Thursday, November 12, 2009

अज्ञात असण्यातली क्षमता.

“एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”

मी आमच्या बिल्डींग मधून खाली उतरत जात होतो.आणि अरूण-आमचा शेजारी-वर येत होता.मी घाईत असल्याने त्याच्याशी फक्त हंसलो.का कुणास ठाऊक दोन पायर्‍या वर जाऊन मागे वळून अरूण मला म्हणाला,
“काका,तुमचं काम झाल्यावर घरी परत येताना माझ्या घरी या.मी तुम्हाला गरम गरम कॉफी करून ठेवतो.तुमच्याशी काही चर्चा करायची आज मला हूक्की आली आहे.”
इतकं काय माझ्याशी हा बोलणार आहे असा मी विचार करीत खाली उतरताना त्याला म्हणालो,
“माझं बॅन्केत काम आहे.अर्धा तास लागेल.त्यानंतर मी येतो.”
“नक्की वाट बघतो”
असं म्हणून अरूण वर गेला.

मी त्याच्या घरी गेल्यावर माझ्या हातात कॉफीचा कप देत अरूण मला म्हणाला,
“तुम्ही मघाशी माझ्याशी नुसते हंसला,त्या हंसण्याने मला माझ्या जुन्या आठवणी भरकन डोक्यात आल्या.तेव्हा तुम्हाला लागलीच सांगून टाकलं की आपण चर्चा करूंया”

विषयाची प्रस्तावना करीत अरूण सांगू लागला,
“जे मला माहित नाही,म्हणजेच जे मला ज्ञात नाही त्याच्या क्षमतेवर माझा दृढविश्वास आहे.
माझं उभं जीवन मी प्रकाशाच्या वेगाच्या उपयोगतेबद्दल ज्ञात न रहाता काढलं आहे. माझ्या विज्ञानाच्या प्राध्यापकाने त्याशिवाय आणखी काही शिकवलं असेलही त्याच्या उपयोगतेशिवाय मी जगलो आहे.
अर्थात त्यांच्या वर्गात मला मिळत गेलेले गुण हीच त्यांनी शिकवलेलं मला ज्ञात नसल्याची स्पष्ट साक्ष आहे.
ज्या गोष्टी मनुष्याला तत्वतः अज्ञात असतात त्या गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.”

हे ऐकून मी अरूणला म्हणालो,
“अशा अनेक मोठ्या अज्ञात गोष्टी आहेत जशा,
ईश्वराचं अस्तित्व असणं किंवा नसणं,
मनुष्याच्या अस्तित्वाची अर्थ न समजणं,
जीवनात दुःखाची भुमिका काय?,
असल्या गोष्टीबद्दल तुला काही तरी म्हणायचं आहे काय?”
असा मी सरळ प्रश्न अरूणला केला.

“नाही मुळीच नाही.अगदी लहान लहान अज्ञात गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.
एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”
असं म्हणाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग हे आजच का तुला आठवलं.? आणि ते सुद्धा आत्ताच?”

“त्याचं काय झालं,”
अरूण सांगू लागला,
“मघाशी जिन्यात तुम्ही माझ्याशी फक्त हंसला.त्याने मला एक जूनी आठवण आली.
एकदा सकाळी भाजी बाजारात गेलो असताना भाजी विकणार्‍या बाईशी मी हंसलो आणि तीपण माझ्याकडे बघून हंसली. त्या हंसण्याचा तिच्यावर दिवसाच्या शेवटी काय परिणाम झाला हे मला माहित नाही.मला आशा होती काही तरी व्हावं.मला आशा होती की ते आमचं हंसणं तिने दुसर्‍या गिर्‍हाईकाला पारित केलं असावं, पासऑन केलं असावं.आणि कदाचीत त्याने ते एखाद्या वयस्कर माणसाला रस्ता ओलांडून जाण्यात मदत करणार्‍या तिसर्‍याला, ती मदत करताना पाहून त्याच्याशी हंसून पारित केलं असावं. आणि बिल्डींगचा जिना वर चढून जाताना त्या वयस्कर माणसाने आपल्या शेजार्‍याला पाहून त्याच्याशी हंसून सांगितलं असावं,
” ये कधी तरी कॉफी प्यायला.”
आणि नंतर कधीतरी कॉफीच्या कपावर जीवनातल्या सुखदुःखावर त्यांचं बोलणंही झालं असावं.हंसण्याच्या दूरवरच्या परिणामा विषयी मी त्यावेळी एव्हडा ज्ञात नव्हतो.”

