Thursday, May 13, 2010

“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ!”

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
कर तुही निर्मिती कवितेची
दाखव चुणूक तुझ्या प्रतिभेची

“मला तिसावं लागेपर्यंत कळलं नाही की बर्‍याच अडचणीत असलेला तो माझा मामाच असण्याची शक्यता होती.
कारण मला एक फोन आला की बर्‍याच वर्षांच्या दारूच्या व्यसनाने बरबाद झालेली त्याची लिव्हर फुटली आणि त्यातच त्याचा अंत झाला आणि खरं म्हणजे तो माझा मामाच होता.
त्याचे ते शब्द मात्र मागे राहिले.पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्या शब्दांनी माझी व्याख्या करण्याची आता कुणालाही जरूरी भासणार नाही.”
अगदी काकूळतेला येऊन मालती मला सांगत होती.

मालती आईवडीलांची एकुलती एक मुलगी.तिच्या वयाच्या आठव्या वर्षीच तिचे बाबा दम्याच्या पीडेच्या आहारी गेले.त्यांनी खूप त्रास काढला.मी त्यांना मोठमोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो आहे.पण त्यांची फुफ्फुसं जन्मतःच कमजोर होती.त्यामुळे दम्याचा ऍटेक आल्यावर एकतर प्राणवायुचा सिलिंडर वापरून सावरून घ्यायचं किंवा औषधावर भरवंसा ठेवून रहायचं.शेवटी शेवटी त्यांना सिलिंडर वापरण्याविना गत्यंतरच नव्हतं.बिचारे कंटाळून
जायचे.
“आयुष्यात रहाण्याची इच्छाशक्तिच गेली”
असं मला एकदा वैतागून म्हणाले होते.मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करायचो.पण शेवटी,
“जावे त्याच्या वंशी त्यालाच कळे “
हेच खरं ठरलं.त्यांची अन्नावरची इच्छाच गेली.आणि नंतर व्हायचं तेच झालं.

मालती आणि तिची आई मालतीच्या आजोळी कोकणात गेली.
मालतीचे आजी आजोबा पण बरेच वृद्ध झाले होते.पण ह्या दोघांना दुसरा आधार नसल्याने त्यांना आपल्या घरी ठेऊन घेण्याविना त्यांना पर्याय नव्हता.मालतीला एक मामा होता.
मामा जरा सरफिरा आणि गरम डोक्याचा होता.आपल्या आईला घालून-पाडून बोललेलं मालतीला आवडत नव्हतं. आपली आई रडायची हे पाहून मालतीला दुःख व्हायचं.आजीआजोबांचं काही चालायचं नाही.

जून्या आठवणी काढून मालती मला सांगत होती.
“माझ्या मामाच्या अश्लाघ्य शब्दांशी मी नेहमीच सामना करीत आले.आणि ते सुद्धा माझ्या शब्दांनी.माझ्याच खोलीत थोडावेळ निपचित पडून झाल्यावर,माझ्या जाडजूड बोटांनी,माझ्या आठव्या वयातसुद्धा मी काही गोष्टी किंवा कविता खरडून काढायची.माझे लिहिले गेलेले शब्द रात्रभर माझ्या आजुबजूला,माझ्या बिछान्यावर पडून असायचे.जणू ते शब्द माझ्यासाठी ढाली सारखे असायचे. माझं संरक्षण करण्यासाठी.त्या रात्रीतून माझी सुटका
करण्यासाठी.”

“मला आठवतं मी एकदा कोकणात आलो होतो तेव्हा तुझ्या घरी आलो होतो.तू त्यावेळी घरी नव्हतीस.मी विसरणार नाही, मी तुझ्या खोलीत एका भिंतीवर पाटी लटकवलेली वाचली होती.
“हे ही दिवस जातील”
मी मालतीला आठवण देत म्हणालो.

