Friday, May 7, 2010

“तुझ्याच अनुभवासाठी जातीने हजर रहायला!”

“चित्रात गणपतिबाप्पाकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला सान्तवन वाटेल अशी बाप्पाची नजर होती.मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हॉलमधल्या एका भिंतीवर ही तस्वीर टांगलेली होती.”

आयुष्यात वेळोवेळी असे प्रसंग येतात की,काहीना काही निर्णय घेण्याची पाळी येते.पण एखादा प्रसंग खरोखरच आपलीच सत्वपरिक्षा घेण्यासाठी निर्माण होतो आणि त्यावर निर्णय घ्यायला आपल्याला विवश करून टाकतो.

मायाचं असंच झालं.तिच्या आईवडीलांचं घर कोकणात होतं.वडील अलीकडेच वार्धक्याने गेले.तिची आईपण बरीच थकली होती.ती जवळ जवळ बॅण्णव वर्षाची झाली होती आणि एकटीच होती.माया एकूलती एक मुलगी होती.माया तिला वरचेवर भेटून जायची.आईच्या सुशृषेसाठी मायाने बराच खर्च करून योजना आखल्या होत्या.तिला रोज स्पंजींग करायला आणि तिच्या औषध पाण्याची नीगा ठेवायला एका नर्सला कायमची ठेवली होती.हे सगळं मायाने स्थाईक डॉक्टरच्या सुचनेवरून केलं होतं.

अलीकडे माया आपल्या आईला भेटायला आली असताना डॉक्टर तिला म्हणाले,
“माया,तुझी आई जास्त दिवस काढील असं दिसत नाही.तरीपण कुणाचा मृत्यू केव्हा येईल हे सांगणं फारच कठीण असतं. माझ्या सांगण्यावरून तू पैशाच्या मदतीने तुझ्या आईची अत्यंत उत्तम सेवा करण्यात कर्तव्य बजावलंस.पण जे पैशाने होणार नाही ते तू तुझ्या आईजवळ जातीने हजर राहून होईल.त्यासाठी तुझा काय तो निर्णय तू घे.”

आईला सोडून आपल्या घरी परत येत असताना मायाला गाडीत सतत डॉक्टरांचे उद्गार डोक्यात येऊन अस्वस्थ व्हायला होत होतं.
विशेषकरून ते डॉक्टरांचं वाक्य.
“आईजवळ जातीने हजर राहून होईल.”

माया एक दोन वर्षात निवृत्त होणारच होती.ते आईसाठी अगोदरच करावं की काय हा विचार ह्यावेळी तिने आपल्या नवर्‍याला विचारायचं ठरवलं होतं.
माया अलीकडेच दोनतीन दिवसासाठी आईला सोडून आपल्या नवर्‍याकडे आली होती.त्यावेळी आपलं मनोगत मला सांगत होती.
माया मला म्हणाली,
“माझा नवरा खरंच देवमाणूस आहे.मी त्याला विचारल्यावर मला म्हणाला,”
“माया तू तुझ्या नावासारखीच मायाळू आहेसच,पण आपल्या आईच्या अखेरच्या दिवसात अशा परिस्थितित कुणालाही तुला वाटतं तसंच वाटणार.तू खुशाल राजिनामा दे.नोकरी परत करता येते.त्याच्यासाठी तुझं आयुष्य पडलेलं आहे.पण तुझी आई तुला परत मिळणार नाही.”

“मग तू काय निर्णय घेतलास?”
मी मायाला विचारलं.

“मी आई हयात असे पर्यंत तिची सेवा करायचं ठरवलं.मी लवकर निवृत्त झाले.आणि नवर्‍याला आणि मुलांना सोडून आईच्या घरी रहायला आले.”
माया मला सांगू लागली.
“सुरवातीला फारच कठीण जायचं.एकदाचे रात्रीचे दिवे काढल्यावर आणि कंटाळवाण्या सबंध दिवसाच्या समाप्ति नंतर एक मोठा उसासा टाकून मी माझ्या मलाच विचारायची,
” हे सर्व कशासाठी चाललं आहे?”माझं वयक्तिक आणि व्यवसाईक जीवन मधेच सोडून माझी आई जी आता बॅण्णव वर्षाची आहे तिच्या बरोबर का रहायला आले आहे?”

मला मायाची कींव आली.मी तिला म्हणालो,
“खरंच विवश करणारा हा निर्णय आहे.तुला तुझ्या आईच्या प्रेमापोटी असं करणं स्वाभाविक आहे.पण तुझ्या नवर्‍याने आणि मुलांनी दिलेलं सहकार्य वाखाणण्यासारखं आहे.
पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली का?

मी उलट प्रश्न करताच माया मला म्हणाली,
“माझ्या मनात मी प्रश्न आणल्यावर माझंच मन मला लगेचच उत्तर द्यायचं.
“तुझ्याच अनुभवासाठी जातीने हजर रहायला!”
नंतर ही जातीने हजर रहाण्याची कारणं काय असावीत हे हुडकून काढायला मला जोर यायचा.”