मी म्हणालो,
“अरूण, तुझ्या कल्पना-शक्तीची ही उंच भरारी असावी काय?की कदाचीत तुला शक्तिशाली होण्याची तीव्र अभिलाषा तर नसावी?.मला काहीच कळत नाही.की कदाचीत ज्ञात नसल्याच्या क्षमतेतलं हे रहस्य तर नसावं.तुझ्या अंगात जी काही दयाशीलता आहे ती नकळत पारित करण्याची हळहळ तर नसेल ना?”

अरूण म्हणाला,
“हे असं व्हायला मला बराच काळ घालवावा लागला.ज्ञात नसलेल्या गोष्टीतली क्षमता कळायला मला बरीच वर्ष घालवावी लागली.तत्पुर्वी आरामातलं आयुष्य घालवणं,रोज जेवणाची थाळी माझ्या पुढ्यात येणं,कधी ही कसल्याही गोष्टीपासून वंचीत न होणं,खरोखरचं उपाशी न रहाणं,किंवा कधीही कष्टप्रद न होणं.अशी माझी परिस्थिती होती.

जसं वय होत गेलं तसं जीवन मला कळलं.हे असं सर्वांना होत असावं.मित्र दुरावले जावे,कुटूंबात हानी व्हावी,मला आणि माझ्या प्रियजनाना कठीण प्रसंग यावेत आणि जावेत.
प्रौढ वयात असताना सर्वसाधारण माणूस भोगतो तसे आनंदाचे आणि विपत्तीचे दिवस मी भोगले आहेत.आणि त्यानंतरच ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेचा मी विचार करू लागलो.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे,मला मुल झालं.ह्या जगात मुलाला जन्म देण्याने जीवनात सर्व तर्‍हेचा बदलाव आणला जातो. हे प्रत्येक पालकाला माहितआहे.
परंतु,ज्यावर मी अंतःकरणापासून आणि परिपूर्ण प्रेम करतो त्याच्यासाठी आशावादी राहून आणि प्रयत्न करून कसं झालं तरी माझ्या मुलासाठी हे जग अधिकांश चांगलं ठेवताना ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेने माझे डोळे उघडले.”

मी म्हणालो,
“ज्ञात नसणं हे काही इतकं महत्वाचं नाही.ज्ञात नसतानाही अगदी अल्पशी दयाशिलता पारित करण्यात,अगदी छोटीशी खूशी पारित करण्यात त्याच्यात असलेल्या क्षमतेचं अस्तित्व पाहून मला गंमत वाटते.”
“अगदी बरोबर”
अरूण एकदम खूश होऊन म्हणाला,
“म्हणूनच मी तुमच्याशी लगेचच चर्चा करायचं ठरवलं.
आता मला असं वाटायला लागलं आहे की,आशा ठेवण्यात असलेली जादू आणि त्याचं रहस्य,आणि जी आशा मला पूर्ण ज्ञात नसतानाही ती बाळगण्यात मी नेहमी प्रवृत्त असल्याने हे जीवन आज तरी थोडसं चांगलं वाटायला लागलं आहे.”

कॉफीचा रिकामा कप त्याच्या हातात देत मी हंसत हंसत अरूणला म्हणालो,
“हरएक दिवशी एक गोड स्मित,एक दयेचा शब्द,एक हात हलवून केलेला प्रेमाचा इशारा त्यात भर घालत असतो.आणि ह्या लहानश्या गोष्टीचे परिणाम ज्ञात नसतानाही तुझ्या नकळत हे जग तुझ्यासाठी सुंदर करण्यात तू कारणीभूत होत आहेस.”

अरूणचा चेहरा प्रफुल्लीत व्हायला मी एक अज्ञात गोष्ट करण्यात कारणीभूत झालो हे त्याला कळायला वेळ लागला नाही.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com