Thursday, May 27, 2010

माझी खरी जीवनसाथी.

“आजुबाजूच्यांच्या संसारात होत असलेल्या घटनांकडे पाहून आम्ही एकमेकांकडे विस्मयीत होऊन,भयभीत होऊन पहात असतो.”

“माझ्या मनात नेहमीच वाटायचं,की माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते.ह्याचं काय कारण असावं ह्याचा मला नेहमीच अचंबा वाटायचा.पण खरोखर ती प्रेम करते.”
हे गणेश सकपाळचं अगदी सुरवातीचं वक्तव्य होतं.पश्चिम रेल्वेच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर आम्हा दोघांची भेट झाली.आणि नंतर आम्ही मामा काण्यांच्या स्वच्छ उपहारगृहात चहा आणि बटाटेवड्याचा आस्वाद घेताना एकमेकाशी बोलत होतो.मी दादरच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर डहाणू फ्रुट शॉपच्या जवळच्या बाकावर बसून अंधेरी लोकलची वाट पहात बसलो होतो.
खाकी रंगाची शॉर्ट,वरती खादीचा सफेद टी शर्ट,हातात खाकी रंगाची पिशवी असलेल्या गणेश सकपाळला मी सहजा सहजी ओळखू शकलो नसतो.मला पाहून तो हंसला आणि माझ्या जवळ येऊन बसला.
“मी तुम्हाला ओळखलं नाही!”
मी त्याला म्हणालो.
“पण मी तुम्हाला ओळखलं!”
गणेश म्हणाला.
“कसं काय?”
मी गणेशला उलट प्रश्न केला.
“हंसल्यावर उजव्या गालावर ठसठशीत खळी पडलेली पाहून मी क्षणार्धात दहा वर्षं मागे गेलो.तुमच्या डिपार्टमेंटमधे मी स्टेशनरी आणि फायलींग सेक्शनमधे होतो. मी गणेश सकपाळ.”
हे ऐकल्यावर माझी स्मृति पण दहा वर्षं मागे गेली.
गरीब परिस्थितिमुळे खूप शिक्षण झालं नसलं तरी तल्लख बुद्धिचा,गरीब स्वभावाचा आणि समयसुचकता असलेल्या गणेशला मीच निवडला होता.

आमच्याकडे दोन तिन वर्षं काम करून झाल्यावर राजीनामा देऊन तो आणखी कुठे कामाला लागला होता.आमच्याकडे असेपावेतो नेहमीच तो माझ्याबरोबर सुख-दुःखाच्या गोष्टी करायाचा.मला त्याची खूपच किंव यायची.एक म्हणजे तो स्वभावाने भोळसट,गरीबीने पछाडलेला आणि कोकणातला रहिवाशी.आणि दुसरं म्हणजे,निष्कपटी,आणि भाबडा होता.
“खूप दिवसानी मामा काण्यांचा बटाटेवडा खातोय.”
गणेश कपातल्या चहाचा शेवटचा घोट घेत म्हणाला.
मी लगेचंच वेटरला बोलावून आणखी चहा आणि वडे मागवले.
“नको,नको,माझा तसं म्हणण्याचा अर्थ नव्हता.”
मला शपथ घालीत आणखी ऑर्डर करू नका हे गणेश आवर्जून सांगू लागला.
मी मनात म्हणालो,
“हाच तो निष्कपटी भाबडेपणा”
“असू देत रे! मी पण तुझ्या सारखा बरेच दिवस काण्यांच्या उपहारगृहात आलो नव्हतो.पण ते जाऊंदे मघाशी तू तुझ्या बायकोच्या प्रेमाचं काय सांगत होतास,ते पुढे सांग.”
मी विषयांतर करीत गणेशला म्हणालो.