“हो मी त्यावेळी सोळएक वर्षांची होती असेन.”
असं म्हणत मालती आपल्या लहानपणाच्या आठवणी काढून काढून मला सांगत होती.
“पण दुसर्‍या दिवशीच्या सकाळाच्या पारीला माझ्या मामाचे शब्द मला पुन्हा हलवून हलवून जागं करायचे.ते शब्द म्हणजे,
“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ “
हे शब्द त्यावेळी झोपेतच माझ्या डोक्यात प्रतिध्वनी सारखेचे वाजायचे. आणि ज्यावेळी मी माझे डोळे उघडायची आणि मला त्यातली अश्लाघ्यता पटायची, त्यावेळी लगेचच उठून मी ते आदल्या रात्री खरडलेले शब्द नष्ठ करून टाकायची.”

“हे असं तुझा मामा कुठपर्यंत करायचा?”
मी मालतेला कुतूहलाने प्रश्न केला.

मला म्हणाली,
“मी वयात येईतोपर्यंत ह्या अश्लाघ्य शब्दांचा भडिमार माझ्यावर रोजच झाला आहे.आणि मी मोठी बाई झाले तरी तो टिकून राहिला.त्या शब्दांनी माझ्या मनाला,माझ्या आत्म्याला आणि माझ्या द्रष्टेपणाला घडवलं गेलं.मी जेव्हा आरशात पहायची तेव्हा का कुणास ठाऊक,खरीच मी माझा मामा म्हणायचा तशी

“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ”
मलाच भासायची.”
मला मालती कडून हे ऐकून खूपच वाईट वाटत होतं.पण तिच्या मनाचा ओघ जाण्यासाठी मी ती सांगत होती ते निमूट ऐकत होतो.

“आणि असं असून सुद्धा दिवसभरात ते शब्द त्याच्या तोंडून ऐकल्यावर प्रत्येक रात्री,मी काहीतरी खरडत रहायची.मी अशा अविर्भावात लिहायची की जणू त्या लिहिलेल्या शब्दांवर माझं जीवन निर्भर होतं.मी माझं ते लेखन,ते शब्द वाचायची आणि मला ते सर्व ठीक आहे असं वाटायचं.आणि जेव्हा हे शब्द माझ्या डोक्यात घुसायचे तेव्हा माझ्या मामाने उच्चारलेले आणि माझ्या डोक्यात बसलेले ते अश्लाघ्य शब्द त्यांना हुसकावून काढायचे.”
मालती मला सांगत होती.

“ज्यावेळी माणसाला मनस्वी दुःख होतं तेव्हा त्याला आपलं दुःख कुणाकडेतरी उघडं करावं असं खूपच वाटत असतं. काही दुसर्‍यांना सांगून आपल्या तोंडच्या शब्दानी ते उघड करतात. तर काही कागदावर लिहून आपलं मन हातातून येणार्‍या शब्दातून -लेखातून -उघड करतात.पण एक मात्र नक्की, दुःखानेच प्रतिभा उभारून येते.
साहित्यातल्या अनेक विषयामधे दुःखाने जर्जर होऊन लिहिलेले विषय वाचकाला भावत असतात.असं मला तरी वाटतं.सुरेश भटांच्या कविता वाचून मी काय म्हणतो ते तुला नक्कीच कळेल.बिचारे सुरेश भट पोलिओ मुळे एका पायाने अधू होते.आणि ते त्यांना नेहमीच खटकायचं.एका कवितेतत्यांनी लिहिलंय की,
देवा मला दुसरा जन्म दिलास तर अधू करू नकोस “
मी मालतीच्या प्रयत्नांची स्तुतीच करीत होतो.

