट आणि खाली रंगीबेरंगी पायजम्या सारखा पोषाख होता. आईने आंखूड पॅन्ट,वर रंगीत टॉप,केसाचा आंबाडा,आणि पायात टेनीस श्युझ घातले होते.सकाळीच समुद्रावर फिरून आल्यावर ब्रेकफास्टला चौपाटीवरच्या एका हॉटेलात आम्ही गेलो होतो.माझ्या बाबानी गोव्या बद्दल माहिती असलेलं पुस्तक विकत घेतलं होतं.त्यातले महत्वाचे मुद्दे ते आम्हाला वाचून दाखवत होते.

गोव्याच्या स्थानीक लोकांचा पेहराव,त्यांच्या संवयी,खाणं पिणं, कुटीर उद्योग, प्रसिद्ध चर्चांची माहिती वगैरे वगैरे समजावून सांगितली.
ह्या सुट्टीनंतर पुढे येणार्‍या निरनीराळ्या सुट्टीत आम्ही पश्चिमेला गुजराथ, राजस्थान, तसंच दक्षिणेला कर्नाटक,आंध्रप्रदेश,मद्रास याठिकाणी जाऊन आलो. आणि त्या त्या ठिकाणचे स्थानीक लोकांचे नेसायचे पेहराव ते विकत घेऊन दोघही नेसायची.मद्रासमधे बाबानी सफेद लूंगी आणि वर उघडे राहून अंगावर बेज रंगाचं उपरणं घेतलं होतं.आणि आईने टिपीकल साऊथ-इंडियन साडी नेसून दोन्ही नाकपुड्यात चमक्या घातल्या होत्या. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी किंवा रात्री/दुपारी जेवताना असले कपडे नेसून आम्हाला त्या त्या प्रांताची माहिती वाचून दाखवायचे. कधी कधी स्थानीक लोकांपैकी कुणाला तरी बोलावून जेवणाचं आमंत्रण देऊन त्यांच्या तोंडून माहिती काढून आम्हाला ऐकवायचे.मग नगर/हवेलीच्या बंदरांची माहिती, किंवा हैद्राबादच्या टिपू सुलतानाच्या राजवाड्याची माहिती,तर कधी कलकत्यातल्या हावडा ब्रिजवर कुणाबरोबर नेऊन हावडा ब्रिजची माहिती द्यायचे.”
मी मकरंदला म्हणालो,
“बाबारे,तुझे वडील शेअर बाजारात ब्रोकर होते.त्यांनाच हे असलं परवडणार.!
पण पैसा असला तरी तो योग्य कारणाला खर्च करायचा पण कळलं पाहिजे हे पण खरं आहे.”

मकरंद पुढचं सांगण्यापूर्वी जरा कष्टी झालेला दिसला.त्याला त्याच्या बाबांची आठवण येऊन तो थोडा भाऊक होऊन म्हणाला,
”मी आणि माझा भाऊ सहा वर्षाचा असल्यापासून माझे बाबा एका दुर्धर रोगाशी लढत देत होते.आमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना हाडाचा कॅन्सर रोग झाला होता.माझी आई आणि ते कुणी कुणी सुचवल्याप्रमाणे देशात विमानाने तर विमानाने जाऊन आपल्यावर उपाय करून घेण्याच्या प्रयत्नात असायचे. माझ्या बाबांचा शेअर ब्रोकरचा धंदा होता.त्यांचा धंदा चांगला चालायचा.आणि म्हणून त्यांना ते परवडायचं. माझे बाबा आजारी असूनही नंतरच्या सोळा वर्षात मला आणि माझ्या भावाला त्यांना हॉस्पिटलात पेशंट म्हणून राहिलेले कधीही पाहिल्याचं आठवत नाही आणि आमची “देशाची जेवणावळ”पण कधी थांबल्याची आठवत नाही”
“मग आजगांवकर केव्हा गेले?मला कसं कळलं नाही.?”
मी आश्चर्य करीत त्याला एका मागून एक प्रश्न करीत राहिलो.
तो म्हणाला,
“मी तेवीस वर्षाचा असताना माझे वडील गेले.आणि त्यानंतर पाच वर्षानी आमची आई गेली. पण आमचे बाबा गेल्यानंतर बर्‍याच वर्षानी माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघा भावानी आणि आमच्या आईने आमच्या “आजारी ” बाबांबरोबर आमचा बराचसा अवधी घालवला.
माझं वय वाढत असताना मला वाटत राहिलं की,आमच्यापासून नामानिराळा असणारा कुठचाही “आजार” तो फक्त अशाच लोकांना व्हावा की जे हंसत नाहीत. निदान आमचे आईबाबा आणि आम्ही भरपूर हंसत राहायचो.
ह्या घटने नंतर मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की ही सतत हंसत रहाण्याची देणगी आमच्या आईबाबांकडून आम्हाला मिळाली. पण त्यासाठीफार किंमत त्यांना द्यावी लागली.”
मी म्हणालो,
“तुमचे आईवडील खूपच प्रेमळ होते.”
“हो तेच मला तुम्हाला शेवटी सांगायचं आहे”
मकरंद सांगत राहिला.
“प्रेम काय आहे ते आता मला त्यांच्याकडून कळलं.प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो, आणि आमच्या जीवनात त्या गुणांची आम्हाला देणगी व्हावी म्हणून माझ्या आईबाबांकडून झालेला त्यांचा मनस्वी प्रयत्न.”
बिचारे दोघेही भाऊ भाऊ पोरके झाल्याचं पाहून मी ही सद्नदीत झालो.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com