Tuesday, October 27, 2009

“गाथनी होयेत गेsss?”

“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”.. इती भाग्यश्री.

चेरापुंजी नंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला मजबूर करायचे.त्यातच विजांचा चमचमाट आणि विज पडल्यावर होणारा कानठिळ्य़ा बसणारा कडकडाट.
घरातली लहान मुलं तर घाबरून जायची,आणि अगदी लहान असली तर रडायची पण.

मला स्वतःला मात्र अशा पावसाच्या दिवसात कोकणात जायला आवडतं.समुद्राचं वातावरण वादळी झाल्याने समुद्रात मास्यांची रापण टाकायला कुणी धजत नाही. त्यामुळे खाडीतल्या मास्यांची आवक वाढते.गुंजूले,शेतकं,काळूंद्री,सुळे असल्या चवदार मास्यांच्या “गाथनी” करून -माडाच्या झावळ्यातल्या हिराचा वापर करून मास्यांच्या गालफडातून तो हीर ओवून केलेली मास्यांची माळ- दारोदार कोळणी हे मासे विकायला येतात.
“गाथनी होयेत गेsss?”
असा बाहेरून ओरडलेला आवाज ऐकून, असेल तसं धांव्वत आईकडे जाऊन,
“आई,तिख्खट सूकं तिखलं कर गं! अशा पावसात खायला मजा येते बघ.”
अशी आईकडे केलेली विनवणी आई शिवाय कोण मान्य करणार?
”गे माय! इकडे आण बघू तुझ्या गाथनी”
असं बाहेर जाऊन कोळणीला ओरडून सांगायला आईच्या परवानगीची पण वाट पहावी लागत नव्हती.
दोन तीन गाथनी विकत घेऊन ते मासे स्वच्छ धुऊन चांगली मिठ मिरची लाऊन खोबर्‍याच्या रसात शिजवलेलं जाड चवदार तिखलं आणि जोंधळ्याची गरम गरम भाकरी,मग काय विचारता?
जिरेसाळ तांदळाच्या गरम गरम भाताला पण कोण विचारतोय? पण जर का फणसाच्या घोट्या घालून केलेली डाळीची आमटी असेल तर मात्र भात जेवायला मजाच मजा.

आता आई कुठे आहे? फक्त तिच्या आठवणी मात्र आहेत.मग एक दिवस ठरवलं ह्या पावसाळ्यात कोकणात जायचंच.पण कुणाकडे जाणार? मग लक्षात आलं की सावंतवाडी जवळ एका खेड्यात माझी एक बहिण राहायची.सांगायचं म्हणून मामेबहिण पण खरं तर ती सख्या बहिणी सारखीच होती.तिचं खरं नाव भाग्यश्री, पण आम्ही सर्व तिला लहानपणी “भित्रीभागू” म्हणायचो.

सावंतवाडीला सकाळीच आल्यावर,तडक मासळी बाजारात गेलो.वेंगुर्ल्याहून मासे घेऊन येणार्‍या गाड्या सकाळी नऊच्या दरम्यान येत्तात.तसाच माल बाजारात रवाना होतो.
बाहेर पाऊस फार पडत होता.मासे घेऊन भाग्यश्रीच्या घरी ती जेवण तयार करण्याच्या पूर्वी पोहोचेन किंवा कसं ह्याची उगाचच शंका मनात येत होती.पण रिक्षावाल्याने धीर दिला.
“तां आमकां लागलां.तुम्ही आमचे पावणे मां?,तुमच्या बहिणीकडे वेळेवर पोचल्यात म्हणजे झालां मां?”
इतकं आश्वासन मिळाल्यावर माझा “जीव “भाड्यांत पडला.

भाग्यश्रीचं घर मंगळोरी कौलांचं होतं.जवळपास पिंपळांची झाडं बरीच होती. घराच्या समोर त्यांच्या भातशेतीचे कुणगे होते.त्या पलिकडे उंच डोंगर होता. कोकणात भरपूर पाऊस पडत असल्याने “बोडके” डोंगर दिसणं कठीण.डोंगरावर आणि वरती सपाटीवर झाडांचं जंगल असल्याने,वाघ सिंह सोडल्यास रान-डुकरं, ससे,आणि रानटी पक्षी दिसायचे.
मला पाहून भाग्यश्री आश्चर्यचकीत झालीच आणि आनंदी ही झाली.
कारण मी तिला खूप वर्षांनी पहात होतो.
“किती वर्षांनी बाबा तुका आमची आठवण झालीs?ये ये ह्या पावसान गेले चार दिवस नुसतां धुमशाण घातला.”
मला पावसाने चिंब भिजलेला पाहून सहानुभूती देत ती मला म्हणाली.

