Saturday, November 21, 2009

माझी दोन मतीमंद भावंडं.

“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे उघडपणे आणि निडर होऊन.”

आमच्या बिल्डींगच्या मागे जी बिल्डींग होती त्याच्या दुसर्‍या मजल्यावर भांगले कुटूंब रहात होतं.श्री.भांगले दक्षिण मुंबईतल्या एका कॉलेजात प्रोफेसर होते.गणीत विषय शिकवायचे.
त्यांना तीन मुलं होती.मोठा उमेश लहानपणापासूनच वडलांसारखा फार हुशार होता. मात्र भांगल्यांचं एक दुःख होतं की त्यांची नंतरची दोन्ही मुलं एक मुलगा आणि एक मुलगी जन्मताच मतीमंद होती.
जशी मुलं मोठी होऊ लागली तशी भांगल्यांना घरात जास्त वेळ देण्याची आवशक्यता भासू लागली.म्हणून त्यांनी कॉलेजमधला आपला जॉब सोडून घरीच शाळकरी मुलांना शिकवायला क्लासीस काढले होते.गणीत आणि विज्ञान ते शिकवायचे.

नंतर नंतर शिकणार्‍या मुलांची संख्या वाढू लागली ते पाहून जवळच्या एका बिल्डींगचा एक मजलाच भाड्याने घेऊन ते तिकडे शिकवायला लागले. परत तिथे ही त्यांनी आणखी शिक्षक ठेवून निरनीराळे विषय शिकवायचे वर्ग काढले. भांगल्यांचं जोरात चाललं होतं.नंतर माझा आणि त्यांचा बरीच वर्ष संपर्क कमी झाला होता.
अलीकडे त्या बिल्डींगच्या खालून जाताना वर मान करून पाहिल्यावर भांगले क्लासीस ऐवजी दुसराच बोर्ड मी पाहिला.वर जाऊन चौकशी केल्यावर कळलं भांगले आता लोखंडवाला कॉप्लेक्स मधे राहायला गेले होते आणि त्यांनी क्लासीस दुसर्‍यांना चालवायला दिले होते.

मी एक दिवस त्यांचा पत्ता काढीत लोखंडवाला कॉप्लेक्स मधे गेलो होतो.बेल दाबल्यावर त्यांचा मोठा मुलगा उमेशच दार उघडायला आला.त्याने मला ओळखलं, मी मात्र तो उमेश असेल असा अंदाज केला.बहुतेक त्याचं एव्हाना लग्न झालं असावं. दोन लहान मुलं आत खेळताना दिसली.मला उमेशने आत बसायला सांगितलं. चौकशी केल्यावर मला कळलं की त्याचे आईवडील निर्वतले होते.त्याची बहिण आणि भाऊ गुजराथ जवळ एका गावात राहात् होते.ते तिकडे मतीमंद मुलांच्या एका संस्थेत कामाला असतात.त्या दोघानी तिकडेच धंदे शिक्षण घेऊन तिकडेच रहात होते.उमेश मधून मधून त्याच्याकडे जाऊन येऊन त्यांच्या चौकशीत असतो.

गप्पा मारताना मी उमेशला म्हणालो,
“जरी प्रत्येक माणसाचा अनुभव निरनीराळा असला तरी मला वाटतं प्रत्येक माणसाच्या अनुभवाचा आशय जास्त करून एक सारखाच असतो. जीवनात प्रत्येकजण रोज कष्ट काढीत असतो,संघर्ष करीत असतो.आणि जीवनात सर्वजण एकलेपणाच्या वेदना कधी ना कधी सहन करीत असतात. तसं पाहिलं तर प्रत्येकजण जर का मोका मिळाला तर आपला चांगुलपणा दाखवायला उत्सुक्त असतो.”

भांगले कुटूंबाला मी बरीच वर्ष ओळखत असल्याने त्याची कहाणी ऐकून मी माझा प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने असं म्हणालो.

हे ऐकून उमेश म्हणाला,
“परंतु, माझा समज आहे की माणूस जेव्हा दुसर्‍याला दयाळु्पणा दाखवतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या मनाला लागलेले घाव भरून काढण्याच्या तो प्रयत्नात असतो.”

