Sunday, August 29, 2010

लेखन करण्यात मला विशेष वाटतं.

“मला वाटतं माझं लेखन,मला जे हवंय, ते देऊ शकतं आणि माझ्या लेखनातून,मला जे हवंय,ते होऊ शकतं.”

एका सेमिनारमधे माझी आणि महेंद्र नाडकर्णीची भेट झाली.महेंद्र उत्तम लेखक आहेत हे मला पूर्वीच माहित होतं. पण ह्या सेमिनारमधे मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं.पन्नाशीत आलेले,सहाजीकच स्थुलतेकडे थोडे झुकलेले,डोक्यावरचे केस विरळ होण्याच्या मार्गाला लागलेले,छुटकुल्या उंचीचे,चेहर्‍यावर मिस्कील हास्याची लकीर भासवणारे महेंद्र नाडकर्णी मला माझ्या मनावर छाप पाडणार्‍या व्यक्तीमत्वाचे वाटले.

सेमिनारमधे ज्या विषयावर आम्हा दोघांना विशेष स्वारस्य नव्हतं त्या तासाला आम्ही गरम गरम कॉफीच्या पेल्यावर कॅन्टीनमधे गप्पा मारण्यात वेळ घालवायचं ठरवलं.
महेंद्रांची आणि माझी आमच्या एका सामाईक मित्राने ओळख करून दिली.तो मात्र कॅन्टीनमधे आमच्या बरोबर नव्हता.

“तुम्ही लेखन करायला कसे प्रवृत्त झाला?”
असा सरळ प्रश्न मी नाडकर्ण्यांना केला.मला माहित होतं की ते मनात येईल ते मला बिनदास सांगतील.त्यांचे अनेक लेख मी वाचले होते त्यावरून अनुमान मी काढलं होतं.

“दुसर्‍या कुठल्यातरी विश्वाच्या प्रवेशदाराशी मी ऊभा आहे अशी मी कल्पना करतो.त्या विश्वातलं अंत नसलेलं लांबच लांब मैदान बघून माझे डोळे दिपून जातात.त्या जगातल्या अतीशय खोल गहराईचा मी शोध घेत आहे अशी कल्पना करतो.जशी मी कल्पना करीन तसं ह्या जगात होत राहिलंय.

अनेक तर्‍हेचे जीव आणि इतर गोष्टी माझ्या अवतिभोवती निर्माण होत आहेत आणि त्यांचा लोपही होत आहे.मला भासतं की ह्या जगात मी माझ्या मनानेच यात्रा करीत आहे. ह्या साहसी विचारामुळे लेखन करण्यावर आणि लेखनावर विश्वास ठेवण्यावर मी प्रवृत्त झालो आहे.”
मला अपेक्षीत होतं तसं, महेंद्रानी मला बिनदास सांगून टाकलं.
असं म्हणून झाल्यावर मलाच त्यांनी विचारलं,
“तुम्ही केव्हां पासून लेखन करायला लागला.?”

“मला आठवतं,माझ्या शालेय जीवनात लेखन करीत असताना,मी स्वतःला शास्त्रज्ञ समजून फुलांचा सुगंध येणार्‍या सुगंधी सुपारीचा शोध लावला आहे आणि माझ्या वर्गातली सर्व मुलं तसली सुपारी तोंडात ठेवून चघळत आहेत,त्या आमच्या कोंदट वातावरणातल्या वर्गात फुलांचा सुगंध दरवळत आहे असं चित्र मनात आणून ,शब्द कानात ऐकून कागदावर लिहिण्याचा पहिला प्रयत्न मी केला होता.”
मी लागलीच त्यांना सांगून टाकलं.

माझं हे ऐकून महेंद्र मला म्हणाले,
“मी लेखनाला विशेष मानतो कारण मला माझं लेखन एका मोठ्या प्रवासाला नेत रहातं.कसलही लेखन, माझ्या आतून, माझ्या विचाराना,माझ्या भावनाना आणि माझ्या प्रतिभासाना,खेचून बाहेर काढतं.जे काही मी लिहितो त्यांने मी आनंदीत होतो.
मनातल्या मनात साहस करून, नंतर अंतर्धान पावून जाण्यात मिळणार्‍या क्षणात मी मौजमजा करू शकतो.”

“तुम्ही कविता पण लिहिता.मी तुमच्या कविता वाचल्या आहेत.तुम्ही कुठं तरी म्हटल्याचं मी वाचलंय,की तुम्ही अगदी लहानपणापासून कविता लिहित होता.तुमची पहिली कविता तुम्हाला आठवते का?”
मी महेंद्राना विचारलं.

“माझ्या आजीवर मी पहिली कविता लिहिल्याचं मला आठवतं.”
कोणती कविता हे आठवणीत आणण्यासाठी जरा नजर तिरकी वर करून थोडा विराम घेऊन मला म्हणाले.

