Wednesday, November 25, 2009

अजून स्वीट-डीश यायची आहे

“हे बघ, असे जगात कितीतरी लठ्ठ लोक आहेत.प्राप्त परिस्थिती स्विकार करून किंवा अन्य उपाय असतील तर ते करून पुढे जाणं हेच जास्त योग्य आहे.तुला नाही का वाटत?”



अलीकडे तळ्य़ावर लवकर काळोख पडतो.आणि त्यासाठी लवकर निघालं की चमचमीत उन्ह्यात निघावं लागतं.म्हणून मी जरा उशीराच निघालो.मला वाटलं होतं की प्रो.देसाई माझ्या अगोदर येऊन बसले असतील.पण कसलं काय.?
काळोख व्हायला लागल्यावर उठून जायला निघालो.चार पावलं गेल्यावर,
“काका,काका”
अशी हांक ऐकायला आली.मागे वळून पाहिल्यावर तो प्रो.देसायांचा नातू विजय, नक्कीच असणार ह्याची खात्री झाली.आणि त्याच्याबरोबर एकजण होता.जरा थांबलो.
“कुठे चालला काका? जरा बसा”
असं म्हणत त्याने आपल्या मित्राची ओळख करून देत म्हटलं,
“हा माझा मित्र,संजय पोतदार.तो त्याच्या आजोबांची गोष्ट सांगत होता.मी त्याला म्हटलं तुम्हाला पण ऐकायला आवडेल.”
“हो मला ऐकायला नक्कीच आवडेल.बसूया पाहिजे तर “
मी असं म्हटलं आणि आम्ही परत त्या बाकावर येऊन बसलो.
संजय मला म्हणाला,
“काका माझी गोष्ट नक्कीच तुम्हाला स्वारस्यमय वाटेल.कारण ती नुसतीच गोष्ट नसून त्यात माझ्या मनातली व्यथा पण आहे”



प्रो.देसायांचा नातु बरेच वेळां आपल्या आजोबाबद्दल मला सांगत असतो.तक्रार म्हणून नव्हे तर दोघांच्या विचारसरणीत असलेला फरक दाखवण्यासाठी चर्चा करण्यासाठी सांगत असतो.तसाच काही तरी संजयचा सांगण्याचा प्रकार असेल असं गृहीत धरून मी संजयाला म्हणालो,
“बाबारे,प्रो,देसायांना मी चांगलाच ओळखतो.तुझ्या आजोबांशी माझा काही परिचय नाही.त्यामुळे तू जे काय सांगशील ते एकतर्फी होईल.म्हणजेच मी काही माझं मत देऊ शकणार नाही.बरोबर ना?”



“काका,तुम्ही मला मत देण्यासाठी किंवा माझ्यात आणि माझ्या आजोबात असलेल्या विचारसरणीत फरक वगैरे आहे हे सांगण्यासाठी हे मी सांगत नाही.”
असं संजय मला म्हणाला.
“उलट माझे आजोबा मला आपल्या मित्रासारखे वागवतात.जसा जमाना बदलतो तसं माणसाने बदललं पाहिजे अशा विचाराचे माझे आजोबा आहेत.”
असं त्याने मला पुढे जावून सांगीतलं.
“असं असेल तर मला तुझी गोष्ट आणि व्यथा ऐकाला जरूर स्वारस्य आहे”
असं मी संजयला प्रोत्साहन देत सांगीतलं.विजयच्या चेहर्‍यावर मला छुपं स्मित दिसलं.