उमेशच्या आईवडीलांची झालेली हानी आणि दोन भावंडांची त्याच्यावर पडलेली जबाबदारी ह्याच्या संदर्भाने त्याने असं म्हटलं असावं असं मी गृहित धरलं.

उमेश मला पुढे म्हणाला,
“आम्ही तीन भावडं आहो.पण दुर्दैवाने माझी बहिण आणि भाऊ दोघंही मतीमंद होऊन जन्माला आली.ही एक आमच्या कुटूंबातली आनुवंशीक कमतरता आहे.ती त्यांच्या नशिबी आली असावी. जीवनातल्या प्रत्येक विकासात्मक पातळीवर त्यांचा विकास होण्यात त्यांना विलंब लागायचा.आणि म्हणूनच रोजच्या शारिरीक गरजा भागवण्यासाठी त्यांना कुणाची ना कुणाची गरज भासायची.त्या दोघानीही आपल्या आपणच आश्चर्यजनक सामाजीक कुशलता आणि वयक्तिक पसंती स्वतःसाठी म्हणून विकसीत केली.चटका लावण्यासारख्या विनोदी वृत्तीत राहून मलाच त्यांनी जीवनातल्या माणूसकीबद्दल दुसर्‍या कुठल्याही सूत्राकडून मिळण्याअगोदर उदाहरणं घालून दिली. त्यांची ती उदाहरणं अपरिपक्व आणि छाननी न केलेली असली तरी जास्त माणूसकीला धरून होती.
मला वाटतं आपल्यातले बरेच जण रोजच्याच वयक्तीत बेबनावामूळे स्वतःच स्वतःला इतरापासून विलग करतात..माझ्या ह्या दोन्ही भावंडानी मला दाखवून दिलं की, आपलं कुटूंब स्पष्टरुपाने इतरांपेक्षा जरा भिन्न आहे.आम्ही निर्णय घ्यायला कमजोर आहोत.आणि त्यांना वाटायचं की मी एकदम कुणाची हजेरी घेऊ नये.उद्धट दिसेल असं बोलूं नये.”

उमेश किती विचारी झाला आहे हे बघून मला त्याच्या परिस्थितीची किंव आली. वडलांच्या सतत छायेत राहिलेला मी त्याला लहानपणी पाहिलं होतं. त्याच्या अपंग भावंडाविषयी त्याचे आदराचे उद्गार ऐकून मला त्याच्या वडलांची आठवण आली. त्यानी आपली कॉलेजातली करियर सोडून मुलांसाठी कष्टप्रय जीवन काढलं हे त्यांचे संस्कार ह्या मुलात उतरल्याचं मला जाणवलं.
मी त्याला म्हणालो,
“कष्ट करून जीवन जगणं हा मनुष्याच्या जीवनाच्या अनुभवातला एक मुख्य मुद्दा आहे.आणि काही प्रमाणात आपणा सर्वांना हा मुद्दा जाणवतही असावा.ही सर्वसाधारण व्यथा आपण सर्व समजू शकतो.
हे जर माझं म्हणणं खरं असेल -आणि मला ते खरं असावं असं ही वाटतं-मग त्याचा अर्थ असा होईल की मी सर्वांशी चांगली वागणूक ठेवून राहिलं पाहिजे कारण एकमेकाकडून आपण त्या चांगल्या वागणूकीचीच अपेक्षा करीत असतो.”
“हे आपलं म्हणणं एक मौल्यवान नियम म्हणून उचित दिसेल.”
असा शेरा मारून उमेश म्हणाला,
“म्हणजेच मला म्हणायचं आहे की, एकमेकाचं मन जर दुखावलं जात असेल-अर्थात मला ठाऊक आहे की मी दुखवला गेलो की मला कसं वाटतं ते- तर मग चांगली वागणूक ठेवणं हेच जास्त स्वाभाविक आहे.आपल्याच वयक्तिक व्यथा आपल्याला जगात पुढे येण्यापासून दूर ठेवतात.त्यामुळेच आपण आपल्यालाच सगळ्या जगापासून लांब ठेल्यासारखं राहून स्वतःला बंदिस्त करून ठेवतो.

