Sunday, August 1, 2010

स्वयंपाक कला.

“खाद्यपदार्थावरचं माझं प्रेम आणि स्वयंपाक कलेचं उच्चतम रूप लक्षात आणून,आणखी पदार्थांचा शोध घेण्यात, स्वयंपाक करण्यात आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यात मी मला कधीच अटकाव आणणार नाही.”
बबन कॉफी संपवीत म्हणाला.

त्यादिवशी कंपनीच्या कामाला म्हणून मी राजकोटला गेलो होतो.एक दिवस तिथे रहाण्याची गरज भासली होती.कंपनीच्या शिफारीशीतल्या एका होटेलमधे रात्र काढण्याची पाळी आली होती.
रात्रीचं तिथेच जेवायचं मी ठरवलं.कंपनीमधल्या बरोबरच्या सहकार्‍याबरोबर रात्री होटेलच्या मुख्य डायनींग हॉलमधे आम्ही गेलो.
जेवण फार चवदार होतं.आणखी काही चवी परिचयाच्या वाटल्या.चौकशी केल्यावर कळलं की होटेलचा मुख्य शेफ, स्वयंपाकी,मराठी होता.पुरणपोळ्या राजकोटमधे खायाला मिळणं हे एक कुतूहल होतं.म्हणूनच मी कोणी बनवल्या ह्याची चौकशी केली.
बबन कोचरेकर,हे नाव परिचयाचं वाटलं.म्हणून त्याची भेट घेण्याचं ठरवलं.
बबन दादरच्या कॅटरिंग स्कूल मधे शिकत होता हे मला माहित होतं.तोच की काय हे कुतूहल खरं ठरलं.मलाही त्याने ओळखलं.
खूप दिवसानी भेटल्यावर गप्पा मारायला उत येणं स्वाभाविक होतं.जेवण आटोपल्यावर रात्री एक एक कॉफीच्या कपावर गप्पा मारायचं ठरलं.माझ्याच रूममधे मी त्याला बोलावलं.

कॅटरिंगमधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर मुंबईत अनेक होटेलमधे बबन नोकरी करायचा.कधी कधी माझी त्याची एखाद्या होटेलमधे भेट व्हायची.तो राजकोटमधे ह्या होटेलात आल्यामुळे मुंबईत हल्ली त्याची माझी भेट झाली नव्हती.मला कळलं की मुंबईला कंटाळून नंतर तो दिल्ली,कलकत्यालाही थोडे दिवस काम करायचा.आणि आता राजकोटला त्याच्याच एका मित्राच्या मालकीच्या होटेलमधे मित्राच्या आग्रहामुळे येऊन काम करीत होता.

मित्राच्या होटेलचं बस्तान बसल्यावर मग तो कायमच्या विश्रांतीसाठी कोकणात जाऊन रहाणार होता.
कॅटरिंगचा अभ्यास करणं केवळ त्या कलेचा हव्यास म्हणून त्याने पत्करलं होतं.त्याचा एक भाऊ इंजीनयर होता, एकाचं कपड्याचं दुकान होतं.
बबनच्या आजोबाची कोकणात खानावळ होती.मला वाटतं त्याचं लहानपण आजोळी गेल्याने खानावळीच्या वातावरणाचे संस्कार त्याच्यावर झाले असावेत.
मी त्याला हाच प्रश्न केला.
“तुझ्या आजोबाचे संस्कार तुझ्यावर झाले असावेत ना?”

मला बबन म्हणाला,
“तुमचं अगदी बरोबर आहे.माझ्या आजोबांनी त्यांची खानावळ, जेव्हा त्यांना वय झाल्यावर झेपेना, तेव्हा बंद केली. आजोबांच्या खानावळीत सुधारणा करून आपण चालवावी हे माझं स्वप्नं होतं.पण प्राप्त परिस्थितीत ते काही जमलं नाही. म्हणून मी मुंबईत नोकरी पत्करली.”

बबनने पाकशास्त्राचा नुसता स्वयंपाक करण्याच्या दृष्टीने व्यवसाय पत्करला नव्हता.त्याच्याशी गप्पा मारीत असताना माझ्या नजरेतून हे निसटून गेलं नाही.बबन जात्याच हुशार होता.तो कविता करायचा.त्याने एक दोन कविता संग्रह छापले पण आहेत.मी जाण्यापूर्वी मला तो त्याचं एक पुस्तक देणार होता.

“जगात ना ना तर्‍हेच्या कला आहेत.तू म्हणतोस तू ही कला म्हणून शिकायचं ठरवलंस.तू जरा आणखी विस्ताराने बोलशील का?”

माझं बोलणं त्याला आवडलं.अगदी खूशीत येऊन बबन मला म्हणाला,
“रंगचित्रकारी आणि रेखाचित्रकारी ही डोळ्यांना उत्तेजक असते.
आपल्या शरीराची ही एक ज्ञानशक्ति किंवा संवेदना आहे.तसंच संगीत, श्रवणशक्ति कानाला उत्तेजीत करते.अंगाला मालिश केल्याने त्वचा उत्तेजीत होते.जवळ जवळ प्रत्येक कारीगरी कुठल्यातरी संवेदनेकडे केंद्रीत असते.

