Tuesday, May 4, 2010

“आईआज्जी तू पण!”…(काळजी घे).

“ज्यावेळी बाहेर जाण्यासाठी मी तिच्याकडे पाठमोरी होऊन बाहेर पडायला लागले त्यावेळी मी माझ्या कानात अस्पष्ट शबद ऐकले,
“काळजी घे”

“लहान वयातच मला समजायला लागलं होतं की माझ्या आईआज्जीकडून तसं प्रेम मला मिळणार नाही जसं माझी आई मला जवळ कवटाळून माझा मुका घेऊन रोजच द्यायची.
शोभना मला आपल्या मनातली, आपल्या आजीची तक्रार-वजा चिंता वर्णन करून सांगत होती.

“माझ्या आजीने मला जवळ घेऊन कधीच कवटाळलं नाही.अगदी गरज लागली तरच,नाहीपेक्षां ती क्वचितच माझ्याशी बोलली असेल..मी वयात येत असताना मला वाटायचं की,आजीकडून ऐकली जाणारी- श्रावणबाळाची, धृवबाळाची, गोकूळातल्या कृष्णाची- अशा प्रकारच्या गोष्टीपासून मी वंचित झाले आहे.

जेव्हा दुसरी मुलं आपल्या आजीबद्दल बोलायची,

“आमच्या आजीने नेहरू,गांधीची भाषणं ऐकली आहेत,बेचाळीसचा लढा पाहिला आहे,सुखदेवला फांसावर लटकवल्याची बातमी पेपरात वाचली आहे,”

की माझ्या लक्षात यायचं की, मी आजीजवळ बसल्यानंतर मनातल्या मनात ईच्छा करायची माझी आजीसुद्धा एका रात्रीत बदलून अशाच काहीश्या गोष्टी मला सांगील.मी माझ्या आजीला प्रेमाने “आईआज्जी” म्हणायचे.”

मला शोभनाकडून हे सर्व ऐकून गंमत वाटलीमी तिला म्हणालो,

“अग,तू आजीला आईआज्जी म्हणायचीस.म्हणजे एका प्रेमळ नावात आणखी एक प्रेमळ नाव घालून तू तुझ्या आजीवर किती प्रेम करायचीस हेमाझ्या लक्षांत येतं.पण आजीचं राहूंदे.तुझ्याकडून तुझ्या आजीवर किती प्रेम व्हायचं?”

“मी जर कधी,
” माझी आईआज्जी”
असं तिच्या जवळ जाऊन, तिला मिठी मारून म्हणाले तर मग तिच्या ओठावरून,
“माझी ती बाय “
असे शब्द निसटून यायचे.”
आपल्याकडून होणार्‍या प्रेमाची बाजू शोभना पटकन सांगून गेली.

आणि पुढे म्हणाली,
“माझ्या मनात यायचं की आजीच्या खोलीत गेल्यावर मला ती जवळ कवटाळून घेईल आणि म्हणेल,
“घराच्या पाष्ट्यावर मणीयार जातीची सर्पटोळी दिसली,किंवा हे कपिलेचं चौथं पाडस आहे,किंवा ह्या पिढीतल्या तुम्ही मुली नशिबवान आहात कारण तुम्हाला बिनदास शिक्षण घेता येतं वगैरे”
असं काहीतरी एखाद्या विषयावर घोटून घोटून सांगील.पण अशी कधीच वेळ आली नाही की आजी माझ्याजवळ बसून आमची चर्चा झाली,आणि अशी कधीच वेळ आली नाही की आजीने आपणहून मला जवळ घेऊन,
“माझी ती बाय”
असं म्ह्टलं असेल.”

मला शोभनेची दया आली.मी तिला म्हणालो,
“जे कोण आहे ते तसेच असणार”
हे कसं स्वीकारायचं ते त्या वयात तुला न कळणं स्वाभाविक आहे.
जोपर्यंत प्रेम आपल्या जीवनात अनुपस्थित रहात नाही तोपर्यंत प्रेमाचं मुल्य आपल्याला कळत नाही.”
मी शोभनाची समजूत घालीत म्हणालो.
आणि तिच्याकडून आणखी काढून घेण्यासाठी मी शोभनाला म्हणालो,
“मग तू तुझ्या आईला आजीबद्दलचं कारण विचारलंस का?”