“तुला भेटायला आणि ते सुद्धा ह्या पावसाळ्यात यायचं मी ठरवलं होतं.ही मास्यांची पिशवी घे.ह्यात सुळ्याच्या गाथनी आहेत.मस्तपैकी तिखलं कर बघू.”
असं म्हणून तिच्या घराच्या पडवीतून मी घरात आलो.
“गरम गरम चहा कर” असं मी म्हणताच म्हणाली.
“अरे ते काय सांगायला हवं? आधी तुझं ह्या टॉवेलने डोकं पूस,केस पूस असं म्हटलं असतं पण तुझ्या डोक्यावर केस कुठे दिसत नाहीत.” असं म्हणून हंसली.
“तुला हंसताना पाहून आणि तुझ्या गालावरची खळी पाहून आपल्या लहानपणाची आठवण आली.भित्रीभागू कुठली!”

असं मी म्हणताच मला म्हणाली,
“आता मी भित्रीभागू राहिली नाही.आता माझ्यात खूप फरक झाला आहे.
“तो कसा?” असं मी म्हणताच,
“तुला जर दुपारपर्यंत जेवण हवं असेल तर माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चल. आणि ह्या पाटावर बस.जेवण करता करता मी तुला माझी हकीकतथोडक्यात सांगते”
असं म्हणून माझ्या हातात पाट देत हातातली मास्याची पिशवी एका बाईकडे देत तिला म्हणाली,
“हे मासे नीट करून मला आणून दे”

गरम गरम चहाचा पेला माझ्या हातात देत म्हणाली,
“जीवन निर्भय असावं असं मला वाटतं.ज्या अनेक गोष्टी जीवनात असाव्यात असं आपल्याला वाटत असतं,त्यापैकी ही निर्भयता असावी यासाठी मी झटत असते.मी शक्यतो ह्या भया पासून दूरच असते.
खासकरून मी मृत्युला तशी घाबरत नाही.मला असं वाटतं आपल्या मृत्युनंतरही आपल्यासाठी काहीतरी राखून ठेवलेलं असावं. मला नक्की ते काय आहे हे माहित नाही पण तसं असावं असा माझा विचार सांगतो एव्हडंच. त्या पुर्वानुमानाचं मी पुर्वानुमान करते.आणि त्यासाठी योग यायची वाट पहात आहे. अर्थात सध्यातरी जगून खूप गोष्टी करायच्या आहेत म्हणा.एव्हडी काही मी म्हातारी झाली नाही.”
मी म्हणालो,
“हे स्थित्यंतर केव्हा पासून झालं.?प्रत्येक गोष्टीत तू भित असायची़स.”

“माझी स्वतःची ताकद आणि माझ्या मनातला भरवंसा हुडकून काढण्यापूर्वी, तसंच माझा माझ्या मनावर ताबा येण्यापूर्वी गेली वीसएक वर्षं मी भयभितीतच काढली.आणि त्याची उदाहरणं म्हणजे,अशा काही हास्यास्पद कल्पना,
जसं एखादं वादळ येऊन आमच्या घरासमोरचं पिंपळाचं झाड घरावर कोलमडून पडलं तर?,
माळ्यावर ठेवलीली पाण्याची टाकी फुटली तर?,
कोसळणार्‍या आणि न थांबणार्‍या पावसात आपली गाडी तुंबलेल्या पाण्यात अडकून पडल्यावर दरवाजे न उघडल्यास दरवाजाच्या काचा फोडाव्या लागल्या तर?
आणि त्यासाठी मी मोठा हातोडा पण गाडीत सहज मिळेल असा ठेवला होता.
भरपावसात घरून निघाल्यावर गाडी जवळच्या नाल्यात घसरून आत गेली तर?
अर्थात नाला काही एव्हडा खोल नव्हता की मी त्यात बुडणार होती.
पण ही माझी सर्व भिती काही तर्कसंगत नव्हती.

जग बुडती होईल म्हणून मी बरीच वर्ष काळजीत असायची.धान्याची आणि इतर गरजांची मी भरपूर सोय करून ठेवायची.कुणी चोर चिलटा येऊन घर लुटेल म्हणून शिवाय माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी म्हणून मी माझ्या नवर्‍याला सांगून लायसन्स काढून एक पिस्तुल पण त्याला ठेवायला सांगितलं होतं.
आमच्या घराच्या मागच्या परड्यात भाजी,मिरच्या,वगैरेची झाडं लावली होती.वीज गेली तर जेवायाला पंचाईत होऊ नये म्हणून मी जळावू लाकडांचा पण साठा करून ठेवला होता.”
मला हे ऐकून हंसू येतंय हे पाहून,मला भाग्यश्री पुढे म्हणाली,
“मी तुला आणखी काही गोष्टी सांगितल्या तर तू पोटभर हंसशील.”
मी भाग्यश्रीला विनोद करीत म्हणालो,
“नाही नाही माझं पोट मला तुझ्या मास्यांच्या जेवणाने भरायचं आहे. सांग तू पुढे.”

