Saturday, August 21, 2010

फास्कूचं प्रेम.

“इतक्या वर्षांनंतर अजून पर्यंत तू त्या जोषाचा आनंद घेत असतोस. समुद्राच्या इतकं जवळ राहून,पडावातून भर समुद्रात जाऊन मासेमारी करण्याच्या व्यवसायामुळे तू तुला नशीबवान समजत असावास”.

दर पावसाळ्यात मी कोकणात जातो.मला कोकणातला पावसाळा खूप आवडतो.मे महिन्याच्या उष्म्याने हैराण झालेले लोक पावसाची वाट पहात असतात.मृग नक्षत्र लागलं की कोकणी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून असतो.पूर्वी घडाळाच्या काटयासारखा पाऊस सात जूनला कोकणात कोसळायचा.पाउस येण्यापुर्वी एखादा आठवडा वावटळी वार्‍यांना जोर यायचा.मे महिन्याच्या शेवटी शेवटी असं व्हायचं.पावसाच्या आगमनाची ते संकेत असायचे.

कडाम कुडूम असा आवाज काढून वीजा चमकायला लागल्या की समजावं साहेब येत आहेत.
“इलो रे इलो” असं जोरात रस्त्यावरून कुणीतरी ओरडत जायचं.”इलो” म्हणजे कोण “इलो” हे ज्याने त्याने समजायचं.पावसाला एखादा पाहूणा समजून त्याला उद्देशून बोलायचे.

पहिल्या आठ दिवसात पाऊस कोसळून कोसळून गार गार झाल्यावर कोकणातलं वातावरण कॅलिफोरनीया सारखं वाटायचं.
मग बाजारात ना ना तर्‍हेची फुलं यायची.चाफ्याच्या फुलाचे किती प्रकार? नागचाफा,सोनचाफा,कवटीचाफा,देवचाफा,हिरवाचाफा.ओवळीची फुलं,आबोलीची फुलं,सुरंगीची फुलं, कमळं, कृष्ण कमळं किती फुलांची नावं घ्यावीत.
आणि लवकरच गणपतीबाप्पाचं आगमन होणार ह्याची चाहूल लागायची.

ह्यावेळी मात्र पावसाळ्यातल्या पहिल्या आठवड्यात मी कोळी वाड्यात माझ्या मित्राला- पास्कला -भेटायचं ठरवलं होतं.त्याच्याशी गप्पा मारत एक दिवस काढायचं ठरवलं होतं.पास्कल माझा शाळकरी मित्र.आम्ही त्याला फास्कूच म्हणायचो.ताजे मासे हवे असल्यास माझी आई फास्कूकडे जाऊन घेऊन यायची.फास्कूचे मासे-मारीचे पडाव होते.

पावसाळ्यात पडाव, मासे-मारीसाठी जात नाहीत हे मला माहित होतं.म्हणूनच पास्कल घरी नक्कीच भेटणार ह्या उद्देशाने मी त्याच्या घरी गेलो.
कोळीवाड्यातली घरं सारखीच दिसायची.पास्कलचं त्यामानाने जरा हटके होतं.अलीकडेच त्याने चिरेबंदी घर बांधून छप्पर मंगळोरी कौलांनी शाखारलं होतं.त्यामुळे घर ओळखून काढायला सोपं होतं.
फास्कू मला पाहून खूश झाला.आणि म्हणाला,
“ये बामणा ये.खूप दिवसानी इलंस.वाट चूकलंस नाय मां?”
शाळेत असल्यापासून फास्कू मला बामण म्हणूनच संबोधायचा.कदाचीत हे त्याने आपल्या आजीकडून उचलं असावं. लहानपणी त्याच्या घरी गेल्यावर माझं नाव घेण्याऐवजी मला बामण म्हणायला तिला सोपं जायचं.
“पावसाळ्यात पडाव समुद्रात जात नसल्याने तुम्हा लोकांचं वेळ घालवणं मोठं कठीण जात असेल नाही काय?”
मी फास्कूला प्रश्न केला.