“हो तर!”
अगदी खणकून मला शोभना सांगू लागली.
“एक दिवशी निव्वळ कुतूहल म्हणून आणि नैराश्यापोटी मी माझ्या आईला विचारलं की,
“मला इतर प्रेम दाखवतात तसं माझी आईआज्जी मला का दाखवत नाही? “
माझी आई मला सांगायला लागली,
“आजीला सात भावंडं होती,अगदी लहान असताना तिला तिच्या मामाने दत्तक म्हणून घेतली होती.तिच्या मामाला लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी मुल होत नव्हतं.तिची मामी चागली होती.
पण मामा काहीसा व्यसनी होता.त्यामुळे तिला खर्‍या प्रेमाची चुणूकसुद्धा दाखवायला त्याला संधी मिळाली नाही. अखेर ती प्रेमाने परिपूर्ण असून सुद्धा ते प्रेम प्रकट करायला अपूर्ण राहिली.”
माझ्या आईआज्जीची पूर्वपिठिका ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की मी तिला मिठी देताना तिचे दोन्ही हात अनिच्छापूर्वक का वर यायचे.मला जवळ घेऊन इतर आज्यांसारखी तासनतास गंमतीच्या गोष्टी का सांगत नसायची.”

“तिच्या बालपणी संगोपनाचं नातं काय असतं ते तिने अनुभवलं नसल्याने प्रेम कसं द्यायचं ते तिला ठाऊक झालं नसावं.”
मी शोभनेच्या आजीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.

शोभनेला आपल्या आजीची कींव आली असावी.आंवढा गिळत मला म्हणाली,
“मला एक घटना चांगलीच आठवते.मी त्यावेळी सतरा वर्षाची होती.आईआज्जीला बरं वाटत नव्हतं.तिला दवाखान्यात ठेवलं होतं.माझी आई आणि मी तिच्याबरोबर तीनएक तास तिच्या बिछान्याजवळ बसून होतो.आई निघून गेली आणि आणखी थोडावेळ मी आईआज्जीजवळ बसून होते,ते थंडीचे दिवस होते.दिवस लहान होऊन काळोख लवकर पडायचा.मी पण आता घरी जाण्यासाठी तयारी करीत होते.बाहेरच्या गर्दीच्या यातायातीची तिला
कल्पना असायची.ज्यावेळी जाण्यासाठी मी तिच्याकडे पाठमोरी होऊन बाहेर पडायला लागले त्यावेळी मी माझ्या कानात अस्पष्ट शबद ऐकले
“काळजी घे”
मला आठवतं जणू मला कुणी तरी शीवी दिली की काय अशा विस्मयात मी त्यावेळी पडले.मी फिरून तिच्याकडे पहायला लागले. अवघडल्यासारखा चेहरा करून पुढे काय करायचं अशा अविर्भावात तिला पाहून,

मी तिला म्हणाले,
“तू पण.” …..(काळजी घे)
तिची अवघड कमी करण्याच्या प्रयत्नात मी होते.

त्यानंतर तिचे ते,
“काळजी घे”
हे शब्द कायमचे माझ्या मनात रेंगाळत राहिले.एकदाच प्रथम माझ्या आईआज्जीला वाटलं असावं की कुणाला प्रेम दाखवून जगबुडती होणार नाही.
आणि त्यानंतर नेहमीच ती जाणीवपूर्वक प्रयत्न करून तिला प्रकट करता येईल असं प्रेम मला दाखवायला लागली.पण अजून ती प्रेमाच्या संकल्पनेशी धडपडत असते.आणि कष्टप्राय होऊन ते दाखवीत असते.
पण एक नक्की की ते दाखवताना त्यावर तिचा ताबा आहे हे तिला जाणवतं.
आईआज्जी दवाखान्यातून घरी आल्यानंतर,मी बाहेर जाताना माझा एकही दिवस गेला नाही की मला म्हटले जाणारे ते दोन शब्द मी आजीच्या तोंडून ऐकले नाहीत.
“काळजी घे”

आणि मग मी म्हणायचे,
“तू पण”
आम्हा दोघांना त्या दोन शब्दानी मौल्यवान धडा शिकवला.
हे शब्द आता आमच्या घरात एक परिभाषा झाली आहे.जीवनातलं एक वळण झालं आहे.जगण्याचं आयुध मिळालं आहे.आणि अंतरात असं भिनलं आहे की, हे शब्द आम्ही कधीही त्यागणार नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनेया)
shrikrishnas@gmail.com