Monday, May 10, 2010

वंदनाची यमूताई.

वंदना,काल माझ्या घरी आली होती.तिची मोठी बहीण यमूताई,बरीच आजारी आहे हे सांगायला आली होती.मला ते ऐकून धक्काच बसला.यमूचं तेव्हडं काही वय झालं नव्हतं.

वंदना मला म्हणाली,
“अलीकडेच ताईने मला बोलावून घेतलं.मला म्हणाली,
“किमोथेरपी करायचं मी सोडून दिलं आहे”.
आणि पुढे माझी ताई मला हंसत हंसत म्हणाली,
“मी नेहमीच म्हणत होते की मला आईचा विसरभोळेपणा येईल.पण त्या ऐवजी हा कर्क रोग कसा झाला कळेना.”

श्रीयुत आणि श्रीमति वालावलकरांना चार मुलं आहेत.मोठी यमुना.
वालावलकर निवृत्त होऊन लगेचच गेले.यमुची आई त्यानंतर बरेच दिवस राहिली.पण बिचारीला उतारवयात विसरभोळेपणाचा व्याधी झाला होता.

मुलांनी तिची खूप सेवा केली.पण त्यातच ती गेली.
माझा आणि वालावलकर कुटूंबाचा चांगलाच स्नेह होता.काही झालं की, त्यांच्याकडून कोण ना कोण मला सांगायला यायची.

मी वंदनाला म्हणालो,
“मला वाटतं,बहीणी,बहीणीमधे खास दुवा असतो.तुझ्या नशीबाने तुला दोन बहीणी आणि एक भाऊ आहे.तुम्हाला तुमची माती माहित आहे.आणि तुमची मुळंही समान आहेत.वाटलं तर,चांगलं किंवा वाईट म्हण, उन्हाळा असो वा पावसाळा तुम्ही भावंडं एकमेकाला समजून उमजून असतां.”

माझं हे ऐकून,आपल्या मोठ्या बहीणीची, यमूनेची, आठवण येऊन वंदना मला म्हणाली,
“माझी मोठी बहीण यमूताई सोळा वर्षांची होती जेव्हा माझा जन्म झाला.मी ऐकलं की माझी आई माझ्या वेळी गरोदर आहे हे ऐकून त्यावेळी ती थोडीशी नाखूष होती.आणि त्यावेळी तिची खात्री नव्हती की ती माझ्या बरोबर प्रत्येक वेळी माझ्यात सहभाग घेईल.पण जशी माझी यमूताई दिसते आहे तशी पाहिल्यावर तिने माझ्या बरोबर सहभाग न घेण्याचं सोडूनच द्या,माझ्यावर केलं तितकं तिने कुणावरही प्रेम केलं नसेल.मी म्हणेन असं प्रेम फक्त मोठीच बहीण करूं शकते.”

पूर्वीच्या आठवणी येऊन मी वंदनाला म्हणालो,
“मला आठवतं,तुझ्या ताईचं लग्न झाल्यावर ती तुमच्यापासून फार दूर रहायला गेली.तू त्यावेळी जेमतेम बारा वर्षांची असशील.तरीपण तुमच्या आणि तिच्या घरामधल्या “डोंगर-दर्‍या” ओलांडून तुम्ही एकमेकाला वर्षातून एकदा तरी भेटत असायचा हे मी पाहिलं आहे.”

वंदनाला त्यांच्या भेटी आठवून आणखी सांगावं असं वाटलं,
” आमच्या वार्षीक भेटी पहाटे,पहाटे पर्यंत गप्पा मारण्यात,भाजेलेल्या भूईमुगाच्या शेंगा सोलून खाण्यात गेल्या आहेत. कुटूंबात येणार्‍या कटकटी आम्ही एकमेकात कुजबुजत असताना,एकमेकाच्या संपत आलेल्या वाक्याची नकळत पुनरूक्ती करण्यात गेली आहे.”

“तुझी आई आजारी झाल्यानंतर तुझी यमूताई तुम्हा भावंडांना आईसारखीच वाटत असावी”
मी वंदनाला म्हणालो.