“मला आठवतं माझ्या नवर्‍याला आणखी एक टुमदार घर बांधायचं होतं आणि ते सुद्धा आमच्या समोरच्या शेतीच्या मळ्यांच्या पलिकडे दिसणार्‍या डोंगराच्या पायथ्याशी.पुन्हा माझी तर्कसंगती अशी होती की समजा मुसळधार पावसात डोंगरावरून दरड कोसळून आपल्या घरावर पडली तर?”
तिला मधेच थांबवीत मी म्हणालो,
“ह्यात काही तुझी चूक नाही.कोकणातला पाऊस इतका मुसळधार असतो की हा तुझा विचार मला पटतो.झाडांची मुळं कमकुवत झाली की माती अस्थीर होते आणि दरडपण कोसळते.पण असले हे भितीचेच विचार तुझ्या मनात येण्याचं कारण काय?”

“खरं म्हणजे माझ्या ह्या असल्याप्रकारच्या विचाराचं कारण माझ्या लहानपणी माझ्या एका लांबच्या मामाबरोबरची माझी संगत.माझा हा मामा माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा होता.कुठल्याही जोखमीबद्दल तो अतिशयोक्ति करून दाखवायचा, आणि कुठल्याही भयगंडाबद्दल माझं मन उकसायचं काम करायचा. त्यामुळे माझा त्याच्याशी नेहमीच वाद व्हायचा आणि मी भयभीत रहायची.
आता मला वाटतं अशा त्याच्या वागण्याने त्याला ते त्याच्या सुरक्षिततेच्या कारणाचं मूळ आहे असं वाटत असावं.खरं म्हणजे त्याला शिकारीची आवड होती. आमच्या डोंगरासमोरच्या जंगलात जाऊन लहानसहान प्राण्याची-ससा, कवडे, रानटी कबुतरं,आणि कधीकधी रानडुकरांच्या शिकारीला पण जायचा. स्वतःला संरक्षक समजायचा,सध्या असलेल्या समाजाचं एक ना एक दिवस पतन होणार आहे असं माथेफिरू सारखं उघड उघड मनोरथ करायाचा.इतर लोकाना सांगायचा की तो चुकीच्या शतकात जन्माला आला आहे. पुरूष पुरूषांसारखे वागायचे त्या शतकात जन्माला यायला हवं होतं अशी इच्छा दाखवायचा.
अशातर्‍हेने त्याला कुठच्याही गोष्टीची अतिशयोक्ति केल्या शिवाय राहवत नव्हतं आणि मला मात्र तो त्याचा नित्याचा डोस देत राहायचा. आणि त्यामुळे त्यातून त्याला जो आनंद व्ह्यायचा ते त्याला तो तसा आहे याचा आनंद होण्यासाठी व्हायचा.”
“मग तू एव्हडी धीट कशी आणि केव्हा झालीस?”
मी तिला विचारलं.

“ह्या अशा काळ्या सावल्यातून बाहेर पडायला मला बराच अवधी लागला. त्यानंतर मी कसल्याच आपत्तीबद्दल किंवा कसल्याच दुर्घटनेबद्दल विचार करायचं सोडून दिलं.आणि त्याचं मुख्य कारण माझा नवरा होता.मला समजावून सांगायला त्याला फार वेळ लागला तरी त्याची त्याबाबतची चिकाटी वाखणण्यासारखी होती.माझी मुलंपण मोठी झाली.त्यांच्याकडून आता मला समजावयाचा डोस मिळत गेला.

पण दुःखाची गोष्टी अशी की माझ्या मामाशी आम्ही प्रयत्न करूनही कुणी मुलगी लग्नच करीना. आमच्याकडून त्याला बर्‍याच मुली सांगून पाठवल्या.पण मुलींची मुलाखत घेताना सुद्धा,
“माझ्याशीच तुला लग्न करावं असं का वाटतं?तुला माझ्याही पेक्षा चांगला मुलगा भेटला नाही काय?”
असे विचित्र प्रश्न करायचा.मुलींचे बाप कपाळावर हात मारून निघून जायचे.
अलिकडेच मला कुणीतरी सांगितलं की त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने सध्या त्याच्यावर उपाय चालू आहेत.”

भाग्यश्री हे सांगताना थोडी भावूक झाली.मी विषय बदलावा म्हणून तिला म्हणालो,
“तू बोलता बोलता केव्हा जेवण केलंस ते कळलं नाही.पण ज्यावेळी तू मासे फोडणीला टाकलेस त्याचा आवाज ऐकून आणि फोडणीचा वास घेऊन मला परत लहानपणाची माझ्या आईची आठवण आली.
ताट-पाट घ्या रे,जेवण तयार आहे म्हणून ओरडून सांगायची”

बाहेर पाऊस धो धो पडत होता.दिवसाच काळोख झाल्याने भित्रीभागूने दिवे पेटवले. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढगानी आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला तिला मजबूर केलं. त्यातच विजांचा चमचमाट आणि विज पडल्यावर होणारा कानठिळ्य़ा बसणारा कडकडाट होत होता.मला खूप वर्षानी कोकणात आल्याचा आनंद झाला.
“गाथनी होयेत गे?”
असा उगाचच आवाज माझ्या कानात घुमत होता.
“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”
मला भाग्यश्री म्हणाली.

खरं सांगू,मला भाग्यश्री माझ्या आईच्या जागीच वाटली.
मी पडत्या फळाची आज्ञा कशी अव्हेर करीन?



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com