Saturday, May 15, 2010

बगीच्याची क्षमता.

“दुःखाची भरपाई करण्याच्या बगीच्यातल्या क्षमतेमुळे आपल्या जवळचं माणूस आपल्या हृदयात सामावून ठेवता येतं हे मला विशेष जाणवतं.”

“माझे आजोबा सत्तर वर्षाचे असताना जेव्हा एकाएकी गेल्याचं मी ऐकलं,तेव्हा,माझ्या मनाला एव्हडा धक्का बसला की ती परिस्थिति स्वीकारायला माझं मन तयारच होईना.आणखी त्यात भर म्हणजे गेले कित्येक महिने मी त्यांना भेटू शकलो नव्हतो.”

प्रमोद मला आपल्या आजोबांच्या जाण्याने त्याची झालेली हानी आणि त्यांची भेट घेऊ शकला नाही ह्याचा त्याला होणारा पश्चाताप समजावून सांगत होता.
हे सगळं बोलणं, मी जेव्हा त्याच्या नव्याने बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात कोकणात गेलो होतो त्यावेळी मला ऐकायला मिळालं.

त्याचं असं झालं,प्रमोदचं लहानपण,त्याचं शिक्षण सर्वकाही त्याच्या आजोळी झालं.नंतर लग्न झाल्यावर तो शहरात नोकरीसाठी आला.आणि अधुनमधून आजोळी जायचा.नंतर नंतर कामाच्या व्यापामुळे त्याला त्याच्या आजोबांना नियमीतपणे भेटायला जमेना.
पण अजोबांनी बांधलं तसं एक घर कोकणात बांधायचं आणि निवृत्त झाल्यावर त्या घरात जाऊन रहायचं हे त्याचं स्वपनं होतं.ते त्याने आता प्रत्यक्षात आणून त्या घराची वास्तुशांती करत होता.

मी त्याचं घर आणि आजुबाजूचा परिसर फिरून पाहिला.घराच्या मागे आणि सभोवती त्याने खूपच सुंदर फुलांचा बगीचा केला होता.त्या बगीच्याबद्दल मी त्याला विचारलं.

मला म्हणाला,
“दम्याच्या आजाराने आजोबांची प्रकृति इतकी क्षीण झाली होती की त्यांच्या अंगावर मांसच कुठे दिसत नव्हतं. त्यांचं जाणं इतकं अनिवार्य होतं जीतकं उन्हाळा,पावसाळा वाटावा तसं. परंतु,माझ्या मनाला चांगलाच धक्का बसला होता.

त्यांनी आणि माझ्या आजीने मिळून घराच्या सभोवताली इतकी सुंदर बाग विकसित केली होती की येणारे जाणारे थोडावेळ थांबून रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलं बघून वाः! म्हटल्या शिवाय पुढे जात नव्हते.
नाना तर्‍हेची फुलझाडं होती.गुलाब-निरनीराळ्या जातीचे आणि रंगाचे,मोगरा,चाफा-अनेक जातीचा,साईलीचे वेल,केवड्याची झुडपं किती सांगावं?.
पडवीत खूर्ची टाकून बसल्यावर संध्याकाळच्या वार्‍याच्या झुळकीबरोबर एकनाएक फुलांच्या सुगंधाची दरवळ नाकावर आल्याशिवाय चुकायची नाही.

गळून पडलेल्या फुलांच्या पाकळ्या वेचताना,झुडपांची काटछाट केल्यावर पडलेल्या फांद्या उचलताना,गवताची तृणं उचकून काढताना,आणि अनेक प्रकारे,मी लहान असताना माझ्या आजोबांना,मदत करताना,
“या आमच्या नातवाला मदत करा.मी तुम्हाला थोडा व्यायाम करायला देईन”
असं म्हणून आजोबा बाग-बघ्यांची छेडखानी करीत असत.ते पाहून मी थोडा लाजायचो.त्याची मला अजून आठवण आहे.”

“तुझ्या आजोबांवर तुझं किती प्रेम होतं हे तुझ्या ह्या बारीकसारीक गोष्टी तू लक्षात ठेवल्या आहेस ते बघून लक्षात येतं.”
मी प्रमोदला म्हणालो.

“माझे आजोबा बागेत उभे असतानाची त्यांची प्रतिमा माझ्या हृदयात मी ठेव म्हणून जोपासली आहे.ते त्यांच्या वरखाली असलेल्या दातांच्या रांगेतून केलेलं मिष्किल हास्य,त्यांच्या जाड चष्म्याच्या भिंगातून दिसणारी ती त्यांची बेरकी नजर, पानवेलीवरून काढलेल्या ताज्या पानात काथ घालून केलेला विडा खाल्याने झालेलं लाल तोंड मधनूच हलवून करतानाचं ते चरबटणं, खादी-ग्रामोद्यकातून आणलेला जास्तित जास्त जाड्भजरी असलेला आणि एखाद दुसरी गुंडी काजातून बळेच सुटलेला तो त्यांचा नेहरूशर्ट,कोकणातल्या तांबड्या मातीमुळे धुऊन धुऊन स्वच्छ केला तरी तांबडट दिसणारा कमरेवरचा तो त्यांचा पंचा,ही हुबेहूब छबी मी कशी विसरेन.”
प्रमोद अगदी तल्लिन होऊन मला सांगत होता.