“माझी आई आणि माझे आजोबा एकमेकाशी पत्रव्यवहार करण्यात खूप उत्सुक्त असायचे.अलीकडे मी आजोबांच्या कपाटात त्या पत्रांची थप्पी पाहिली होती. आजोबांची परवानगी घेऊनच मी त्यांच्या कडून पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता दाखवली होती.माझ्या आजोबानी मला हंसत हंसत मान्यता दिली.”
संजय सांगू लागला.
“ह्या अनेक पत्रातून एक पत्र मी जरा वेगळं करून ठेवलं होतं.ते मला नीट वाचावं असं वाटलं.
गावातल्या एका म्हातार्‍या आजीची गोष्ट त्यात होती.आजोबा आईला लिहीतात.
“आपल्या इथे गावात एक पार्वतीआजी म्हणून बाई होती ते तुला ठाऊक असेलेच. होती म्हणण्याचं माझं कारण आता ती नाही.दोन दिवसापूर्वी ती निर्वतली.तिची खासियत अशी की तीला गावात कुणीही कुणाच्याही घरात कसला समारंभ असला की जेवायला बोलवायचे.आणि ती आजी पण अगदी आनंदाने जायची.तीची एक जगावेगळी संवय होती की तीच्याबरोबर एक चांदीचा चमचा न विसरता ती घेऊन जायची.सहाजीकच जेवण संपल्यावर एखादी स्विट- डीश असायची.तीचा आस्वाद घ्यायला आजीला खूप आवडायचं.आणि ते सुद्धा तिच्याच चांदीच्या चमच्यातून.
“जेवण पूर्ण संपलं नाही.अजून स्वीट-डीश यायची आहे.”
असं यजमानानी म्हटल्यावर आजी आपला चमचा सर्सावून बाहेर काढून ठेवायची.सुग्रास जेवण झाल्यावर काहीतरी आणखी चांगली गोष्ट चाखायची आहे हा त्याचा अर्थ असायचा.”
पुढे आजोबा आईला लिहीतात,
“त्या आजीने आपली शेवटची इच्छा आपल्या मुलांना आणि नातवंडाना सांगून ठेवली होती.ती ही की,
“माझ्या बरोबर हा माझा चांदीचा चमचा माझ्या अंतीमकार्याला न्या.माझ्याबरोबर त्याला जावूदे.”
पत्र वाचून झाल्यावर त्यावेळी माझ्या मनात विचार आला की प्रत्येकाने अशा कल्पनेला चिकटून राहिलं पाहिजे की शेवटी काही तरी चांगलं होत असतं.जसं जेवणार नंतर स्वीट-डीश.”



संजयचं एव्हडं ऐकून झाल्यावर मी मनात म्हटलं खरंच स्वारस्य घेण्यासारखं हा काही तरी सांगत आहे.थोडा काळोख झाला तरी हरकत नाही. ह्या दोघाना माझ्या घरापर्यंत सोबत घेऊन जाईन.



पुढे संजय म्हणाला,
“नेहमी मी मला स्वतःला निराश किंवा असा-तसाच आहे असं समजतो. सकाळी उठल्यावर मी नेहमीच आशा करीत असतो की ज्या काही अडचणी, रुकावटी मी माझ्या मार्गात पेरल्या आहेत त्यातून मुक्त होईन.तसं माझं जीवन छान आहे.मी एका प्रेमळ कुटूंबातला आहे. मला चांगली नोकरी आहे. तसंच माझं भवितव्य पण उज्वल आहे.”



“मग तू कशाबद्दल एव्हडं दुःख करतो्स?”
मी थोडा उतावीळ होऊन संजयला विचारलं.
“मी माझ्या पायावर आहे.पण माझी विशिष्ठता जरा विशेष आहे.हे, मी म्हणत नाही किंवा मी ठरवलेलं नाही.मला तसं सांगीतलं गेलंय. शिवाय मला सांगीतलं गेलंय की बर्‍याचश्या माझ्या आयुष्यात पाहिलं तर ते खरं आहे.पण माझ्या ह्या विशिष्ठतेमुळे मला मित्र जोडता येत नाहीत.जास्तकरून मी माझ्या जीवनात एकटाच असतो.आणि सगळ्यांत घृणा करण्यासारखी गोष्ट म्हणजे मला एकलकोंडं रहायला मुळीच आवडत नाही.
माणसाला परस्पर संबंध ठेवायला नेहमीच आवडत असतं.आपण कुणाला तरी हवं हवं असं वाटलं पाहिजे.कुणी तरी आपल्याशी प्रेमळ असायला हवं असं त्याला वाटत असतं.आपण कुणाच्यातरी जरूरीत असलेलं असावं असं वाटत असतं. मला सुद्धा तसंच वाटतं.”