मला म्हणाला,
“आम्हा कोळ्याना पडावात बसून समुद्रात मासे मारायला जाणं म्हणजे एक प्रकारचं कुटूंबीयानी एकत्र आणण्यासारखं आहे.पडावात असणं म्हणजे एक प्रकारचा आराम वाटतो,नव्हेतर काहीतरी शिकल्यासारखं वाटतं,एक प्रकारची जोखीम घेऊन पुढचा मार्ग काटण्याच्या प्रयत्नात असल्यासारखं वाटतं.
पावसाळा सोडलातर वर्षाच्या इतर दिवसात समुद्रावर रहायला मोकळीक असते.समुद्र अक्षुब्ध असताना वातावरणातली शांतता,आणि सहज बदलणार्‍या,नाजूक हेलकावे देणार्‍या लाटा हळू हळू पडावाला क्षितीजाकडे नेत असतात.”

“सांग रे पास्कल तुझा लहानपणापासूनचा अनुभव.मला ऐकायला बरं वाटेल”
मी लागलीच त्याला म्हणालो.
पास्कल सांगू लागला,
“आईवडीलांबरोबर मी वयाच्या तिन वर्षापासून पडावात बसून समुद्राचं वातावरण उपभोगलं आहे.माझ्या म्हातार्‍या आजीकडे माझी आई माझ्या सुरवातीच्या वयात मला ठेवून जायची.आणि त्यानंतर आईवडीलांबरोबर जायला मला चटक लागली होती.अगदी ते जाणं नैसर्गिक होतं.”
फेणीची बाटली ग्लासात रिकामी करीत करीत,
“तू सोवळो बामण तुका ह्या जमांचां नाय.पाणी-कम-दुधाची कॉफी माझी बाईल तुझ्यासाठी करताहां.वाय़ंच धीर धर.”
असं म्हणून फास्कू घोट घेण्यासाठी ग्लास तोंडाजवळ नेत रंगात येऊन म्हणाला,
“मी जसा मोठा होत गेलो,तसा माझे बाबा मला पडावाविषयी आणि समुद्राविषयी जास्त माहिती देऊं लागले. पाण्यात होडी कशी ढकलायची,व्हल्लं कशी हलवायची,शीडं कशी उघडायची आणि वार्‍याला सामोरं जाऊन शीडांची दिशा कशी पकडून धरायची.रापणीसाठी जाळं कसं समुद्रात पेरायचं,जाळ्याला ओढ लागल्यावर भरपूर मासे लागल्याने जाळी खेचून पडावात कशी डाळून ठेवायची,एक ना अनेक कामं मला समजावली होती.मी सतरा वर्षाचा होई पर्यंत ही सगळी कामं आत्मसात केली होती.कधी कधी मी शाळेला बुट्टी मारायचो.त्याचं कारण हेच.”

“का रे? तुला शिक्षणात गम्य नव्हतं का? नंबर तर तुझा चांगला वरचा असायचा”
पास्कला आमचे गुरूजी हुशार मुलगा आहे असं समजायचे ते आठवून मी त्याला म्हणालो.

मला म्हणाला,
“वडील म्हणायचे शिकून तरी काय करणार.शेवटी समुद्रातच आयुष्य घालवायचं आहे.मला माझ्या बाबांचं हे म्हणणं पटायचं नाही.पण त्यांचं मन मोडवत नव्हतं.त्यामुळे कधी कधी शाळेत गैरहजर रहायचो.”
आणि पुढे सांगू लागला,
“ही मासे-मारीची सर्व कामं मला शिकून अंगवळणी करायला जास्त वेळ लागला नाही.
आता माझ्या आईबाबांच वय झालं आहे.तेव्हा मीच ही सर्व कामं करतो.फरक एव्हडाच की आता माझ्याबरोबर माझी बायको आणि मुलगा असतो.
पण मुलाला मी शाळेत गैरहजर होऊ देत नाही.शाळेच्या सुट्टी दिवशी मी त्याला निक्षून घेऊन जातो.माझा मुलगा पण ह्या कामात स्वारस्य घेतो.
माझ्या कुटूंबीयाना पडावातून घेऊन जायला मला खूप आनंद होतो.”

“मग तू काय करतोस पडावात?
आता तुझा मुलगा मोठा झाला आहे.”
मी कुतूहलाने फास्कूला प्रश्न केला.

