Wednesday, November 18, 2009

मला निस्तब्धता का आवडते.

“माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.”

माझ्या अनुभवानुसार मला गोव्याचे लोक बरेचसे देवभोळे वाटतात.इकडे असलेल्या चर्चाच्या आणि मंदिरांच्या संख्येवरून त्याची कल्पना येते.
मग किरीस्तांव लोकांची निरनीराळी चर्च असोत,किंवा हिंदू लोकांची देवळं असोत. वर्षभरात बरेच उत्सव असतात.देवांच्या मंदिराबरोबर देवींची पण बरीच मंदिरं आहेत. किरीस्तांवांचा नाताळ हा मोठा सण.शिवाय लहान मोठे उत्सव असतातच. मुंबईत वांद्र्याला जसा मथमाऊलीचा उत्सव असतो तसा इथे गोव्यालापण मेरीचा उत्सव असतो.
गणपतीच्या,दत्ताच्या,शंकराच्या,पुर्वसाच्या मंदिराबरोबर शांतादुर्गाच्या, मंगेशी, म्हाळसादेवीच्या मंदिरापर्यंत अनेक मंदिराना भेट द्यायला अनेक लोक उत्सुक्त असतात.
मी गोव्याला आल्यावर ह्या सर्व मंदिराना भेट दिल्याशिवाय रहात नाही.त्या शिवाय मी चर्चाना पण भेट देतो.विशेषकरून खेडेगावातली चर्चं खूपच शांत वातावरणात भासतात.

ह्यावेळी माझा एक मित्र गिरीश बोरकर ह्याला भेटायला त्याच्या घरी खूप दिवसानी गेलो होतो. पेडण्याजवळ एका छोट्या खेड्यात तो रहात आहे.पूर्वी पेडण्याहून ह्या खेड्यात पायी चालत जावं लागायचं. पण आता रस्ते झाल्याने रिक्षेने पण जाता येतं.एकदा ह्या गावात पोहोचल्यावर गजबजाट,गोंगाट म्हणजे काय असतो ते विसरायला होतं.पायवाटेवरून चालत जाताना पायाखालची सुकलेली पानं चिरडली गेल्यामुळे होणारा आवाज पण कधी कधी गोंगाट वाटावा एव्ह्डी शांतता इथे भासते.
गिरीशच्या घरी दोन दिवस राहिल्यानंतर ह्या शांततेविषयी बोलल्याशिवाय मला रहावलं नाही. मी गिरीशला गप्पा मारताना म्हणालो,
“इकडची शांताता बघून माझी खात्री झाली आहे की इकडचे लोक बहिरे नक्कीच नसणार.कारण शहरात राहून गोंगाट कानावर पडून बरेच लोक काही प्रमाणात बहिरे झाल्याचं माझ्या एका कान-नाक-गळा स्पेशालीस्ट डॉक्टर मित्राने मला आंकडेवारी देऊन दाखवलं आहे.
त्यामुळे तू इथे रहातोस,म्हणून सुखी आहेस.कारण त्या गोंगाटातून सुटलास बाबा!”

गिरीशला माझ्या बोलण्याचा अर्थ कळला.पण त्याच्या डोक्यात काही निराळाच विचार आला असावा.मी म्हणतो त्या शांततेच्या पलिकडे जाऊन त्याला काही तरी सांगायचं मनात आलं.
मला म्हणाला,
“मला निस्तब्धता आवडते.
याचा अर्थ जिथे मुळीच कसलाच आवाज नाही ती निस्तब्धता नव्हे.
ती निस्तब्धता की जी मला माझ्या आजुबाजूच्या जगावर लक्ष न ठेवता मी माझ्या आतल्या आवाजाकडे जास्त ध्यान देऊ शकतो.”
मी ह्यावर त्याला म्हणालो,
“तुझं काय?,तुझा इथे पूरा जन्मच गेला आहे.त्यामुळे तुझ्या ह्याबाबतीत अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.मी तुला त्याबद्दल दोष देत नाही.शहरातलेआम्ही इथल्या ह्या शांततेच तृप्त असणार.”

गिरीश अगदी मनापासून हंसला आणि म्हणाला,
“मी अगदी लहान असताना माझी खेळायची जागा म्हणजे आमच्या गणपतीच्या मंदिराचं बाहेरचं पटांगण. रस्त्याच्या पलीकडे आमच्या गावातली मोठी शाळा होती. त्या गणपती मंदिरात माझे वडिल पुजारी होते.आणि आम्ही देवळाच्या आवारातच रहात होतो.
मला अजून आठवतं माझी लहानशी तिनचाकी सायकल होती.आणि मी मंदिराच्या पटांगणाबाहेर जाणार्‍या डांबरी रस्त्यावर चालवीत असायचो.तेव्हारस्त्यावर गाड्यांची तेवढी वरदळ नसायची.
माझी लपायची जागा मला अजून आठवते.गणपतीच्या गाभार्‍याच्या मागे एक लहानशी अडगळीची खोली होती. त्या खोलीवर एक माळा होता.कोळयाची जाळी आणि सरपटणार्‍या पाली शिवाय त्यावर काहीच नसायचं. माळ्यावर एक छोटीशी खिडकी होती.खिडकीला नक्षीकाम केलेले लाकडाचे लहानसेच गज होते.सकाळीच सूर्योदयानंतर कोवळी किरणं त्यातून आत यायची त्यावेळीच काय तो प्रकाश यायचा.कोळ्याची जाळी चमकूनदिसायची. मी ह्या खोलीत एकांतात बसून असायचो. त्या खोलीतली ती थंड निस्तब्धता मला अजून आठवते.त्या खोलीत बसल्यावर जीवन जगत आहे असं वाटायचं.”

