Friday, October 9, 2009

“सखी शेजारणी तू हंसत रहा”

शरद,रमेश आणि सुमन ही तिन भावंडं घरात किंवा बाहेर सदाची मजा-मस्करी करण्यात दिसायची.कदाचीत हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून आले असावेत. त्यांची आई प्रत्येक उच्चारलेल्या वाक्यागणीक हंसून समारोप करायची.मला ह्या कुटूंबात वेळ घालवायला आवडायचं.मी दुसर्‍या मजल्यावर राहत असल्याने आणिहे कुटूंब पहिल्या मजल्यावर असल्याने ह्यांच्या घरावरून जावं लागायचं. ह्याच्या घराच्या जवळ आल्यावर हस्याचे फुलोरे ऐकायला मिळायचे.बरं वाटायचं. ह्यांचे वडिल मात्र स्वभावाने अगदी मख्खं. गालावर माशी बसली तरी ते ती हाकलण्यासाठी गाल हलवत नसत.ही एक दुसर्‍या टोकाची व्यक्ती होती.

सुमन स्वभावाने शांत पण वागायला भावांसारखी मिष्कील होती. बरीच बोलकी पण होती.लग्न होऊन आता ती दुसरीकडे राहायला गेली.तिलाही तिन मुलं होती. नवरा पुन्हा अमेरिकेला काही दिवस कामासाठी गेल्याने ती थोडे दिवस माहेरी राहायला आली होती.मी त्यांच्याकडे गप्पा मारायला गेलो होतो.
हंसत हंसत माझं सगळ्यानी स्वागत केलं.अर्थात ते स्वाभाविक होतं.

गप्पा मारताना कसलातरी विषय निघाला.मी सुमनला म्हणालो,
“धंद्यात आणि राजकारणात एक उक्ति आहे, आणि त्यात सुचना आहे की पैसा कमवायचा असेल तर समजून घ्या की लोक जसे वागतात ते तसे का वागतात?.”
सुमन म्हणाली,
“हे असं म्हटलं तरी मला वाटतं,जीवनात आणखी अनेक महत्वाच्या वयक्तिक पसंती- जशा, मैत्री,प्रेम,लग्न,पेशा असल्या तरी हंसतमूख असण्यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट नसावी.”
“हे तू मला सांगू नको सुमन.दिवसाची सुरवात आणि शेवट तुमच्या घरी ह्याच गोष्टीनी होते हे काय मला माहित नाही काय?”
असं मी तिला म्हणाल्यावर हंसत हंस्त सुमन म्हणाली,

“गप्पा,गोष्टी,गजाली आणि हंसणं-खिदळणं भरपूर असलेल्या कुटूंबात मी वाढले. रात्रीचं जेवण नेहमीच लांबलेलं असायचं,बडबडीचं असायचं आणि योग्य वेळी आदेशाचे हस्तक्षेप यायचे बाबांकडून,
“जेवा रे! आता”
माझा एक भाऊ रमेश,कुणाच्याही नकला करण्यात निपुण होता तर दुसरा शरद “गजाली” सांगण्यात श्रेष्टत्व दाखवायचा.मी मात्र त्यामानाने भोळीभाळी होते, त्यामुळे आनंदी आनंद वाढायचा.”
“पण लग्न झाल्यावर तुझं हेच वातावरण तुला नवर्‍याच्या घरी न्यायला मिळालं काय?” मी तिला विचारलं
“सांगते ऐका” असं म्हणून सुमन म्हणाली,
”अजीब गोष्ट अशी की काही काळ मी हंसण्या-खिदळण्याचा नाद थोडासा हरवून बसले.माझं लग्न एका गृहस्था बरोबर ठरलं होतं. त्यामुळे माझ्या वातावरणात थोडा बदल झाला.ते स्वाभावीक होतं.एकदा तो मला म्हणाला,
“ते हंसण्याचे दिवस आता गेले. परत येणं कठीण”
हे सांगितल्यावर मला ऐकून आश्चर्य वाटलं,मी म्हणालो,
“असं कसं तो म्हणाला?”

“खरं म्हणजे असं म्हणून तो त्या दिवसांची कदर करीत होता.पण माझ्या डोक्यात काय आलं की हे हंसणं खेळण्याचं वातावरण यापुढे वाढण्या ऐवजी कमीच होत जाणार.मी मनात म्हणाले की ह्याची ही हेव्यामुळे नवी अटकळ असेल.नंतर त्याच्याशी आणखी काही कारणामुळे लग्न ठरलं नाही हा वेगळा भाग झाला.”
असं सुमन माझ्या प्रश्नाला उत्तर देत बोलली.

