Wednesday, November 4, 2009

तांब्याचा पैसा.

“आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही.कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.”

आज बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर आले होते.त्यांना मध्यंतरी बरं नव्हतं. त्यांची गैरहजेरी मला जाणवायची.प्रि.वैद्य मधून मधून तळ्यावर भेटल्यावर त्यांची जागा ते भरून काढायचे.
मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“बरेच दिवस माझ्या मनात राहून गेलं होतं,आणि तुम्हाला तुमचं त्याबद्दलचं मत विचारायचं राहिलं होतं, ते म्हणजे नशिब अजमावण्याच्या माणसाच्या निरनीरळ्या तर्‍हांबद्दल.

आपण इकडे नेहमीच पाहतो जेव्हा लोक पार्कमधे येतात किंवा काही रम्य ठिकाणी फिरायला जातात,तेव्हा त्यांना जर का कुठे पाण्याच्या फवार्‍याचं कुंड दिसलं तर ते खिशातलं नाणं काढून-बहुदा तांब्याचं नाणं-मनात काही बडबडून त्या कुंडात टाकतात. का तर म्हणे,नशिब जागृत होतं.तुम्ही असं कधी आयुष्यात केलं आहे का भाऊसाहेब?”

प्रो.देसाई थोडे मिष्कील हंसून मला म्हणाले,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळतो त्यवेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.असा तांब्याचा पैसा दिसला तर मी तो कुठनही उचलतो. त्याच्यावर चिखल असला,त्याच्यावर कसला चिकट पदार्थ टाकलेला असला किंवा त्याच्यावर रात्री दारू पिऊन कुणीतरी टाकलेल्या बाटलीतल्या सांडलेल्या दारूचा वास असला तरी मला चालतो.मला त्याबद्दल काहीही वाटत नाही.मी त्यात कुणाची चोरी करतो असं समजत नाही. शिवाय मी स्वतः खेदजनक होऊनही तो पैसा उचलत नाही उलटपक्षी मी स्वतःला असं करण्यात धीट समजतो.”

“म्हणजे याचा अर्थ पूर्वी तुम्ही असं करीत नव्हता.कदाचीत त्यावेळी तुमचा त्यावर विश्वास नव्हता असं मी समजूं का?”
असा मी त्यांना प्रश्न केला.

“तसं म्हटलंत तरी चालेल.” प्रो.देसाई सांगू लागले.
“मी लहान असताना असं काही करीत नव्हतो.ज्यावेळी मी वीस वर्षाचा तरूण होतो त्यावेळी नक्कीच नाही.त्यावेळी मी ऐटबाज सूट चढवून दक्षिण मुंबईतल्या फोर्ट विभागात मोठया दिमाखाने रस्त्यावरून जाताना इतक्या खालच्या पातळीवर येऊन आणि ते सुद्धा इतकं खाली वाकून एखादा पैसा दिसला म्हणून उचलायचं लांछन मुळीच करीत नव्हतो. तेव्हा मला दुनिया मोत्याच्या तोलाची वाटायची.
एका तांब्याच्या पैशाची कुणाला त्या वयात कदर असावी.?ज्या वयात अवतीभोवतीची हवाच अशी असायची की तिच्यात कला आणि प्रसिद्धीचे मनसूबे, नशिब उजाडल्याचे झरोके,आणि मदमस्त सुगंधाने भरभरून आसमंतात फैलावलेली कुंद हवेची दरवळ यायची.”

मी म्हणालो,
“म्हणजे तरूणपणात असल्या गोष्टी करणं हास्यास्पद दिसतं असंच तुम्हाला म्हणायचं आहे असं वाटतं.”
“अगदी बरोबर,मला पुढे तेच सांगायचं होतं.
कुणी सर्वकाळ तरूण राहत नाही.अर्थात तरूण असताना कुणी हास्यास्पद आणि मामूली गोष्टी करतोच म्हणा जशा,चतुर्भुज होणं,मुलं होणं,उपनगरात एखादा फ्लॅट घेणं वगैरे.
एके काळी कुणीतरी तरूण वयात भडकदार कुंचल्याने रेखाटलेलं जसं एखादं रेखाचित्र दिसावं तसं दिसणारं ते तुमचे व्यक्तिचित्र नंतर हळूहळू तुम्ही जूळवून जळवून शिवलेल्या रंगीबेरंगी गोधडी सारखं दिसणारं, कुठे भडक रंगाचं तर कुठे विरलेल्या कपड्याचं जणू चित्रसंग्रह असलेलं तुमचं व्यक्तिचित्र दिसायला लागतं.”
भाऊसाहेबांनी आपल्या खुमासदार शैलीत वर्णन करून सांगितलं.