मी म्हणालो,
“माझ्या अनुभवानुसार आपलं जग अगदी कर्णकटू झालं आहे असं मला वाटतं.हे जग पूर्ण गोंगाटाने भरलं आहे.समाजातून येणारा गोंगाट आहे, गाड्यांचा, बस्सीचा, टीव्हीचा,लाऊड स्पिकर्सचा,इकडे तिकडे खेळणार्‍या लहान मुलांचा,धर्माच्या नावाखाली केलेल्या आरडा-ओरडीचा मग त्यात तो मशीदीतून असेल किंवा मंदिरातून येणारा घंटानादाचा असेल.मी जिथे वाढलो त्या वातावरणातल्या समाजातून येणारा हा गोंगाट मला एकवेळी मी जीवन कसं जगायचं ह्याचा आदेश द्यायचा. त्यानेच नियम निर्माण केले होते.ह्या समाजाच्या ताबेदार लोकांच्या आवाजात मी वाढलो होतो.म्हणून इकडे आल्यावर इथल्या शांततेचं महत्व चांगलंच माझ्या लक्षात आलं.तुझी गोष्ट मात्र निराळी आहे.पण ह्या निस्तब्धतेबद्दल तू जे काय म्हणतोस ते तुझ्याकडून ऐकावं असं वाटतं.”

“मला आठवतं त्यावेळी मी पंचवीसएक वर्षाचा असेन.माझे बाबा म्रुत्युपंथाला लागले होते.त्या दिवसात मला त्या अडगळीच्या खोलीतल्या निस्तब्धते मधली क्षमता पुन्हा लक्षात आली.मी त्यांच्या बिछान्याजवळ बसून अगणीत रात्री काढल्या होत्या.त्यांच्या तोंडून येणारा आवाज निर्मळ होता,.मला जीवनात खंबीर राहायला त्यांनी शिकवलं,लहान मोठा गोंगाट कसा ओळखायचा ते दाखवलं त्यामुळे त्याकडे कसं दुर्लक्ष करायचा ते त्यांच्याकडून शिकलो.त्यांच्या मृत्युमुळे गोंगाट हा प्रकारच माझ्यापासून दूर केला गेला.आणि असा परिसर निर्माण झाला की निस्तब्धता फुलली आणि फोफावली.”
एव्हडं सांगून झाल्यावर गिरीश जरा गंभिर होऊन मला म्हणाला,
“माझ्यावर तुझा विश्वास बसणार नाही.कदाचीत तू मला हे ऐकून मनात हंसशील.
माझ्या वडलांची गैरहजेरी मला खूप जाणवायला लागली.आणि त्या निस्तब्धतेत- कदाचीत मी पाच वयाच्या असल्यानंतर पहिल्याच वेळी- मी माझा आतला आवाज ऐकला. माझी मुल्यं काय असावीत ते त्या आतल्या आवाजाने मला सांगितलं. माझ्या कमतरता दाखवून माझं अंगातलं बळ त्या आतल्या आवाजाने प्रज्वलीत केलं.मी कोण आहे ते माझ्या आतल्या आवाजाने मला दाखवून दिलं.मी जीवन कसं जगायचं ह्याची स्पष्ट कल्पना दिली.त्या निस्तब्धतेत मी माझा खरा आवाज ओळखू शकलो.आणि असं झाल्यावर गोंगाट हा प्रकारच नाहिसा झाला.”
गिरीशच्या मनातलं हे चिंतन ऐकून मला कुठेतरी वाचल्याचं आठवलं.
मी त्याला म्हणालो,
“मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं,आपल्या प्रत्येकाच्या देहात एक “व्यक्ती” असावी. त्या व्यक्तीचा आतला आवाज ऐकण्याची प्रत्येकाला जरूरी भासत असावी.हा विश्वातला गोंगाट मनुष्याची हत्या करीत आहे.मनुष्याच्या आतल्या आवाजाची दमछाक करीत आहे.आणि मानवतेच्या सामर्थ्याला सीमित करीत आहे.ज्या विपत्ति विरुद्ध मनुष्य प्रयास करीत आहे त्या प्रयासाला हा गोंगाट अविरत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.”
“अगदी माझ्या मनातलं तू सांगितलंस.”
असं म्हणून गिरीश सांगू लागला,
“माझ्या बाबांच्या मृत्युनंतर कित्येक वर्षं रोज मी ह्या,निस्तब्धतेकडे ध्यान देण्याच्या प्रयत्नात असतो.
आमच्या घराच्या मागे माडा-पोफळीच्या बनात मी माझ्या मुलीचा हात हातात घेऊन फेरफकटा मारीत असताना ही निस्तब्धता मला गवसते.माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.माझं जीवन त्यानी कसं सुधारलं ते मी तिला सांगतो.
तू जर इथे कायम राहायला आलास तर ही निस्तब्धता काय आहे ते तुलाही कळेल.”
मी गिरीशला एव्हडंच म्हणालो,
“शहरातल्या गोंगाटापेक्षा इकडची शांतता मला नक्कीच आवडेल.”



श्रीकृष्ण सामंत.