माझं हे बोलणं ऐकून मालतीला आनंद झालाही आणि आनंद झाला नाहीही.
मला म्हणाली,
“आणि असं असून सुद्धा रोज रात्री नव्याने खरडलेल्या त्या माझ्या शब्दात मला गम्य वाटायचं.जणू माझ्या लेखणीच्या फटकार्‍याने माझी भावस्पर्शी स्थिति निपटूनच जायची.माझा आत्मसंदेह एखाद्या अतीप्रिय रजईसारखं मला गुरफटून ठेवीत असायचा.
कुणी नवीन मैत्रीण मला मिळाली किंवा एखादी संधी माझ्या जवळ चालून आली की मी ह्या रजईचा मला गुरफटून घेण्यात उपयोग करायची.
असं असूनसुद्धा त्यानंतर मी माझं लेखन नष्टच करायची.कदाचीत त्यामुळे मला वाटायचं की मला कुणीही मी किती विक्षिप्त दिसते हे सांगणार नाही.पण असं करणं कायम टिकलं नाही.”

मालती हे म्हणाली ते ऐकून मला अचंब्यातच तिने टाकलं.
“कायम टिकलं नाही म्हणजे काय झालं?”
मी तिला सरळ सरळच प्रश्न केला.

मला म्हणाली,
“त्यानंतर, मी आतापर्यंत अनेक रात्री माझ्या अंथरूणात बसून काहीतरी लिहून काढायची.मी रकानेच्यारकाने भरून लिहलं आहे. त्यात माझा मामा, माझं जीवन आणि माझी श्रद्धा ह्याबद्दल खरडंत गेलेलं आहे.
आणि असंच एकदा सकाळी उठून मी ते वाचायला घेतलं.आणि नंतर मी माझ्या मनात निश्चीत केलं की माझे लिहिलेले शब्द असे फेकून देणं,नष्ट करणं हे शुद्ध मुर्खपणाचं आणि लज्जास्पद होईल,म्हणून ते लेखन नष्ट करायचं नाही.”

“तू मला एकदा तुझं कवितांचं पुस्तक वाचायला आणून दिलेलं आठवतं.आणि तुझ्या कविता वाचून मी तुला म्हणाल्याचंही आठवतं की तुझ्या कविता दुःखी वाटतात.ते ऐकून तू फक्त हंसली होतीस. आणि मी ही त्यावेळी जास्त ताणून धरलं नव्हतं.”
मी मालतीला म्हणालो.

“जसे दिवस निघून गेले तसं मला माझंच वाटायला लागलं की मी किती सफल लेखिका आहे ते.
मी मग निर्णय घेतला की मी माझ्या कविता छापायच्या. आणि ते फक्त एव्हड्याच कारणासाठी की माझा मामा मला म्हणायचा तशी मी नाही हे दाखवायला.आणि असं करीत असताना माझ्या वयक्तिक भावना कागदावर लिहून त्या कुणालाही वाचायला मोकळ्या झाल्या तरी चालेल.
माझ्या मनात आलं, की जरी लोकाना ते लेखन आवडलं नाही तरी चालेल.मी लिहितंच राहिन.त्यातलंच एक कवितेचं पुस्तक मी तुम्हाला दिलं होतं.”
मालतीने अगदी अभिमानाने मला सांगून टाकलं.

आता मला भरंवसा वाटायला लागलाय की तुझ्या मामाचं तुझ्याबद्दलचं अश्लाघ्य बोलणं नष्ट होऊन, त्या,
“गबदूल,आळशी,ऐतखाऊ”
मुलीला स्वतःला,
“बुद्धि,धैर्य,आणि सौंदर्य आहे”
हे उघड झालं आहे.
मी तुझ्या अनेक पुस्तकांची वाचनं करायला उत्सुक आहे.आणि त्यातला तुझ्या कविता दुःखी असल्यातरी चालतील. नव्हे तर त्या दुःखीच हव्यात. सुखात असतीस तर एव्हडं लेखन आणि कविता तुझ्या हातून कदाचीत झाल्या नसत्या.माझीच कविता मला आठवते.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वां उल्हासित करावे
गुलाब, जाई,जुई अन मोगरा
घाणेरी, लाजेरी,कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
कर तुही निर्मिती कवितेची
दाखव चुणूक तुझ्या प्रतिभेची

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com