मला म्हणाला,
“बरेच वेळा मी शीडाच्या काठीला टेकून स्थीतप्रज्ञ झाल्यासारखा होऊन बसतो.माझा मुलगा बायको बाकी कामं करीत असतात.समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठ भागावरून येणारा थंड थंड वारा त्याच्याबरोबर खार्‍या चवीने मिश्रीत झालेली वाफ घेऊन सतत चेहर्‍याला चाटून जातो तेव्हा किनार्‍यावरचा सर्व प्रकारचा तणाव आनंदात विरून जातो.हे अनुभवायला तुला प्रत्यक्ष माझ्याबरोबर एकदा मासे-रापणीलाच यावं लागेल.
भर समुद्रात पडावात बसून वेळ घालवण्याच्या रोमांचकारी कल्पना आणि पडाव उलथून जाऊन समुद्रात बुडून जाण्याच्या भीतिवरच्या कल्पनेची उगाचच वाटणारी मनोरंजकता हे नुसतं सांगून कळणार नाही.त्यासाठी अनुभव येणं अगदीच विरळं म्हटलं पाहिजे.”

“पडावातून समुद्रात जाणं आणि समुद्राच्या पाण्यावर वेळ दवडणं म्हणजेच तुझ्या कुटूंबीयाना आणि कधी कधी माझ्यासारख्या मित्राना एकत्र आणून दिवस आनंदात घालवल्याचं श्रेय तुला मिळत असेल.”

“अगदी बरोबर”
असं म्हणत फास्कू म्हणाला,
“मी तुला गंमत आठवते ते सांगतो
लहानपणीचं मला आठवतं,माझी आई अगदी पहाटे उठून जोंधळ्याच्या भाकर्‍या भाजायची.आदल्यादिवशी पकडलेल्या ताज्या मास्यांचं,मडक्यात -मातीच्या भांड्यात-शिजवलेलं कालवण,आणि काही तेलात तळलेले मास्यांचे तुकडे हे सर्व एका मोठ्या परातीत बांधून घ्यायची.कधी कधी भाकर्‍या ऐवजी उकड्या तांदळाचा भात घ्यायची.ही शिदोरी बरोबर घेऊन आम्ही पडावावर जायचो.सूर्योदय होण्यापूर्वी आम्ही किनार्‍यावर यायचो.पहाटेच्यावेळी समुद्रावरून येणारी थंड वार्‍याची झुळूक अंगावर काटा आणायची.सगळे मिळून पडाव, वाळूवरून समुद्रात ढकलत न्यायचो.एकदा पडावाच्या बुडाला पाणी लागलं की सगळेजण उड्या मारून पडावात जाऊन बसायचो.माझ्या बाबांकडे ट्रान्झीसटर असायचा.भर समुद्रात जपानहून स्मगल करून आलेल्या इलेक्ट्रॉनक्सच्या मालातून कुणीतरी त्यांना हा ट्रान्झीस्टर दिला होता.
मुंबईहून ऐकायला येणारं सकाळचं भक्तिसंगीत ऐकायला मला खूप मजा यायची.आम्ही सर्व त्या वातावरणातला आनंद लुटायचो.माझे आईबाबा, मी,माझी धाकटी बहिण आणि तुझ्यासारखे बरोबर येणारे काही मित्र असे आम्ही सर्व मिळून त्या उत्कट जोषात भागीदार व्हायचो.”

“इतक्या वर्षांनंतर अजून पर्यंत तू त्या जोषाचा आनंद घेत असतोस. समुद्राच्या इतकं जवळ राहून,पडावातून भर समुद्रात जाऊन मासेमारी करण्याच्या व्यवसायामुळे तू तुला नशीबवान समजत असावास”.
मी फास्कूला म्हणालो.

“अगदी माझ्या मनातला बोललंस बामणां.”
असं म्हणत पास्कल पुढे म्हणाला,
“हा माझा जीवनभरचा आनंद आणि जोष जो मी मनमुराद उपभोगतो आहे,शिवाय माझं समुद्रावरचं प्रेम आणि थंडगार हवेमुळे तणावमुक्त मिळणारा आराम मी जीवंत असे पर्यंत माझ्या बरोबर रहावा अशी मी देवाकडे प्रार्थना करीन.मला पडावावरचं जीवन विशेष वाटतं.”

रीप रीप पडणारा पाऊस बराचसा कमी झाला होता.निघताना पास्कलला आलिंगन देत निरोप घेण्यापुर्वी मी म्हणालो,
“फास्कू नारळी पौर्णिमेदिवशी नारळ समुद्रात भिरकावल्यावर समुद्र शांत होतो आणि तुमचे पडाव समुद्रात मासे-मारीसाठी जातात त्यावेळी मी नक्कीच तुझ्याबरोबर येईन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com