“माझ्या म्हणण्याचा गैरसमज होऊ देऊ नका.मी अगदी धष्ट-पुष्ट आहे,अगदी सुधृड आहे आणि माझी खात्री आहे की मी स्वाभिमानीही आहे.जीवनात येत असलेल्या अनेक असंभावना आणि समस्या ह्यांच्याबद्दल मी कधीही चिंतन करीत असताना बराच समय मी ह्या बाबतीत -प्रेमाबाबतीत- विचारात घालवतो.”
गणेश सांगू लागला आणि पुढे म्हणाला,

“तसं पाहिलंत तर आमची गरीब परिस्थिति असायची.मी बारीक-सारीक धंदे केले पण त्यात काही बरकत होत नव्हती. लहान-सहान नोकर्‍या केल्या पण त्यासुद्धा कायमच्या अश्या नव्हत्या.मिळकत नसली तर उपासमार होऊ नये म्हणून आम्ही घरात काही तरी किडूक-मिडूक ठेवायचो.एखादा महिना त्यातून निभावून जायचा.कधी कधी हे किडूक-मिडूक तळाला जायचं आणि आम्हाला प्रचंड काळजीत टाकायचं.”

“पण नंतर तू दादर पोस्टात पोस्टमनची नोकरी करायचास,असं मला कुणीतरी सांगीतल्याचं आठवतं.तुला पोस्टात भेटायला यावं असं मला अनेकदा वाटायचं पण काही जमलं नाही.”
मी गणेशला म्हणालो.

“हो पोस्टमनची सरकारी नोकरी मिळाल्यावर मला जरा स्थैर्य आलं.”
गरम गरम चहा बशीत ओतून तोंडाने सूर्रकन आवाज काढीत चहा पीत,पीत सकपाळ मला सांगू लागला.
“नंतर लग्नाची काही वर्ष उलटल्यावर माझ्या पत्नीला परळ भागात एका महिला संस्थेत जेवणाच्या भटारखान्यात चपात्या लाटून देण्याचं काम मिळालं.ते कामसुद्धा मोठ्या योगायोगाने मिळालं.मी जिथे कामाला होतो तिथल्या पोस्टमास्तरांची पत्नी त्या परळच्या महिलामंडळाची सभासद होती. तिची आमच्यावर कृपा झाली.मुंबई शहरात दुपारच्या वेळी ह्या महिलाकार्यातून शेकडो लोकांना जेवणाचे डबे जायचे.
सुरवातीला ही योजना लहान प्रमाणात चालायची.नंतर त्याचा व्याप एव्हडा वाढला आणि जेवणात रोज हजारावर चपात्या लागायच्या.दोन चार बायकांचं ते काम नव्हतं.पन्नास बायकानी सकाळी सहा वाजता चपात्या लाटायला घेतल्या की दहावाजे पर्यंत जेमतेम तेव्हड्या चपात्या भाजून तयार व्हायच्या.”

“जास्त न शिकलेल्या पण जेवण करण्यात आवड असलेल्या महिलांना रोजगार देऊन त्यांची आर्थिक परिस्थिति सुधरवण्यासाठी ही उपाय योजना करणार्‍या त्या महिलामंडळाचा प्रयत्न खरंच स्तुत्य होता.”
मी गणेशला म्हणालो.

“पण सांगायचा मुद्दा असा की,माझ्या पत्नीने हे काम पत्करून आमच्या संसारात स्थिरता आणली.आणि अनेक दृष्टीने ते खरंच होतं.त्याशिवाय माझ्या पत्नीत बदलावही आला.ती त्यामुळे जास्त पोक्त आणि व्यवसाईक झाली.तिला संसारात रस घ्यायला हुरूप येऊ लागला आणि माझ्यावर प्रेमही करीत राहिली.”
गणेश अगदी खूशीने सांगत होता.
“आमचं लग्नाचं आयुष्य म्हणजे एका आनंदमेळातल्या गोल चक्रीसारखं होतं.त्या चक्रातच आम्ही गोल गोल फिरत असायचो. आम्ही कधी मधुचंद्राला गेलो नाही, नाकधी फिरायला हिंडायला,माथेरान-महाब्ळेश्वरला,गेलो.आमची आर्थिक स्थितिच अशी होती की हे कधी जमण्यासारखं नव्हतं.”

“फिरायला,हिंडायला जाण्याचा उद्देश प्रेक्षणीय स्थळं पहाण्याचा जरी असला तरी मुलतः एकमेकाच्या सहवासात असण्याची ती कोशिश असते.”
मी गणेशला त्याबद्दल नाराजी वाटूं नये म्हणून म्हणालो.