“माझ्या यमूताईकडे परत परत कतीदा तरी मी माझ्या जीवनातल्या अडचणी,माझे विचार आणि माझे आनंदाचे क्षण घेऊन जायची.”
वंदना म्हणाली.आणि सांगू लागली,
“माझं लग्न होण्याच्या बेतात असताना,माझं कुणावर प्रेम होतं,आणि नंतर मी कुणाशी लग्न करायला तयार झाले आहे ते पण मी तिला सांगीतलं आहे.माझ्या मुलांना घ्यावे लागणारे परिश्रम आणि त्यांच्या जीवनातल्या कटकटीत मी माझ्या ताईला सहभागी करून घेतलं आहे.आमचे बाबा गेल्यावर पाच एक वर्षांनतंर आमच्या आईला उतार वयात आलेला विसरभोळेपणा आणि त्यासाठी आम्हाला काढाव्या लागणार्‍या मानसिक प्रयासाबद्दल तिला चिंता वाटायची.
आमच्या दोघांतलं हंसणं बरेच वेळा आमच्या नवर्‍यांना गोंधळात टाकायचं.आम्ही दोघं घरासमोरच्या अंगणात बसून तासन-तास गप्पा मारताना वेलची मिश्रीत दुधाची कॉफी पीत पीत म्हणायचो रोज असं करायला शक्य होईल तर किती आनंद होईल.”

“तुझी यमूताई खरोखरच प्रेमळ आहे.माझ्याशी बोलताना तिच्या प्रेमळ स्वभावाची मला प्रचिती यायची.आपला संसार संभाळून तुम्हा भावंडांबद्दल ती नेहमीच आस्था दाखवायची.आईच्या प्रकृतिबद्दल काळजी करीत बसायची.”
मी यमुनेबद्दलचं माझं मत वंदनाला सांगत होतो.

“झाडापेडात फिरायला,राजकारणावर बोलायला,आणि आमच्या आईच्या हातून केलेल्या निरनीराळ्या पदार्थाबद्दल,विशेष करून आईने केलेल्या डाळीच्याआमटीबद्दल आम्ही एकमताने सहभागी व्हायचो.आमची आई विसरभोळेपणाच्या आजाराशी दोनहात करून शेवटी गेली.”
आईची आठवण येऊन वंदना थोडी भाऊक झाली.

मी म्हणालो,
“मला आठवतं मी तुझे बाबा हयात असताना तुझ्या घरी केव्हाही आलो तरी तुझी ताई तुझ्या आईला आराम करायला सांगून आपण काम करायची. मला वाटतं यमुनेला तुझ्या आईच्या आजाराची अंधूक अशी कल्पना येत असावी.पण ती कुणाला बोलून दाखवत नसायची.”

वंदना म्हणाली,
“माझ्या यमूताईबरोबर मी आमच्या आईच्या व्याधीवर खूप चर्चा केली होती.त्यापासून होणारे क्लेश आणि त्यातून होणारा अंत ह्यावरही चर्चा केली.
काही झालं तरी हीच व्याधी आपल्यातल्या कुणाला झाल्यास आपण एकमेकाची काळजी घेऊच,असं एकमेकात पक्क ठरवलं होतं.कारण आम्हाला खात्री होती त्या व्याधीपासून आमची सुटका नव्हती.
यमूताई माझी जीवश्च-कंटश्च मैत्रीणही आहे आणि बहीणही आहे. तिने मला कांटा न लागता कर्ली हा मासा कसा खायचा,कच्च्या फणसाची-कुयर्‍याची-भाजी कशी करायची पासून अपराध करणार्‍या कुणालाही माफ कसं करायचं हे शिकवलं आहे.ति्ची ज्यावर श्रद्धा आहे त्याला ती चिकटून असते.आणि तसं करताना न डगमगता, सहजसुंदरतेने आणि आपल्या ढंगात करते.तिच्या जीवनात ती आवेशपूर्वक राहून आणि अनुभव घेत घेत जगत आहे.
आता तिला गर्भाशयाचा कर्क रोग झाला आहे.रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात तिच्या हाडात पसरला आहे.”

“तुम्ही सर्व तुमच्या ताईला वरचेवर भेट देत असाल.कारण हा रोग वाढायला लागला की झपाट्याने वाढतो.मला तू सांगीतलंस ते बरं झालं.मी लवकरात लवकर तिला भेटतो.”
मी वंदनाला म्हणालो.

