Sunday, August 15, 2010

गोड पक्वान्न खाण्याची परिसीमा

मी माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि विषय संपवण्यासाठी म्हणालो,
“मात्र,प्रत्येक रात्री तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागेल.
आज कुठच्या गोड पक्वान्नाचा फडशा उडवूं? एव्हडंच.”

“कधी संपूच नये असं गोड पक्वान्न मला भारी आवडतं.एखाद्या मोठ्या वाडग्यात-मोठ्या वाटीत- चॉकलेट-चीपचं आईसक्रिम मला दिलं,आणि त्यातलं अर्ध जरी मी खाल्लं तरी माझ्या संवेदनाची पूर्ती करण्यासाठी,माझी गोड गोड खाण्याची अविरत इच्छा आणखी आणखी खाण्यासाठी आर्जव करायला राहूनच जाते.”
श्रीधर बडोदेकर मला पोटतिडकीने सांगत होते.

त्याचं असं झालं,मला माझ्या एका गुजराथी मित्राच्या मुलाच्या लग्नाला अहमदाबादला जावं लागलं होतं.लग्नात जबदस्त गोड-धोड जेवण असणार याची मला खात्री होती.मला गोड पक्वान्न आवडतात पण आज मी श्रीधर बडोदेकरना गोड खाताना पाहून अचंबीत झालो.पहिल्या पंगतीत माझ्या शेजारीच श्रीधर बसले होते.
गुलाब जांब घेऊन जेव्हा वाढपी आला तेव्हा श्रीधरने त्याचं हातातलं भांडच काढून घेतलं.आणि माझ्याकडे बघायला लागले. मी त्यांच्याकडे कुतूहलाने बघतोय असं बघून मला म्हणाले,
“माझ्या रोज गोड खाण्याला चटावलेली माझी जीभ,लोभी होऊन माझ्या कानात जेव्हा फुसफूस करते तेव्हा सरतेशेवटी मी आणखी एक जेवणाचा हाप्ता घ्यायला प्रवृत होतो.”

श्रीधर तसे प्रकृतिने बारीकच होते.
“एव्हडं गोड खाणारा माणूस एव्हडा बारीक कसा?”

असा प्रश्न माझ्या मनात येण्यापूर्वीच मला म्हणाले,
“माझं हे ऐकून तुमच्या मनात माझ्याबद्दल लठ्ठ व्यक्तिची छबी तयार होणार हे नक्कीच पण माझी आश्चर्यजनक पचनक्रिया माझ्या शरीरयष्टीवर ताबा ठेवते,निदान मी मध्यवयावर येई तोपर्यंत तरी.
त्यामुळे मी त्या अनिवार्य दिवसाचा विचारच करत नाही,की ज्या दिवशी माझी पचनक्रिया मंद होत जाईल आणि माझ्या खाण्याच्या यादीतून गोड पक्वान्न अन्यायपूर्ण ढंगाने जबरदस्तीने काढलं जाईल.”

जेवण झाल्यावर आम्ही दोघे उठून आमच्या खोलीत गप्पा मारायला गेलो.
मी त्यांना बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“मला नेहमीच वाटतं की गोड पक्वान्न हा एक जगातला सर्वात महत्वाचा खाण्याचा प्रकार आहे.”

हंसत,हंसत श्रीधर मला म्हणाले,
“माझ्या बाबतीत विचाराल तर गोड पक्वान्न म्हणजे
“थाळीतला हृदय-झटका”
म्हटलं तरी चालेल.
रेफ्रिजरेटर मधून काढलेलं चमच्या भोवती थलथलणारं चॉकलेटचं आईसक्रिम पासून डब्यात ठेवलेले निरनीराळ्या प्रकारचे गोड लाडवाचे प्रकार-कडक बुंदीचे,मऊ बुंदीचे,रव्याचे,बेसनचे लाडू किंवा राघवदास,किंवा खास बाळंतीणीसाठी डिंक घालून केलेले लाडू पाहिल्यावर मला अपरिमीत आनंद होत असतो. माझ्या जीभेचा गोड चवीचा भाग प्रत्येक चाखण्याच्या क्रियेबरोबर एव्हडा चकीत होत असताना जो माझी ह्या गोडखाऊ शौकाशी एकमत होत नाही त्याला समजावून सांगणंच मला कठीण जातं.

