Friday, October 2, 2009

मनात आकांक्षा ठेऊन जगावं.

आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली.
मी वैद्यांना म्हणालो,
“प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं स्वतःला खास समजतात. ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?”
माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले,

“कोणी काही खास नसतो.उदाहरण म्हणून, रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री चापचापून साडी नेसलेली असली आणि ठुमकत ठुमकत चालत असेल तरी ती काही खास आहे असं म्हणता येत नाही.एखादा स्वतःला अगदी आदर्श समजणारा सुद्धा काही खास नसतो.पण कृपाकरून माझ्या म्हणण्याचा गैरसमज करून घेऊ नका.कुणीही दोषहीन नसतो,किंवा कुणाला स्वतःची खास शैली नसते किंवा कुणाला काही प्रतिभा नसते अशातला भाग नाही. अशा म्हणण्यावर माझा मुळीच विश्वास नाही.मला जरा विस्ताराने सांगू द्या.हा माझा प्रतिसाद त्या लोकांना उद्देशून आहे की जे,
“तुम्हाला काही कळत नाही”
असं म्हणून स्वतःला अलिप्त ठेवत असतात. कदाचीत असं म्हणणार्‍यापैकी तुम्ही ही असाल कबुल करा.कबूल करतो, मीही पण असेन.पण खरं सांगायचं तर प्रत्येकाला हे सगळं कळत असतं.”
हे ऐकून मी वैद्यांना म्हणालो,
“जरा विस्ताराने सांगितलंत तर बरं होईल.”
मला म्हणाले,
“असं बघा,एका स्थरावर प्रत्येकाला मृत्यु येणार,कुणाचं प्रेमभंग होणार,कुणाला जीवनात अपयश येणार हे माहित असतं कळतही असतं.प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला येत असणार,कुणी कधी चकित होऊन आनंदी होत असणार, अचानक जवळच्याची भेट होऊन कधी कुणी प्रसन्नही होत असणार. पण ह्या बाबी सामान्यपणे प्रस्थापित झालेल्या असतात.”
पुढे जाऊन मी म्हणालो,
“प्रत्येकाला कर्ज म्हणजे काय,भयभीती होणं म्हणजे काय आणि आजार म्हणजे काय असतो हे माहित असतं कळत असतं. व्यसनी कुणाला म्हणावं,कुरकुर करणारी सासू कशी असते हे पण प्रत्येकाला माहित असतं”
पण प्रश्न असा आहे वैद्य साहेब मग पुढे काय?”

वैद्य म्हणाले,
“समस्या अशी आहे की जे कोणी स्वतःला खास समजत असतात ते प्रत्येकातल्या ह्या सर्वसामान्य गोष्टी समजून घ्यायला अपयशी होतात.”
एव्हड्यात आम्ही तळ्यावर केव्हा आलो ते कळलंच नाही.एक चांगला बाक बघून त्यावर बसलो.आणि प्रि.वैद्य पुढे सांगू लागले,
“बसमधे तुमच्या समोर बसलेला तो अस्थव्यस्थ कपडे घातलेला माणूस कदाचीत प्रेमभंग झाल्याने काळजीत असेल.तुमच्या समोरच्या घरातलं चारजणांचं वरवर अगदी पर्फेक्ट आहे असं तुम्हाला वाटणारं कुटूंब, पण त्या कुटूंबातले आईवडील मुलांचं संगोपन करण्यात ह्या सदा बदलणार्‍या समाजात मेटाकुटीला येत असतील.तुम्हाला ही कदाचीत अशाच प्रकारच्या चिंता असण्याचा संभव आहे”
अजून माझ्या प्रश्नाला उत्तर न मिळाल्याने मी वैद्यांना परत विचारलं,
“मग पुढे काय”?
“सागतो,सांगतो तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आहे.”
असं म्हणत वैद्य पुढे म्हणाले,
ह्यातून एकमेकाची सहायता करण्याची वृत्ती आपण आणूं शकतो. या विविधतापूर्ण समाजातल्या उणीवां ज्या समानतेचा वाटेकरी होण्यास आणि भेदभावांना सामावून घेण्यात अडथळे आणतात त्या उणीवामधून निर्माण झालेली पोकळी भरायला आपण सुरवात करू शकतो..ह्यावरून एकमेकाशी संबंध प्रस्थापित कसे करायचे हे तुम्हाला माहित होऊ शकतं.”
हे ऐकून माझ्या मनात एक विचार आला.मी वैद्यांना म्हणालो,
“वैद्यसाहेब,हे तुमचं सर्व ऐकून माझ्या मनात एक प्रस्ताव सुचवावा असं आलं आहे.”
उठता उठता वैद्य म्हणाले,
“सांगा तुमचा प्रस्ताव.काळोख झाला आहे.घरी जाता जाता एकूया.”

“मला वाटतं,आकांक्षा ठेवून जीवन जगावं,लक्ष देऊन ऐकावं,उद्देश ठेवून शिकावं आणि हृदयात दयाळूपण विकसित करावा. पूर्वानुमान करून आणि संपर्क न ठेवून हे साध्य होणार नाही.बसमधल्या किंवा दुकानातल्या एखाद्या अनोळख्याशी बोलायला आपण संकोच करू नये.” असं मी सांगितल्यावर प्रि.वैद्य म्हणाले,

“तुम्ही अगदी माझ्या मनातलं सांगितलं.तुमच्या म्हणण्याचा विचार प्रत्येकाने करावा आणि प्रयत्न करण्याची हिम्मत करावी.”



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com