चित्रकार, आपण कसला आवाज काढतोय ह्याबद्दल चिंतीत नसतो.वाद्य वाजवणार्‍याला, आपलं वाद्य कसं दिसतं, ह्याची गाणं वाजवीताना चिंता करावी लागत नाही.ही सर्व मंडळी फक्त एकाच, संबंधीत ज्ञानशक्तिच्या चिंतेत असतात.
ह्या सर्व कला तशा कठीण आहेत.पण मला जी कला प्रिय आहे ती नक्कीच कठीण कला आहे.मला म्हणायचं आहे पाककला.ह्या कलेला सर्व ज्ञानशक्तिना आकर्षित करावं लागतं.ह्यामुळेच ही कला जरा जास्त प्रभावशाली असावी असं मला वाटतं.”

मला पाकशास्त्राबद्दल विशेष वाटतं.पाककलेत खाद्यपदार्थाना योग्य उष्णता देण्याइतकं सोपं आणि योग्य अशी रासायनीक क्रिया करून घेण्याइतकं कठीण असं जे काही असतं, त्याबद्दल मला विशेष वाटतं.स्वयंपाक्याला मुख्यतःखाद्यपदार्थ योग्य प्रकारे चवदार होईल ह्याबद्दल खात्री करून घ्यावी लागते. दुसरं म्हणजे तो पदार्थ दिसायला डोळ्यांना आकर्षक वाटला पाहिजे.नंतर पदार्थाचा सुगंध योग्य असला पाहिजे आणि नंतर त्या पदार्थाची बनावट पण तितकीच आकर्षित असायला हवी.
तसं पाहिलंत तर ह्यामुळे पाचापैकी चार ज्ञानशक्ति ह्या कलेत संमिलित होतात.”
मला बबनचं हे स्पष्टीकरण आवडलं.

मी म्हणालो,
“जरा विचार केला तर रंगचित्रकाराला नीळेची जास्त मिलावट करून त्याच्या चित्रावर कसा असर होईल ह्याची चिंता करावी लागेल.तर स्वयंपाक्याला,नारळाचं चून,उदाहरण म्हणून, घालून पदार्थाची चव कशी प्रभावित होईल याचा विचार,आणि बनावट,प्रतिकृति, आणि सुगंधाबद्दलचा विचार करावा लागेल.प्रत्येक सामुग्री सामाविष्ट केल्यावर पाककलेमधल्या समस्या लक्षात येतात हे तुझं म्हणणं मला पटतं.”
बबनला हे माझं स्पष्टीकरण आवडलं.

मला म्हणाला,
मी स्वयंपाक कलेचं आव्हान आनंदाने स्विकारलं. चुलीजवळची उष्णता,आणि गर्दीच्या वेळी घड्याळाबरोबरची चुरस मी आनंदाने झेलतो.थाळीत लागणारा प्रत्येक पदार्थ सामाविष्ट झाला आहे की नाही हे निक्षून पहाण्यात मला आनंद होतो. ठरावीक पदार्थ योग्य उष्णता देऊन तयार झाले की नाही ह्याकडे लक्ष देण्यातही मला हुरूप येतो. अशा तर्‍हेचं मला मग्न करणारं दुसरं कुठचंही काम विशेष वाटत नाही.
शिवाय,कुठच्याही स्वयंपाक कलेच्या जगतात काम करणं थोड्या थोड्या फरकाने प्रतीत होतं.ताजमहाल होटेल मधला स्वयंपाकी आणि मामा काण्यांच्या होटेलमधले स्वयंपाकी ह्यात नक्कीच फरक असतो.हा फरक केवळ खाणा‍र्‍याच्या चवीमुळे असतो.कुठचंच होटेल उच्च किंवा नीच असं मानण्याची गरज नाही.अगदी पदार्थांच्या सामुग्रीपासून ते पदार्थाला दिलेल्या उष्णतेपर्यंत लागणार्‍या कलेच्या आणि अनुभवाच्या क्रमबद्धतेत स्वयंपाक्याला तत्पर असावं लागतं.हे आणखी एक कारण पाककलेला वरचं रूप द्यायला कारणीभूत होतं.”

मी बबनला म्हणालो,
“तुझ्याकडून हे सर्व ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला की,पाककलेच्या अपरिमित कार्यक्षेत्रामुळे ही कला उच्चतम होऊन सर्वात आकर्षित राहिली आहे.हजारो वर्षापासून पाहिलंत तर खाद्यपदार्थाच्या स्वादाची आणि बनावटीची इतकी असंख्य मिश्रणं आहेत की कुणीही त्या कलेत पूर्णपणे प्रभावित झालेला दिसणार नाही.कुणीही आपल्याला सराव असलेले पदार्थ आठवून पाहिलं,आणि जगात मिळणार्‍या आणखी अनेक पदार्थांचा त्यात सामावेश करून पाहिलं तर खरीच मजा येईल.”

“खाद्यपदार्थावरचं माझं प्रेम आणि स्वयंपाककलेचं उच्चतम रूप लक्षात आणून,आणखी पदार्थांचा शोध घेण्यात, स्वयंपाक करण्यात आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यात मी मला कधीच अटकाव आणणार नाही.”
बबन कॉफी संपवीत म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com