“मला तुझ्या मनातली कारणं ऐकायला नक्कीच आनंद होईल.”
असं मी म्हणताच,मायाने एका मागून एक कारणं द्यायला सुरवात केली.ते ऐकून मी थक्कच झालो.
मला म्हणाली,
“माझ्या आईला औषधाच्या दुकानातून रोजचंच जे काय लागतं ते आणण्यासाठी,जातीने हजर रहायला.
सतत चालणार्‍या मोठ्या आवाजातल्या टीव्हीचा सहन न होणारा आवाज ऐकायला,जातीने हजर रहायला.
जेव्हा माझी आई ती बसलेल्या खुर्चीवरून उठण्याचा प्रयास करताना, तिची धडपड चालली असताना,जमिनीवर तिचे पाय ती घट्ट ठेवताना आणि अशावेळी ती पडू नये म्हणून मी तिला आधार देताना,आलेले जणू असे क्षण की काळ क्षणभर थांबला असावा की काय हे भासवून घेण्यासाठी, जातीने हजर रहायला.
माझ्या आईच्या मनात घर केलेल्या भितीमुळे तयार झालेल्या नकारार्थी आवरणाला दूर करण्यासाठी काहीतरी तिच्या कानावर पडावं म्हणून ज्ञानेश्वरीतून आणि गीतेमधून वाचून दाखवण्यासाठी, जातीने हजर रहायला.
माझ्या भावनाना मृत्यूच्या मार्गाने जाण्यात येणारा आनंद आणि चमत्कार समजावून देण्यासाठी,जातीने हजर रहायला.
माझ्या बालपणातल्या आठवणी उजळण्यासाठी,गेल्या तीस वर्षातल्या जीवनाची उजळणी करण्यासाठी,जातीने हजर रहायला.
अशी एकामागून एक कारणं मी शोधून काढायची.”

“ग्रेट”
मी मायाला म्हणालो.

“माझ्या आईच्या घरात एक सुंदर गणपतिची तस्वीर आहे.मला लहानपणापासून चित्र काढण्याचा नाद होता. जे.जे.स्कूलमधे जाऊन चित्रकलेवर मी डिप्लोमा पण घेतला.पण हे चित्र मी वयाच्या चौदाव्या वर्षावर काढलं होतं. आता माझं वय सत्तावन्न आहे.”
माया मला मन मोकळं करून सांगायला लागली.

“चित्रात गणपतिबाप्पाकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला सान्तवन वाटेल अशी बाप्पाची नजर होती.मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हॉलमधल्या एका भिंतीवर ही तस्वीर टांगलेली होती. किचनपासून माझ्या आईच्या बेडरूमकडे आणि परत किचनकडे जाण्याच्या मार्गात ही तस्वीर दिवसातून पाच-दहावेळेला माझ्या नजरेसमोरून जायची. आईला पाणी आणून दे,तिला औषधाच्या गोळ्या आणून दे,तिला हवी असलेली पण ती आणायला विसरलेली एखादी वस्तू तिला आणून दे असे फेरफटके व्हायचे.आईने हे सगळं आणायचं ठरवलं तर तिला तिच्या वेगात चालण्यात अर्धा दिवस जायचा.आणि ते करताना सुद्धा वाटेत काही कागदाचा कपटा पडला आहे म्हणून किंवा अशीच काहीतरी बारिक सारिक गोष्ट उचलून घेण्यात तिचा वेळ गेल्याने सरतेशेवटी कोणत्या वस्तूसाठी ती उठून आली होती तेच ती विसरून जायची.

“माया ग,मी काय आणायला आले होते?”
ती ओरडून विचारायची.मी तिला उत्तर मुळीच देत नसायची.पण तिला काय हवं होतं ते लक्षात घेऊन तिला मुळीच न सांगता,तिनेच हुडकून काढावं आणि अशा तर्‍हेने कदाचीत तिच्या पुस्सट होत जाणार्‍या स्मृतिची बचत करायला मी तिला मदत करायची.”

मी मायाला म्हणालो,
“जातीने हजर रहाणं” ही एक तुझ्याकडे उक्ति किंवा वचन झालं असेल नाही काय?.एखादा उच्च कार्यविधि झाला कसं झालं असावं.पण तू ते आचरीत आहेस.
तुला एव्हांना ठाऊक झालं असेल की तुझी आई आता तुझीच शिक्षीका झाली आहे आणि तू तिची आई झाली आहेस.”

माझं हे ऐकून माया खरोखरंच भावनाप्रधान झाली.
मला म्हणाली,
“आमच्या घरातल्या,त्या हॉलमधल्या भिंतीवरच्या गणपतिबाप्पाच्या असंदिग्ध अस्तित्वामधून, मी माझ्या आईचा हात धरला असताना माझा कोपर धरल्याचा भास होण्यात,माझा तोल जाऊ नये म्हणून सज्ज राहून,त्या क्षणाच्या वजनाखाली पडून उठण्याच्या धडपडीत उठवण्यासाठी प्रयत्न होण्यात,पाय घसरल्यावर तोल संभाळण्यासाठी मदत होण्यात,मी आणि माझी स्वपनं ह्या मृत्युमार्गाकडच्या वाटचालीच्या प्रक्रियेत हरवून न जाण्यात ते अस्तित्व माझ्या मागे सज्ज आहे असं मला वाटायला लागलं आहे.”

मला मायाचं हे ऐकून, खरोखरंच माझा तिच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.माझ्या चेहर्‍यावरचे भाव पाहून ती हंसली.आणि मला म्हणाली,
“माझी गति माझ्या आईच्या गति एव्हडी हळुवार झाल्याने,माझ्या जीवनाच्या सीमेभोवती असलेली प्रेमाची झुळूक मला भासू लागली आहे. मृत्यूला दारातच उभा ठाकायचा इशारा देण्याची ही वेळ असताना,त्याच्याच डोळ्यात डोळा घालून आणि एखादा मार्ग काढून,उघड्या मनाने मी आणि माझी आई बसले आहे त्या बैठकीकडे त्याचं स्वागत करावसं वाटत असताना,हवेतला हलकासा आनंदाचा सुगंध मी घेत आहे.”

मायाचं हे सर्व ऐकून मी खिशातून रुमाल काढून माझे डोळे पुसले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com