“तुमची कंपनी सोडल्यावर ह्याच गोष्टीची मला उणीव भासायची.
तुम्ही अगदी दुसर्‍याच्या मनातलं सांगता.”
गणेशला आमच्या कंपनीत होता त्या दिवसाची त्याला आठवण आली असावी.म्हणाला,
“आम्ही नवरा-बायको एकमेकाच्या सहवासात असतो हेच आम्हाला समाधानीचं आहे.आमचे आनंदाचे क्षण म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या मुलांना खेळताना-बागडताना आणि शाळेचा अभ्यास करताना पहातो.कधी कधी आमचा धाकटा मुलगा- जरा मतिमंद आहे- त्याच्याशी संपर्कात असताना त्यानेच त्याच्यासाठी तयार केलेल्या भाषेतून आम्हाला समजण्यासारखे अर्थ काढायला,त्याच्याबरोबर वेळ घालवण्यात आनंद घेतो.
मी आणि माझी पत्नी एकमेकात संतुष्ठ राहून संसारातल्या जाणीवा-उणीवाबद्दल आणि मुलांच्या संगोपनाबद्दल शांत आणि सौजन्यपूर्वक राहून चर्चा करून मार्ग काढतो.आमच्या दोघापैकी कुणालाही
“अहो (किंवा अग) मला काही बोलायचं आहे.”
असं एकमेकांना सांगावंच लागलं नाही.आम्ही नवरा-बायको असल्याने संसारासंबंधी एखाद्या समस्येबाबत काहीना काही बोलणं भागच असतं.”

“हेच,हेच तुझं कोकणीपण तू आमच्या कंपनीत असताना मला भावायचं.कांटेरी फणसातला आतल रसाळपणा, खडबडीत सीताफळाच्या आतलं माधुर्य, कांटेरी करली मास्याचा गोड आणि चविष्टपणा,हे कोकणी मातीतले आणि समुद्रातले गोड अंश कोकणी माणसात न आले तरच नवल.”
गणेश सकपाळचा हात माझ्या हातात घेऊन मी भाऊक होऊन बोललो.

“माझ्या बर्‍याच जणांशी ओळखी आहेत.रोज अनेक लोकांना बघायला,त्यांच्याशी बोलायला बरं वाटतं.मला कुणीही शत्रू नाही. आणि माझी पत्नी, सुलभा,माझी एक खरी जीवनसाथी आहे.मी जसा आहे तसा तिला पसंत आहे,आणि माझ्याकडून कधी चुका झाल्या असल्यास त्या दृष्टीने तिने आपलं मत कधीच बनवलं नाही.
आम्ही एकमेकाचे साथी म्हणूनच रहातो.एकमेकाला सहयोग देतो.आजुबाजूच्यांच्या संसारात होत असलेल्या घटनांकडे पाहून आम्ही एकमेकांकडे विस्मयीत होऊन,भयभीत होऊन पहात असतो. त्यांचे भांडण,बखेडे आम्हा दोघाना घाबरवून सोडतात.आम्ही एकमेकाची कदर करतो.आणि सगळं स्वय़ंसिद्ध आहे असं समजून रहात नाही.अर्वाच्य भाषा बोलणं आणि एकाने दुसर्‍याला गप्प करणं हे थट्टा-मस्करीतसुद्धा चालू देत नाही.”
सकपाळ मला आपलं मन उघडं करून सांगत होता.

मला गहिंवरून आलं.मी गणेश सकपाळला म्हणालो,
“थोडक्यात सांगायचं झाल्यास,जरी तुमच्या जीवनात,तसंच संसारात स्थैर्य नसलं,आणि काही वेळा परिस्थिति हाताबाहेर गेल्यासारखी झाली असली, तुमची अनिश्चीत आणि असंभवनीय हालत असली तरी,एका गोष्टीची तू विवंचना करीत नाहीस आणि ती गोष्ट तुझ्या अंतरात ठाम बसून राहिली आहे,ती म्हणजे तुझी पत्नी तुझ्यावर प्रेम करते आणि तू तिच्यावर.”
माझं हे ऐकून सकपाळ गालातल्या गालात हंसला.एव्हड्यात,

“साहेब आणखी काही हवंय का?”
वेटरने आमच्या जवळ येऊन विचारल्यावर मी समजायचं ते समजलो.गणेश सकपाळचा हात मी माझ्या हातात पुन्हा घट्ट धरला पण तो भाऊक होऊन नव्हे.त्याने आपल्या खिशात हात घालून बिल देऊ नये यासाठी.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com