Tuesday, August 24, 2010

आईस्क्रीम कोन खाण्याची कला.

“माझी जीभ,ह्या शंकूच्या टेंभ्यावर चक्राकार फिरवून,खाली-वर करून,नाचत रहाते.असं करताना,समतोल राखून,साफसूफ करून आकार देत देत,एक ठिसूळ,कलात्मक वास्तु तयार होते.”

जूनमधे पाऊस येण्यापूर्वी मे महिन्याचा उष्मा पराकोटीचा असतो.आज जास्तीत जास्त पारा वाढणार आहे म्हणून हवामान खात्याने भाकीत केलं होतं.

माझा पुतण्या माझ्याकडे आला होता.संध्याकाळीही एव्हडा उष्मा होतो हे पाहून त्याने मला गोड सुचना केली. आपण जुहू चौपाटीवर जाऊन बास्कीन-रॉबीनचं आईसक्रीम खाऊ या.मी लागलीच कबूल झालो.आईसक्रीमच्या दुकानात गेल्यावर माझ्या पुतण्याने एक भन्नाड कल्पना सुचवली.येताना त्याने आईस कन्टेनर बरोबर घेतला होता. मी तेव्हडं लक्ष दिलं नव्हतं.

मला म्हणाला,
“दुकानात बसून आईसक्रीम खाण्यापेक्षा आपण आईसक्रीम कोन घेऊया आणि बीचवर समुद्राच्या पाण्यातून पाणी तुडवीत जाता जाता कोन खात खात चालूया”
मला काहीच प्रॉबलेम नव्हता.जवळ जवळ एक डझन निरनीराळ्या आईसक्रीमचे कोन घेऊन आम्ही निघालो.
“खाऊन उरले तर घरी घेऊन जाऊया”
मला पुतण्या म्हणाला.

आज समुद्रावर भरती होती.चौपाटीवर पाणी किनार्‍यावर भरपूर आलं होतं.भरतीमुळे समुद्रावरून हवा किनार्‍यावर येत होती. त्यामुळे घरी होणारा उष्मा मुळीच जाणवत नव्हता.एक एक कोन खाऊन झाल्यावर,
“जरा वाळूवर बसुया”
म्हणून माझा पुतण्या मला म्हणाला.
सन -ऍन्ड -सॅन्डच्या किनार्‍यावरच्या भिंती जवळ आम्ही जाऊन बसलो.
“पाण्यात चालत चालत जाता जाता कोन खाऊंया असं तू म्हणालास आणि एकच कोन खाऊन बसायचं का ठरवलंस?”
मी कुतूहल म्हणून माझ्या पुतण्याला विचारलं.

मला म्हणाला,
“माझ्या मनात एक विचार आला आणि तुम्हाला सांगून टाकावा असं वाटल्याने मी लगेचच माझा तो विचार बदलला.”
आणि पुढे सांगू लागला,
“मघाशी तुमच्याबरोबर चालत असताना मला माझ्या लहानपणाची आठवण आल्याशिवाय राहावलं नाही.माझे बाबा, तुम्ही आणि मी बरेच वेळा आईसक्रीम खायला जायचो.मला आईसक्रीम आवडतं हे माझ्या बाबांना चांगलच माहित होतं.बरंचसं आईसक्रीम, माझ्या तोंडात जाण्याऐवजी, चेहर्‍यावर चोपाडलं जायचं.माझे हात चिकट होऊन, माझी बोटं बुळबूळीत होऊन जायची,आईसक्रीममुळे कोन दलदलीत व्हायचा आणि ते रुचकर मिष्ठान्नं पूरं संपवू शकत नसायचो.त्या दिवसांची मला आठवण आली.आता वाटतं काय तो कोन व्यर्थ फुकट जायचा.”

मला त्याचं लहानपण आठवलं.मी म्हणालो,
“लहान वय असताना भला मोठा आईसक्रीमचा कोन खायला दिल्यावर तू म्हणतोस तसंच होणार.पण खरं सांगू, आईस्क्रीम कोन चाटणं ही एक कला आहे असं मला वाटतं.
ऐकून जरा चमत्कारीक वाटेल,पण ही अगदी साधी आणि मस्त आनंद देणारी क्रिया बरीचशी दुर्लक्षीत झाली आहे.”

माझं हे बोलणं ऐकून पुतण्या मला म्हणाला,
“आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतंय की,आईस्क्रीम कोन हे काही नुसतं हातात धरून खायचं गोड मिष्ठान्नं नाही. उलट मला वाटतं,तो एक छोटासा मलाईदार बर्फाचा,कुरकूरीत पिठाच्या शंकूच्या बैठकीवर बसवीलेला, पुतळा आहे असं मी समजतो.”

“मला वाटतं तू शिल्पकार झाल्यानंतर असले विचार तुझ्या मनात येत असावेत.कारण तू पुतळा वगैरे म्हणतोस म्हणून माझ्या मनात तो विचार आला.”
मी म्हणालो.

“माझी जीभ,ह्या शंकूच्या टेंभ्यावर चक्राकार फिरवून,खाली वर करून,नाचत रहाते.असं करताना,समतोल राखून, करून आकार देत देत,एक ठिसूळ,कलात्मक वास्तु तयार होते.”
असं म्हणून माझ्याकडे माझा पुतण्या,मी काहीतरी बोलेन,याची अपेक्षा करीत बघत राहिला.