“म्हणजे उघड उघड तुम्हाला म्हणायचं आहे की वय होता होता व्यक्तिचित्रं बदललं की एखादा आपला दृढनिश्चयही बदलतो की काय?”
मी भाऊसाहेबांकडून जास्त स्पष्टीकरण मिळण्यासाठी त्यांना प्रश्न केला.
मला म्हणाले,
“जीवनातल्या एका टप्प्यात आकाशात पहाण्यासाठी तुम्ही तुमचं शीर उंचावता आणि तारे पाहून त्याकडे बोट दाखवून तुमच्या चिल्लापिल्लाना सुधारलेला माणूस बनवण्याच्या प्रयत्नात असता.
आणि तुम्हाला आवडो वा न आवडो तुमच्या त्या वयात तुमचा काही वेळ तुम्ही खाली जमिनीकडे पहाण्यात पण घालवता.आणि गंमत् म्हणजे ह्या ह्या गोष्टी तुमच्या नजरेतून सुटत नाहीत.

कुणी सांडलेलं दुध,कुणाची वांती,नेल पॉलीश,डोक्यातल्या पिना,फाटलेलं एखादं वर्तमानपत्र वगैरे वगैरे.”

“त्याचा अर्थ ह्या वयातही तांब्याचं नाणं तुमच्या नजरेतून सुटतं.किंवा दिसलं तरी ते उचलून घेण्याच्या मनस्थितीत तुम्ही नसतां.असं मी समजूं का?”
असा सरळ सरळ प्रश्न मी केला.

थोडासा विचार केल्यासारखं करून देसाई म्हणाले,
“ही पण आयुष्यातली पायरी चढून गेल्यानंतर हळू हळू तुमच्या विचारसरणीत फरक पडतो.
सरते शेवटी जेव्हा तुमचं शरिरच अंथरूणातून उठायला मज्जाव करतं.तुम्ही तरूण किंवा वयस्कर नोकर ठेवण्याच्या प्रयत्नात असता. पटत नाही म्हणून तुमचा जूना डॉक्टर बदलता,ज्योतिषाकडेही जाऊन येता आणि एकदिवशी काही कारण नसताना सकाळी उठून बाहेर रस्त्यावर येता.

रस्त्यावरून चालताना पाला पाचोळा आणि त्यावर पडलेला कचरा दिसत असतो. आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही. कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.

त्यानंतर मात्र तुम्हाला विचारांची गणना करण्यासारखं विशेष काही नसतं.एखाद दिवशी तुम्ही मोठ्या उत्साहाने अंथरूणातून उठता,एखाद दिवस तुमचा पाळलेला पपी ओरडून ओरडून बाहेर नेण्याचा इशारा करतो.
अजूनही तुम्ही आकाशाकडे बघून मदतीची आकांक्षा ठेवता,आणि खाली जमिनीकडेही बारकाईने बघून जीवनात,आशा,आणि प्रेमाच्या अपेक्षेत असता. अपेक्षीत असलेल्या घटनांचक्राबद्दल सांत्वन करून घेण्याच्या मनस्थितीबद्दल तुम्ही शिकत असता,तसंच, अनपेक्षीत ठिकाणी गेल्याने त्यातून मिळणार्‍या आनंदाशीही उत्सुक्त असता. मिळेल तेव्हडं नशिब उजळून यावं ह्याची तुम्हाला जरूरी भासते. आणि म्हणून एखादा तांब्याचा पैसा दिसला की तुम्ही तो उचलता.तुमच्या खिशात ठेवता.आणि मनात एखादी प्रार्थनाही करता. म्हणून मी तुम्हाला सुरवातीला म्हणालो की,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळातो त्यावेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.”
उठतां,उठतां मी प्रो.देसायाना म्हणालो,
“आज वेळ खूप मजेत गेला.भाऊसाहेब आपण बरेच दिवसानी तळ्यावर फिरायला आला.पण पहिल्याच दिवशी आपल्याकडून “तांब्याच्या पैशाबद्दल” माझी शंका दूर केलीत.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com