Saturday, August 7, 2010

दृढविश्वास

“साध्या साध्या गोष्टीवर भरवसा ठेवा.आणि हा भरवसा तुमचा दृढवि़श्वास होवो.”

मी खालसा कॉलेजमधे गणीताचा विषय शिकायला जायचो.बरेच असे माझे प्रोफेसर सरदारजी होते.प्रो.वर्यामसींग तर माझे खास होते.त्यांची स्टॅटिस्टीकवरची लेक्चर्स मी कधीच सोडली नाहीत.
सॉलीड जॉमेट्री आणि कॅलक्युलस हे ही माझे प्रिय विषय असायचे.
आज मी बरेच दिवसानी खालसा कॉलेजला भेट दिली.प्रो.वर्यामसींग आता प्रिन्सिपॉल झाले म्हणून मी ऐकलं होतं. त्यांना भेटायची मला खास इच्छा वाटत होती.मी टिचर्सरूममधे डोकावून पाहिलं.एक सरदारजी प्रोफेसर माझ्याकडे बघून हंसले.मी पण हंसलो.त्यांच्या हंसण्यात चेहर्‍यावर मला प्रो.वर्यामसींगची झांक दिसली.कुतूहल म्हणून मी त्यांन विचारलं,
“आपण प्रो.वर्यामसींगचे कुणी लागता का?”
“मी त्यांचा मुलगा प्रो.मोहनसींग”
असं मला ते म्हणाले.
मी सिनीयरला असताना हे मोहनसींग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होते.त्यानीही गणीतात पीएचडी करून थोडे दिवस टीआयएफआरमधे गणीताच्या फॅकल्टीमधे संशोधन केलं होतं.ऍडव्हन्स इंटिग्रेशन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.त्यांच्या वडीलांनीच त्यांना खालसा कॉलेजमधे शिकवायची विनंती केली होती.

ही सर्व माहिती मला सांगताना त्यांना आनंद होत होता कारण मी पण त्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी होतो.
पिढ्यानपिढ्या मुंबईत राहिल्याने बर्‍याच सरदारजीना मराठी अस्खलीत बोलता यायचं.माझे काही सरदारजी मित्र मराठीतच बोलायचे.
प्रो.मोहनसींग पण माझ्याशी मराठीतच बोलत होते.
एक पिर्यड संपेपर्यंत मला त्यांनी बसायला सांगीतलं.नंतर आम्ही कॅन्टीनमधे गप्पा मारायला गेलो.
इकडच्या तिकडच्या बर्‍याच गप्पा झाल्यावर,बालपणातल्या आठवणी काढून आम्ही बोलत होतो.
दृढवि़श्वास म्हणजे काय?ह्यावर आमची चर्चा चालली होती.

प्रो.मोहनसींग मला म्हणाले,
“मला आठवतं,आमच्या शाळेतले शिक्षक आम्हाला भरवंसा असणं किंवा दृढवि़श्वास असणं म्हणजे काय ते असं विस्ताराने सांगायचे.
“दृढवि़श्वास असणं म्हणजेच एखाद्या विचाराने तुमच्या मनाला त्याबाबत जखडून ठेवणं,बंदिस्त करणं.”

रंगात येऊन पुढे म्हणाले,
“माझा एक मित्र, बोलता आणि ऐकता न येणार्‍या, मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून होता.मला आठवतं एकदा मी सहजच त्याला दृढविश्वास हा शब्द तू तुझ्या वर्गातल्या मुलांना त्यांच्या भाषेत कसा समजावून सांगशील? असं कुतूहलाने विचारलं.
“अगदी सोपं आहे”
मला मित्र म्हणाला.
“उजव्या हाताचं दर्शनीय बोट,आपल्या कपाळाकडे दर्शवून झाल्यावर तोच हात उघडून,तळवा खाली दिसेल असा घेऊन डाव्या बंद मुठीच्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूला नेऊन चटकन टेकवायचा,जणू माशी पकडल्या सारखं वाटावं”
त्याचा अर्थ दृढविश्वास असं होईल.”

“तुमच्या मित्राने दृढविश्वासाची ती साईन लॅन्गवेज दाखवून केलेली व्याख्या,जरी यथातथ्य असली तरी,मला ती बरीच बुद्धिपुर:सर वाटते”.
मी प्रो.मोहनसींगना माझं मत दिलं.

“खरं आहे तुमचं म्हणणं”
प्रोफेसर मला म्हणाले.पुढे सांगू लागले,
“आता इतक्या वर्षांनी विचार केल्यावर वाटायला लागलं की, दृढविश्वासाचा माझ्या मित्राने दाखवलेल्या साईन लॅंग्वेजचा विचार केल्यावर त्या शब्दाच्या सत्यते ऐवजी, दाखवण्याच्या ढंगाचा त्यावेळी माझ्यावर जास्त प्रभाव झाला होता.”