मी त्याला हंसून इशारा केला,
“बोल,आणखी बोल मला तुझं शिल्पकार पुराण ऐकायचं आहे”

जरा खाकरून गळा साफ करीत म्हणाला,
“तुम्ही असं म्हणताच तर नेहमीच मला आईसक्रीम कोन खाताना काय वाटतं,माझ्या मनात काय विचार येतात, ते तुम्हाला सांगतो.
जसं चांभाराचं लक्ष चप्पलाकडे,स्वयंपाक्याचं लक्ष मोठ्या झार्‍याकडे,गाणार्‍याचं लक्ष पेटी-तबल्याकडे,तसंच माझं लक्ष वास्तु बनवण्याकडे जात असतं.

आईसक्रीम कोन खाताना माझ्या ह्या उत्तम कृतीत क्षणभर मी मुग्ध झालो असताना,आणि स्वर्गीय सुखाची चव घेत असताना, पिक्यॅसो,विन्सी,राजा रवीवर्मा, आणि आताचे एम.एच.हुसेन ह्यांच्या सारखं माझ्याच कला-कृतीबद्दल मी मुल्यमापन करीत असतो.कॅनव्हासवर रंग घेऊन ब्रशचे फटकारे मारल्यासारखं मी माझ्या जीभेने आईस्क्रीमवर फटकारे मारतो.अशावेळी माझ्या कलाकृतीची बनावट पहाण्यात मी दंग रहातो.”

मी म्हणालो,
“आता संध्याकाळ आहे म्हणून ठीक.पण जर का उन्हात आईसक्रीम खायला लागलास तर ते वितळून जाणार.आणि तुझा पुतळा दिसणार नाही.”

“त्याचंही माझ्याकडे स्पष्टीकरण आहे.”
मला सहजच सांगू लागला,
“सूर्यप्रकाश जरा तीव्र झाल्याने माझं आईसक्रीम वितळायला सुरवात झाली की अशावेळी व्यग्रतेने मी माझा आईसक्रीम कोन चाटत असताना, एखाद्या आर्किटेक सारखं युक्तिपूर्वक विचार करून मी सत्वर माझ्या डोक्यात एखाद्या नकाशाची रूपरेखा तयार करतो. तितकी प्रवीणता दाखवून,मी माझ्या आईसक्रीम कोनला अशा प्रकारे आकार देण्याच्या प्रयत्नात रहातो की,त्या कुरकूरीत शंकूच्या बाहेरच्या भागावर ते आईसक्रीम ओघळून जावू
नये म्हणून,आणि बरोबरीने आईसक्रीमचा थेंब अन थेंब वाचवावा म्हणून प्रयत्नात असतो.”
पुन्हा थोडासा थांबून,चेहरा थोडा गंभीर करून मला म्हणाला,
“नंतर नंतर माझे बाबा मला आईसक्रीमचे लाड पूरवीत नसत.आईसक्रीम देण्यापूर्वी सौदा व्हायचा.”
मला माझ्या भावाची आठवण आली.तो बराच व्यवहारी होता.आपल्या वडीलांची काय आठवण करून सांगतो ते ऐकायला मला कुतूहल निर्माण झालं.

मी म्हणालो,
“मी तुझ्या बाबाला चांगलाच ओळखतो.माझा भाऊच पडला की रे. पण तु कसा ओळखतोस ते ऐकायला मला आवडेल.”

मला पुतण्या सांगू लागला,
“मला आठवतं माझ्या किशोर वयात वरचेवर आईसक्रीम खायला मला मिळत नसायचं.,मला चांगले मार्क्स मिळाले तर, कुठच्यातरी सोहळ्याला जायचं असलं तर किंवा माझ्याकडून अतीशय चांगलं आचरण झाल्याचं दिसून आलं तरच आईसक्रीमच्या दुकानात जायला मिळायचं. व्हेनीला आईसक्रीमची ती सुंदर कृती,त्यावर शिंपडलेले ते रंगीबेरंगी चॉकलेटचे कण असलेला तो आईसक्रीमचा कोन माझ्या हातात पडल्यावर माझ्याकडून निमीषात तो माझ्या तोंडात कोंबला जायचा, आणि असं करताना मी काहीसा असफल होऊन माझा मेंदू सुन्न होण्याची पाळी यायची.”

मी माझ्या पुतण्याचं सान्तवन करण्याच्या विचाराने त्याला म्हणालो,
“आता तर ह्या वयात तुझ्या अनुभवात खूपच सुधारणा झाली आहे.आता तर तू आईसक्रीमच्या कोनाकडे एक रुचकर कलाकृती असं पाहून,तो खाताना प्रत्येक क्षण उराशी बाळगून घालवत आहेस.तू मनमुराद त्याचा स्वाद घेत आहेस.
नाहीतरी,आईसक्रीम सारख्या मिष्ठान्नाची मजा लुटताना जीवनात जल्दबाजी करून काय फायदा?”

आता समुद्रावर काळोख झाला होता.उरलेले आईसक्रीम कोन वितळून जाऊ नयेत म्हणून आम्ही घरी चालत न जाता,रिक्षा करून गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com