मी म्हणालो,
“सुमन मग तुझ्या मनासारखा जोडीदार तू कसा काय मिळवलास?
तो पुर्वा अमेरिकेत राहायचा ना?असं मी ऐकलं होतं”
सुमन म्हणाली,
“होय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
“त्या नंतर,
”हा माझा जोडीदार व्हायला काहीच हरकत नाही”
असं म्हणून मी ज्याला पसंत केलं त्याची माझी पहिली भेट तो ज्यावेळी भारतात आला होता त्यावेळी माझ्या एका मैत्रीणीच्या घरी झाली.आणि ती सुद्धा आम्ही सर्व जेवत असताना.त्याने एक गमतीदार गोष्ट सांगितली.तो म्हणाला,

“मी अमेरिकेत असताना एकदा आमच्या मित्र मंडळी बरोबर आम्ही सहलीला गेलो होतो.ती सुद्धा समुद्राची सहल होती.ज्या होडीत आम्ही बसलो होतो आणि बरंच अंतर काटल्यावर आमच्या होडीच्या निशाणाचा वरचा भाग वार्‍याने अडकला गेला.कुणी तरी वर चढून तो गुरफटलेला भाग सोडवायला हवा होता. आम्ही होडीत अडकले गेलो. आम्हां चोघां पैकी माझ्या मित्राचा हात दुखावल्यामूळे त्याचा हात प्लास्टर मधे बांधला होता.त्याची बायको गरोदर होती.आणि दुसरा मित्र मुळातच लंगडा होता.राहाता राहिलो मी. पण मला उंचीवरचढण्याची मुळातच भिती होती.”
पुढे त्याची पुर्ण गोष्ट ऐकण्यापूर्वीच मनात मी त्याला माझा जोडीदार ठरवून गेले. जेवताना गंमतीदार गोष्ट सांगणारा मला हा नवरा म्हणून पसंत होता.ती नुसतीच गंमतीदार गोष्ट नव्हती तर त्यामधे तो स्वतःच्या त्रुटी,कमीपणा सांगायला आणि स्वतःचं हंसं करून घ्यायला सुद्धा कचरत नव्हता.
आता पंधरा वर्षा नंतर मी माझ्या नवर्‍याला गर्दी मधे सुद्धा त्याच्या सात मजली हंसण्याच्या स्टाईलवरून हूडकून काढू शकते. आमची मुलं सुद्धा जेवणाच्या टेबलावर जमल्यावर गंमतीदार गोष्टी सांगतात.आणि त्यातला माझा एक मुलगा नकला करण्यात निपुण आहे.एव्हडं नक्की की हे हंसणं- खिदळणं नुसतंच प्रेम जारी ठेवत नाही तर मैत्री आणि कुटूंब पण,आणि हा विपत्तीत सुद्धा मार्ग काढण्याचा नक्की आणि सोयीस्कर उपाय आहे.हसणं हे एक कामावरच्या सदाचाराचं निर्देशक आहे.कदाचीत ह्यामुळेच कामाचा बोजा सहजगत्या उतरता येत असावा.ज्या ठिकाणी हंसण्यात वाटेकरी होतात त्या ठिकाणी सख्य, ईमानदारी,प्रामाणिकपणा,आणि आत्म बोध-ह्या सर्व चांगल्या गोष्टी जीवन उभारायला उपयोगी पडतात.म्हणून मी माझ्या मुलांना नेहमी म्हणते,
“तुमच्या आणि इतरांच्या हंसण्या-खिदळण्यात भाग घ्या आणि ऐका.ज्यावर तुम्ही प्रेम करता-लोक,स्थान आणि तुमचा पेशा ह्या गोष्टींच्या जवळ तुम्हाला नेण्याच्या प्रयत्नात ही संवय उपयोगी होईल.”
“म्हणूनच मी तुमच्या घरी वरचेवर येत असतो.मी असं म्हटलं म्हणून हंसू मात्र नकोस” असं मी सुमनला म्हणाल्यावर,
“ते कसं शक्य आहे?” असं म्हणत सुमन जोरात हंसली.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com