दुसरं काहीच नाही,एव्हडंच काय,धो,धो पावसात बिछान्यावर बसून शरीराभोवती उबदार पांघरूण लपेटून गरम गरम भज्याची चव घेण्यातसुद्धा,मला जास्त सुखदायी वाटणार नाही, जेव्हडं गोड खाण्यात वाटतं.”

मी श्रीधरला जरा धीर करून विचारलं,
“माझ्या सारखा विशेष गोड न आवडणारा माणूस तुमच्या शेजारी पंगतीत बसतो.तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?”

“लाज-भीड न ठेवता ज्यावेळी मी क्षणार्धात गोड पक्वान्नाचा फडश्या उडवतो,ज्याकडे लोक पहिली आणि शेवटची थाळी आहे असं समजतात, त्यावेळी त्यांना माझ्या गोड खाण्याच्या भुकेच्या मापाचं पूर्णपणे आकलन होत नसावं. ब्रम्हांडातल्या ब्लॅक-होलला आजुबाजूचं चक्रदार तारांकुंज गीळंकृत करून त्याचं होतं नव्हतं करून,रितंच राहिल्यासारखं वाटावं तसंच काहीसं गोड पक्वान्न खाल्यावर मला वाटतं.गंमत म्हणजे हे माझं विशिष्ट लक्षण मला तर्कदृष्ट्या निष्कर्शाला आणतं की मला आणखी खायची जरूरी आहे.”
मला श्रीधरने सांगून टाकलं.

मी श्रीधरना म्हणालो,
“खूप गोड खाऊन मला जेवणच नकोसं होतं.तुमचं असं कधी होत नाही काय?”

“काय सांगू तुम्हाला?”
असं म्हणत श्रीधरने गोड पानाचा विडा आपल्या तोंडात कोंबला आणि मला पण दिला.पान चघळत,चघळत मला म्हणाले,
“माझी गोडखाऊ जीभ कधीच तृप्त नसते. अगदी मनोमनी सांगायचं झालं तर गोड खाऊन माझं पोट भरल्यासारखं मला कदापीही वाटणार नाही.
जेव्हा एखादा,अशा व्यापक संतुष्ट करणार्‍या गोष्टीत आनंद घेतो,तेव्हा तो वेळकाळाचं ध्यान,माझं-तुझं,असल्या भौतीक जगाशी आणि जीवनाशी संबंधीत असलेल्या समस्या विसरून जातो.
पण जर का एखाद्याला अशावेळी खरंच दुःखी आणि उदास वाटलं तर नक्कीच त्याला मदतीची जरूरी असावी असं मला वाटतं.माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही पण जगातलं उष्णतामान वाढतंय,स्टॉक मार्केट पडतंय,सांपत्तिक परिस्थिती डबगायला आली आहे वगैरेवर एकच उपाय-गोड पक्वान्न.”

“कठीण आहे बुवा!”
मी पान खाऊन झाल्यावर,बेसीनमधे तोंड साफ करून आल्यावर त्यांना म्हणालो.

“काही कठीण नाही”
श्रीधरनी मला सांगून टाकलं.तोंडात पान ठेवूनच मला सांगू लागले.
“फ्रिझमधलं थंडगार चॉकलेट-आईसक्रिम,डब्यात ठेवलेले सर्व प्रकारचे लाडू,साखरेच्या थंड पाण्यात मुरलेले गुलाबजाम,केशर घातलेली श्रीखंड-बासुंदी, खसखस पेरलेले कुरकूरीत आनारसे,दुपदरी लाटलेल्या साखर पेरलेल्या चिरोट्या हे माझं चौथ्या हाप्त्यातलं जेवण.हे खाऊन मी अनिश्चित काळ, कसल्याही प्रकारच्या आहाराच्या सहाय्याविना माझं अस्तित्व टिकवून ठेवीन.”

मी माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि विषय संपवण्यासाठी म्हणालो,
“मात्र,प्रत्येक रात्री तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागेल.
आज कुठच्या गोड पक्वान्नाचा फडशा उडवूं? एव्हडंच.”

माझ्या ह्या वाक्यावर श्रीधरना हंसू आवरेना.पान घशात अडकेल म्हणून बेसीनकडे थुंकायला जात जात मला म्हणाले.
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं सांगीतलं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com