विजयला रहावेना तो म्हणाला,
“अरे संजय पण त्या स्वीट-डीशचं आणि चांदीच्या चमच्याचा संबध कुठे येतो.?”
माझ्याही मनात तोच प्रश्न आला होता.
तेव्हा संजय म्हणाला,
“जरा ऐकायला विक्षिप्त वाटेल पण माझ्या आयुष्यात ती स्वीट-डीश आणि चांदीचा चमचा अंतर्भूत झाला आहे.त्याचं कारण माझं व्यक्तीमत्व तसं वजनदार आहे. खरंतर मला स्पष्ट शबदात सांगायचं झालं तर मी शरीराने स्थुल आहे,लठ्ठ आहे. आणि हे तुम्ही पहाताच आहां.पण त्या शब्दांची मी घृणा करतो.ते शब्द उच्चारल्यावर किंवा कानावर पडल्यावर मला कसंसच होतं.आणि त्याहूनही जास्त जेव्हा मला कुणी तसं संबोधून हांक मारतं तेव्हा तर नक्कीच कसंस वाटतं.”
मला संजयची किंव आली मी त्याला म्हणालो,
“हे बघ, असे जगात कितीतरी लठ्ठ लोक आहेत.प्राप्त परिस्थिती स्विकार करून किंवा अन्य उपाय असतील तर ते करून पुढे जाणं हेच जास्त योग्य आहे.तुला नाही का वाटत?”



“मी लठ्ठ आहे ही कल्पना माझ्या मनाच्या आड येत नाही.पण ज्यावेळी इतर जेव्हा माझ्या लठ्ठपणाची काळजी दाखवण्याचा अविर्भाव करतात ते मला नको असतं.जसा आहे तसाच त्या माझ्या शरीराचा मी स्विकार करीत असतो.पण एक मला नक्की वाटतं की इतरानी पण मी जसा आहे तसा मला स्विकारलं पाहिजे.”
संजय सद्गदीत होऊन म्हणाला.



“लठ्ठ आणि सुखी” ह्या वाकप्रचाराचा अविष्कार कुणीच माझ्या वयातल्यानी स्विकारला नव्हता.कारण माझ्या ह्या जगात मला असं दिसून येतं की सुखी असणं आणि स्विकारलं जाणं हे त्या लोकानी बनविलेल्या सांचात फिट्ट बसलं गेलं पाहिजे.त्या सांच्यातली मी अचूक व्यक्ती असं समजलं गेलं पाहिजे.पण मी मात्र त्या सांच्यात फिट बसत नाही.हे असं, आपल्या हृदयापासून किंवा मनापासून सांगून काय उपयोग नाही,काही खरं नाही.दुसर्‍या कशाचाच विचार न करता फक्त तुमच्याच बद्दल तुम्ही विचार करणं हे जरा कमी लेखलं जातं.”



संजयची समजूत घालण्याच्या विचाराने मी त्याला म्हणालो,
“हे बघ संजय,ज्या गोष्टीवर आपला दृढविश्वास आहे त्यावर विचार करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.आपल्यासाठी जर का दुसरे विचार करीत असतील तर मग ते त्यांना करू देत. तसं करणं हे त्यांना सोपं नाही काय?
तुझ्यात दोष आहे माझ्यात दोष आहे,ज्या जगात आपण रहातो त्या जगात दोष आहे.”



तळ्यावर कळोख खूपच झाला होता.उठता उठता संजय जे म्हणाला ते ऐकून मी खूपच सद्गदीत झालो.
” काका,तरी पण मी तो चांदीचा चमचा हातात घट्ट धरून आहे.पार्वतीआजी जशी स्वीट-डीशची वाट बघत असायची,तशीच माझ्या हातात ती चांदीची धातु पकडून मी एव्हडीच वाट बघत आहे की त्यानंतर काहीतरी चांगलं घडेल.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com