“अगदी बरोबर मला हेच सांगायचं होतं.”
असं सांगून मी म्हणालो,
“ही सत्यता काय? तर दृढवि़श्वास म्हणजेच तुमच्या मनाला जखडून ठेवणारा विचार,जो तुम्ही काहीही केलंत तरी तुम्हाला त्याला त्याज्य करता येणार नाही. बरोबर ना?”

“प्रश्नच नाही”
असं म्हणून प्रोफेसर सांगू लागले,
“अगदी माझ्या बालपणापासून अजून पर्यंत,ह्याच कल्पनेने माझा ताबा घेतला आहे,जणू मला दाव्याने बांधून ठेवलं आहे.मला जबरद्स्त दृढविश्वास आहे की,प्रत्येक साध्या साध्या बाबतीत सुंदरतेचा आणि संगीताचा अर्थपूर्ण अंश असतो.
मग मी जरी गर्दीत चालत असलो,कॉलेजच्या टिचर्सरूम मधे बसलेला असलो,किंवा घरात वावरत असलो तरी, लहान मुलांत प्रत्येक परिस्थितित जसं औत्स्युक्य असतं,जे अनेक लोकात रोजच्या झकाझकीत लोप पावलेलं असतं,ते माझ्यात परिपूर्ण वास्तव्य करून असतं.

अगदी आत्ता जरी मी माझ्या वर्गामधे बसून खिडकीतून बाहेर पहात असताना एका फांदीवरचं लहानसं पान,येणार्‍या वार्‍याच्या झोतीशी संघर्ष करता करता फांदीचा त्याग करून वार्‍याला कसं शरण गेलं ते पहात असलो तरी.
ह्या असल्या साध्या बाबी इतराना भेट म्हणून द्याव्यात किंवा माझ्या जबरदस्त उत्साहाचा अंश म्हणून त्यांच्याकडे विवरण कराव्यात असं मला वाटत असतं.”

हे ऐकून मी म्हणालो,
“कदाचीत हे खरंही असेल की तुमच्या अशा प्रकारच्या दृढविश्वासातून त्याचा हेतू बराच अस्पष्टपणे दिसला जात असेल.पण तसं असलं तरी तुमच्यातच तुम्ही त्याच्यात असलेल्या विस्मयाचा अर्थ विकसीत करण्याच्या प्रयत्नात असता असं मला दिसून येतं.”

जणू मी त्यांच्या मनातलं बोललो असं वाटून प्रोफेसर मला म्हणाले,
“साधं उदाहरण म्हणून सांगतो,
त्या कोवळ्या सुंदर सूर्यकिरणानी तुमचा चेहरा किती उजळ दिसतो किंवा समुद्राचं पाणी किती नीळंभोर दिसतं हा माझ्या मनात आलेला साधा विचार पण माझ्या मित्रांशी, कुटूंबीयांशी,सहकार्‍यांशी आणि ओळखदेख असलेल्याशी मी वाटण्याच्या प्रयत्नात असतो.

मी आशा करतो की एकवेळ अशीही येईल की रोजच माझ्या मुलांना अशा लहान लहान गोष्टीतून मिळणारा आनंद आणि त्यावर असलेला त्यांचा दृढविश्वास ती मलाही वाटतील.
मला आठवतं माझ्या सृजनशील आईवडीलांनी आणि उत्तेजन देणार्‍या शिक्षकानी माझ्या मनात भरवून दिलं की हे जग विस्मयकारी आहे आणि हीच कल्पना मी इतरांच्यात मनात भरवून देईन अशी आशा करतो.

माझ्या भविष्याकडे पाहिलं तर,शिक्षक होण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला नकळत इंधन मिळालं ते मी प्रोफेसर आहे म्हणून त्यामुळे विद्यार्थ्यांची मनं जाळ्यात अडकवण्याची शक्यता एक व्याख्येने का होईना,सफल होत आहे.
माझ्यात शब्दबंबाळपणा जरी असला तरी मी जर का एकच व्याख्या निवडली तरी माझे शब्द अगदी सहजसाध्य असतील.”

गणीतासारख्या क्लिष्ट विषयावर पिएचडी घेणारा हा प्रोफेसर जीवनातल्या साध्या साध्या बाबतीत किती स्वारस्य घेऊन असतो हे बघून त्याचं कौतूक करावं असं माझ्या मनात आलं.

माझ्या चेहर्‍यावरचा भाव पाहून प्रो.मोहनसींग म्हणाले,
“साध्या साध्या गोष्टीवर भरवसा ठेवा.आणि हा भरवसा तुमचा दृढवि़श्वास होवो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com