“त्यांच्या जाण्याने आणि त्यानंतरच्या तुझ्यावर झालेल्या त्यांच्या जाण्याच्या (दुःखी)परिणामाने,तुझी बागेवरची श्रद्धा आणि मानसिक जखमेची भरपाई करण्याची त्या श्रद्धेची क्षमता तुझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसवायला मदत झालेली मला दिसत आहे.”
प्रमोदने तेव्हड्याच तत्परतेने त्याच्या नव्या घराचा परिसर सुशोभित केलेला पाहून प्रमोदची शिफारस करावी म्हणून मी असं म्हणालो.

मला प्रमोद म्हणाला,
“पैशाच्या रूपाने फारसा नसलेला,पण त्यांच्या जीवनातल्या प्रचंड त्यागाच्या रूपाने मिळालेला वारसा माझे आजोबा मला मागे ठेवून गेले. ही वारश्याची ठेव आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी बॅन्केत ठेवणं जरा चुकीचं वाटायाला लागलं. त्यापेक्षा त्यांना कदाचीत जिथे हवं होतं त्या बागेत झाडं रुजवायचं आम्ही ठरवलं.आम्ही नव्याने बांधलेल्या घराच्या मागच्या परड्यात ढोपरभर उंच रानटी गवत वाढलेलं होतं.आणि त्या परड्याच्या मागे उंचच उंच पिंपळाची आणि चिंचेची झाडं होती.त्या परड्यात ही ठेव रूजवायचं आम्ही ठरवलं.”

“हे सर्व करायला तुला खूप मेहनत घ्यावी लागली असेल.”
मी प्रमोद्ला म्हणालो.

“खूप दिवसांची नव्हेतर खूप महिन्यांची मेहनत करावी लागली. अजूनही काम पुरं झालेलं नाही.मी शहरातून बरेच वेळा इकडे येत असतो.आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना पण घेऊन येतो. उन्हाळ्याच्या मोसमात एखाद्या संध्याकाळी, जाईचा सुगंध वार्‍यात दरवळतो.माझी लहान मुलं फुलझाडांच्या गर्दीतून वाट काढून बोवाळत असतात.एखादं नवीन रोपटं शोधून काढतात.फुलांचा नवीन बहर पाहून आनंदी होतात.
“बाबा,या इकडे बघा,आम्हाला काय दिसलं ते!”
असं म्हणून माझा हात ओढत ओढत त्या ठिकाणी घेउन जातात.”
प्रमोद मला सांगत होता.आणि मधेच जरा थांबून आणखी काहीतरी आजोबांबद्दल सांगावसं त्याला वाटलं असावं.

“हे सांगत असताना परत मला आजोबांची आठवण आली.”
असं म्हणून मला सांगायला लागला.
“माझे आजोबा करायचे तसं मी मुलांना त्यांचे डोळे मिटायला सांगून केवड्याच्या झुडपाकडे नेऊन त्या केवड्याच्या पिवळ्या फुलांचा सुगंध घ्यायला सांगतो.ही केवड्याची फुलं मला त्यांची आठवण प्रकर्षाने करून देतात.”

“तुम्हाला त्यांचा एक किस्सा सांगतो”
प्रमोद पुढे सांगू लागला,
“एकदा,घाणेरीच्या फुलांच्या झुडपाखाली असलेला आणि रुतून बसला असल्याने उचकून वर घ्यायला किंचीत परिश्रम देणारा एक काळा दगड त्यानीच वर काढल्यावर,
“हे! हे बघा काय मिळालं! ह्या दगडाच्या सर्व बाजूनी भू-छत्र्या (अळमी) उगवली आहेत.रात्री भाजी करूंया! छान! छान!”
असं ओरडून सांगणारे माझे आजोबा मला बागेत दिसतात.
कुड्याच्या विडीचं थोटूक नाम मात्र ओठात धरून नव्याने आकार घेणार्‍या बागेत धुडगूस घालून कुदणार्‍या माझ्या बरोबरीच्या मुलांकडे पाहून एका कोपर्‍यात उभे असलेले माझे आजोबा बागेला संबोधून म्हणायचे,
“बघा,बघा माझी बेबी हळू हळू मोठी होत आहे!”

“किती रे,प्रेम करतोस तुझ्या आजोबावर.तू विकसीत केलेली ही बाग बघायला तुझे आजोबा जीवंत असते तर त्यानी नक्कीच तुला आपल्या छातीजवळ कवटाळून घेतलं असतं.”
माझं हे बोलणं ऐकून प्रमोद बराच भाऊक झाला.

“माझ्या आजोबांमुळे,आजोबांवरच्या प्रेमामुळे विकसीत झालेल्या ह्या बागेत मी वावरत असताना माझं जीवन त्यातून प्रतिबिंबीत होतं.प्रत्येक नव्याने येणार्‍या मोसमाचा मी कृतज्ञ असतो.माझ्या आजोबांचे ते विचित्र विनोद, खसखसून हंसणं आणि त्यांच्या डोळ्यातली चमक ह्या पासून होणारं दुरावलेपण मला जाणवत असतं.दुःखाची भरपाई करण्याच्या बगीच्यातल्या क्षमतेमुळे आपल्या जवळचं माणूस आपल्या हृदयात सामावून ठेवता येतं हे मला विशेष जाणवतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com