“मग आठवत असेल तुम्ही ती कविता लिहायला कसे उद्युक्त झाला?”
मी कुतूहलाने त्यांना विचारलं.

“माझ्या आजीला स्मृतीभ्रम झाला होता.त्या रोगाशी तिने दोन हात केले.तिच्या निधनानंतर मी ही कविता लिहिली होती.ती लिहायला मला जास्त प्रयास पडला नाही.अगदी सहजपणे माझ्यातून माझं दुःख आणि मनातला उजाडपणा मी कागदावर लिहिला.माझी आजी स्वतंत्र वृत्तीची आणि खंबीर मनाची होती.माझी कविता ही माझ्यातर्फे तिला दिलेली श्रद्धांजलि होती.मी माझ्या मनात तिला कसं आठवून ठेवावं,असं तिला जे वाटत होतं ते
माझ्या आठवणीत रहाण्यासारखी ती कविता होती.
माझं हे लिखाण माझ्या दुःखावरचा उपाय होता.
“मी तुला आठवत रा्हीन,तुझं बलस्थान आठवत राहीन आणि त्याचबरोबर तुला झालेल्या वेदना विसरून जाईन” असाच काहीसा आशय त्या कवितेत होता.

लेखनाबद्दल मला विशेष वाटत असतं.लेखन करणं ही एक जादू आहे असं मला वाटतं.लेखन म्हणजे आत्म्याला उपचारात्मक दिलासा दिल्यासारखा आहे.माझ्या भावनाना बदल देण्याची लेखनात क्षमता आहे.माझं मन जेव्हा सैरभैर असतं तेव्हा मनात असणार्‍या भावना शब्दात उतरवून माझ्या शीरावरचं जड दडपण कमी केलं जातं असं मला वाटतं.कविता लिहूनही हे साध्य होतं.यशाबद्दल आणि सुखाबद्दल लिहूनही माझं मन आशेने आणि प्रेरणेने ओथंबून जातं.
लेखन सहज करता येतं असं काहीना वाटत असतं,माझे वर्ग मित्र मात्र लेखन करायला घाबरायचे.मी मात्र आशा करीत असतो की मी लेखन करून काहीतरी निर्मिती करावी.
इतर लेखक,जी काही निर्मिती करतात ती पाहून माझं मन उत्तेजीत होतं.”

मी त्यांना म्हणालो,
“मी ज्यावेळी लेखन करतो त्यावेळी मी मला स्वतःला जरा कमजोर झाल्यासारखा समजतो.जणूं एखादं अदृश्य, करणारं कवच माझ्यावरून काढून टाकलंय, मी अनादर आणि समालोचनासाठी उघडा पडलोय असं वाटतं.हे शब्द काहीसे वेदनादायक वाटतील.”

“मलाही तसंच वाटत असतं.”
महेंद्र मला म्हणाले.नंतर म्हणाले,
“जे स्वतःचे सुझाव दुसर्‍यासाठी पुढे आणतील, काळजीपूर्वक लेखाची छाननी करतील आणि अनुमान काढतील अशा लोकांच्या प्रतिक्षेत मी असतो.ते पण स्वतः लेखक असतात आणि मला त्यांच्याबद्दल मनस्वी आदर आहे. तसंच त्यांच्या हिम्मतीबद्दल आणि झळाळीबद्दल सुद्धा आदर आहे.”

माझ्या हातातलं पुस्तक पाहून मला महेंद्र म्हणाले,
“ही कादंबरी मी वाचली आहे.अप्रतीम लेखन आहे.तुमचं काय मत?”

“अलीकडेच मी ह्या लेखिकेची कादंबरी वाचायला घेतली आहे.तिने आपल्या लेखनात सुंदर आणि परिणामकारक शब्द वापरले आहेत.ही कादंबरी वाचत असताना मी माझ्याच वास्तविकतेच्या खोलात शिरण्याच्या प्रयत्नात राहिलो.प्रत्येक शब्द इतका खोलवर भिनतो की मला त्या शब्दांतून दुःखाची तीव्रता झोंबते.”
मी माझं मत दिलं.

ते म्हणाले,
“लेखन हेच माझं सर्व काही आहे, असं मला वाटतं.मला वाटतं लिखाण करणं ही एक सफर आहे,जादूची शक्ती आहे आणि संमिश्रीत साहसाचा प्रयत्न आहे.मला वाटतं माझं लेखन,मला जे हवंय,ते देऊ शकतं आणि माझ्या लेखनातून, मला जे हवंय, ते होऊ शकतं.”

एव्हडं म्हणून महेंद्र नाडकर्णी आणि मी उठलो.पुढच्या तासाचा विषय ऐकायला हजर रहाण्यासाठी आमचा सामाईक मित्र आम्हाला बोलवायला आला होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com