Sunday, October 4, 2009

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

“फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला.”

मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे.
तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे.माझे वडील त्यावेळी नौसैन्यात असल्याने प्रत्येक वेळी बंदराजवळ आलेल्या लहान सहान जहाजावर अथवा बोटीवर जाण्याची मला संधी मिळायची.पश्चिमेकडून रेडीचा किनारा आणि दक्षिणेकडून गोव्याला जाण्याच्या क्षितीजाची सीमा मी बंदराजवळ असलेल्या लाईट- हाऊसमधून पहात आलो आहे. किनार्‍यावरच्या लहान लहान होड्यामधे बसून, येणार्‍या मोठ्या लाटांवर हेलकावे घेण्याचा नाद मी मनमुराद उपभोगला आहे.कधी कधी माझ्या इतर मित्रांबरोबर फेसाळलेल्या लाटांवर आरूढ होऊन किनार्‍यावर सरपटत येण्याचा खेळ मी अनेक वेळा खेळलो आहे.बरेच वेळा माझ्या त्या वयात मला भासणारी मोठाली लाट माझ्या होडी सकट मला वर ऊचलून गरगर फिरवून पाण्याच्या फेसात फेकून देताना येणारी मजा मला कधीच विसरता येणार नाही.आणि त्या फेसाळलेल्या पाण्याच्या वेगात किनार्‍याकडे जायला आतूरलेलं ते लाटेचं पाणी मला एखाद्या बंदूकीतून सुटलेल्या गोळी सारखं वाळूत फेकून द्यायचं.आज माझ्या ह्या वयावरही ते दृष्य माझ्या डोळ्यासमोर दिसतंय.मला कधी कधी वाटतं,माझ्या मनातले जेव्हा हे असले अविस्मरणीय क्षण विसरण्यात गेले तर तो एक माझ्या आयुष्यातला
दुःखद टर्नींग-पॉइंट होईल.
लहानपणी माझ्या पायावर आलेल्या एक्झीम्याला समुद्राचं खारंट पाणी आणि किनार्‍यावरचा भरपूर सूर्यप्रकाश बरं करण्यात उपयुक्त ठरला.
तुम्ही जर समुद्राला भेट दिलीत तर कदाचीत समुद्र तुमचे गुढघे कधीच ओले करणार नाही.वाळुतून चालणं आणि पाऊलभर फेसाळलेल्या पाण्यातून पाणी उडवत चालणं ह्यातच तुमचा सहभाग मजेशीर होऊ शकतो.ज्याचा त्याचा सहभाग ज्याला जसं वाटेल तसा असावा.जीवनात प्रत्येकाला निदान एकदातरी समुद्राला भेट देण्याची जरूरी आहे असं मला वाटतं.
मला आठवतं माझा एक मित्र होता.आम्ही त्याला बबन म्हणायचो.तो समुद्राच्या इतका जवळ रहायचा तरीपण त्याने एकदाही समुद्रावर येऊन वाळूत चालून आणि पाण्यात पाय देऊन मजा करण्याचा प्रयत्न केला नाही ह्याचं मला राहून राहून नवल वाटायचं.आणि एकदा त्याने प्रयत्न केला तो पहाताना मला ते दृष्य रोमांचकारी वाटलं.
नेहमी प्रमाणे मी एकदा कुंद सकाळी पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात बुचकळून पुढे जाण्यासाठी तयार होतो न होतो तो मी बबनला पाहिलं.एक रंगीत शॉर्ट घालून दोन हाताची क्रॉस घडी करून हाताचे तळवे खांद्यावर टाकून फुटलेल्या लाटेचे तुषार अंगावर उडाल्यानंतर अंगावर शहारे येणार्‍या गंमतीचा तो अनुभव घेत होता.मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो,
“आपण दोघं पोहूया,तू चल माझ्या बरोबर”
गावातल्या विहीरीत पोहायची संवय असल्याने बबनला समुद्रात पोहायला तितकसं कठीण जात नव्हतं.आम्ही समुद्राची लाट फुटण्यापूर्वी लाटेपर्यंत पोहत जात होतो.आणि लाट फुटता फुटता तिच्यावर आमच्या पोटावर (उपडी) झोपून त्या धमाकेदार लाटेवरच्या भ्रमणाची मजा लुटीत होतो.अशा एक दोन अनेक लाटांवर आरूढ होत होतो. हंसता हंसता कधी कधी बबनची शॉर्ट त्याच्या गुडघ्यापर्यंत खाली उतरायची,आणि किनार्‍यावर पोहचल्यावर ओली वाळू काना, नाका, तोंडात आणि डोळ्यात जायची.पहिल्याच खेपेला मला आठवतं,असं झाल्यावर त्याने खार्‍या पाण्यात लघुशंकाच केली.जणू तो आपल्या जीवनातल्या वर्जित निग्रहापासून-समुद्रावर न येण्याच्या निग्रहापासून-मनमोकळा झाला होता.
मला वाटतं बबनला समुद्र आता आशेचे किरण दाखवीत होता. त्यानंतर काही दिवसानी त्याचा नी माझा संपर्क तुटला.तो डॉक्टर झाला की इंजिनीयर हे मला ठाऊक नाही.फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com