“माझ्या भावंडांबरोबर तिच्या घरी आम्ही खूपदा जात असतो.जे काही तिने आपल्या जीवनात मिळवलं त्यात तिला आपल्या मुलांबद्दल जास्त अभिमान आहे.मी तिचा हात हातात घेतला आहे. चमच्याचमच्याने आईस्क्रीम घेऊन तिला भरवून तिला झोप आलेली पाहिली आहे.जून्या आठवणी काढून हंसलो आणि रडलोही आहोत.ती शरपंजरी होत असतानाही तिच्या अंगातली ताकद पाहून मला अचंबा वाटतो.”
वंदना सांगत होती.

“आता जे होणार आहे ते चूकणार नाही.आधूनीक औषोधोपचाराने चमत्कार घडवले आहेत.आपल्याला नेहमीच सांगीतलं जातं की योग्य अशा सकस आणि पौष्टीक आहाराने आणि नियमीत व्यायामाने दीर्घायुष्य मिळतं आणि निरोगी स्वास्थ्य मिळतं.”
मी वंदनाला धीर येण्यासाठी म्हणालो.

वंदना म्हणाली,
“पण आमची यमूताई हे सांगायला साक्ष झाली आहे की,
“होणारे न चुके.”
म्हणजेच आपल्या हातात काहीच नाही.
अनेक वर्षं उचित खाणं खाऊन,रोज चालण्याचा व्यायाम घेऊन, योगासनं करूनही ती जाण्याच्या पंथाला लागली आहे.
ती आमची मोठी बहीण आहे.आम्हा सर्वांना तिने एकत्रीत ठेवलं.
आम्हाला वयात येताना तिने पाहिलंय.आणि ह्या निष्ठूर जीवनप्रवासात वाटचाल करतानाही ती आमच्याकडे पहात राहिली,आम्हाला मार्ग दाखवीत राहिली.आम्ही तिला नेहमीच आमच्या जवळ येताना पाहून सर्व काही ठीक होणार याची खात्री बाळगून असायचो. ती आमची ताई आहे.तिच्याशिवाय जीवन अशक्य आहे.”

मी वंदनाला म्हणालो,
“तुझ्या आईच्या व्याधीवर आता बरंच संशोधन झालं आहे.जरी ती व्याधी आनुवंशीक असली तरी त्यावर औषधं आली आहेत.त्याशिवाय शारीरिक व्यायामाबरोबर मानसीक व्यायाम घेत राहिल्यास हा विसरभोळेपणाचा रोग बराच दुरावला जातो असं माझ्या वाचनात आलं आहे.”

“रोज वाचन करून, कोडी सोडवून, थोडं फार लिहूनही निश्चीतच,कधी काळी,आईचा तो व्याधी, माझ्या डोंबल्यावर येऊन बसणार आहे हे मला जाणवत आहे.
सतत गोंधळात टाकणार्‍या त्या व्याधीने माझी आई कशी जर्जर झाली होती ते आठवून माझं मन भित्रं होतं.
मला माहित आहे मी वेळोवळी अडखळणार आहे,शेजार्‍यांचं नाव काय ते माझ्या लक्षात रहाणार नाही,किंवा चहाचा कप कुठे ठेवला आहे ते विसरणार आहे.
पण तुम्हाला खरं सांगू का,माझा कुटूंबव्यवस्थेवर,त्या समान मुळांवर,जीथे आनुवंशिकता आहे,त्यावर विश्वास आहे.तसंच माझ्या आईच्या डाळीच्या आमटीवरपण विश्वास आहे.
माझी ताई जाण्याच्या पंथावर आहे पण तिचा आत्मा,जो तिचं व्यक्तिवैशिष्ट्य आहे, ते जीवंत रहाणार.आणि कदाचीत मी माझ्या गोष्टीसाठी विसरभोळी राहीन पण तिचं व्यक्तिवैशिष्ट्य विसरणार नाही.मी माझ्या यमूताईला,माझ्या मोठ्या बहीणीच्या प्रेमला विसरणार नाही.”

यमुताईला निश्चितच भेटायला येण्याचं आश्वासन मी वंदनाला दिलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com