Monday, November 2, 2009

केला मी तर प्रारंभ पिण्या

(अनुवाद. मैने पिना सिख लिया….)

माझा मित्र वसंत फार पुर्वी पासून पितोय.वहिनीचं खूप प्रेशर आलं की मग काही दिवस प्यायचं सोडून देतो.आणि त्याचं हे असंच चालंय.परत कधीतरी प्यायला सुरवात करतो.बिचारी वहिनी मात्र ही त्याची संवय पाहून हिरमुसली होते.मला तिची किंव येते.त्या पलिकडे मी तरी काय करणार?अलीकडे त्याला कंटाळून वहिनी माहेरी जाऊन राहिली आहे.
योगायोग म्हणजे काल,
”मैने पिना सिख लिया…”
हे गाणं मी रेडियोवर ऐकलं.ताबडतोब त्याचा अनुवाद करून वसंताकडे गेलो.त्याला ही कविता वाचून दाखवली.आणि म्हणालो,
“तुम्हा लोकांचं हे असं चालतं.आणि दोष मात्र दुसर्‍याला देता.”

“शुद्धीवर नसल्यावर हे लोक खरं तेच सांगतात”
असं मी कुठेतरी वाचलं होतं.
कविता ऐकून झाल्यावर वसंता फक्त हंसला.मी समजायचं ते समजलो.



पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

लाखो मधली एक छबी
नयनी माझ्या येऊनी बसली
एक कळी जशी सहज फुलली
भ्रमराला ती कशी घाबरली

फुलले एक फुल प्रीतिचे
मिळाले सूर एक गीताचे
दैव आणीते रंग नवे
सूर सुटता गीत सरे

मध्य भोवरा तूच सोडीला
मम प्रीतिचा अनुबंध तोडीला
प्रेमावरी कुणी प्रहार केला
देवा,देवा
कठीण झाले आम्हा जगायला

मदिरे कडूनी साथ मिळवूनी
शिकलो आम्ही तुजविण जगण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

म्हणती इतर का पितोस बरे
म्हणते मन का जगतोस बरे
जगण्यात नसे मला अभिलाषा
मरण्यात दिसेना एकही दिशा

जीवन झाले व्यथा इथे
सांग तयाला उपाय कुठे
प्रीत आठवूनी पिणे धरीले
शुद्ध हरपूनी दुखणे कसले

लक्ष आमुचे आम्ही शो्धिले
दैव आम्हावरी का बरे रुसले
सजणी मजला गेली सोडूनी
हृदय तुटले ठोकर खाऊनी

अशाच नशेच्या ह्या धाग्याने
शिकलो आता हृदय शिवण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com