माझ्या दोन्ही भावंडाकडे मात्र लोकांना आकृष्ट करून घेण्याचं कौशल्य होतं.माझा भाऊ आणि बहिण अनोळख्याच्या प्रतिरोधाचा पडदाफाश करताना अगदी भोळेपणा आणून त्या अनोळख्याच्या कष्टी दिसत असलेल्या मनाशी बोलण्याच्या प्रयत्नात असतात.हंसून,खरंच स्वारस्य आहे असं दाखवून, स्वतःचीच ओळख करून देऊन,निडर राहून त्यांच्याशी दोस्ती करण्याच्या प्रयत्नात असताना मी त्यांना पाहिलं आहे.त्यांनी मला दाखवून दिलं आहे की अगदी मुलतः आपण सर्व दयाळूपणाच्या मुल्यालाच प्रतिसाद देत असतो.”

“किती रे मोठ्या विद्वान अनुभवी माणसासरखा बोलतोस.मला हे तुझं बोलणं ऐकून एक विचार सुचतो”
असं म्हणत मी त्याला पुढे म्हणालो,
“एकदा मला असं वाटतं की दुसर्‍याशी संबंध ठेवायला जेव्हा आपण मागेपुढे करतो तेव्हा त्याचं मुख्य कारण कदाचीत दुसर्‍याने जर का आपल्याला अव्हेरलं तर आपण मूर्ख भासले जावू ह्या भितीपोटी असावं.पण मला कधी कधी असंही वाटतं की आपण सर्वांशी स्नेहशील राहाण्याची संधी मिळण्याची वाट पहात असतो कारण आपल्याला वाटत असतं की त्यामुळे आपला चांगुलपणा दिसून येईल.”
आपल्या भावंडांची आठवण काढून उमेश मला म्हणाला,
”कुणाला आवडणार नाहीत असं त्यांच्याच मनात येऊन ते कष्टी झाल्याचे मी माझ्या दोन्ही भावंडाना कधीही पाहिलं नाही.काही तरी आनंदाचं घडेल अशी मनोवृत्ती ठेवून ते वागतात.आणि त्यांचा हा यत्न क्वचीतच असफल झालेला मी पाहिला आहे.

जे लोक त्यांच्याशी बोलूं इच्छीत नसण्याच्या प्रयत्नात असावेत अशा लोकांकडून दयाळुपणाची परतफेड व्हावी पण ती परतफेड उपहास होण्यात किंवा अस्विकरण होण्यात येणारी जोखिम न घेता व्हावी अशा प्रयत्नात माझी भावंडं असायची.आणि ती सुद्धा अशा माणूसकी असलेल्या जगात जिथे दयाळुपणाच्या लेन-देनबद्दलच्या उपयुक्ततेला जोर दिला जात नसायचा.तसं पाहिलंत तर लोक पण प्रतिसाद द्यायचे.एखादी अनोळखी व्यक्ती त्यांच्या मैत्रीत असा्वी असं समजणं हे योग्य आहे असं त्यांना नेहमीच वाटतं.”

मी उमेशला म्हणालो,
”मला वाटतं स्वतःला वाटणार्‍या वास्तविकतेबद्दल निर्धारक रहाणं आणि निष्कर्षाला येणं ही एक प्रकिया आहे.अशी प्रकिया की रोजच्या रोज तिचा बोध होण्यासाठी आपली धडपड असते,कधी कधी ही प्रक्रिया दाह दायी असते,कधी कधी ही प्रक्रिया एकमेकाशी संबन्धीत असताना कसं सहानुभूतिपूर्वक असावं हे शिकवून जाते.
अवतीभवती असलेल्या एव्हड्या क्लेषदायी लोकांच्या गराड्यात,आणि ह्या कोलाहल असलेल्या जगात दयाशिलतेला आणि स्नेहभावाला महत्व असणं अस्थायी नाही. खरं तर आजुबाजुच्या लोकांपासून दूर रहाणं म्हणजे आपण नुकसानीत जाणं असं म्हणावं लागेल.”

आपल्या भावंडांची आठवण येऊन उमेश डोळ्यात पाणी आणून म्हणाला,
“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम असण्याचा संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे, उघडपणे आणि निडर होऊन..”

“तुमच्या आईवडीलांचे चांगले संस्कार तुम्हा भावंडावर झाले आहेत हे उघडच आहे”
असं म्हणून मी उमेशला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटली.







श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com